सोहनी झालासे कळस

सोहनी हे नाव किती छान आहे ! अनेक चिजांमध्ये ‘सोहनी सूरत’ असा वापर आढळतो. या नावाच्या अर्थाप्रमाणेच सोहनी ही अत्यंत ‘सुहावनी’ रागिणी आहे. रागिणी अशासाठी म्हटले, की तिचा जीव लहान आहे. मैफलीमधील तिचा वावर अल्पकाळासाठी असतो; पण प्रभाव मात्र दीर्घकाळ टिकणारा असतो. मी तो असर पहिल्यांदा अनुभवला तो मालिनीताई राजूरकर यांच्या सोहनीद्वारे ! मी त्यांनी गायलेल्या ‘काहे अब तुम आये हो’ ही पारंपरिक बंदिश आणि द्रुत तराणा यांची पारायणे करतो. गंमत म्हणजे मालिनी यांच्या आवाजातील तीच चीज ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव पेशवा व काशीबाई यांच्यामधील प्रसंगात समयसूचकतेने वापरली आहे. त्याला कारण सोहनीचा भाव !

पतीच्या किंवा प्रियकराच्या वागण्याने दुखावलेली, त्रासलेली आणि त्यामुळे क्रुद्ध अशी नायिका मुळूमुळू रडत बसण्यापेक्षा जेव्हा स्पष्टपणे नायकाला त्याच्या वर्तनाचा जाब विचारते; तेव्हा सोहनीचे सूर सापडतात. अश्विनी भिडे-देशपांडे सोहनीची तुलना द्रौपदीशी करतात. द्रौपदीला भर सभेत अपमानित केल्यावर ती तिच्या पाचही पतींना खडसावून विचारते, की जर तुम्ही आधीच स्वतःला द्यूतात गमावून बसला होतात; तर मला तुम्ही कोठल्या अधिकाराने पणाला लावले? सोहनीचा स्वभाव हा असा स्पष्टवक्त्याचा आहे. त्याला कारण त्याचे सूर ! सोहनी रागात पंचम वर्ज्य आहे; तर ऋषभ कोमल आणि मध्यम तीव्र. मारवा थाटातील हा राग ! मजेची गोष्ट म्हणजे पूरिया आणि मारवा या संधिकालीन रागांचेदेखील तेच सूर आहेत; पण चलनभेदाने संपूर्ण रागस्वरूप बदलते आणि त्याला वेगळे व्यक्तिमत्त्व प्राप्त होते. हीच तर अभिजात भारतीय संगीताची खासियत आहे.

सोहनी हा उत्तररात्री गायचा राग ! त्यामुळे साहाजिकच त्याचे सूर टिपेचे, काहीसे आर्त आणि अस्वस्थ करणारे ! तो मध्यमाच्या वरती खुलतो आणि वारंवार तारषड्जाकडे झेपावतो. साहाजिकच, प्रियकराकडून फसवणूक झालेली नायिका जिचे दुःख आणि क्रोध, दोन्ही सीमा ओलांडून वाहत आहे; तिची कहाणी ‘काहे अब तुम आये हो’ ही बंदिश सार्थपणे पोचवते. भास्करबुवा बखले, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर यांच्यापासून सर्व कलाकारांनी त्या बंदिशीला न्याय दिला आहे.

ग्वाल्हेर घराण्याचे कलाकार ‘देखवे को जिया ललचाये’ किंवा ‘जानू मै सब तुम्हरी बात’ किंवा ‘जियरा रे’ हे ख्याल मांडतात, तर आग्रा व जयपूर घराण्याच्या कलाकारांकडून ‘करम कीजिए’ हा ख्याल अनेकदा ऐकण्यास मिळतो.

मालिनी यांच्या सोहनीनंतर मला अश्विनी भिडे यांच्या सोहनीने पुरते झपाटले होते. त्यांनी गडकरी रंगायतनमधील ‘परंपरा’ या कार्यक्रमात रात्री उशिरा ‘सनदपियांची का करु ना माने री’ ही बंदिश की ठुमरी आणि त्याला जोडून स्वतःची ‘नंदके सुवन’ ही द्रुत मत्ततालातील रचना इतकी तडफदारपणे गायली की आख्खा श्रोतावर्ग भान हरपून ऐकत होता. तीच ‘सनदपियांची’ चीज मी म्हणण्याचा प्रयत्न केला आहे.

