पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळते. त्या काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली जात असे. नंतर तिचा उपयोग रंगकामासाठी होऊ लागला आणि यानंतर मात्र तिने मसाल्याच्या डब्यात हळद पावडरच्या रुपाने उडी घेतली. हळदीची औषध, रंग आणि मसाल्याच्या पदार्थांतील वापरामुळे मागणी वाढली आणि शेतीक्षेत्रात तिचा प्रवेश झाला. पिवळ्या रंगामुळे हळद काश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरसाठी पर्याय ठरली. केशराची जशी शेती तशी हळदीची का नको? म्हणून भारतीय जंगलात आढळणारी हळद आणि श्रीलंकेच्या जंगलातील हळद यांचा संकर झाला आणि शेतीसाठी हळदीचे पहिले वाण तयार झाले.
भारतामध्ये ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये हळदीचे पीक शेतीचे मुख्य उत्पादन म्हणून घेतले जाते. सर्वात जास्त हळदीची लागवड तमिळनाडूमध्ये होते. भारताबाहेर ती बांग्लादेश, श्रीलंका आणि चीनच्या मध्य भागात जास्त पिकते. केरळ हे राज्य आर्युवेदशास्त्र आणि प्रचारात कायम आघाडीवर राहिले आहे आणि म्हणूनच हळदीस या राज्यात सर्वात जास्त सन्मान प्राप्त झाला. हळदीचे वाण विकसित करताना त्याच्यामध्ये असलेले करक्युमिन या औषध द्रव्यांचे प्रमाण तपासले जाते. प्रामुख्याने हळदीचे दोन वाण शेतीसाठी वापरतात. एक आहे अलप्पी वाण ज्यामध्ये करक्युमिनचे प्रमाण साडेसहा टक्के असते व दुसरे मद्रास वाण. यामध्ये हेच प्रमाण साडेतीन टक्के असते. अलप्पी हे औषधासाठी तर मद्रास वाण खाण्यासाठी जास्त वापरतात.
हळद ही वनस्पती एकदल विभागात मोडते. तिचे शास्त्रीय करक्युमा लोंगा आणि झिंझेबरेसी या वनस्पतीशास्त्राच्या कुळामध्ये मोडते. हळदीच्या रोपांची उंची अंदाजे नव्वद सेंमी म्हणजे तीन फूट असते. त्याची पाने मोठी असून संख्या मर्यादित असते. हळदीच्या पानांचा आकार कर्दळीच्या पानासारखा लांब, अंदाजे एक मीटर असतो. हळदीस मध्यभागी फुलांचा गुच्छ येतो. फुले पिवळी, पांढरी असतात. मात्र यामध्ये परागसिंचन होत नाही म्हणून या वनस्पतीस बी अथवा फळ येत नाही. या वनस्पतीचे उत्पादन खोडांच्या रुपांतरीच भागाकडून होते. यालाच ओले हळकूंड म्हणतात.
हळदीची शेती समुद्रसपाटीपासून बाराशे मीटर उंचीपर्यंत करता येते. म्हणजेच ती केरळाला पिकते आणि सिक्किममध्ये सुद्धा. हळदीसाठी भरपूर पाणी असलेली, पण पाण्याच्या निचरा होणारी जमीन हवी. झाडाची लागवड हळदीच्या कंदापासून करतात. कंदाला एक दोन कोंब हवेत. हळदीच्या लागवडीसाठी जमिन भूसभूशीत, वाळूचा अंश असणारी, काळी अथवा चिकनमातीची असावी. एक वर्ष जुना कंद लागवडीस योग्य असतो. या कंदाचे चार-पाच समप्रमाणात तुकडे केले जातात. त्या तुकड्यास दोन कोंब असतात. शेणखत घालून तयार केलेल्या जमिनीत ठराविक अंतरावर दोन ते तीन इंच खोल जाईल अशा पद्धतीने कंदाचे तुकडे लावले जातात. त्यावर माती व्यवस्थित टाकून लगेच पाणी दिले जाते. हळदीच्या पीकाला आठ ते नऊ महिन्यांचा अवधी लागतो. लावणी शक्यतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केली जाते. पीक तयार होण्यास आठ ते नऊ महिने लागतात. जेव्हा खालची पाने पिवळसर होतात तेव्हा हळदीचे कंद जमिनीखाली तयार झाले असे समजावे. जमिनीखालील हळद यांत्रिक पद्धतीने काढली जाते. ती हळद स्वच्छ करुन मोठ्या टाकीत शिजवली जाते. त्यानंतर तिला योग्य पद्धतीने वाळवतात. सध्या या प्रक्रियेमध्ये अटकलीचा वापर होत आहे. वाळवलेल्या हळदीच्या कंदापासून हळद पावडर तयार करतात.
