सोलापूर शहराचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकाच्या मागे ढकलता येत नाही. त्या काळापूर्वीचे सोलापूरचे अस्तित्व ठरवायचे झाल्यास ठोस व बळकट पुरावे द्यावे लागतील. परंतु तसे पुरावे उपलब्ध नाहीत.
सांप्रत, सोलापूर शहर परिवहन कार्यशाळेसमोरच्या बुधवार पेठेतील नवनिर्मित बौद्ध विहाराजवळ काही वर्षांपूर्वी शिलालेख सापडला. तो सर्वज्ञ चक्रवर्ती चालुक्य सोमेश्वर तिसरा (इसवी सन 1127-1168) याच्या कारकिर्दीतील आहे. अभिलाषितार्थ चिंतामणी अथवा ‘मानसील्लस’ या ग्रंथांचा कर्ता तोच. महामंडलेश्वर कलचुरी बिज्जलदेव दुसरा (इसवी सन 1130-1168) याची सत्ता त्या विभागावर होती. त्याची राजधानी मंगळवेढ्यास होती. वीरशैव मतोद्धारक बसवेश्वर हे त्याच्या दरबारात मंत्री होते. पुढे बिज्जलदेवाने चालुक्यांची सत्ता अपहरण करून तो स्वत: सत्ताधीश झाला व त्याने त्याची राजधानी बीदर जिल्ह्यातील कल्याण येथे हलवली. बिज्जलदेवाचा स्थानिक अधिकारी महाप्रधान श्रीकरण कन्नप्पय्य नायक यांनी त्या ठिकाणी एक त्रिकारात्मक मंदिर निर्माण केले. त्या त्रिकुटातील स्थापित देवतांची नावे अनुक्रमे कन्नेश्वर, चट्टेश्वर आणि मल्लिकार्जुन. त्या मंदिरांना बिज्जलदेवांनी भूदान दिले आहे. त्या सर्व नोंदी शिलालेखामध्ये नोंदवताना ते मंदिर सोन्नलिंगे (सोलापूर) येथे उभारण्यात आल्याचे म्हटले आहे. त्या लेखाची तारीख आहे 22 डिसेंबर 1135. सोलापूर अस्तित्वात असल्याचा स्पष्ट असा तो पहिला पुरावा होय. त्याचा अर्थ असा नव्हे, की ते गाव त्या काळापूर्वी अस्तित्वातच नव्हते! त्याचे अस्तित्व जरूर असणार; परंतु त्याचा इतिहास मागे किती न्यायचा याचा विचार अनेक अंगांनी करावा लागेल. तत्कालीन ते स्थान व्यापारपेठ अथवा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते, अशा नोंदी पुराभिलेखांतून व तत्कालीन ग्रंथातून मिळत नाहीत. तसे जर असते तर बलचुरी बिज्जलदेव किंवा त्या राजघराण्यातील पूर्ववर्ती सत्ताधिकारी यांनी त्यांची राजधानी मंगळवेढ्यास न ठेवता तो मान सोलापुरास दिला असता. परंतु शिवयोगी सिद्धरामांच्या श्रीशैल यात्रेनंतर, त्यांनी सोलापूर येथे निर्माण केलेल्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रसिद्धीमुळे सोलापूर प्रकाशझोतात आले. यथाकाल, सिद्धरामांनी तलावनिर्मिती करून त्या गावाचा पाणीप्रश्न सोडवला. त्यापुढे सोलापूरच्या प्रगतीत कोठे अडसर आल्याचे दिसून येत नाही.
इसवी सन 1135 च्या शिलालेखात उल्लेखलेले त्रिकटात्मक मंदिर अस्तित्वात नाही. ते कोठे होते, कसे होते याबद्दल काही माहिती नाही. ते काळाच्या उदरात नामशेष राहिले आहे.
सिद्धरामनिर्मित कपिलसिद्ध मल्लिक्कार्जुनाचे मंदिर (इसवी सन 1130-1180) अवशेष स्वरूपात किल्ल्यामध्ये उभे आहे. किल्ल्याची निर्मिती ही नंतरची आहे. कल्याण चालुक्याची उत्तम मंदिर निर्मिती म्हणून त्या वास्तूकडे बघण्यास हरकत नाही. हंपी (विजयनगर) चे कवी राघवांक (सुमारे इसवी सन 13 वे शतक) यांनी सिद्धराम पुराणांची पद्यात्मक रचना केली आहे. त्या कृतीचे मूळ नाव ‘सिद्धराम चरित्र’. तो ग्रंथ लिहिताना राघवाकांनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराचे वर्णन करताना त्या परिसरातील इतर मंदिरांचेही वर्णन केले आहे. परंतु त्यातील एकही शिल्लक नाही!
