स्ट्रॅण्ड बुक स्टॉलच्या निमित्ताने

0
21
_StrandBookStallchya_Nimittane_2.jpg

मी ‘स्ट्रॅण्ड’ जनरेशनचा नाही. म्हणजे मी ज्या पिढीचे पुस्तकप्रेमी ‘स्ट्रॅण्ड बुक स्टॉल’ला फार जवळ मानायचे, त्यांच्यात येत नाही. मी कॉलेजला असताना स्ट्रॅण्डला चक्कर मारत असे. कारण माझे वडील रत्नाकर मतकरी आणि आजोबा माधव मनोहर यांच्याकडून मी स्ट्रॅण्डविषयी ऐकले होते, आणि ‘स्ट्रॅण्ड’चे मालक टी. एन. शानभाग यांच्याबद्दल कौतुक, आदर आणि दबदबा तर सर्वांनाच होता. माझ्या वडिलांच्या पिढीचे अनेकजण, खास करुन ज्यांची महाविद्यालये, कामाची ठिकाणे मुंबईच्या फोर्ट भागात होती, त्यांच्यातील अनेक जण त्या बुकस्टोअरमधे नित्यनेमाने जात. त्यांच्यातील अनेक जण शानभाग यांना पर्सनली ओळखत. शानभाग त्यांना हवी ती पुस्तके मागवण्यासाठी लागेल ती मदत करत.

मला स्वत:ला ते दुकान फार लहान वाटायचे. मी जेव्हा पुस्तके घेता झालो, त्या सुमाराला मुंबईत पहिले ‘क्रॉसवर्ड’ उघडले. शिवाय, बोरीबंदरपासून छत्रपती शिवाजी म्युझिअमपर्यंत रस्त्यावर सरसकट पुस्तके मिळायची, त्यामुळे मला प्रचंड संख्येने पुस्तके पाहण्याची सवय होती. तोवर इंटरनेट दुर्मीळ होते. इबुक्स आणि पायरसी सुरू झाली नव्हती. अॅमेझॉन तर फार दूर! त्यामुळे पुस्तके मोठ्या संख्येने पाहता-हाताळता येणे हा आकर्षणाचा आणि पुस्तकांशी अधिक ओळख होण्याचा भाग होता. मला त्या दिवसांत ‘लोटस बुक हाऊस’ या दुकानाचा शोध लागला होता. ते वांद्र्याला पश्चिमेकडे होते. मी ‘लोटस’ला फार वेळा गेलो नाही. तेही ‘स्ट्रॅण्ड’प्रमाणे लहानसे होते, पण मला तेथील ‘कलेक्शन’ मला ‘स्ट्रॅण्ड’हून अधिक आवडायचे. विराट चंडोक म्हणून गृहस्थ ते दुकान चालवायचे, तेच आता ‘वेवर्ड अॅण्ड वाईज’ हे जीपीओसमोरील गल्लीत मुंबईतील सर्वात उत्तम बुकस्टोअर चालवतात.

मला इंग्रजी वाचनाची अावड अधिक निर्माण झाली आणि सवय लागली ती मी गोव्याला तीन वर्षे होतो तेव्हा. मी व्ही. एम. साळगावकर यांच्या कंपनी लायब्ररीतून त्या दिवसात प्रचंड प्रमाणात पुस्तके आणत आणि वाचत असे. मी पुन्हा 1996 च्या अखेरीस मुंबईत आलो. तोवर ‘स्ट्रॅण्ड’चा चर्चगेट येथे सुंदराबाई हॉलला असणारा वार्षिक सेल सुरू झाला होता आणि तेव्हापासून मात्र माझी ‘स्ट्रॅण्ड’शी चांगली मैत्री झाली.