हळदीचा सांस्कृतिक आणि औषधी प्रवास मोठा आहे. हिंदू धर्मसंस्कृतीच्या स्थापनेपासूनच ती या प्रवाहात आहे. हळदीचे सांस्कृतिक उपयोग भारताच्या उत्तर भागात, आर्य संस्कृतीमध्ये तसेच दक्षिण भागातील द्रविड संस्कृतिमध्ये समप्रमाणात आढळतात. हिंदूूचे प्रत्येक सण, उत्सव आणि विधी यांमध्ये हळदीचा वापर केला जातो.
हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते. सुपारीस गणपतीचे स्वरुप समजून त्यावर हळद वाहिली जाते. यामुळे कार्य र्निविघ्न पार पाडते असे समजतात. हळद आणि हळदीमध्ये कापूर मिसळून कुंकू तयार केले जाते. या दोन्हीही लाल-पिवळ्या रंगाना हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे. हळदीचा रंग पिवळा. तो रंग वाईट दृष्टी प्रवृत्तीपासून घर आणि घरातील व्यक्ती यांचे संरक्षण करतो असे मानले जाते. वास्तूला दृष्ट लागू नये म्हणून हळकूंड बांधून ठेवतात ते याच कारणामुळे. प्रातःकाली घरासमोर सडा टाकून, रांगोळी काढली जाते व त्यावर हळद व हळदीपासून तयार झालेले कुंकू टाकले जाते. उद्देश हाच, की घर उघडल्यावर कुठलीही वाईट गोष्टी घरात येऊ नये. जेवताना सुग्रास भोजनास नजर लागू नये म्हणून सभोवती हळद कुंकवाची रांगोळी घालतात. देव-देवतांच्या स्पर्शाने इच्छापूर्ती व्हावी म्हणून देवतांच्या मूर्तीना हळदमिश्रित पाण्याने स्नान घातले जाते. या मागचा उद्देश देवत्वाची खरी ओळख व्हावी हा आहे.
हळदी ही सौख्य आणि भरभराटीची खूण समजली जाते. वधूवरांना लवकर संतती व्हावी यासाठी, तसेच दोघेही एकमेकास अनुरुप आहेत हे दर्शवावे यासाठी लग्नसमारंभात वधूवरांच्या हातात कंकणाच्या स्वरुपात हळकूंड बांधले जाते. वधूवरांमध्ये मंगलाष्टकांच्या वेळी धरण्यात येणारा अंतरपाटसुद्धा हळदीत भिजवलेला असावा असे म्हटले आहे. मामांच्या पिवळ्या साडीबद्दल आणखी वेगळे काय लिहिणार?
दक्षिणेत हळदीस खूपच महत्त्व आहे. तेथे हळदीच्या पाण्यात शिजवलेले अन्न अतिशय शुद्ध समजले जाते. प्रतिवर्षी चौदा जानेवारीस साज-या केल्या जाणा-या ‘पोंगल’ या सणामध्ये हळदीचे झाड कंदासह शेतातून घरी आणले जाते व त्याची पूजा करतात. पोंगल पात्रास हळदीचे झाड बांधून आतमध्ये शिजवलेले अन्न पवित्र प्रसाद म्हणून सेवन केले जाते. हळदीच्या स्पर्शाने तयार झालेले अन्न खाल्ल्याने वर्षभर कुणीही आजारी पडत नाही असे मानले जाते. पोंगल सणादिवशी हळदीचे झाड सूर्यदेवतेस अर्पण करुन शरीराच्या विविध भागातील उर्जाचक्रामध्ये भरपूर उर्जा साठवण्याचा कार्यक्रम दक्षिण भारतात केला जातो.