पुढील काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. पारतंत्र्याच्या काळात व त्या आधीच्या मुसलमानी कारकिर्दीत, असहिष्णू मताच्या मंडळींनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराची जेवढी विटंबना व नासधूस करता येईल तेवढी केली. कालांतराने, भक्त मंडळींना पूजा-उत्सवादी करणे कठीण झाले. त्यामुळे स्थानिक सद्भक्त मंडळींनी निर्णय घेऊन जुन्या मंदिरातील काही खांब आणि उपयुक्त शिलासामुग्री एकत्र करून उत्तर कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिर निर्माण केले. तो सन आहे इसवी सन 1821. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन म्हणजे सोन्नलिगे पुखराधिश्वर; अर्थात सोलापूरचे ग्रामदैवत होय.
मध्ययुगीन मुस्लिम राजवटीत बहामनीकडून तेथे भुईकोट उभारला गेला. त्याच्या बांधकामात हिंदुमंदिराचे ताशीव दगड, मूर्तिशिल्प, अनेक कोरीव स्तंभ वापरण्यात आले आहेत. त्याचा अर्थ उघड आहे, की परिसरातील हिंदुमंदिरे उध्वस्त करून, मोडतोड करून त्यांची शिळासामग्री किल्ला बांधताना वापरली गेली आहे. कालांतराने, तो किल्ला बहामनीकडून विजापूरच्या आदिलशहाने वीस मण सोने देऊन विकत घेतला अशी नोंद इतिहासातून मिळते.
बहामनी व आदिलशाही काळात तेथे अनेक मशिदी, दर्गे व विहिरी यांची निर्मिती झाली. तथापी, कालौघात त्यातील ब-याच वास्तू नष्ट झाल्या व ज्या शिल्लक आहेत त्यात परिवर्तन झाले असल्याचे आढळून येते. त्या दोन्ही शाह्यांकडे सेवा रुजू केलेला एक अधिकारी नायब जाबित खान म्हणून होता. त्याने त्या शाह्यांसाठी बरीच खटपट करून पुष्कळ इमारतींची, वास्तूंची निर्मिती केली. अली आदिलशाह (इसवी सन 1657-1672) करता त्याने किल्ल्यामध्ये महाल उभारल्याची नोंद शिलालेखामध्ये सापडते. त्या सर्व वास्तू कालपुरुषाने स्वाहा केल्या आहेत. कालाय तस्मै नम:, दुसरे काय!
देशात पुराणवस्तू विभाग आहे. तो त्याच्या परीने कार्यरत आहे. खंडप्राय देशात पुराणवस्तू-वास्तूंचा फार मोठा पसारा आहे. त्या सर्वांचे कमी-अधिक महत्त्व देऊन संरक्षण, संवर्धन करणे मोठे कठीण काम आहे. स्थानिक पुराणवस्तुप्रेमी संस्थांनी या वास्तूंचे जतन करावयास हवे!
– आनंद कुंभार
प्लॉट क्र. 34, न्यू पातशा पेठ,
अशोक चौक, दिवटे टेक्स्टाईल्सच्याशेजारी,
सोलापूर – 413006
9420806485
(‘समर्थ सोलापूर, 2020’ मधून उद्धृत)
सोलापूर शहरातील वास्तू आणि वैशिष्ट्ये
सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी या नगराची रचना केली. त्यांनी तेथे अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली. छत्तीस एकर क्षेत्रफळ असलेले सरोवर निर्माण केले. त्यालाच सिद्धेश्वर तलाव असे म्हणतात. सिद्धरामेश्वरांनी समाजसुधारणेची लोकोपयोगी कामे केली.
सोलापूर हे कापडगिरण्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. कापड उत्पादनास तेथे 1877 साली प्रारंभ झाला. ‘सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ ही पहिली गिरणी. ती ‘जुनी मिल’ म्हणून प्रसिद्ध होती. त्या मिलमध्ये तेलगू भाषिक समाज त्यांच्या वस्त्र विणण्याच्या कौशल्याबद्दल नावाजला गेला. ‘जुनी मिल’ हे सोलापूरचे वैभव मानले जाई.
