Home वैभव इतिहास सोलापुरी शिलालेखांना आकार देणारा कुंभार

सोलापुरी शिलालेखांना आकार देणारा कुंभार

4

आनंद कुंभार यांचे घर सोलापूर पूर्व भागातील बोल्ली मंगल कार्यालयाजवळील अशोक चौक परिसरातील एका गल्लीत आहे. मी आणि नितीन अणवेकर त्या छोट्या चाळीवजा इमारतीतील त्यांच्या घराच्या समोरच्या एका खोलीत शिरलो अन् नजर हटणार नाही अशी माझी अवस्था झाली! नितीनचा पुस्तकांच्या त्या स्वर्गात येण्याचा अनुभव नेहमीचा असल्याने त्याच्या चेहऱ्यावर तो मला सोलापूर शहराचा वारसा दाखवत असल्याचा आनंद होता, तर मी त्या अभ्यास मंदिरावरील पुस्तकरूपी शिल्पांनीच मोहरलो होतो. खोली पुस्तके अन् त्या पुस्तकांच्या सावलीत बुडालेली होती आणि ते तर मंदिराचे बाह्यरूप होते. मुखमंडप, सभामंडप, त्यातील देव्हारे, शिखर… सारे मंत्रमुग्ध करणारे. सर्वत्र मासिकांचे अन् पुस्तकांचे गठ्ठे… मंदिराचे अंतराळ अन् गर्भगृह अशी दहा बाय वीसची ती खोली अंगावर रोमांच निर्माण करत होती. आनंद कुंभार यांचे वय पंचाहत्तरीच्या जवळपास… मन मात्र पंचविशीतील. भिंतीवरील दोन शर्ट टांगण्याची जागा फक्त रिकामी असावी. मी धाडसाने ‘किती पुस्तके आहेत?’ असे विचारले. ‘असतील सात-आठ हजार.’ ‘बापरे इतकी?’ असे मी म्हणाल्यावर कुंभार म्हणाले, ‘कोठे कोठे ठेवणार? त्यामुळे 1950 पूर्वी प्रसिद्ध झालेली एक हजार दुर्मीळ पुस्तके पुणे विद्यापीठाला भेट म्हणून दिली!”

माझी कुंभार यांच्याशी लय जुळली अन् ते हळूहळू उलगडू लागले. तीन-चार कपाटे खोलीत होती. ‘यात काय आहे?’ असे विचारल्यावर ते हसून म्हणाले, ‘पुस्तके…’ कपाटांच्या बाहेर पुस्तके, आतही पुस्तके! सर, मी आणि नितीन बसलो होतो तेवढी जागा सोडली तर अवतीभवती जमिनीवरही पुस्तकेच पुस्तके.

आनंद कुंभार यांच्या गाठी वेगवेगळे अनुभव, आयुष्य रोमांचकारी; तितकेच कष्टप्रद. उत्तर सोलापुरातील (सोलापूर शहरातून साधारण तीस किलोमीटर अंतरावरील) हत्तरसंकुडल येथे त्यांनी शोधलेला एक हजार वर्षांपूर्वीचा मराठी शिलालेख असो… वा त्यांच्या शिलालेखाच्या पुस्तकाला छपाईस अयोग्य असा शिक्का मारून साहित्य संस्कृती मंडळाने केलेली फरफट असो…  वा नंतर महाराष्ट्र सरकारने त्याच पुस्तकासाठी दिलेला वाङ्मय पुरस्कार असो… असा आमच्या बोलण्याचा प्रवास सुरू झाला. तोच त्यांच्या शब्दात ऐकवतो-

