हलगी नावाचे चर्मवाद्य

1
516
-halgi

हलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे. हलकारा देणे म्हणजे सांगावा पुढे जाणे. हलकारा हा शब्द हलगीतून आला असावा.

हलगीवादनाचा विशिष्ट ठेका किंवा ताल माणसाला नृत्य करण्यास भाग पाडतो. हलगीवादन किंवा त्या वाद्याचे श्रवण वाजवणारा व ऐकणारा यांच्या मनाला, शरीराला प्रसन्नता आणते. हलगीवादनासाठी टिपरू आणि छोटी लवचीक काडी वापरली जाते. लवचीक काडी मधुर आवाज काढत असते, तर टिपरू मोठा स्वर काढत असते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये डीजे आणि बँजो वगैरेंमुळे हलगीवादनाची कला दुर्लक्षित होत आहे;  तरीही हलगीला मोठी मागणी यात्राकाळात, तसेच गणेशोत्सवात व देवदेवतांच्या इतर उत्सवांत असते (उदाहरणार्थ लग्नसराई, मोहरम, आषाढातील देवदेवतांच्या यात्रा). हिंदू आणि मुस्लिम, दोन्ही समाजाच्या यात्रा-उत्सव काळात हलगीला महत्त्व आहे. हलग्यांना (हलगी वाजवणारे) मिरवणूक काढताना किंवा निवडणुकांच्या काळात मागणी जादा असते. हलगी ही लेझीम, झांज अशा इतर वाद्यांच्या साथसंगतीसाठीसुद्धा महत्त्वाची असते. लेझीम तर हलगीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तसेच, झांजपथकसुद्धा हलगीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

आंदोलनांच्या वेळीसुद्धा हलगी असते. काही आंदोलने हलगीआंदोलने म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते रणवाद्यही मानले जाते. भैरोबा व ज्योतिबा या देवतांच्या यात्रेतील उत्सवप्रसंगी जी चाल वापरली जाते तिला कावडीची चाल असे संबोधले जाते. कुस्तीच्या प्रसंगी हलगी वाजवतात. पैलवानांना स्फुरण येण्यासाठी हलगीवादन केले जाते. कुस्तीच्या फडात जी चाल वाजवली जाते तिला मर्दानी असे म्हटले जाते.

हलगीवादनासाठी काही गावे प्रसिद्ध आहेत. करमाळा तालुक्यातील काही गावांत हलगीचे वाद्यवृंद आहेत. तसाच वाद्यवृंद केम या गावात आहे. त्या गावातील हलगी नागराज मंजुळे यांनी ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटात दर्शवली आहे. त्या गावातील नंदकुमार ढावरे यांचे हलगीवादकांचे ग्रूप आहेत. त्या लोककला जपण्यासाठी काही कलावंत अशी पारंपरिक वाद्ये वाजवून कार्यरत असतात. करमाळा शहरात राहणारे शाहीर बन्सीदादा कांबळे हे त्यांपैकी एक होत. शाहीर बन्सीदादा हे ज्येष्ठ शाहीर आहेत. त्यांना अनेक संस्थांचे; तसेच, शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत. ते भेदिक व सवाल-जवाब असे शाहिरी कार्यक्रम करत असतात. त्यांचे पुत्र नंदू बन्सी कांबळे हेही त्यांना त्यांच्या वादनासाठी साथ देत असतात. ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत खेड्यापाड्यात, यात्रेत हलगी वाजवण्यासाठी जात असतात. शाहीर बन्सी यांनी काही कलाकार घडवले आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाचे प्रमोशन हलगी वाजवून करण्यात आले होते. त्यावेळी शाहीर बन्सी कांबळे व इतर सहकारी यांनी हलग्या वाजवून मिरवणूक साजरी केली होती. करमाळा तालुक्याचे दिवंगत आमदार; तसेच, राज्यमंत्री कै. दिगंबरराव बागल मिरवणुका व कार्यक्रमांच्या वेळी हलगी वाजवायचे.

अनेक जुन्या-नव्या मराठी सिनेमांमध्ये हलगीने प्रभुत्व मिळवलेले दिसून येते. संगीतकार आणि गायक अजय-अतुल यांनीही हलगीसारख्या पारंपरिक वाद्यांचा उपयोग केला आहे.

हलगी हे डफासारखे पण त्याच्याहून लहान असते. त्याचा आकार सामान्यपणे ताटाएवढा असतो. लाकडी किंवा लोखंडी पट्टीचे कडे एका बाजूने कातड्याने मढवून हलगी बनवतात. हलगीने वाद्य मेळ्यात कडाक्याचा रंग भरतो. हलगी पूर्वी चामड्याची बनवली जात असायची. परंतु चामडे महाग झाले आहे. त्यामुळे चामड्याऐवजी फायबर कागद वापरून हलगी बनवली जाते. चामड्याच्या हलगीचा आवाज आणि फायबरच्या हलगीचा आवाज यांमध्ये थोडा फरक आढळून येतो. ती छातीवर डाव्या बाजूला उभी धरून तिच्यावर उजव्या हाताच्या थापा देत ती वाजवतात. हलगीला ‘कडे’ असेही म्हणतात. तमाशाचा मुख्य नायक ती वाजवतो म्हणून त्याला ‘कडेकरी’ म्हणतात. हलगी हे वाद्य वापरण्यास हलकेफुलके असून, वादनासाठी त्यावर विशिष्ट टिपरू किंवा बारीक छोट्या लवचीक सड्या वापरल्या जातात. गावातील हलगीवादनाचे ग्रूप किंवा वाद्यवृंद यांना इतर गावांतून विशिष्ट कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले जाते. त्यावेळी ते त्यांचे मानधन ठरवून त्या कार्यक्रमासाठी त्यांची ‘सेवा’ पार पाडत असतात.

शाहीर बन्सी म्हणतात, “हलगी वाद्याच्या विविध चाली आहेत. उदाहरणार्थ कावडीची चाल, लावणीची चाल, लाठीकाठीची चाल, पोतराज किंवा देवीच्या गाण्याची चाल वगैरे. तशाच प्रकारे, सोलापुरी चाल, कोल्हापुरी चाल, पंढरपुरी चाल अशा काही गावांच्या नावानेही चाली प्रसिद्ध आहेत. त्यात धुमाळी आणि लगातार ही चाल मोठ्या प्रमाणात वाजवली जाते. तसेच, स्थळ आणि प्रसंग बघून वेगवेगळ्या चाली वापरल्या जातात. कार्यक्रमाशी सुसंगत राहवे असा तो विचार असतो.”

हलगीच्या नावाने काही गाणी पुढे आलेली आहेत. गायक साजन बेंद्रे यांचे ‘बोल मे हलगी बजाऊ क्या’ हे गाणे खूप गाजले. परंतु हलगीचे उल्लेख असलेली ही गाणी डिजेवर वाजवली जातात. म्हणजे गाणे हलगीचे पण वाजते डीजेवर! हलगी वाद्य व त्यांचे वादक कलाकार प्रासंगिक महत्त्व वगळले तर अशा तऱ्हेने दुर्लक्षित होत आहेत.

–  हरिभाऊ हिरडे 88881480
haribhauhirade@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. लेख वाचून हलगीचा आवाजच…
    लेख वाचून हलगीचा आवाजच कानात घुमायला लागला.

Comments are closed.