तो सेल महिनाभर चाले. माझी पहिली व्हिजिट ही साधारण प्रत्येक वेळी पहिल्या एकदोन दिवसांत असे. त्यानंतर निदान दर आठवड्याला एकदा. काही स्टॉक बदले. काही पुस्तके फार महाग असली तरी ती घेण्याइतपत मनाची तयारी तेवढ्या अवधीत होई. तोवर मुंबईतील पुस्तकांच्या दुकानांमधे ‘स्पेशॅलिटी सब्जेक्ट्स’ची पुस्तके जवळपास नसत. ‘क्रॉसवर्ड’मध्ये साठा मोठा असला तरी ती पुस्तके खपाऊ, बेस्टसेलर वर्गातील असायची. सायन्स फिक्शन, ग्राफिक नॉव्हेल्स, आर्किटेक्चरचे संदर्भग्रंथ वगैरे फार कुठे दिसत नसत. त्या प्रकारची खरेदी ‘स्ट्रॅण्ड’मध्ये होऊ शके. शानभाग त्यांच्या दुकानात गेले तर जसे कायम दिसत तसे ते प्रदर्शनातही दिसत. ते त्यांच्या नेहमीच्या गिऱ्हाईकांचे स्वागत करत, गप्पा मारत, त्यांना पुस्तके रेकमेण्ड करताना नजरेस पडत. माझी शानभाग यांच्याशी फॉर्मल ओळख कधीच झाली नाही. मी स्वत: संशोधन करुन पुस्तके निवडत असल्यामुळे मला रेकमेण्डेशन्सची गरजही वाटत नसे. पण प्रदर्शनातही त्यांचे तेथे असणे, देखरेख करणे जाणवत असे.

_StrandBookStallchya_Nimittane_1.jpg

भारत स्वतंत्र झाला तेव्हाची गोष्ट. माझे बाबा टी. एन. शानभाग यांना इंग्रजी साहित्य भारतात अाणावे, ते लोकांपर्यंत पोचवावे अशी इच्छा होती. त्या काळी फोर्टला ‘स्ट्रॅण्ड’ सिनेमामध्ये इंग्रजी सिनेमे दाखवले जायचे. बाबांनी थिएटर मालकाची परवानगी घेऊन तिथे एका छोट्या कोपऱ्यात पुस्तक विक्री सुरू केली. पुढे पारसी बझार रोडवर जागा घेऊन पुस्तकांचे रितसर दुकान सुरू झाले. मात्र ‘स्ट्रॅण्ड’ हे नाव तसेच राहिले. बाबांना पुस्तक विक्रीपेक्षा वाचक महत्त्वाचा वाटे. ते पुस्तकांच्या निवडीत चोखंदळ असायचे. त्यामुळे ‘स्ट्रॅण्ड’सोबत पंडीत जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, एपीजे अब्दुल कलाम, जेअारडी टाटा, मनमोहन सिंग अशी अनेक मोठी मंडळी ग्राहक म्हणून जोडली गेली. बाबांचे निधन झाले त्या सुमारास इंटरनेटचे प्रस्थ वाढू लागले होते. लोकांना मनोरंजनासाठी विविध पर्याय उपलब्ध होत गेले. एकीकडे पुस्तकांची मोठी दुकाने सुरू झाली अाणि दुसरीकडे पुस्तके अॉनलाईनदेखील उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे ‘स्ट्रॅण्ड’मध्ये येणारा वाचकवर्ग कमी होत गेला. ‘स्ट्रॅण्ड’ मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या तारखेपर्यंत कायमचे बंद होत अाहे. त्याला सभोवताली घडलेला बदल कारणीभूत असला तरी त्याबाबत मनात कटुता नाही. जग हे याच रितीने बदलत जाणार हे अाम्ही स्वीकारले अाहे.

– विद्या विरकर (टी. एन. शानभाग यांच्या कन्या)

मास मार्केट चेन्स; म्हणजे क्रॉसवर्ड किंवा काही वर्षे टिकलेली लॅण्डमार्क चेन आणि विशिष्ट व्यक्तीने, कुटंबाने चालवलेले दुकान यांमध्ये फरक दिसतो. असतो. चेन स्टोअर्स ही लोकप्रिय आणि नवे घेण्याच्या मागे असतात तर ‘स्ट्रॅण्ड’, ‘वेवर्ड…’ यांसारखी दुकाने ती चालवणाऱ्याची आवड, त्यांची व्यक्तीमत्त्वे आणि त्या दुकानात नियमित येणाऱ्यांबद्दलची, त्यांच्या वाचनसवयींबद्दलची जाण यांच्याशी संलग्न असतात. हे बाहेर देशातही तसेच असते. न्यू यॉर्कमध्ये ‘बार्न्स अॅन्ड नोबल’ सारखी चेन आणि तेथे असणारे, योगायोगाने ‘स्ट्रॅण्ड’ हेच नाव असलेले प्रचंड पण फॅमिली ऑपरेटेड स्टोअर, यांमध्ये गेले, की तो फरक जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बेस्टसेलर पलीकडे वाचन करणाऱ्या चोखंदळ वाचकांना कालांतराने व्यक्तीकेंद्री दुकाने अधिक आवडू लागतात. ‘स्ट्रॅण्ड’च्या प्रदर्शनाला त्या प्रकारचे अपील असे.

