रेखा मेश्राम यांनी स्त्रीप्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘रमाई फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना ७ फेब्रुवारी २०१० रोजी केली. रेखा मेश्राम यांचे वडील फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचे असल्यामुळे त्या लहानपणापासून मुक्त वातावरणात वाढल्या. त्यांच्या वडिलांचा प्रभाव त्यांच्यावर पडला अन् तसे संस्कारही त्यांच्यावर घडले. त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’तून एम.फिल.ची पदवी मिळवली. त्या आधी त्या मराठी विषयात एम.ए. झाल्या. त्या पीएच.डी.साठी ‘दलित कवयित्रींच्या कवितेतून व्यक्त होणा-या आंबेडकरवादी स्त्री-जाणिवा’ या विषयावर प्रबंध लिहीत आहेत. त्यांचे बालपण व शिक्षण औरंगाबाद येथेच झाले. रेखा मेश्राम औरंगाबादजवळील पाथ्री (ता. फुलंब्री) येथील ‘राजर्षी शाहूमहाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’त मराठी विषयाच्या प्राध्यापक आहेत.
हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या स्त्रिया वगळल्या तर स्त्रियांना समाजात मिळणारे दुय्यम स्थान तसेच आहे. त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होतात. पण बहुतेक स्त्रिया भीतीमुळे म्हणा किंवा भिडेखातर म्हणा, त्यांस वाचा फोडण्याचे धाडस करत नाहीत. त्यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थिती जवळून पाहिली. म्हणूनच त्यांनी स्त्रियांना कणखर बनवावे, स्वत्वाची जाणीव करून देऊन त्यांच्यात परिवर्तन घडवून आणावे या उद्देशाने ‘रमाई फाऊंडेशन’ची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेची धुरा सुरुवातीला रेखा आणि त्यांचे पती प्राध्यापक भारत शिरसाट या दोन शिलेदारांनी त्यांच्या खांद्यावर घेतली. त्यानंतर समाजातील अनेक मंडळी त्यांच्या विधायक कार्यात सहभागी झाली. संस्थेची मार्गक्रमणा येणारी नवीन पिढी परिवर्तनवादी विचारांनी संस्कारित व्हावी, स्त्रियांना समाजात मानाने जगता यावे यासाठी सजग व्हावी, या दुहेरी हेतूने सुरू आहे.
ग्रामीण भागातील स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी माध्यम असे ‘रमाई फाऊंडेशन’ला स्वरूप येत आहे. रेखा मेश्राम यांच्या मैत्रिणी दैवशीला गवंडे, शोभा खाडे, ललिता खडसे, बेबीनंदा पवार फाऊंडेशनच्या कार्यात सहभागी झाल्या आहेत. फाउंडेशन म्हणजे दुर्लक्षित स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ बनले आहे. गावपाड्यांमध्ये बालविवाह होतात. लग्न काय याची जाणीव नसलेल्या मुलींना संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपले जाते. जातीचे बंध दिवसेंदिवस घट्ट होत आहेत. या विषमतेचा जास्त त्रास हा स्त्रीलाच सहन करावा लागतो. रेखा मेश्राम सांगतात, अगदी गल्लीबोळात, तळागाळातील स्त्रियांपर्यंत पोचून फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुरुषी सत्तेला बळी पडलेल्या स्त्रिया त्या भेटींदरम्यान भेटल्या. अनेक जणी मोकळेपणाने बोलण्यास पुढे येत नव्हत्या. असेही काही पुरुष भेटले ज्यांना त्यांच्या घरातील स्त्री स्वत:च्या अस्मितेसाठी सक्षम व्हावी, जेणेकरून संपूर्ण कुटुंब वैचारिक दृष्टीने सक्षम होईल असे वाटत होते. अशी काही मंडळी संस्थेशी जोडली गेली. त्यात कल्पना वाहुळे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्या मुंबईमध्ये स्त्रियांच्या प्रबोधनासाठी वाचक मेळावे घेत आहेत. शोभा खाडे या स्त्रियांनी स्वावलंबी बनावे, त्यांची आर्थिक बाजू सक्षम व्हावी या दृष्टीने स्त्रीवर्गासाठी शिबिरे आयोजित करतात. त्या बचत गटाच्या माध्यमातून पाककौशल्याचे धडे देऊन महिलांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे कामही करतात. संस्थेतर्फे स्पर्धात्मकतेला आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे म्हणून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांवर आधारित मार्गदर्शक शिबिरेही आयोजित केली जातात. या सर्व उपक्रमांतून एक डोळस, सशक्त पिढी निर्माण होईल अशी ‘रमाई फाऊंडेशन’ची अपेक्षा आहे.