हळकूंड हे उर्जा आणि शुद्धीकरणाचे प्रतिक मानले जाते. दक्षिण भारतात लग्न झालेल्या स्त्रिया गळ्यामध्ये मंगळसूत्राच्या आधी लहान हळकूंड बांधतात. देवाला हळद कूंकू वाहणे, सौभाग्यवती स्त्रीने हळदकूंकू लावणे या दोन्हीही विधीमध्ये हळदीस प्रथम प्राधान्य दिलेले आढळते. यामध्ये शुद्धतेला, सौख्याला आणि भरभराटीस प्राधान्य दिलेले आढळते. ज्या घरी गोकूळ नांदते तेथे नेहमी हळदी कुंकवाचा सडा टाकला जात असे. विड्याचे पान आणि त्यावर हळकूंड हे हिंदू संस्कृतीमध्ये शुभशकूनाचा संदेश समजला जातो. ‘घरामध्ये संतती आणि संपतीची भरभराटी होऊ दे’ अशा अर्थाचे ते संकेत असत. आजही सर्व सण, समारंभ, रीतीरिवाज, उत्सव, लग्नकार्य, पूजाविधी आणि यात्रेमध्ये हळदीचे महत्त्व कायम आहे. काळाच्या ओघात, संगणकाच्या युगात, लोकल प्रवासात हळद-कुंकू ऐवजी टिकली आली, एकदिवसाच्या लग्नकार्यामुळे हळद लावण्याची राहून गेली आणि लोक काय म्हणतील म्हणून हातातले बांधलेले हळकूंड आणि सोबतचा पिवळा धागा हरवला.
हळदीच्या सांस्कृतिक प्रवासास विज्ञानाचा फार आधार नसला तरी तिच्या औषधी गुणास आधुनिक वैद्यकशास्त्राने दुजोरा दिला आहे. चरक आणि शुश्रृत यांनीदेखील हळदीच्या औषधी गुणधर्मांच्या नोंदी त्यांच्या संहितांमध्ये केलेल्या आढळतात. हळदीचे औषधी गुणधर्म तिच्या जमिनीखालील कंदामध्ये आढळतात. ओला आणि वाळलेला कंद म्हणजेच हळकूंड आणि हळदपावडर यामध्ये गुण समान असतात. त्याचे कारण करक्युमिन या द्रव्यामुळे. ते द्रव्य पिवळसर रंगाचे स्फटिक रुपात असते. त्या द्रव्याचे प्रमाण वाळलेल्या कंदामध्ये तीन ते पाच टक्के असते. आजीबाईच्या बटव्यात हळद ही असलीच पाहिजे. मनुष्याच्या अनेक रोगांवर आणि उपचार पद्धतीमध्ये हळदीचा अंर्तभाव असल्यामुळे हळदीला घरातील धन्वंतरी म्हणतात.
हळद ही रक्त शुद्धिकरणाचे कार्य करते. रक्त शुद्ध झाले म्हणजे शरीर शुद्ध राहते. फुप्फुस स्वच्छ करुन रक्तास प्राणवायुचा पुरवठा करण्याचे काम हळद करते. चेहऱ्यावर येणारे लहान फोड, तारुण्य पुटीका रक्तदोषामुळे होतात. हळदीच्या वापरामुळे त्या तक्रारी दूर होतात. यकृत हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आणि हळद ही यकृत रोगावर रामबाण औषध आहे. वसंत ऋतूमध्ये भरपूर हिरव्या भाज्या आणि हळद घालून अन्न सेवन केले असता यकृत निरोगी राहते. काविळ हा आजार यकृताशी जोडलेला आहे. या आजारात हळदीचे सेवन अवश्य करावे.
हळद भूक वाढवते. भात आणि कडधान्य अथवा घट्ट वरण यांमध्ये हळद मिसळली असता पचन लवकर होते. म्हणूनच वरणात हळद घालतात. सायंकाळी हलके अन्न म्हणून अनेकवेळा हळद टाकून खिचडी करतात. हळदीमुळे पोटातील वायू कमी होतात. हळद जठररस वाहक नलिकेस उत्तेजित करते. त्यामुळे जठराग्नी प्रज्वल्वित होतो आणि अन्नाचे पचन लवकर होते. पोटात गॅस तयार होऊन अपचनामुळे गुबार तयार होतो. हळद त्यावर उत्तम औषध आहे. यकृतामध्ये तयार झालेले पित्त हे पित्तनलिकेमधून पित्ताशयामध्ये जमा होते. या जमा झालेल्या पित्तामुळे शरीरातील स्निग्ध पदार्थांचे लवकर पचन होते. या क्रियेमध्ये हळदीमधील करक्युमिन हे द्रव्य प्रेरक म्हणून कार्य करते. हळद घालून केलेला आहार जेवणानंतर थकवा निर्माण करत नाही.
