स्वच्छतादूत गिधाड : जगण्यासाठी धडपड!

4
212
_Swachatadut_Gidhad_2.jpg

खूप मोठे पंख, लांब मान, डोके व मान यांच्या पुढील भागावर छोट्या गाठी आणि गळ्याखाली सुरुकुतलेली व लोंबणारी कातडी असलेला गिधाड हा कुरूप पक्षी पाहून वा ऐकून माहीत असतो. गिधाड म्हणजे जटायू. ते मानवी आरोग्यासाठी अतुलनीय कार्य करत असते. गिधाड अर्थात जटायूची गगनभरारी मात्र सद्यकाळात दुर्मीळ झाली आहे.

मृत प्राण्यांचे सडलेले मांस हे गिधाडांचे मुख्य अन्न आहे. बाकदार टोक असलेली त्यांची चोच सांडशीप्रमाणे विशिष्ट रचनेची असते. त्यामुळे ते पक्षी कुजलेल्या मांसाचा फडशा क्षणार्धात पाडू शकतात. तो निसर्गातील ‘सफाई कामगार’ म्हणूनच ओळखला जातो.  गिधाडे मृत प्राण्यांचे शरीर फुगून फुटेपर्यंत वाट पाहतात. गिधाडे फक्त मेलेली जनावरे किंवा माणसे यांची मृत शरीरे खातात. गिधाड हे नाव ऐकल्यावर मानवी मनात किळसवाणे विचार येतात, त्याचे कारण म्हणजे त्यांची खाण्याची, विचित्र आणि विक्षिप्त पद्धत.

गिधाड हा पक्षी आकाराने भलामोठा असून त्यांच्या पंखाची लांबी तीन ते चार फूटांपर्यंत असते. मानेच्या खालील बाजूस शर्टच्या कॉलरसारखी करड्या रंगाची पिसे असतात. त्याला चाळीस ते पन्नास वर्षें आयुष्य असते. मात्र त्या पक्षाची प्रजनन क्षमता फार कमी आहे. त्यांची नर व मादी यांची जोडी वयाच्या सातव्या वर्षांपासून तयार होते व ती मरेपर्यंत टिकून राहते. एक जोडी प्रियाराधनात वर्षातून एकदाच डिसेंबर ते एप्रिल दरम्यान, रममाण होते. मादी विणीच्या काळात केवळ एक अंडे उंच कपारीत किंवा खडकांच्या खोबणीत; तसेच, कधी कधी जंगलातील झाडांच्या बुंध्याच्या पोकळीत देते. अंडी उबवण्याचे काम मादीच करते. त्या काळात नर घरट्याची काळजी घेतो. पिल्लू अंड्यातून बाहेर पडल्यावर चार ते साडेचार महिने घरट्यातच राहते. संगोपनाचे काम नर व मादी एकत्रितपणे करतात. प्रजनन काळात जर काही कारणांमुळे, उदाहरणार्थ, पृथ्वीच्या तापमानात वाढ (ग्लोबल वॉर्मिंग), हवा, पाणी व ध्वनिप्रदूषण इत्यादींमुळे त्या पक्ष्यांच्या जीवनावर ताण पडल्यास पक्षी दोन ते तीन वर्षांतून एक अंडे देतो.

भारतात गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळतात. त्यातील लांब मानेचा, मोठ्या पंखांचा पक्षी या वर्णनाशी जुळणाऱ्या पाच प्रजाती आहेत. तर बाकीच्या चार प्रजाती थोड्या वेगळ्या आकार-रंगाच्या आहेत. ‘जिप्स’ प्रकारची गिधाडे थव्याने राहणारी असून, वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ती सर्वत्र सहज आढळत. इतकेच काय, पण भारताची राजधानी-दिल्ली, ही गिधाडांवरील एका वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणासाठी प्रसिद्ध होती. ती म्हणजे,  1971 मध्ये शिकारी पक्ष्यांवर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले होते, की या शहरात व्हाईट-बॅक्ड (पांढऱ्या पाठीचा) गिधाडांची संख्या सर्व जगात विक्रमी आहे. एका शास्त्रीय अंदाजानुसार त्या काळात संपूर्ण भारतात चार कोटींपेक्षा जास्त गिधाडे होती. आज ही संख्या काही हजारांवर आली आहे.