“माझा जन्म सर्वसामान्य कन्नड कुटुंबात झाला. घरातील बोलण्याची भाषा कन्नड. शिक्षण दहावीपर्यंत. मी भारतीय लष्करात वायरलेस ऑपरेटर म्हणून 1960 ते 65 दरम्यान सेवा दिलेली आहे. मला वाचनाची आवड असल्याने सोलापुरात आल्यावर ग्रंथालयाचा सदस्य झालो अन् मिळतील ती सर्व पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. एकदा, मी विदर्भ संशोधन मंडळाच्या एका अंकात मिराशी यांचा ‘कोरीव लेख ताम्रपट’ या विषयावरील लेख वाचला अन् प्रभावित झालो. तो विषय झपाटून टाकणारा होता. त्या लोकांना इतके कसे काय सापडते हे गूढ मला काही उलगडत नव्हते. मग लक्षात आले, की ते भटकंतीशिवाय शक्य नाही. माझ्याकडे सायकल होती. मी 1970 ते आजपर्यंत सोलापूरच्या अकरा तालुक्यांतील सहाशेहून अधिक गावांची भटकंती सायकलवर केली आहे. घरातून शिधा बांधून सोबत, घ्यायचा अन् शक्य होईल तेथे खायचा.
“सुरुवातीला अनेक गावांत माहिती मिळत नसे… हाती काहीच येत नव्हते. भटकंती मात्र सुरू होती. पण काही न मिळणे हेसुद्धा संशोधन आहे ना! मात्र मी निराश झालो नाही. पहिला शिलालेख कुंभारी गावात १९७० साली हाती लागला. सोलापूर शहरातील दिसणारे शिलालेख तर सहज मिळाले, त्यांतील काहींचे वाचन झाले होते. काहींचे होणे बाकी होते. सव्वाशे शिलालेख गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत शोधले. सुरुवातीला शिलालेख मिळू लागले. पण अडचण होती, ती म्हणजे ते वाचायचे कसे याची? शिलालेखातील ‘अ, ब, क, ड’ही मला कळत नव्हते. मी मात्र नियतीने माझ्यासमोर शिलालेख शोधण्याचा उत्साह ही जबाबदारी म्हणून दिल्याने माघार घ्यायची नाही असे ठरवून टाकले. कारण गावागावांमधील शिलालेखांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. शेतात फेकून दिलेले शिलालेखही मिळाले. मी ते शोधले नसते तर ते पुन्हा कोणी शोधले असते की नाही ते माहीत नाही. त्यामुळे ते मी करायलाच हवे, ही भावना प्रबळ झाली होती. देशाचा इतिहास या शिलालेखांमधून दडलेला आहे, हा वारसा आपण जपायचा नाही तर कोणी जपायचा या विचाराने मी झपाटला गेलो होतो.

“मी मला शिलालेखांबद्दल काही माहीत नसल्याने मिराशी यांना पत्र लिहिले. त्यांनी तातडीने उत्तर दिले अन् पुण्यात ग.ह. खरे यांना भेटण्यास सांगितले. त्यांनी त्यांच्या पत्रात माझ्याबद्दलही विशेष चौकशी केली होती. ‘तुम्ही कसे काय याकडे वळलात? आमच्यातील माणसेही हे काम करण्यास धजत नाहीत’ असे त्यांनी म्हटले होते. मी मिराशी यांना जेवढी काही पत्रे लिहिली त्या सर्व पत्रांची उत्तरे त्यांनी मला तातडीने दिली. त्यावरून मिराशी यांची प्रतिभा किती ज्ञानप्रबोधनकारी होती हे दिसते…

