इसवी सन 1857 हे मध्ययुगातील अंतिम वर्ष, कारण तलवार व घोडा ह्या, ज्या मध्ययुगीन काळाच्या प्रमुख निशाण्या आहेत त्या दोन्ही गोष्टींचे महत्त्व त्या वर्षीच्या युद्धानंतर जवळजवळ संपले. हिंदुस्थानात रेल्वे धावू लागली, शिक्षणपद्धत बदलून गेली. ब्रिटिशांच्या आधुनिक व्यवस्थापनाची चढती कमान सुरू झाली. त्या आधुनिक युगाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 20 एप्रिल 1896 रोजी सोनोपंत दांडेकर यांचा पालघर जिल्ह्यातील केळवे-माहीम येथे जन्म झाला. तोपर्यंत इंग्रजी शिक्षणाचा दबदबा निर्माण झालेला होता. सोनोपंतांच्या वडिलांनी त्यांना व त्यांच्या मोठ्या भावाला माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पुण्याला पाठवले. कर्मधर्म संयोगाने, सोनोपंत वारकरी संप्रदायाचे प्रमुख, लोकमान्य टिळकांचे मित्र, आत्मज्ञानी विष्णुपंत जोग महाराज ह्यांच्या घरासमोरच वास्तव्याला आले. सश्रद्ध माणसाला तो ईश्वरी इच्छेचा संकेतच वाटतो. जोगमहाराजांमुळे सोनोपंतांना अगदी लहान वयात वारकरी संप्रदायाची ओळख झाली व ज्ञानेश्वरीची गोडी लागली. ईश्वरीय संकेताच्या कल्पनेला बळकटी आणणारी दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे सोनोपंतांना तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर म्हणून फर्ग्युसन कॉलेजात गुरुदेव रानडे ह्यांच्यासारखे आत्मज्ञानी, विद्वान व्यक्तिमत्त्व लाभले. गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून सोनोपंतांनी एम.ए.ला वेस्टर्न फिलॉसफी हा विषय घेतला. रानडे ह्यांचे म्हणणे असे होते, की जोग महाराजांमुळे तुम्हांला भारतीय तत्त्वज्ञान कळणारच आहे. परंतु तुम्हाला पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व ते मांडण्याची पद्धत कळणे आवश्यक आहे. त्यामुळे एका विशिष्ट कार्यासाठी सोनोपंतांची तयारी करून घेतली जाणे हा ईश्वरीय संकेत म्हणावा लागेल.
सोनोपंत दांडेकर ज्या वारकरी संप्रदायाचे प्रमुख म्हणून मान्यता पावलेले होते त्या वारकरी संप्रदायाची काही वैशिष्ट्ये आहेत –
१. वारकरी संप्रदायाची परंपरा ही हरि आणि हर यांचे अद्वैत साधणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शैव व वैष्णव हा वाद कधी निर्माण झाला नाही. त्या परंपरेने आत्मानुभूतीला सर्वांत जास्त महत्त्व दिले. त्यामुळे तो संप्रदाय जातिधर्माच्या पलीकडे गेला. महाराष्ट्रातील प्रत्येक जातीत संत तर निर्माण झालेच; परंतु शेख महंमद, श्री गोंदेकर ह्यांच्यासारखे इस्लामधर्मीय वारकरी संतसुद्धा निर्माण झाले.
२. वारकरी संप्रदायाने अखंडित संत परंपरा व विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यामुळे भागवत, गीता व उपनिषदे ह्यांतील तत्त्वज्ञान जनसामान्यांना कळेल अशा मराठी भाषेत सुबोध व सुलभ रीतीने उलगडून दाखवले गेले. त्या कारणाने मराठी माणसाला संस्कृत भाषेतील भगवद्गीता किंवा उपनिषदे वाचण्याची गरज पडत नाही. ते मराठी माणसाचे भाग्य आहे. संत नामदेव व संत तुकाराम ह्यांच्या अभंगांमुळे आत्मसाक्षात्काराची वाट उजळून निघालेली आहे. ज्ञानेश्वरीच्या महानतेचे एक उदाहरण देतो. एकदा, गुरुदेव रानडे व सोनापंत दक्षिणेतील महान विभूती भगवान रमण महर्षी ह्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी रानडे ज्ञानेश्वरीतील काही भाग इंग्रजीत अनुवाद करून भगवान रमण महर्षींना सांगत होते. रमण महर्षींनी ते ऐकत असताना मध्येच गुरुदेवांच्या हातातील ज्ञानेश्वरी हिसकावून घेतली व स्वतःच्या डोक्यावर ती ठेवून ते आनंदाने डोलू लागले व म्हणाले, “किती सुंदर ग्रंथ आहे हा. तुम्ही मराठी भाषिक खरोखर भाग्यवान आहात!” ह्या प्रसंगातील प्रत्येक व्यक्ती ही विभूती आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
३. वारकरी संप्रदायातील संत समाजाभिमुख होतेच, पण राष्ट्रप्रेमीसुद्धा होते. शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा महाराष्ट्रात निर्माण झाला व यशस्वी झाला ह्याला जी काही कारणे आहेत, त्यांपैकी एक महत्त्वाचे कारण वारकरी संतांनी मराठी मनाची आधीच्या शतकात केलेली मशागत हे होय. महाराजांची ‘हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा’ ही जी भूमिका आहे त्यावर वारकरी संतांच्या शिकवणीचा प्रभाव आहे. किंबहुना, त्यांच्या त्या भूमिकेमुळे स्वराज्य महाराजांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षें टिकले. पंजाब केसरी रणजीत सिंह ह्यांची भूमिका तशी नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर केवळ दहा वर्षांत ते स्वराज्य कोलमडून पडले.
