स्वस्तात हृदय शस्त्रक्रिया

0
46

स्वस्तात हृदय शस्त्रक्रिया

पश्चिम बंगालमधील बेलूर येथील स्वामी विवेकानंदांचा मठ प्रसिद्ध आहे. त्याच्या जवळच काही अंतरावर एक रुग्णालय आहे. त्यामध्ये हृदयावरील शस्त्रक्रिया केवळ पंचवीस हजार रुपयांत होते. इतरत्र, हा खर्च एक लाख रुपये तरी आला असता. याच प्रकारे तेथे सर्व आरोग्य सेवा माफक दरात उपलब्ध आहेत.

इंडो जपान स्टील कंपनीच्या कामगारांनी हे रुग्णालय सुरू केले. त्यांचा कारखाना जेव्हा आजारी झाला तेव्हा त्यांनी हे श्रमजीवी रुग्णालय सुरू केले. त्यांना प्रेरणा मिळाली ती विवेकानंदांच्या, ‘जो दुस-याची सेवा करतो तो परमेश्वराला भजत असतो’ या बोध- वचनापासून. या रुग्णालयाचा लोकांना उत्तम फायदा होत आहे. उदाहरणार्थ, दुर्गापूरच्या एका कामगाराचे ट्रक अपघातात दोन्ही पाय मोडले. खाजगी रुग्णालयात त्याला, त्याचे पाय कापून टाकावे लागतील असा सल्ला मिळाला. परंतु श्रमजीवी रुग्णालयात त्याच्यावर दोन महिने उपचार करण्यात आले. तो बरा झाला व आपले काम करू लागला. खर्च फक्त आठ हजार रुपये आला.


या रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया करणे चार वर्षांपूर्वी सुरू झाले. एवढ्यात तेथे तीनशे शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रुग्णालय बेलूर श्रमजीवी स्वास्थ्य प्रकल्प समितीमार्फत चालवले जाते.


स्टील कंपनीमध्ये १९८० च्या सुमारास जेव्हा वाईट दिवस आले तेव्हा परिसरातील लोकांनी कामगारांना बरीच मदत केली. त्याची कृतज्ञतापूर्वक परतफेड म्हणून कामगारांनी दर आठवड्याला तेथे आरोग्य केंद्र सुरू केले. त्यामधून हे श्रमजीवी रुग्णालय उभे राहिले आहे आणि आता, समितीचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा बेत आहे

प्लास्टिकचे बूच

दारूच्या बाटलीचे बूच फार महत्त्वाचे मानतात, कारण ते विशिष्ट वनस्पतीपासून बनवले जाते. परंतु उत्तर कॅरोलिनातील एका कारखानदाराने त्या ऐवजी प्लास्टिक बुचे बनवण्यास आरंभ केला आहे. गेल्या दहा वर्षांत दारूच्या बाटलीच्या बूचाची वीस टक्के बाजारपेठ त्याने व्यापली असावी असा अंदाज आहे. त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की या कारखानदारामुळे दारूच्या बाटलीच्या बुचातील लाकडाचे महत्त्व संपुष्टात येऊ लागले आहे. गेल्या सुमारे चारशे वर्षांत या बाटल्यांना बुचे लागत ती विशिष्ट वनस्पतीच्या सच्छिद्र लाकडाची. या वनस्पती मुख्यत: स्पेन व पोर्तुगाल येथे वाढवल्या जातात. परंतु नव्या तंत्रज्ञानाचा चमत्कार असा, की त्या नैसर्गिक बुचाची जागा प्लास्टिकच्या बुचांनी घेतली आणि त्यांची किंमत प्रत्येकी फक्त दोन ते वीस सेंटच्या दरम्यान असते.

हिंद स्वराज्य कल्पनेची शताब्दी

भारताच्या ईशान्येकडील मणिपूरमध्ये आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर एक्ट हा विशेष कायदा लागू केला गेला आहे. त्याच्या निषेधार्थ आयरोम शर्मिला नावाच्या कार्यकर्तीने अन्न सत्याग्रह पुकारला आहे. तिला पाठिंबा देण्यासाठी केरळमधील सारा जोसेफ या प्रमुख लेखिका आणि अन्य कार्यकर्त्या केरळ ते इंफाळ अशी यात्रा घेऊन निघाल्या आहेत. महात्मा गांधींच्या हिंद स्वराज्य कल्पनेस शंभर वर्षें पूर्ण होतात. ते निमित्त करून ही यात्रा आखण्यात आली आहे. शर्मिला गेल्या दहा वर्षांपासून उपोषण करत आहेत. एका जागी खिळून राहिल्यामुळे त्यांची अवस्था एखाद्या बंदिवानासारखी झाली आहे. ही यात्रा संघटित करण्यात सिविक चंद्राणी नावाच्या मल्याळी कवयत्रीने पुढाकार घेतला आहे. त्या कट्टर गांधीवादी आहेत. त्यामुळे शर्मिला यांच्या अहिंसक लढ्याला पाठिंबा देणे त्या आपले कर्तव्य मानतात.

– (संकलित)

About Post Author

Previous articleश्रम, श्रमपरिहार आणि तुकोबाराय!
Next articleकसाबचे स्थानिक साथीदार कोण?
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.