सोलापूरमधील ‘प्रेरणाभूमी’ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचा कलश ठेवलेली जागा! ती दुमजली सुंदर इमारत असून तळमजला व पहिला मजला अशी ती वास्तू! दोन्ही मजल्यांवर मोठी सभागृहे आहेत. तळमजल्यावर बुद्धाचा व डॉ. आंबेडकरांचा पुतळा आहे. वरच्या मजल्यावर चांदीचा अस्थिकलश व बाबासाहेबांचा अर्धपुतळा आहे. समोरील सभागृहात बुद्धपौर्णिमेला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो, तर दर पौर्णिमेला एखादे व्याख्यान असते. अस्थिकलशाच्या वरच्या घुमटावर दोन मोठे लाऊडस्पीकर आढळले. त्यावर रोज सकाळी बाबासाहेबांची गाणी ऐकवली जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी महाराष्ट्रात तीन ठिकाणी आहेत. नागपूरमध्ये दीक्षाभूमी, मुंबईत चैत्यभूमी तर सोलापुरात प्रेरणाभूमी येथे!
– प्रमोद शेंडे