शेठ गोकुळदास मोरारजी हे तिचे मालक! त्यांनी त्या काळी वीजनिर्मितीसाठी मिलच्या आवारात मोठे हौद व विहिरी खोदून पॉवर हाऊसही बांधले. पूर्ण सोलापूरचे रस्ते त्या वीजेमुळे प्रकाशित झाले. मिल अठ्ठ्याऐंशी एकर क्षेत्रात वसली आहे. मिलची चिमणी तीनशेपंचवीस फूट उंच होती व ती आशिया खंडातील सर्वांत उंच चिमणी ठरली. दुस-या महायुद्धात सैनिकांच्या छावणीसाठी लागणारे तंबूचे कापड त्या मिलमधून तयार होत असे. नंतरच्या काळात सोलापुरात अनेक गिरण्या उभारल्या गेल्या.
‘नरसिंग गिरजी’ ही मिल मिळालेला नफा कामगारांना वाटत असे! त्या मिलच्या आवारात अडीचशे वर्षांहून अधिक जुने वडाचे झाड आहे, त्याचा बुंधा तब्बल पंधरा फूट रुंद आहे. त्याच आवारात पाउणशे वर्षांपूर्वीचे लाकडी देवघर आहे. त्यातील गणपतीची मूर्ती साडेसहा फूट उंच आहे. देवघराचे नक्षीकाम रेखीव आहे. एकशेपंधरा वर्षांनंतरही पाणी पुरवणारी चौकोनी दगडी विहीरही तेथेच आहे.
सोलापुरातील चाळी प्रसिद्ध आहेत. वीरचंदपूर चाळ 1944 साली उभारली. तेथे चारशेअठ्ठ्याऐंशी घरे आहेत, तर एस.जी. वारद चाळीत तीनशेएक घरे आहेत.
कवी कुंजविहारी ऊर्फ हरिहर गुरुनाथ सलगरकर हे ‘लक्ष्मीविष्णू मिलमध्ये (1896 ते 1978)’ काम करत. लक्ष्मी विष्णू चाळीत घरे होती सातशेपन्नास. माधवराव आपटे यांनी ती मिल चालवायला 1966 मध्ये घेतली. त्या काळी चाळीचे भाडे तीन रुपये महिना असे (तेव्हा पाव दहा पैशांला व बुंदी पंधरा पैशांला मिळे). चाळींची डागडुजी चाळींचे मालकच करत.
शहराला हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा होई. म्हणून अनेक विहिरी खोदल्या गेल्या. त्यांपैकी साखरपेठमधील विहिरीला गोड पाणी लागले. म्हणून त्या पेठेला साखरपेठ म्हणत. तेथेच सिद्धेरामेश्वरांच्या जन्माचा उल्लेख आहे. तेथेच हिंगलाजमाता मंदिर आहे. तिचे उगमस्थान बलुचिस्तानात असल्याचे दाखले मिळतात. त्याच भागात लाकडाचा बाजार होता. त्याला तेलगुमध्ये ‘कट्टेलसंता’ म्हणतात. त्या नावाचे प्रसृतिगृह त्र्याऐंशी वर्षांनंतरही कार्यरत आहे. त्याच पेठेतील पद्मा टॉकीज 1946 पासून टिकून आहे.
त्या पेठेतील सोमा कुटुंबीय हातमागावर सुंदर व सुबक कलाकृती विणतात व त्यांनी बनवलेल्या वॉलहँगिंगना जगभरात मागणी आहे. ते कुटुंब 1965 पासून वॉलहँगिंगच्या व्यवसायात आहे. साखरपेठेत राहणारे आणखी एक नाव आहे व्यंकटेश कोटा! भुयारी गटारे व ड्रेनेज साफ करणारी ‘व्यंकटगिरी यंत्रे’ बनवणारे व्यंकटेश कोटा फक्त पाचवीपर्यंत शिकलेले आहेत. पण त्यांच्या यंत्रांना अमेरिका, इंग्लंड व युरोपमध्ये मागणी आहे. त्यांनी त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी ते यंत्र बनवले. त्यांचा कारखाना सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव येथे आहे.