_Swachatadut_Gidhad_1.jpgगिधाड ही पक्षीजात सध्या मरणासन्न होऊन विनाशाच्या कडेवर येऊन थांबली आहे. ती पक्षीजात परिसंस्थेतील अन्नसाखळीतून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस फार वेगाने कमी होत चाललेली आहे. त्याची कारणे अनेक आहेत. झपाट्याने वाढत चाललेल्या वैश्विक तापमानाचा परिणाम या पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर होत आहे. त्या शिवाय खाद्याची कमतरता, जनावरांमध्ये जंतुनाशक व वेदनाशामक औषधांचा वापर, विषबाधा, गिधाडांची शिकार या इतर कारणांमुळेही गिधाडांची संख्या रोडावत चाललेली आहे. गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरात येत असलेल्या डायक्लोफेनिक (Diclofenic) या वेदनाशामक औषधामुळे गिधाडांचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे हे आता सिद्ध झाले आहे. जर ते औषध गिधाडांना दिले तर किंवा औषधांचा मृत जनावरांच्या मांसामार्फत त्यांच्या शरीरात प्रवेश झाला तर त्यांच्या मूत्रपिंडात बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होतो. पशुवैद्यकीय क्षेत्रातील तंत्रक्रांतीमुळे जनावरे मरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय मेलेल्या जनावरांची कातडी सोलून वापरात आणतात. त्यांच्या हाडांचाही उपयोग विविध कारणांसाठी केला जातो. या कारणामुळे गिधाडांना अन्नाचा तुटवडा होतो व त्यांची उपासमार होते. गिधाडांना वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले चिंच, पिंपळ, वड यांसारखे मोठे वृक्षही ग्रामीण भागात दुर्मीळ होत चालले आहेत. त्यामुळे गिधाडांच्या वसतीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

गिधाडांना देखील गाय, बैल, कासव, साप, मोर इत्यादी प्राण्यांप्रमाणे काही धर्मांत मान दिला गेला आहे. तिबेटमधील बौद्ध धर्मपंथात मानवी मृतदेहाचे मस्तक, हात, पाय इत्यादी अवयव वेगवेगळे करून डोंगरभागात गिधाडांसाठी ठेवले जातात. पारशी धर्मामध्ये मानवी मृत शरीर त्यांच्या प्रार्थनास्थळाच्या टेरेसवर विशिष्ट रीत्या बनवलेल्या टॉवरवर ठेवून सूर्यप्रकाश आणि गिधाडे यांच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु गिधाडांच्या संख्येत घट होत असल्यामुळे दोन्ही समाजांवर धर्मसंकट उभे ठाकले आहे! हिंदू धर्मामध्ये देखील गिधाडांना मान दिलेला आहे. रामायणातील अपहृत सीतेला वाचवण्यासाठी प्राणाहुती दिलेला शूर जटायू पक्षी म्हणजे गिधाडच!

परिसर स्वच्छ ठेऊन निसर्गाचा समतोल राखणार्‍या या गिधाडांना वाचवण्याची गरज आहे. दुर्मीळ होत चाललेल्या त्या पक्ष्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही ठोस उपाय योजले गेले पाहिजेत. गिधाडांच्या मूत्रपिंडावर परिणामकारक असलेले व गुरांमध्ये वेदनाशामक म्हणून वापरात असलेले ‘डायक्लोफेनिक’ या औषधावर बंदी घालून त्याचा संपूर्ण वापर थांबवला पाहिजे. मृत गिधाड आढळल्यास त्याच्या मृत्यूचे कारण शोधले पाहिजे. तरच लोककल्याणकारी काम करून ‘मोहक जगाचे सुंदर दर्शन’ घडवणार्‍या या महाकाय जटायूला आकाशात झेप घेताना पाहता येईल!