“मी खरे यांना ‘भारत इतिहास संशोधन मंडळा’त जाऊन भेटलो. त्यांनी मी करत असलेल्या कामाचे कौतुक केले. माझ्याकडे शिलालेखाबाबत ना साहित्य होते ना शिलालेखांचे ठसे घेण्यासाठी साहित्य होते. शिलालेखांचे ठसे कसे घ्यावे ते मला समजत नव्हते… खरे यांनी मला ते तंत्र शिकवले. वेळ रात्रीची होती. त्यांनी रात्री ‘भारत इतिहास संशोधन मंडळा’चे संग्रहालय उघडले. ते पाणी, डॅबर, ब्रश सर्व काही घेऊन आले अन् त्यांनी मला तेथील शिलालेखाचा ठसा काढून दाखवला. मी खरे यांना विचारले, “सर, मी तर कोणीच नाही. तुम्ही मला कसे काय हे शिकवले?” यावर त्या विद्वान माणसाचे उत्तर बोलके होते. खरे म्हणाले, “मी जेव्हा होतकरू होतो, तेव्हा मलाही हे शिकायचे होते, पण अनेकांनी मला शिकवण्यास काचकूच केली. ते खूप अवघड असते वगैरे कारणे सांगितली. त्यातून मी मार्ग काढला. मात्र मी तुझा तो वेळ खर्च होऊ नये म्हणून आणि ठसे घेणे अजिबात अवघड नसते ते दाखवावे म्हणून हे केले. ज्ञान दिल्याने वाढते.” त्यांनी ठसे घेण्याचे साहित्य माझ्या हातात देऊन, ‘आता तू ठसे घेण्याची चांगली प्रॅक्टिस कर’ असेही सांगितले. मी खरे यांचे सूत्र पुढे पाळले… मला ज्यांनी ज्यांनी ठसे शिकायचे आहेत असे विचारले त्यांना मी ते शिकवले.

“ठसे घेण्याची समस्या सुटली होती. ते साल 1975 होते. माझे शिलालेख शोधलेल्या गावी सायकलवर जाणे पुन्हा सुरू झाले. तेथील ठसे घेतले अन् कर्नाटक विद्यापीठात गेलो. मी तेथील शिलालेख विभागाचे प्रमुख श्रीनिवासन् रित्ती यांना भेटलो. ते मी घेतलेले ठसे पाहून आश्चर्यचकित झाले होते. मी ठसे घेतले असले तरी शिलालेखांवर काय लिहिले आहे ते मला वाचता येत नव्हते. मात्र रित्ती ते सहज वाचू शकत होते. रित्ती यांनी मला त्या शिलालेखांचे पुस्तक काढावे असा सल्ला दिला. पण मला ते शक्य नव्हते. माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. मी म्हटले, ‘मी माझे काम केले आहे.’ तेव्हा रित्ती यांनी ठसे ठेवून घेत ‘मी काही तरी करतो.’ असे सांगितले. त्यांनी त्या ठशांवर प्रचंड कष्ट घेतले अन् १९८८ मध्ये, म्हणजे दहा वर्षांनी सोलापूर जिल्ह्यातील शिलालेख या विषयाचे पुस्तक इंग्रजीतून प्रकाशित केले. त्या पुस्तकाचा उपयोग इतिहास व पुरातत्त्व क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांना झाला. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यावर आधारित त्या पुस्तकावर कर्नाटक विद्यापीठाने काम केले. त्यालाही एक कारण होते, ते म्हणजे कन्नड शिलालेखांची संख्या सोलापूर परिसरात अधिक आहे.
“महाराष्ट्र सरकारच्या ‘साहित्य संस्कृती मंडळा’ने त्याच वर्षी ‘साहित्य तरंग’ नावाचे शिलालेखांवरील माझे पुस्तक प्रसिद्ध केले. गंमत अशी, की मंडळाने ते पुस्तक छपाईस अयोग्य असल्याचा शेरा पूर्वी मारला होता व पुस्तक छपाईला नकार दिला होता. पण सोलापूरचे विद्वान त्र्यं.वि. सरदेशमुख यांनी माझे काम पाहिले होते. त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांपर्यंत तो विषय नेला. तेव्हा कळले, की पुस्तकाचे बाड अध्यक्षांपर्यंत कधी पोचलेच नाही. त्यामुळे ते नाकारण्याचा प्रश्नच नव्हता! अध्यक्षांनी माझे बाड मागवून घेतले. त्यांना माझे कष्ट व पुस्तकाचे महत्त्व लक्षात आले अन् त्यानी ‘संशोधन तरंग’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले. त्यापुढील गंमत म्हणजे त्या पुस्तकाला शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला! मी माझा व्यासंग व मिराशी, खरे यांचे मार्गदर्शन यांमुळे केवळ ते साधू शकलो.

