हरहुन्नरीपणा हा अत्रे खानदानाचाच गुण
आचार्य अत्रे यांचा जीवनपट पाहिला तर अरेबियन नाईट्सच्या कथाही ख-या घडल्या असाव्यात असे वाटू लागते. त्यांनी एका क्षेत्रातून दुस-या क्षेत्रात इतक्या सहजपणे प्रवेश केला आणि त्या क्षेत्रावर आपली हुकूमत गाजवली ती पाहता अचंबा वाटतो. त्यांनी शिक्षण, नाट्य, चित्र, राजकीय, वृत्तपत्र, अशा सर्व क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्त्वाने मानबिंदू निर्माण केले.
आचार्य अत्रे यांनी केलेले अचाट आणि अफाट पराक्रम पाहिले की त्यांच्यामध्ये हरहुन्नरीपणा आला कसा? हा प्रश्न पडतो, पण ‘क-हेचे पाणी’ वाचताना त्याची उत्तरे मिळतात. त्यांचे आजी, आजोबा, वडील आणि आईच्याकडून आलेले गुण यांचे काही संदर्भ मिळतात. आणि अनुवंशशास्त्रातील गुण व गुणांच्या संक्रमणाची खात्री पटते. आचार्य अत्रे आपल्या आजोबांविषयी सांगतात, ”माझ्या आजोबांना बुध्दी तशी बेतास बात होती. पण ते मोठे हरहुन्नरी होते. ते हाताने शाडूचे गणपती अतिशय छान बनवत. त्यांनी एक कडू भोपळा आणून त्यापासून एकतारी बनवली होती. त्या एकतारीवर ते भजने म्हणत बसत.”
ते आपल्या आजीविषयी सांगताना म्हणतात, ”माझी आजी अंगाने धिप्पाड होती. सारे सासवड तिला निरूकाकी म्हणून ओळखत असे. तिचा घरात आणि घराबाहेर दरारा असे. ती डोक्यावर गाठोडे घेऊन रात्री-अपरात्री बेधडक गावोगावी जात असे. चोरचिलटे तिच्या खिजगणतीत नसत. गावातल्या सार्वजनिक जेवणावेळी किंवा पापड-कुरडया बनवण्याच्या कर्तेपदावर तिची नेमणूक केली जायची. एकूणच, ती घरच्या कामांपेक्षा बाहेरच्या उठाठेवी करण्यात गुंतलेली असायची. एखाद्या विधवेचे पाऊल वाकडे पडले आणि तिला काही दिवस गेले तर आजी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असे.”
ते आपल्या आईविषयी म्हणतात, ”माझ्या आईचा गळा अतिशय गोड होता. ती आणि तिच्या मैत्रिणी जमल्या की त्या आईला गाणी म्हणायला सांगत.”
ते आपल्या वडिलांविषयी-केशवराव अत्र्यांविषयी सांगतात, ”माझे वडील धाडसी होते. त्यांचा सासवड गावात दरारा होता. ते येताना दिसले की रस्त्याच्या कडेला बसलेली पोरे पळून जात, पाणवठ्यावर कचाकचा भांडणा-या बायका गप्प बसत. घरात ‘भाऊ आले’ म्हटले की सगळे वातावरण चिडीचूप होत असे. ते आजोबांच्या मोतिबिंदूच्या ऑपरेशनसाठी मुंबईला गेले असताना पोलिसात भरती झाले, दुखण्यापायी त्यांना ती नोकरी सोडून सासवडला जावे लागले. त्यानंतर त्यांनी ‘व्ही एल अण्ड सन्स’ नावाने शाईच्या पुड्या बनवण्याचा उद्योग केला. ‘सासवड इंग्लिश स्कूल’ नावाची शाळा काढून पाहिली. शेवटी, ते सासवड म्युनसिपालिटीचे सेक्रेटरी झाले.”
ही सगळी वर्णने ऐकली की आचार्य अत्रे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि त्यांना त्यांचे आईवडील, आजीआजोबा यांच्याकडून कोणकोणते गुण मिळाले हे जाणवते. त्यांच्याकडे साहित्यकलेची आवड आईकडून आली होती तर त्यांनी कर्तबगारी वडिलांकडून घेतली होती. धाडस आणि अन्यायाच्या विरुध्द उभे ठाकण्याची प्रवृत्ती आजीकडून आली होती तर त्यांना कलात्मकता व हरहुन्नरीपणा आजोबांकडून मिळाले होते. हे झाले घरातल्या गुणांचे ! पण बाहेरच्या संस्कारांचे काय? लहानपणी त्या शाळेत अस्पृश्यांच्या मुलांना मिळणारी वागणूक त्यांच्या मनावर इतकी परिणाम करून गेली, की त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातही भाग घेतला.
‘एखाद्या विधवेचे पाऊल वाकडे पडून तिला काही दिवस गेले तर आजी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायची.’ हे वाक्य वाचल्यावर निरूकाकींच्या अंगी असणा-या असामान्य धैर्याची कल्पना येणार नाही. कारण सोवळे ओवळे आणि सनातनी विचारांचे प्राबल्य असलेला तो कालखंड होता. त्यामुळे वाट चुकलेल्या अशा स्त्रीला बाहेरचेच काय पण घरातले लोकसुध्दा नीट वागवत नसत. अशा वेळी तिच्या पाठीशी उभे राहणे म्हणजे समाजाशीसुध्दा वैर पत्करण्यासारखेच होते. आजीचा हा वारसा मात्र अत्र्यांनी पुरेपूर चालवला, अन्याय होताना दिसेल तिथे तिथे अत्रे आपल्या वाणी-लेखणीसह धावून गेले. याची अनेक उदाहरणे अत्र्यांच्या चरित्रात पाहायला मिळतात.