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे वन विभाग व स्थानिक स्वयंसेवक यांच्यामार्फत गिधाडांच्या संवर्धनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे व नाशिक जिल्ह्यातही या पक्ष्यांच्या संवर्धनाचे काम चालते. नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील खोरीपाडा येथे वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून गिधाड रेस्टॉरंट ही संकल्पना राबवली जाते. गिधाड रेस्टॉरंट म्हणजेच मेलेल्या जनावरांना एका मोकळ्या जागी ठेवण्यात येते. मोकळी जागा निवडण्यामागचा उद्देश म्हणजे गिधाडांना दुरूनही ते खाद्य सहज दिसावे म्हणून. मात्र हे खाद्य पुरवताना मेलेल्या जनावरांची तपासणी करून ‘डायक्लोफेनिक’ या वेदनाशामक औषधी द्रव्याचे अंश प्राण्यांमध्ये नसल्याची सर्वप्रथम खात्री केली जाते, मगच ते खाद्य गिधाडांना दिले जाते. वेंगुर्ले, सिंधुदुर्ग येथे ‘घरटी दाखवा बक्षीस मिळवा’ ही मोहीम  राबवण्यात आली होती. बक्षीस म्हणून एक हजार रुपये दिले जायचे. तसेच महाराष्ट्राशिवाय हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम येथेही ‘गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र’ उभारण्यात आले आहे. येथे  पिलांचे संगोपन केले जाते. पिल्लांना ‘डायक्लोफेनिक’चा अंश नसलेले बकऱ्याचे मांस दिले जाते.

राजस्थानातील ‘केवलदेव राष्ट्रीय उद्यान’ हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. विभू प्रकाश यांना तेथे पक्ष्यांची गणना व अभ्यास करताना जाणवले, की गिधाडांची संख्या कमी होत आहे. त्यावर त्यांचा संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला आहे. लगोलग भारतभर पाहणी करून गिधाडांची संख्या इतरत्र कितपत बदलली आहे हे बघण्याची मोहीम सुरू झाली. तो काळ 2000 चा होता आणि गिधाडांची संख्या भारतभर लक्षणीयरीत्या घटली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात गिधाडे का कमी झाली याचा अभ्यास करण्याची निकड शास्त्रज्ञांना आणि निसर्गप्रेमींना भासू लागली.
सध्या भारतात केवळ चार ठिकाणी ‘गिधाड प्रजनन केंद्रे’ आहेत. पहिले हरियाणा राज्यात – पिंजौर येथे, दुसरे पश्चिम बंगाल मध्ये – राजाभातखावा येथे, तिसरे आसाममध्ये गुवाहाटीत तर चौथे मध्यप्रदेशात – भोपाळ येथे आहे. त्या व्यतिरिक्त नेपाळ आणि पाकिस्तानातही अशा प्रकारचे एक-एक केंद्र आहे.

प्रजननाचे प्रयोग या प्रजातींच्या बाबतीत कधीच झाले नव्हते. त्यामुळे त्यांची अन्न आणि निवास या दोन प्राथमिक गरजांची विशेष काळजी घेत हा प्रकल्प सुरू केला.

अन्न – गिधाडांना रोज अन्न मिळण्याची शाश्वती नसते. त्यामुळे एका बैठकीत गिधाड सुमारे दिड-दोन किलो मांस खाते. आठवड्यातून दोन वेळा त्यांना असे अन्न पुरवले जाते. गिधाडांना रोजच्या व्यवहारासाठी लागणारी ऊर्जा आणि पुरवले जाणारे अन्न यांचे शास्त्रीय समीकरण यासाठी वापरले गेले आहे.