तुकाराम महाराज जोशी यांना वैष्णव संप्रदायाचे कुलगुरू मानतात. त्यांचा जन्म1910 सालचा. त्यांनी पंढरपूरला दिंडी नेण्याची सुरुवात सत्तर वर्षांपूर्वी केली. ती प्रथा अजूनही सुरू आहे. त्यांनी 1जानेवारी 1995 रोजी रविवार पेठेत जिवंत समाधी घेतली. त्यांचा समाधी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पद्मशाली समाज म्हणजे विणकर व विड्या वळणारे! तो समाज 1845 मध्ये सोलापुरात आला.
त्या समाजाच्या ‘सेवा मंडळा’ला एकशेचार वर्षे झाली. ती संस्था वड्डेपल्ली येथे आहे. त्याच पद्मशालींच्या 1943 मध्ये स्थापन झालेल्या कुचन प्रशालेच्या बावीस संस्था शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत. ‘दयानंद अँग्लो वैदिक शिक्षण’ संस्थेची स्थापना 1940 साली आर्य समाजाच्या (1886 साली लाहोरमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली) मंडळींनी केली. देशभरात त्या संस्थेच्या सातशेपन्नास शाखा असून महाराष्ट्रात एकोणीस आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे ‘दयानंदचे’च (अनुक्रमे लाहोर व सोलापूर) विद्यार्थी. सोलापुरातील रविवार पेठेत त्रेसष्ट एकर जागेत उभे असलेले ‘दयानंद महाविद्यालय’ होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पंढरीच आहे. ते गेली त्र्याहत्तर वर्षे कार्यरत आहे. दयानंदचे विद्यार्थी – अटलबिहारी वाजपेयी, शहीद भगतसिंग, राजगुरू, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, क्रिकेटपटू कपिलदेव व महेंद्रसिंग धोनी, शाहरुख खान, गायक जगजितसिंग, डॉ. यु.म. पठाण, जब्बार पटेल, डॉ. अरुण टिकेकर, मारुती चित्तमपल्ली व अनेक आयएएस अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू. तेथे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, विंदा करंदीकर, वसंत कानेटकर, महाकवी द.रा. बेंद्रे इत्यादी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवले आहे.
सोलापूर महामार्गावरील मुळेगाव येथे 1933 साली विभागीय कृषी संशोधन केंद्राचे कार्य सुरू झाले. तेथे संशोधलेले विविध प्रयोग कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरले आहेत. तसेच, तेथे संशोधित झालेली नाना प्रकारची अवजारे व यंत्रे यांना राज्यभर ख्याती आहे. तेथे शास्त्रज्ञ एस.व्ही. कानिटकर यांच्या नावाने संग्रहालय उभारले गेले आहे.
सोलापुरात सुमारे पन्नास हजार हातमाग 1948 साली होते. त्या कुटिरोद्योगात मिळालेला नफा व्यापारी व दलाल यांनाच मिळायचा म्हणून 1949 साली तेथील रविवारपेठेत ‘उद्योग बँक’ उभारली गेली. ती 2004 सालापर्यंत कार्यरत होती व नंतर बंद पडली. त्या बँकेने 1966 साली व्याख्यानमाला सुरू केली. त्या व्याख्यानमालेचा नावलौकिक पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेनंतर आहे. ती तेलगू भाषिकांकडून झालेली मराठीची सेवा आहे.
वडार समाज – ओरिसा प्रांतातून आलेला वडार समाज पूर्वी बांधकामावर दगड फोडण्याचे काम करत असे. त्यांची रविवार पेठेत तीन हजारांची वस्ती आहे. त्यांनी पारंपरिक व्यवसायाबरोबर सोलापूरच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. त्यांनी त्यांचा जम अनेक मंदिरे, कळसांची कलाकुसर व रंगरंगोटीतही बसवला आहे. सामुदायिक विवाह हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामधील सुशिक्षितांचे प्रमाणही वाढत आहे.
सोळा गावांचे मिळून सोलापूर झाल्याचे सांगितले जाते. शहराच्या प्रत्येक भागाने त्याचे वैशिष्ट्य जपले आहे. आता जो संयुक्त चौक आहे, त्याला पूर्वी बारा तोटी चौक म्हणत. त्या बाजूला बारा तोटी नळ होते व चार बाजूंला चार पेठा होत्या. तेथेच तिप्पण्णा हिब्बारे यांनी पिठाची गिरणी शंभर वर्षांपूर्वी सुरू केली. ती चालू आहे. तर 1824 साली स्थापन झालेले ‘करंजकर विद्यालय’ही पावणेदोनशे वर्षांनंतर सुरू आहे. तेथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून सातशेदहा विद्यार्थी आहेत. त्या विद्यालयात सतराव्या शतकापासूनची दुर्मीळ ग्रंथसंपदा – नकाशे, शब्दकोश, जुन्या कादंबऱ्या व पुस्तके – आहे.