रेखा मेश्राम ‘रमाई’ या मासिकाचे संपादन व प्रकाशन करतात. त्या सांगतात, ‘मिळून सा-याजणी’ हे मासिक सोडले तर स्त्रियांसाठी असे खास मासिक नाही. त्या निकडीतूनच ‘रमाई’ हे मासिक सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाई या अल्पशिक्षित होत्या; परंतु त्या प्रगतिशील विचारसरणीच्या होत्या. त्यांचा तोच दृष्टिकोन समोर ठेवून मासिकाला ‘रमाई’ हे नाव निश्चित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या ‘मनुस्मृती’चे दहन करून जणू स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सादर केला. त्या दिवसाचा योग साधून ‘रमाई’ २५ डिसेंबर २०१० पासून सुरू करण्यात आले. डॉ. अरुणा लोखंडे, सुशीला मुलजाधव, प्रा. अविनाश डोळस, ज. वि. पवार, डॉ. संजय मून, प्रा. मंगल खिंवसरा, उर्मिला पवार, प्रा. आशा कांबळे अशा, लेखन करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन या मासिकासाठी मिळाले.
स्त्रियांनी परिवर्तनवादी विचार स्वीकारावा आणि त्यांच्या कुटुंबासहित समाजाचेही परिवर्तन व्हावे, या हेतूने मासिकाची वाटचाल सुरू आहे. ज्यांना अक्षरज्ञान नाही, पण ज्यांनी सामाजिक चळवळीमध्ये प्रत्यक्ष जीव ओतून काम केले आहे, अशा स्त्रियांच्या मुलाखती घेऊन त्यांचे काम प्रत्येक पिढीतील स्त्रियांपर्यंत पोचवून त्यांना तशा कामासाठी प्रेरित करणे हा उद्देश त्यामागे आहे. त्यातून नवोदित स्त्री-लेखिका विविध विषयांवर व्यक्त होत आहेत. प्रसिद्ध झालेल्या अंकाच्या प्रती संपल्या, की दुस-या अंकाचे काम सुरू होते. ‘रमाई’च्या एका अंकाचा प्रसिद्धीपर्यंतचा खर्च पंधरा हजार रुपयांपर्यंत आहे. सध्या मासिकाचे चारशे वर्गणीदार आहेत. त्यांच्याकडून साधारण पाच हजार रुपयांपर्यंत वर्गणी जमा होते. बाकीचा भार रेखा मेश्राम व भारत शिरसाट उचलतात. अंकाच्या कामात त्यांच्या कुटुंबाचाही हातभार लागतो. रेखा मेश्राम सांगतात, ‘रमाई’चा अंक प्रसिद्ध झाला, की तो वर्गणीदारांपर्यंत पोचण्यासाठी अंकाच्या घड्या घालून त्यावर रॅपिंग चढवून पत्ता टाकायचे काम आई भागवतीबाई करते. त्या मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण आहेत. आईला वाचनाची आवड आहे. समाज परिवर्तनासाठी कृतिशील राहवे यासाठी आईचा खंबीर आधार आहे. वाचन व चिंतन ही तिचीच देण असून त्यातून लेखन सुगम होत गेले.