हळदीमुळे रक्तातील चरबी कमी होते. त्यामुळे ह्दयरोगांवर नियंत्रण ठेवता येते. शरीरात रक्त वाहिन्याचे जाळे असते. अनेकवेळा या वाहिन्यांना आतून लहान जखमा होत असतात व त्या दुरुस्त करण्यासाठी त्या ठिकाणी प्लेटलेटची गर्दी होते. या गर्दीमुळे अनेकवेळा क्लॉट तयार होऊन रक्त प्रवाहात अडथळा येतो. हळदीमुळे प्लेटलेटची गर्दी एका ठिकाणी थांबून राहत नाही. धमण्यातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. रक्तवाहिन्याच्या आतील पटलावर तेलाचे थेंब जमू न देण्यामध्ये हळदीचा मोठा वाटा आहे. आपल्या आहारातून चांगल्या चरबीबरोबर वाईट चरबीही पोटात जाते. या वाईट चरबीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हळद करते. थोडक्यात ह्रदयरोगासाठी अद्यावत रुग्णालयाच्या पायऱ्या चढण्यापेक्षा त्यापासून संरक्षण देणारा धन्वंतरी आपल्याच घरात देवघराजवळ असतो हे माहित असणे सर्वांना गरजेचे आहे.
गुडघेदुखी, सांधेदुखीच्या वेदना पिडीत व्यक्तिलाच माहित! हळदीचा औषध म्हणून केलेला उपयोग त्या वेदना कमी करते. स्त्रियाच्या रजोनिवृत्तीच्या काळात शरीरांमध्ये संप्रेरकांचे स्थितंतर चालू असते आणि याच कालावधीत स्तनाच्या कर्करोगाची शक्यता जास्त असते. संशोधनाने असे सिद्ध झाले आहे, की या कालावधीत स्त्रीने आहारात हळदीचा वापर जास्त वाढवला तर कर्करोगावर नियंत्रण मिळवता येते. त्याचबरोबर स्वभावातील चिडचिडपणासुद्धा कमी होतो. रजोनिर्मितीच्या काळात स्त्रियांना पोटात दुखणे, पोटात कळ येणे असे वारंवार घडते. दोन आठवडे आधी हळदीचे सेवन केले असता यावर नियंत्रण ठेवता येते.
हळद ही गर्भाशयास प्रेरक म्हणून कार्य करते. नऊ महिन्यानंतर हळदीचे प्रमाण वाढवल्यास गर्भाशय योग्य प्रमाणात प्रसरण पाऊन सुखरुप प्रसूती होते आणि प्रसूतीमध्ये वेदनाही कमी होतात.
रक्तात मोठ्या प्रमाणावर प्राणवायू जमा करण्यामध्ये हळदीचा वाटा मोठा आहे. धुम्रपान शौकिनाच्या रक्तात कायम प्राणवायूची कमतरता असते. हळदीमुळे त्यांना आराम मिळू शकतो. हळदीचे असे कितीतरी बहुमोल औषधी गुणधर्म आहेत जे आर्युवेद, युनानी आणि सिद्धा औषधी प्रणालीमध्ये तावून सुलाखून निघाले आहेत आणि आता त्याला अॅलीपॅथीचाही मजबूत आधार मिळाला आहे. हळद ही अतिशय बहुगुणी, बहुमोल आणि सहज प्राप्त होणारी औषधी आहे. मात्र तिचा विशिष्ट रोगावरील वापर आर्युवेद तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करणे जास्त उपयोगी ठरू शकते.
– डॉ. नागेश टाकळे
Last Updated On – 19th Jan 2017
आपण खुप चांगली माहिती दिली
आपण खूप चांगली माहिती दिली आहे .
छान माहिती आहे .
छान माहिती आहे .
Really very useful and…
Really very useful and interesting information
खरच उपयुक्त व छान महिती आहे…
खरच उपयुक्त व छान महिती आहे .
छान व सोप्या भाषेत असले…
छान व सोप्या भाषेत असले पुर्ण महिती मिळाली
एक प्रश्न
उकडलेली हळद पुन्हा लावता येते का?
अत्यंत सोप्या मोजक्या भाषेत…
अत्यंत सोप्या मोजक्या भाषेत हळद किती प्रभावी औषध आहे सांगितलं..धन्यवाद डॉक्टर. : श्वेता विशाल मुखेकर
Comments are closed.