‘स्ट्रॅण्ड’चे संस्थापक टी. एन. शानभाग 2009 मध्ये गेले. आता, ते छोटे, पण मोठी कीर्ती असलेले दुकान बंद होत अाहे. गेल्या नऊ वर्षांचा काळ हा एकूण पुस्तक व्यावसायिकांना काळजीत पाडणारा ठरला. त्या काळात बऱ्याच गोष्टी झाल्या.

‘डिजीटल रीडर’ असे काही अस्तित्वात असते हे मला जेव्हा माहीतदेखील नव्हते तेव्हा मी इंटरनेटवर (एव्हाना त्याचेही बस्तान पक्के बसले अाहे.) पुस्तकांच्या इ कॉपीज शोधायला सुरुवात केली. त्या आहेत आणि सहज मिळतात हे पाहिल्यावर मी लोक त्या कशावर वाचत असतील याचा शोध घेतला आणि ‘सोनी’ व ‘अॅमेझॉन’ या दोन संस्थांनी ती इ पुस्तके वाचण्यासाठी रीडर्स काढले आहेत,

हे लक्षात आले. ती डिव्हाइसेस 2006 आणि 2007 मध्ये बाजारात आली. मी त्यांची माहिती इंटरनेटवर मिळवली आणि सोनीचा रीडर मागवला. पहिला अायपॅड लगेच, 2010 मध्ये आला. त्यावरही पुस्तके वाचण्याची सोय झाली. सोनी रीडर्स डिसकण्टिन्यूसुद्धा होऊन गेले आहेत. सध्या पुस्तके किंडल पेपरव्हाईट आणि आय पॅड किंवा तत्सम टॅब्लेट्सवर वाचली जातात. डिजीटल कॉपीज वाचण्याचे प्रमाण भारतात वाढत अाहे. पण ते मर्यादित आहे. त्यामुळे पुस्तकविक्रेत्यांना अद्याप त्यांवर येणाऱ्या अधिकृत आणि अनधिकृत कॉपीजमुळे धोका निर्माण झालेला नाही. पण ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘अॅमेझॉन’ या जायंट्सकडून मात्र धोका जरूर आहे.

मला त्या कंपन्यांना ऑनलाईन पुस्तकविक्री किती फायद्याची ठरते ते माहीत नाही. मी त्या दोन्ही कंपन्या फार (किंवा अजिबात) फायद्यात नसल्याच्या अफवा ऐकलेल्या आहेत. पण त्यांच्यात ‘स्ट्रॅण्ड’ किंवा ‘वेवर्ड अॅण्ड वाईज’ यांसारख्या, इंग्रजी पुस्तकविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानांचा नफा कमी करण्याची ताकद नक्की आहे. ऑनलाईन विक्रेत्यांना स्टॉकिंगची जागा, उद्योगावर नियंत्रण ठेवणारे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आणि पुस्तके नियोजित ठिकाणी वेळात पोचवण्यासाठी लागणारी यंत्रणा आवश्यक असते. पण अॉनलाईन विक्रेत्यांना दुकान चालवण्यासाठी, मोक्याची जागा घेण्यासाठी, ती मेण्टेन करण्यासाठी अाणि मार्केटिंग वगैरेसाठी जो खर्च अावश्यक असतो त्याची गरज लागत नाही. त्यामुळे ते पुस्तकाच्या किंमतीत गिऱ्हाईकाला अधिक सवलत देऊ शकतात. नियमित पुस्तके घेणाऱ्यांना ती सवलतीची रक्कम मोठी असते. शिवाय, ऑनलाईन खरेदीत जगभरातील जवळपास कोणतेही पुस्तक सहज मिळवणे शक्य असते. ते देखील घरपोच! त्यामध्ये वाचकांना विशिष्ट दुकानाच्या सिलेक्शनची मर्यादा पडत नाही. साहजिकच, आज निदान इंग्रजी पुस्तकांचे चहाते ऑनलाईन खरेदीकडे अधिक प्रमाणात वळत अाहेत यात आश्चर्य नाही.