सोहोनीमध्ये द्रुत बंदिशींची रेलचेल आहे आणि वैविध्यही आहे. शरद साठे यांच्याकडून ऐकलेला ‘मोरा सैंया’ हा खयाल, वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेली ‘दरसपियांची द्रुम द्रुम लता लता’ ही द्रुत बंदिश आणि तराणा तर लोकप्रिय आहे ! कुमार गंधर्वांची ‘रंग ना डारो श्यामजी’ ही चीज हे सगळेच एकाहून एक सरस आहे. शुभदा पराडकर यांनी ‘चलो हटो जाओ सैंया’ हा दादरा आणि त्याला जोडून खादिम हुसैन खान यांची ‘सजन तुम जरा बोलो बोलो बोलो’ ही चीज फार ढंगदार सादर केली आहे… यादी बरीच लांब होऊ शकते.

मोगूबाई कुर्डीकर सोहनी अप्रतिम गायच्या. त्यांनी ‘दत्तगुरु सुमर ले’ हे भजन ‘गुरु चरनन शरन कर मनुजा’ यांसारख्या रचना गायल्या आहेत; पण मला विशेष आवडते, ती त्यांनी गायलेली ‘वे मियां सड्डे सानु की’ ही पंजाबी रचना. अप्रतिम डौलदार असे बोल टाकत मांडलेली खूपच उठावदार रचना आहे ती. त्यांच्या परात्पर शिष्या प्रतिमा टिळक ती रचना सुंदर रीतीने मांडतात.

सोहनीचे काही जोड रागही आहेत. कुमार गंधर्व यांनी निर्मिलेला सोहनी भटियार हा असाच ‘Hauntingly Beautiful’ राग !’ म्हारो जी भूलो ना माने’ या त्यांच्या चीजेतील आर्त पुकार अंगावर शहारा आणतो. राशीद खान गात तो ‘सोहोनी बहार’ हा असाच अवघड राग. जयपूर घराण्यात दोन मध्यम वापरून ‘तर्ज सोहनी’ गातात, तर ‘पंचम सोहनी’ असाही एक अनवट प्रकार गायला जातो.

‘सुरत पिया की न छिन बिसराये’ या प्रसिद्ध पदाचा मुखडा सोहनीवर आधारित आहे; तसेच, अत्यंत अवघड असे मानले गेलेले लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले ‘कुहू कुहू बोले कोयलिया’ हे प्रसिद्ध गाणे ! त्याचा मुखडा आणि पहिला अंतरा सोहनी रागात आहे. ‘मुघल ए आझम’ चित्रपटात बडे गुलाम अली खान यांबांनी अजरामर केलेली ‘प्रेम जोगन बनके’ ही ठुमरीही सोहनीचीच ! एवढेच काय; तर एकल तबला वादन किंवा नृत्य यांत वापरला जाणारा लहरा हा बऱ्याचदा सोहनीत असतो.

असा हा सोहनी ! जीव छोटा असला तरी मैफलीला कळसावर नेणारा ! मी माझ्या या लेखमालेचा शेवट करण्यासाठी म्हणूनच हा राग निवडला.

– सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.com

About Post Author

6 COMMENTS

  1. अतिशय सुंदर लेख. नेहमी लिहीत रहावे ही विनंती

  2. अप्रतिम लेख लिहिला आहे! मनापासून आभार आणि शुभेच्छा!

  3. फारच छान लेख आहे. सोहनी राग मलाहि फार आवडतो. या ragabaddal अजून लिहिता येईल का? आपल्या लेखातील सगळेच उदा. Malinitai राजूरकर,kumar गंधर्व,त्यांचा सोहनी भाटियाr,veena ताई सहस्रबुद्धे ,mogubai kurdikar यांनी आपले शास्त्रीय संगीत अतिशय समृद्ध केले आहे. आपला अभ्यास आणि गाणेही उत्तमच आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here