भवानीनगर ही झोपडपट्टी भांडूपमध्ये आहे. तो दारिद्र्य रेषेखालील विभाग म्हणून गणला जातो. मी त्याच विभागातील, ‘एम.डी. केणी विद्यालया’त सहाय्यक शिक्षिका आहे. शाळा ‘श्री गुरुजन शिक्षण प्रसार मंडळा’तर्फे चालवली जाते. मला परिसराची बिकट परिस्थिती, तेथील शिक्षणाबद्दलची उदासीनता आणि पालकांचे अज्ञान अशा प्रश्नांना सामोरे जावे लागते. परंतु तशा परिस्थितीतही समाधानकारक एक गोष्ट म्हणजे काही गरीब होतकरू विद्यार्थी सहवासात येतात आणि मग, जोमाने शिकवण्याची उर्मी प्रत्येक वेळी नव्याने जागृत होते.
माझ्या काही धडपड्या विद्यार्थ्यांच्या सहवासातून स्मरणात राहिला आहे तो विद्यार्थी म्हणजे स्वप्नील राजेश गजरे. स्वप्नीलचे आई-वडील तो दोन महिन्यांचा, नवजात बाळ असताना मरण पावले. त्याचा सांभाळ आजी -आजोबांनी केला. त्यांनी स्वप्नीलला पोटाला चिमटा काढून चौथीपर्यंत शिकवले. स्वप्नील त्यानंतर आश्रमशाळेत गेला. गावच्या शाळेत प्रथम क्रमांक मिळवणारा स्वप्नील तेथे रमेना. ती गोष्ट आजी- आजोबांच्या लक्षात येताच, त्यांनी स्वप्नीलच्या भविष्याचा विचार करून ते त्यांच्या नातवासह गाव सोडून मुंबईत आले.
स्वप्नीलने मुंबईत आमच्या शाळेत इयत्ता आठवीत प्रवेश घेतला. स्वप्नील मुंबईच्या वातावरणाशी, शाळेशी लवकरच समरस झाला. परंतु त्याच्या लक्षात आले, की त्याची आर्थिक परिस्थिती शालेय फी भरण्यासारखी नाही. ती बाब त्याच्या वर्गशिक्षक स्नेहल मॅडम यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याची त्या वर्षाची शालेय फी भरली. त्यामुळे स्वप्नील माझ्या सान्निध्यात आला. तो जिद्दीने अभ्यासाला लागला. मी आमचा शिक्षक-विद्यार्थी सहवास आणि त्याची जिद्द पाहून त्याला म्हटले, “मी तुला सर्वतोपरी मदत करीन, पण तू चांगला वाग, अभ्यास कर.”
परंतु स्वप्नीलला मधल्या काळात वाईट संगत लागली. त्याचा परिणाम त्याच्या वागण्या-बोलण्यातून जाणवू लागला. त्याची घरची परिस्थिती दुर्बल होतीच, त्यात त्याला नातेवाईकांकडून वाईट वागणूक मिळू लागली. तो दंगामस्ती करणाऱ्या, वाईट व्यसन असलेल्या मित्रपरिवारात राहू लागला. साहजिकच, तो उद्धट बोलणे, व्यसन यांच्या आहारी गेला. त्याने शाळा व्यसनाच्या नादात सोडली. त्याची करूण कहाणी त्याच्या शाळेतील मराठी निबंधलेखनातून मला वाचण्यास मिळाली. माझे डोळे त्याचे निबंध वाचताना पाणावले. मी हेलावून गेले. मग मी त्याची इत्थंभूत माहिती मिळवली. मी त्याला माझी खरी त्याच वेळी गरज आहे हे ओळखून त्याला भेटले. त्याचे मनपरिवर्तन करून त्याला पुन्हा शिक्षणप्रवाहात सामील करून घेतले.
अशाच आम्हा दोघांच्या संवादात त्याने मला प्रश्न केला, की ‘मी कोण आहे? मी शून्यासारखा का आहे?’ मला काहीच कळत नाही. मला तुमचाच आधार आहे.’ तेव्हा मी त्याला म्हटले, ‘मी तुझ्यासोबत कायम असणार आहे, पण तरी तू स्वतः स्वत:चा आधारस्तंभ बन. कोणाकडून तसे होण्याची अपेक्षा ठेवू नकोस. उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहा, मग बघ, जग तुझे असेल. तू स्वतःला शून्य समजू नकोस. शून्याच्या आधी एक लाव. बघ! यश तुझेच असेल.’ मी इतरही प्रकारे त्याचे मन राखण्याचा प्रयत्न करत असे. गेल्या रक्षाबंधन दिनाची गोष्ट. स्वप्नील त्याच्या मनगटावर राख्या असूनही निराश वाटला. मी त्याला राखी बांधली, तेव्हा मात्र त्याची कळी खुलली.
आमचे असे वारंवार बोलणे होई. त्यातून त्याला धीर मिळत गेला. त्याच्यात बदल घडू लागला. त्याच्या मनातील अविचारांचे द्वंद्व कधीकधी डोके वर काढते. मग पुन्हा त्याच्या मनाची तगमग चालू होते. तो पुन्हा माझ्याशी संपर्क साधतो. त्याला जणू तो डोस अधुनमधून गरजेचा वाटतो. त्याला दहावीच्या परीक्षेत 2017 मध्ये 73.27 टक्के गुण मिळाले. मी त्याची वर्गशिक्षिका त्या सर्व प्रवासात त्याची गुरू न राहता त्याची ‘आई’ बनून गेले होते.
त्याने तशाच एका झटक्यात महाविद्यालयीन शिक्षण अकरावीच्या प्रवेशानंतरही तीन महिन्यांत सोडून दिले. मी त्याला पुन्हा भेटून नव्या विचारांची दिशा दाखवली. तो आता एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी करून रात्र महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. स्वतःच स्वतःचा आधारस्तंभ बनलेला स्वप्नील परदेशात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.
शिक्षिकेला मैत्रीण, बहीण, आई या भूमिकांतून जावे लागते. माझ्यासाठी मी शिक्षिका न राहता स्वप्नीलची आई झाले हा मोठा पुरस्कारच होय!
– प्रोयुषा भोसले
अभिनंदन मँडम,…
अभिनंदन मँडम,
गुरु-शिष्य नाते कसे असावे याची नव्याने ओळख करून दिली. तुमचे कार्य असेच व्दिगुणीत होऊ दे
Really Hearthtouching…
Really Hearthtouching.
Teachers plays a very important role in guiding the future of the children’s along with the parents. Keep it up.
खुपच छान
खुपच छान
Hey sonya,…
Hey sonya,
U r really talented bro, i knoe u very well from childhood . We r in same class from 1 to 4 and one year in boarding school.
I would read that note written by ur bhosale mam, i want very thnk u to mam, bcoz she become a part of ur life n career, shr so much helped to u…..
One day u definately get a success , keep ur hardword be continued…
Best luck sonya …..n thnk u mam….
Comments are closed.