निवारा आणि व्यवस्थापन – प्रजनन केंद्रात येणारी गिधाडे कमीत कमी दीड महिना वेगळी ठेवली जातात. त्या काळात त्यांना कोठलाही आजार नसल्याची खात्री करून घेतली जाते. जर नवीन आलेले पक्षी पिल्ले असतील तर त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था असते. त्यात, घरट्यासारख्या भासणाऱ्या कृत्रिम घरट्यात त्यांना ठेवले जाते आणि त्यांचे संगोपन करण्यात येते.

‘कॉलनी पक्षीगृह’ म्हणजे या प्रजनन केंद्रातील सर्वात मोठे दालन. शंभर फुट लांब आणि चाळीस फुट रुंद अशा पिंजऱ्यात अगर पक्षीगृहात गिधाडांचा थवा ठेवला जातो. प्रजननासाठी योग्य वयातील गिधाडे येथे अगदी वन्य अवस्थेत राहवीत अशी ठेवली जातात. तेथे ती थव्याने राहतात, एकत्र खातात, पाणी पितात, अंघोळ करू शकतात आणि मुख्य म्हणजे स्वत:ची घरटी स्वत:च बांधतात!

आज संपूर्ण देशभरात गिधाडांच्या संख्येत अमुलाग्र वाढ व्हावी असा ध्यास घेऊन उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्यामुळे ऱ्हासाकडे चाललेली गिधाडे भविष्यात पुन्हा गगन भरारी घेतील असे वाटते.

– प्रा. डॉ. अरविंद कुंभार

About Post Author

Previous articleगाडगेबाबांच्या… बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना
Next articleडॉ. विनोद इंगळहळीकर यांची विविधगुणी मात्रा
अरविंद कुंभार हे मूळचे कर्नाटकातील विजापूर जिल्‍ह्याचे. नोकरीच्‍या निमित्‍ताने गेली चाळीस वर्षे ते महाराष्‍ट्रात वास्‍तव्‍यास आहेत. ते सोलापूरच्‍या अकलूज गावातील 'शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालया'त प्राणिशास्‍त्र विषयाचे प्राध्‍यापक म्‍हणून कार्यरत आहेत. कुंभार यांनी भारतातील विविध पक्षी अभयारण्‍यांना भेटी देऊन तेथील पक्ष्‍यांचा अभ्‍यास केला आहे. त्‍यांच्‍याकडे पक्ष्‍यांची दहा हजारांहून अधिक छायाचित्रे संग्रहित आहेत. ते सोलापूर विद्यापीठाचे पीएच.डी. मार्गदर्शक असून त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी पक्षीशास्‍त्र आणि पर्यावरणशास्‍त्र या विषयांवर संशोधत करत आहेत. कुंभार यांनी पक्षी आणि पर्यावरण या विषयांवर महाराष्‍ट्र-कर्नाटक राज्यातील नियतकालिकांमध्‍ये मराठी-कन्‍नड भाषेतून लेखन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9822124191, 02185 224191

4 COMMENTS

  1. VERY STUDIED ARTICLE. THANKS…
    VERY STUDIED ARTICLE. THANKS PROF DR ARVINDJI KUMBHAR FOR THE ENLIGHTENING ARTICLE

  2. डॉ.आरविंद कुंभार यांचा …
    डॉ.आरविंद कुंभार यांचा *गीधाड* हा आप्रतिमा व ऋभ्यासपुर्ण असा लेख वाचला.यातुन खुप काही नविन माहितीचे ज्ञानार्जन झाले.तर जुन्या माहितीला सुवर्णमय उजाळा मीळला.सर्वांनाच उपयुक्त असा लेख आहे.

    हा लेख म्हणजे “जे जे अपणाशी ठावे तेते जनाशी सांगावे.
    शहाणे करुण सोडावे अवघे जन हे”

    हा वसा डॉ.अरविंद कुंभार सर व थिंक महाराष्ट्र टीम जपत आहे.

    धन्यवाद
    गो.रा कुंभार(पत्रकार )

  3. Dear sir ,
    your Observation…

    Dear sir ,
    your Observation is very nice.Very Exlent litratuer published.Wish u all the best

Comments are closed.