जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. उजवी आणि डावी अशा दोन्ही विचारसरणी कालबाह्य ठरत आहेत. अशा वेळी नव्या सिद्धांताची/इझमची गरज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन लेखक-कवयत्री नीरजा यांनी ‘हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल !’ या परिचर्चेत बोलताना केले. नाटककार सतीश आळेकर यांनी नव्या उमेदीच्या, दिशादर्शक काही चांगल्या कलाकृती घडताना दिसतात असे सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, की नव्या जगाच्या खुणा अशा नाटकांत व नव्या कवितांत सापडू शकतील. ते दोघे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वार्षिक दिनी योजलेल्या परिचर्चेत बोलत होते. त्यांच्या खेरीज ‘अंतर्नाद’चे (डिजिटल) संपादक अनिल जोशी आणि तरुण लेखक-कवी आदित्य दवणे यांचा चर्चेत सहभाग होता. चर्चेचे संचालन पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी केले.
परिचर्चेस आरंभ सतीश आळेकर यांनी त्यांच्या लहानपणीच्या पुण्यातील गोष्टी सांगून केला. त्यांच्या घरी काँग्रेसचे वातावरण होते. परंतु त्यांना शाळेमध्ये शिक्षक वगैरे सगळी मंडळी संघाची असत. परंतु त्यांनी कसलेही राजकीय मतभेद रोजच्या वावरात येऊ दिले नाहीत. किंबहुना, कोणी मी हिंदू आहे-ब्राह्मण आहे अशी जाणीवही करून दिली नाही. ते म्हणाले, की त्यांचे नाटकांचे वेड पाहून त्यांना तशा संधी देण्यात आल्या. आळेकर यांनी ‘ठकीशी संवाद’ या त्यांच्या नवीन नाटकाचा उल्लेख करून म्हटले, की गेल्या दहा-पंधरा वर्षांत राजकारणाने सारा समाज ग्रासून टाकला आहे. त्याची सूचक चिन्हे त्या नाटकात दिसतात. सध्या धर्म, राजकारण व जाती या गोष्टी माध्यमांमुळे लोकांच्या मनावर ठसवल्या जातात. त्यामुळे रोजच्या जगण्याचे प्रश्न अनिर्णित राहत आहेत.
नीरजा म्हणाल्या, की माणसे कोशात गेली आहेत. सोशल मीडियावरील ‘फॉरवर्ड्स’ आणि ‘रिसिव्हड्स’ यांमधून चुकीचे वातावरण तयार होत आहे आणि समाजातील विश्वासच हरवून चालला आहे. माध्यमे राजकीय गोष्टींचा मारा करून त्यांनी तयार केलेले जग समाजावर लादत आहेत. अनिल जोशी यांनी जुनी मूल्ये व नवीन मूल्ये यांतील हा संघर्ष आहे. किंबहुना नवी मूल्ये प्रस्थापित झालेलीच नाहीत. त्यामुळे माणसांच्या आरोग्याचे प्रश्न वाढले आहेत असे सांगितले. आदित्य दवणे यांनी तरुण पिढीच्या वतीने कथन केले. ते म्हणाले, की तरुण पिढी सांस्कृतिक दृष्ट्या गोंधळलेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञान व तंत्रज्ञान झपाट्याने पुढे गेले. संशोधन वाढले. तरी अजून कबर-मंदिर-मस्जिद यांच्या पलीकडे समाजाला जाऊच दिले जात नाही. आदित्यने तरुणवर्ग अधिकाधिक एकटा व एकाकी होत आहे असेही निरीक्षण मांडले.

उपस्थित श्रोत्यांमध्ये डॉ. रविन थत्ते होते. ते म्हणाले, की सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. त्याचे कारण व्यक्तिस्वातंत्र्य हे आहे का? त्यावर वक्त्यांनी उलटसुलट मते व्यक्त केली.
नीरजा म्हणाल्या, की हे सर्व वातावरण नव्वद नंतर बदलले. ‘खाऊजा’ संस्कृती आली त्याचा फायदा सर्वाधिक मध्यमवर्गाने घेतला आणि विविध चळवळीशी जोडलेला मध्यमवर्ग त्यापासून तुटला.
- टीम थिंक महाराष्ट्र 9892611767info@thinkmaharashtra.com