चाटी गल्ली व फलटण गल्ली या परिसरात कापड व्यापार आहे (मंगळवार पेठ). तेथील लक्ष्मीनारायण मंदिरात एका वर्षातील दोनशे दिवस विविध उत्सव सुरू असतात. जवळच, सत्यनारायण मंदिर आहे. (ते दोनशे वर्षांपूर्वीचे, महाराष्ट्रातील सत्यनारायणाचे दुसरे मंदिर). उत्तम वास्तुकलेचे नमुने असलेले अनेक जुने वाडे मंगळवार पेठेत पाहायला मिळतात. शिसवी लाकडात केलेली नक्षी असलेला काडादी वाडा, सत्तावीसशे फुटांचा तीन मजली येरटे वाडा, दीडशे वर्षांचा सोमशेट्टी वाडा, अब्दुलपुरकर वाडा… राठी, बसवंती, सोमाणी यांचे वाडेही जुने आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवलेली ‘प्रेरणा भूमी, बुद्धविहार’ बुधवार पेठेत आहे. शंभर वर्षांची श्राविका संस्था; तसेच, दमाणी प्रशाला, जैन गुरुकुल संकूल, सोलापूर एज्युकेशन सोसायटी अशा नामवंत शिक्षण संस्था बुधवार पेठेतच आहेत. त्याच पेठेत श्रमिकांना रोजीरोटी देणारे विडी उद्योग आहेत.
लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ज्या ‘आजोबा गणपती’वरून सुचली ते मंदिर शुक्रवार पेठेत आहे. तेथे सार्वजनिक गणेशोत्सव इसवी सन 1885 पासून साजरा होतो. टिळक यांनी पुण्यातील सार्वजनिक गणपती 1893 मध्ये सुरू केला, त्याआधी आठ वर्षे! तो गणपती इको फ्रेंडली साहित्य वापरून बनवला गेला आहे व ती मूर्ती एकशेअठ्ठावीस वर्षांची जुनी आहे याचे आश्चर्य वाटते. अनेक मान्यवरांनी त्या मंदिरास भेट दिली असून तो मानाचा गणपती आहे. त्याच पेठेत गेली शंभर वर्षे दूध बाजार चालतो. ‘सोलापूर समाचार’ हे साप्ताहिक 1885 साली त्याच भागात सुरू झाले व त्याचे दैनिकात रूपांतर 1930 मध्ये झाले, पण ते 1988 साली बंद पडले. त्याच जक्कल कुटुंबीयांचे ‘विश्व समाचार (1976)’ मात्र सुरू आहे. त्याच भागात शंभर वर्षांपासून ‘भांडे’ गल्ली आहे. सर्व धातूंची भांडी, पलंग, कपाटे, ट्रंका तेथे मिळतात.
वड, लिंब व पिंपळ या वृक्षांचा संगम असलेले शहरातील एकमेव ठिकाण शनिवार पेठेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पाहण्यास मिळते.
भवानी पेठेतील कृषी विद्यालयात आधुनिक शेतीचे शिक्षण मिळते. त्याचे क्षेत्र साडेअकरा एकर आहे. ते विद्यालय गेली सहासष्ट वर्षे सोलापूरला वरदान ठरले आहे.
सोलापूरकरांचे आणखी एक आराध्य दैवत असलेली रूपाभवानी, तिचे मंदिरही भवानी पेठेत आहे. ती मूर्ती तुळजापूरच्या तुळजाभवानीशी मिळतीजुळती असल्याने ती रुपाभवानी! नवरात्रात तेथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. दीड एकर जागेत सभामंडप व मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. शहरातील जोडभावी पेठेत सर्व काही मिळते. मंगळवार बाजारात भाजीपाला, फळे, दूध, तूप, इतर खाद्यपदार्थ, कपडे, अवजारे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, धान्य हे सर्व वाजवी भावात मिळते.