पुस्तकांची ऑनलाईन विक्री वाढल्याने एकेकाळी सर्वाधिक शाखा असलेली अमेरिकन बुक स्टोअर्सची ‘बॉर्डर्स’ ही चेन 2011 मध्ये कोलमडली. ते घडले ते ‘स्ट्रॅण्ड’चे शानभाग गेल्यावर दोन वर्षांनी. भारतात पुढे लॅन्डमार्कदेखील बंद पडले. ‘क्रॉसवर्ड’ मात्र तग धरून आहे. दर्दी वाचकांना त्यांच्याकडे फार काही मिळत नसले तरीदेखील.

ऑनलाईन खरेदीविक्रीचा धोका वाढत असला, तरी पुस्तकाच्या छोट्या दुकानांना तग धरून राहण्यासाठी आवश्यक आहे ते चांगले, वेगळे क्युरेटींग. ते वेगळे असल्याने तशा दुकानांचा पुस्तके मागवण्याचा खर्च अधिक असणार. पण तशा वेगळ्या पुस्तकांसाठी येणारा ग्राहक असतो. ‘वेवर्ड अॅण्ड वाईज’ आणि काही प्रमाणात ‘किताबखाना’ या दोन्ही दुकानांचा भर हा शेल्व्जवर बेस्टसेलर्स ठेवण्यावर नाही, तर तेथील संग्रहात वैशिष्ट्यपूर्ण, दुकान चालकाची खास दृष्टी दाखवणारी पुस्तके मांडण्यावर आहे. तेथे कॅज्युअल ग्राहक चक्कर मारू शकतो, पण त्यापलीकडे जाऊन त्या दुकानांना नियमितपणे तेथे येईल असा ग्राहक घडवणे गरजेचे आहे. शानभाग यांची ‘स्ट्रॅण्ड’ सुरु करताना, चालवताना जी दृष्टी होती, त्या दृष्टीचे ते एक्स्टेन्शन म्हणावे लागेल. शानभाग असते, तर ‘स्ट्रॅण्ड’ बंद झाले असते का? हा जरतर वाला प्रश्न आहे. पण माझ्यासारख्या वाचकांच्या मनी असा प्रश्न येऊ शकतो, की निवडणारी नजर सक्षम असेल, तर पुस्तकांची छोटी दुकाने चालू शकतील का? आणि त्याचे उत्तर माझ्यापुरते आहे, ‘नक्कीच!’

– गणेश मतकरी

About Post Author

Previous articleउर्जा, उत्साह आणि उपक्रम
Next articleमराठी-उर्दू यांची नाळ जुळावी म्हणून…
गणेश मतकरी चित्रपट समिक्षक म्हणून प्रसिद्ध अाहेत. ते पेशाने अार्किटेक्ट. त्यांनी सिनेमाबाबातच्या लेखनास दैनिक 'महानगर'पासून सुरूवात केली. सध्या ते दैनिक 'मुंबई मिरर'मध्ये लेखन करतात. गणेश यांनी दहा वर्षांपूर्वी 'अापला सिनेमास्कोप' हा ब्लॉग सुरु केला. तो मोठ्या प्रमाणात वाचला जातो. गणेश यांनी सिनेमा या विषयावर लिहिलेली 'फिल्ममेकर्स', 'सिनेमॅटिक', 'चौकटीबाहेरचा सिनेमा', 'समाजवाद अाणि हिंदी सिनेमा' ही पुस्तके प्रसिद्ध अाहेत. ते कथालेखक म्हणून नावारुपाला येत अाहे. त्यांचे 'खिडक्या अर्ध्या उघड्या' अाणि 'इन्स्टॉलेशन्स' हे कथासंग्रह प्रसिद्ध अाहेत. त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या कथांचे दोन भागांत संपादन केले आहे. गणेश यांच्या 'सिनेमॅटिक' या पुस्तकाला 'सुभाष भेंडे नवोदित लेखक पुरस्कार' तर 'इन्स्टॉलेशन्स' या पुस्तकाला 'लोकमंगल साहित्य पुरस्कार' लाभला अाहे. लेखकाचा दूरध्वनी 9820243778