फाऊंडेशनतर्फे प्रबोधनात्मक ‘मराठी चळवळीचे साहित्यसंमेलन’ आयोजित केले जाते. साहित्यसंमेलनाच्या आयोजनामागे उद्देश विचारमंथनातून-चर्चेतून चांगले काहीतरी बाहेर पडावे व त्याचा समाजोन्नतीसाठी हातभार लागावा, हा आहे. संमेलनात लेखक, कवी, समीक्षक अशा साहित्यिकांचा व परिवर्तनाशी संबंधित असलेल्या पन्नासाहून अधिक जणांचा वक्ते म्हणून समावेश आहे. विशेष म्हणजे प्रत्येक संमेलनाला महिलाच संमेलनाध्यक्ष राहिली आहे. त्यांनी योजलेली साहित्यसंमेलने अकोला, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, दापोली, नागपूर या ठिकाणी पार पडली आहेत. तेथे विविधांगी विषय हाताळले जातात. तसेच संमेलने फक्त साहित्याशी संबंधित किंवा शिक्षित स्त्रियांपर्यंत मर्यादित न राहता, सर्वसामान्य बाईनेदेखील ते ऐकले पाहिजे, आर्थिकतेच्या बाजारात गुरफटत चाललेल्या स्त्रीला चांगले काय, वाईट काय हे स्वत: ठरवता आले पाहिजे यासाठी प्रबोधन संमेलनांतून होणे हे सगळ्यात महत्त्वाचे कार्य असल्याचे रेखा मेश्राम सांगतात.
स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली ही एकमेव चळवळ आहे असा रेखा मेश्राम यांचा दावा आहे. स्त्रियांनी केवळ वैचारिक प्रगल्भतेपुरते समाधान न मानता समाजोन्नतीसाठी पुढे यावे, स्वावलंबी-कणखर व्हावे यासाठी रेखा ‘रमाई फाऊंडेशन’, ‘रमाई’ मासिक व साहित्यसंमेलनांच्या माध्यमातून प्रयत्न करत राहणार असल्याचे सांगतात.
रेखा मेश्राम 9403123375
– वृंदा राकेश परब
मी रमाई मासिक चार वर्षांपासून
मी रमाई मासिक चार वर्षांपासून वाचत आहे. यातील लेख ,कविता व इतर साहित्य फारच छान दर्जेदार, सामाजिक बांधीलकीचे भान ठेवणारे आहे .मात्र हे तळागाळातील लोकांपर्यंत पण जायला हवे असे मला वाटते. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Aapla upkram excellent aahe
Aapla upkram excellent aahe hardik subheccha
Aprtim lekh manapasun
Aprtim lekh manapasun Abhinandan! Prof Rekha madam n Prof Shirsat sir yancha karykartutvala krantikari JAYBHIM!
अव्यक्त महिलांना व्यक्त
अव्यक्त महिलांना व्यक्त करणारे हक्काचे मासिक रमाई.
वृंदा ताई अतिशय छान लेख व लेखन.
मी रमाई मासिकाची सुरुवाती
मी रमाई मासिकाची सुरुवाती पासुनची वाचक आहे .
त्यातिल लेख कविता ह्या सत्यावर अधारित असतात .रमाई मासिकात लिहीनार्या ऊच्चशिक्षित महिलांन पासुन ते ग्रामिण भागातिल महिलांचा ही समावेश आहे
खरच रमाई मासिक साध्या ग्रहिनींना सुध्दा लिहीत बोलत करन्याच काम करीत आहे माझ्या सारख्या अनेक महिलांच ते आवडत मासिक आहे.
ते उंच उंच भरारी घेवो हिच मंगल कामना करते
आणि संपादक रेखा मँडमला खुप खुप खुप धन्यवाद देते
जय भिम
अभिनंदन मँडम खुप खुप खुप
अभिनंदन मँडम खुप खुप खुप अभिनंदन
जय भिम
R/Sir,
We have covered your…
R/Sir,
We have covered your news in today’s Dainik Marathwada Sathi Newspaper Aurangabad Jalna Parbhani and Ahmednagar.
Vilas Shingi
9922617037
Comments are closed.