हातमागावर साड्या विणणारी पेठ म्हणजे आंध्र-भद्रावती/दाजी पेठ. तेथे तेलगू समाज इरकली, जपानी, मोठी किनार, श्यामसुंदर किनार अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या साड्या विणत असे. आता आंध्र-भद्रावती पेठ ही यल्लमा पेठ म्हणून ओळखली जाते. दाजी पेठेत दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व्यंकटेश्वर मंदिर, म्हणजे तिरुपती बालाजीची प्रतिकृती आहे. जवळ, तितकेच सुंदर राममंदिर आहे. पाच्छा पेठेतही दाक्षिणात्य बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले कालिकादेवी मंदिर आहे. त्याच पेठेत नऊवारी लुगडी व सतरंज्या बनवणारे हातमाग होते.
बेगम पेठ – सोलापुरवर औरंगजेबाचे वर्चस्व असताना तो ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा) येथे सात वर्षे राहिला. तो जुम्मा आणि ईद नमाजासाठी सोलापूरच्या जामे मशिदीत जात असे. तो खुद्द सोलापुरातही तेरा महिने राहिला होता. त्याची फौज बेगमपेठेत असायची. त्याच्याबरोबर त्याची चौथी पत्नी (बेगम) उदयपुरी व मुलगी झीनतल्लीसा होती. त्या वेळपासूनचे बेगमपुरा नंतर बेगम पेठ झाले आहे. ती व्यापा-यांची व कष्टक-यांची पेठ म्हणून प्रसिद्ध आहे.
सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील सिद्धेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्या पेठेत अनेक कलावंत झाले. नाट्य-कलागुणांची जणू तेथे मांदियाळी होती.
दीडशे वर्षे कार्यरत असलेले ‘हिराचंद नेमचंद वाचनालय’ हे सोलापूरची शान आहे. शहरवासीयांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम ते वाचनालय करते. त्याचे तीन हजार सभासद आहेत. ते वाचनालय मुरारजी पेठेत आहे. वाचनसंस्कृतीबरोबर अनेक कार्यक्रमही त्यांच्या ‘टिळक स्मारक सभागृहा’त होत असतात. त्याच पेठेत राघवेंद्र स्वामी मठ आहे व तेथे हजारो भक्तगण अध्यात्माची परंपरा जोपासत आहेत.
साठ फुट खोल व तीस फुटापर्यंत पाय-या असलेली, संपूर्ण दगडी बांधकाम असलेली गंगा विहीर ही नवी पेठचे वैशिष्ट्य आहे. त्याच नवी पेठचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘नामदेव चिवडा’! तो त्याची ओळख गेली एकशेचाळीस वर्षे टिकवून आहे. त्याच पेठेत छत्रपतींच्या कार्याची ओळख सांगणारे ‘शिवस्मारक’ एक एकर चौदा गुंठे जागेवर उभे राहिले आहे. राष्ट्रसेवेची प्रेरणा देणा-या त्या कार्यकेंद्रात विविध व्याख्याने, प्रवचने, स्पर्धा होत असतात. एक संग्रहालयही तेथे आहे. तसेच व्यायामशाळा, भौतिक चिकित्सा केंद्र आहे.
गावठाण भाग विकसित करून बनवलेली ती ही नवी पेठ! सोलापूरचे वैभव असलेला भुईकोट किल्ला त्याच पेठेत आहे. तो 1358 ते 1375 या दरम्यान बांधला गेला असावा. तेथे आतमध्ये बाग बनवली आहे, अठराव्या शतकातील दोन तोफा आहेत. देवालयासारखी एक वास्तू असून त्यावरील शिल्पकला हिंदू राजांनी केलेली आहे. त्या मंदिरातील शिवलिंग मल्लिकार्जुन मंदिरात आणले असावे असे सांगण्यात येते.
ज्योतिषशास्त्राला पंचांगाचा आधार देणारे कै. ल.गो. दाते यांनी 1916-17 मध्ये दाते पंचांग प्रसिद्ध केले. त्यांनी गणितातील स्थुलता घालवून अधिक सूक्ष्म असे दृक्गणित स्वीकारले व पूर्वीची ‘घटी-पळे’ देणारी वेळ रद्द करून घड्याळाच्या वेळा दिल्याने ते लोकप्रिय झाले. दाते पंचांगकर्ते लोकांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसन करतात. त्यांची पंचांगे 1939 पासून पाच पाच वर्षांच्या संचात उपलब्ध झाल्याने अभ्यासकांची सोय झाली आहे. त्यांचे स्वत:चे गणेशमंदिरही आहे.