दंडितांनी शिक्षा भोगली की ते सामान्य माणसासारखे आपले आयुष्य जगत असतात. गोपाळ गोडसे, मदनलाल पहावा आणि विष्णुपंत करकरे हे गांधीहत्येच्या कटातले दंडित. त्यांची शिक्षेची मुदत पूर्ण झाली तरी त्यांची सुटका होत नव्हती, हा त्या तिघांवर अन्यायच होत होता. या अन्यायाविरुध्द सर्वप्रथम आवाज उठवला तो आचार्य अत्रे यांनी.
अत्रे कुटुंबातली दुसरी हरहुन्नरी व्यक्ती म्हणजे दिनुकाका! जसे आचार्य अत्रे यांना भेटावे किंवा दुरून बघावे अशी अनेकांची इच्छा होती, ती काहींची पूर्ण झाली. पण आमच्यासारखे कमनशिबीही खूप आहेत! भेटीची तीच तीव्र ओढ दिनुकाकांच्या बाबतीतही वाटते, इतके दिनुकाकांचे व्यक्तिमत्त्व भन्नाट आहे. थोडक्यात, दिनुकाका अत्र्यांचे काका शोभतात किंवा अत्रे दिनुकाकांचे पुतणे शोभतात!
दिनुकाका आणि अत्रे, दोघे जवळ जवळ समवयस्क! काका अत्र्यांपेक्षा, चारदोन वर्षांनी मोठे होते. तो काळ असा होता की कित्येक घरांत सासू-सून, माय-लेकी दोघींची बाळंतपणे एकदमच किंवा चार-दोन महिने पुढे मागे होत. त्यामुळे काका-पुतण्या, मामा-भाचे बरोबरीचे किंवा वर्ष-सहा महिन्यांचा फरक किंवा पुतण्या काकापेक्षा मोठा अशीही उदाहरणे आहेत.
दिनुकाका आणि अत्रे यांचे नाते जरी काका-पुतण्यांचे होते तरी त्यांच्यातला स्नेह, जिव्हाळा पाहता दोघांची दोस्ती अधिक होती असे जाणवते.
दिनुकाका हे सासवडातले पहिले जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवणारे! तर अत्रे घराण्यातले पहिले मॅट्रिक! अत्र्यांचे वडील केशवराव हे मॅट्रिकच्या वर्गापर्यंत गेले पण परीक्षेलाच बसले नाहीत.(ही त्यांच्या मामांची कृपा)
दिनुकाका पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये गेले. बी.ए. झाले. त्यानंतर त्यांना मिलिटरी अकौंटसमध्ये नोकरी मिळाली. त्यांची पहिली नेमणूक लाहोरला झाली. दिनुकाका तिथे दीडशे रुपये पगारावर रुजू झाले. तिथे त्यांची एका फ्रेंच माणसाशी ओळख झाली. ते फ्रेंच शिकले, पण किती? ते मिलिटरी अकौंटसमधली नोकरी सोडून छत्तीसगडमधल्या सिरगुजा संस्थानाच्या राजपुत्राचे फ्रेंचचे शिक्षक झाले.
आपल्या भावाने आपल्याला न विचारता नोकरी सोडली याचे केशवरावांना अतिशय वाईट वाटले. पण आपला भाऊ एका संस्थानाच्या राजपुत्राचा शिक्षक झाला याचा त्यांना आनंद झाला आणि अभिमानही वाटला. ते येईल-जाईल त्याला सांगू लागले, ”एक ना एक दिवस हा दिन्या या संस्थानाचा दिवाण होईल.”
पण विधिलिखित निराळे होते. पुढे केशवराव अत्रे यांचे निधन झाले आणि दिनुकाका सिरगुजा संस्थानातली आपली नोकरी सोडून पुण्यात परतले.
बी.ए. झाल्यावर वकिलीचा अभ्यास करण्यासाठी अत्रे मुंबईला गेले. त्याच्या बरोबर दिनुकाकाही एलएल.बी. करण्यासाठी मुंबईला गेले. अत्र्यांनी वकिलीचा अभ्यास केला, पण ते वकिलीची परीक्षा देऊ शकले नाहीत. अत्र्यांच्या या मुंबई- वास्तव्याची फलश्रुती म्हणजे एका शिक्षकाचा आणि भावी शिक्षणतज्ञाचा उदय!
दिनुकाका मात्र एलएल.बी. झाले. त्यांनी पुण्यात थोडीफार वकिली केली आणि अखेर, ते पिपल्स ओन इन्शुरन्स कंपनीच्या खटल्यात अडकले. पण या खटल्यातसुध्दा दिनुकाकांनी आपल्या बुध्दिमत्तेच्या ज्या करामती करून आपल्या वकिलांना मदत केली, की हायकोर्टात एकदोघे वगळता सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.
या खटल्याच्या घटनेनंतर दिनुकाकांबद्दल कोणतीच माहिती अत्र्यांच्या चरित्रात सापडत नाही.