“माझ्या या खटाटोपातून इतिहासाला माहीत नसलेल्या गोष्टी समोर तर आल्याच, पण एक वेगळे सुख मला मिळाले. खूप खूप भटकंती सायकलवर केली. देवळे, वीरगळ, विहिरी, वाडे, किल्ले अशा अनेक घटकांच्या नोंदींवर भर दिला. त्याच टप्प्यावर, सोलापूर परिसरातील इतिहास माहीत नसेल तर मी जे काही करत आहे, त्याचे नाते जोडणे शक्य होणार नाही हे लक्षात आले आणि मी इतिहास व पुरातत्त्व शाखांतील पुस्तके विकत घेण्यास सुरूवात केली. संशोधन कामात अगदी वृत्तपत्रातील कात्रणांपासून ते संदर्भ ग्रंथापर्यंत सर्व काही आवश्यक असल्याने ते जमा करणे सुरू केले. पोटापाण्याचा प्रश्न सांभाळत व आर्थिक परिस्थिती संशोधनाच्या आड येणार नाही याची काळजी घेत सर्व काही सुरू होते. त्यातून घरातील सात-आठ हजार पुस्तकांतून घराच्या भिंती उभ्या राहिल्या. मी मला पुस्तकांबरोबर संगीताची आवड असल्याने संगीताच्या असंख्य कॅसेटही जमवल्या. त्यांची संख्याही चार हजार आहे.

“हा छंद होता की ध्यास हे महत्त्वाचे नाही, तर माझ्या कामाचा माझ्या शहराला, जिल्ह्याला उपयोग होत आहे आणि होणार आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. मला संस्था, संघटना यांच्याकडून पुरस्कार मिळाले. मी कमी शिकलो, फक्त दहावी झालो आहे. मात्र माझ्या नावापुढे डॉक्टर लावले जाते. मी डॉक्टर लावू नका म्हणून विनंती करतो, पण कोणी ऐकत नाही. ‘तुम्ही गप्प बसा हो… तुमच्या नावावर किती लोक डॉक्टर झाले आहेत ते तुम्हाला माहीत तरी आहे का?’ असे मला सांगितले जाते! इतिहास संशोधनाला दक्षिणेकडील राज्यांत जेवढे महत्त्व दिले जाते, तेवढे महाराष्ट्रात दिले जात नाही. त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. महाराष्ट्रात गावागावांमध्ये इतिहास पसरलेला आहे. त्याचे संकलन होणे गरजेचे आहे. गाव ते इतिहास संशोधन संस्था अशी नाळ जोडली जाण्याची गरज आहे. श्रीमंतांचे ‘अभिनंदन अंक’ काढले जातात. मात्र संशोधकांचे काढले जातात का? त्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या कामाची दखल ‘अभिनंदन’ ग्रंथांतून घेतली जाते का? ती पद्धत दक्षिणेकडे आहे. रा.चिं. ढेरे यांनीही माझ्या कामाचे कौतुक केले आहे. ढेरे यांनी त्यांचे एक पुस्तक मला अर्पण केले आहे. त्यांनी मी सर्वसामान्य माणूस असूनही माझ्या खारीचा वाटा असलेल्या संशोधन कामाची दखल घेतली हा माझ्यासाठी मोठा पुरस्कार होय.”
आनंद कुंभार हे कथन करत असताना त्यांच्या डोळ्यांत चमक होती. चांगल्या कामाचे कौतुक व्हायलाच हवे. ते झालेही. ते सोलापूरचे रत्न आहेत; त्या शहराचा अनमोल वारसा आहेत…
– आनंद कुंभार 9420806485
– रमेश पडवळ 8380098107 rameshpadwal@gmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. अप्रतिम लेख
    खुप खुप आवडला.

    अप्रतिम लेख

    खुप खुप आवडला.

  2. आपण लिहिलेला लेख हा अप्रतिम…
    आपण लिहिलेला लेख हा अप्रतिम आहे..

Comments are closed.

Exit mobile version