सोलापूरच्या दक्षिण कसबा पेठेतील ‘सुंद्री’ वादन म्हणजे सोलापूरची शान आहे. सुंद्री म्हणजे आकाराने छोटी सनई. सुंद्रीवादन कलेला जाधव घराणे सात पिढ्यांपासून जोपासत आहेत. अक्कलकोटच्या संस्थानचे राजा फत्तेसिंह यांनी ते वादन ऐकून तिला ‘सुंद्री’ हे नाव दिले. ती खैर वा सिसम लाकडाची बनवतात. लांबी अकरा इंच, त्यावर नऊ स्वररंध्रे असून वरील भाग निमुळता असतो. खालील भाग चंबूसारखा व मुखभागी ताडाच्या पानाची पत्ती असते. सुंद्रीवादनाला ‘खुर्दक’ या तालवाद्याची साथ असते.
प्रवचनकार, किर्तनकार, कविवर व लोकशाहीर अशा अनेक बिरुदावलीने अजरामर ठरलेले राम जोशी हे उत्तर कसब्यात जन्माला आले. ते आठशे वर्षांची परंपरा असलेल्या जोशी घराण्यात 1760 वा 1762 साली जन्मले. त्यांच्या घराण्याकडे पूर्वापार ग्रामजोशी हे मानाचे पद होते. ते आता त्यांच्या सहाव्या पिढीकडे आहे. – सुमारे एक हजार वर्षांपासूनचा देशमुखवाडा दक्षिण कसब्यात आहे. सिद्धरामेश्वरांचा आठशे वर्षांपूर्वीचा योगदंड त्या वाड्यात पुजला जातो.
सोळाव्या शतकातील मल्लिकार्जुनाचे हेमाडपंती मंदिर उत्तर कसबापेठेत आहे. तेथे दीडशे फूट खोलीची प्राचीन विहीर स्वच्छ पाण्याने भरलेली असते. त्या भागातील पत्रा तालीम प्रसिद्ध आहे.
हरिभाई देवकरण प्रशाला 1918 साली स्थापन झाली. ती शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर त्याच रेल्वे लाईन भागातील दुसरी नामवंत जुनी शाळा म्हणजे सोलापूर हायस्कूल! त्याच्या नंतर नॉर्थकोर्ट ही प्रशाला स्थापन झाली, 1855 साली! तब्बल एकशेसाठ वर्षांची ती प्रशाला होती सोलापुरातील पहिले हायस्कूल! संपूर्ण इमारत दगडी बांधणीची असून इतर अभ्यासक्रमांसाठी आणखी सहा इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्या प्रशालेतील नामवंत विद्यार्थी आहेत – डॉ. द्वारकानाथ कोटणीस, शिल्पकार रावबहाद्दर मुळे, स्वामी रामानंदतीर्थ, शंतनुराव किर्लोस्कर, वालचंद हिराचंद, शेठ गुलाबचंद व रतनचंद हिराचंद, कवी कुंजविहारी, सोलापूरचे ‘विश्वकर्मा’ – नानासाहेब चक्रदेव, माजी नगराध्यक्ष – बाबासाहेब वारद, सर अब्दुल लतिफ, व्ही. आर. कुळकर्णी, मारुती चित्तमपल्ली, लक्ष्मी उद्योगसमूहाचे जयकुमार पाटील इत्यादी. त्या नामवंत शिक्षणसंस्थांप्रमाणेच गेल्या एकशेतेरा वर्षांपासून कार्यरत असलेले पहिले ‘महिला अध्यापक विद्यालय’ असलेले ‘मेरी बोर्डिंग विद्यालय’ व ‘वोरोनीको प्रशाला’ अतिशय प्रसिद्ध आहे.
– प्रमोद शेंडे
9920202889
Last Updated On – 14th July 2017
अतिशय उपयुक्त इतिहास व
अतिशय उपयुक्त इतिहास व माहीतीचा खजिना
एक नंबर
एक नंबर
मी सोलापूर कर
मी सोलापूर कर
खुप छान माहिती आहे पण ही…
खुप छान माहिती आहे पण ही माहिती पुस्तके कुठुन घेतली आहे.
Comments are closed.