तत्त्वज्ञान जरी एकच असेल तरीसुद्धा ते तत्त्वज्ञान मांडण्याची पद्धत, धाटणी काळानुरूप बदलावी लागते, कारण समाज बदलत असतो. समाजाच्या धारणा व त्याचे अनुभवविश्व बदलत असते. इंग्रजी भाषा व पाश्चिमात्य विज्ञान ह्यांचा प्रचंड परिणाम भारतीय समाजाच्या विचारप्रणालीवर गेल्या शंभर वर्षांत झालेला आहे. त्यामुळे आजच्या समाजाला जुन्या जमान्यातील पुराणिक-कीर्तनकार-प्रवचनकार ह्यांची मांडणी पसंत पडत नाही. तत्त्वज्ञान कोण व कसे सांगत आहे ह्यावर ते तत्त्वज्ञान समाज स्वीकारणार किंवा नाही हे ठरत असते. हल्लीचा काळ व कल लक्षात घेतला तर तत्त्वज्ञान सांगणारी व्यक्ती उच्च विद्याविभूषित, उत्तम इंग्रजी बोलणारी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आत्मानुभवी असणे जरुरीचे आहे (ह्यातील शेवटची अट ही समाजाची नसून वारकरी संप्रदायाची आहे). परमेश्वर अशा व्यक्ती जन्मास घालत असतो व अशा व्यक्तींना परमेश्वराने विशिष्ट काम करण्यासाठी, त्या कार्याला अनुरूप असे व्यक्तिमत्त्व देऊन पाठवलेले असते. उदाहरणार्थ, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचे कार्यक्षेत्र परदेशात होते. त्यांना तरुण वय, अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व, धीरगंभीर आवाज, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असे व्यक्तिमत्त्व लाभले होते. त्या शिवाय त्यांचे संन्यासपूर्व आयुष्यसुद्धा परदेशी नागरिक प्रभावित होतील असेच होते. 1. त्यांचे शिक्षण इंग्रजी पद्धतीनुसार झाले होते, 2. पूर्वायुष्यात ते पूर्णपणे नास्तिक होते आणि 3. ते ब्राह्मण नव्हते- ह्यातून परदेशी नागरिकांना हा संदेश मिळत होता, की कोणीही माणूस आत्मसाक्षात्कारी होऊ शकतो, ती काही ब्राह्मणांची मिरासदारी नाही.
सोनापंत त्यांच्या अशा बहुपदरी व्यक्तिमत्त्वामुळे ते शिक्षित व अल्पशिक्षित अशा दोन्ही समाजांतील लोकांना सारखे आदरणीय वाटले. त्यांना तसे व्यक्तिमत्त्व मिळण्यासाठी त्यांचे आध्यात्मिक गुरू जोग महाराज व शैक्षणिक गुरू गुरुदेव रानडे ह्यांची योजना केली गेली होती असे वाटते. त्यांच्याविषयी असामान्य व अतिसामान्य लोकांना कसा आदर होता हे दाखवणारे, मी प्रत्यक्ष अनुभवलेले उदाहरण देतो. ह्या दोन्ही घटना त्यांच्या महानिर्वाणानंतर तीस वर्षांनी घडलेल्या आहेत. मी स्वाध्याय चळवळीचे प्रणेते पांडूरंगशास्त्री यांना भेटण्यास गेलो असताना सोनोपंतांचा विषय निघाला आणि शास्त्रीबुवांनी सोनोपंतांच्या आठवणी सांगण्यास सुरुवात केली. त्या आठवणी सांगताना त्यांना गहिवरून आले, घसा दाटून आला व डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. ते त्यांना आवरणे शक्य होईना. हा असामान्य माणसाचा एक अनुभव. दुसरा अनुभव असा, की माझा मुलगा पुण्यात एका इस्त्रीवाल्याकडे शर्टाला अर्जंट इस्त्री करून घेण्यासाठी गेला. इस्त्री करता करता, त्याने मुलाची सहज चौकशी केली. ज्यावेळी त्याला कळले, की हा मुलगा सोनुमामांच्या नात्यातील व त्यांच्याच कुळातील आहे, तेव्हा तो म्हणाला, “मी तुझ्याकडून शर्टाच्या इस्त्रीचे पैसे घेणे योग्य नाही. कारण माझे घराणे वारकर्याचे आहे.” लक्षात घ्या, हे सर्व त्यांच्या निधनानंतर तीस वर्षांनी घडलेले आहे. काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, की त्यांच्याशी ज्या कोणा व्यक्तीचा थोडा जरी संबंध आला तरी त्या व्यक्तीवर प्रचंड प्रभाव पडतो. ती व्यक्ती त्यांना कधीच विसरू शकत नाही.
‘शिक्षण प्रसारक मंडळीं’च्या ‘न्यू पूना कॉलेज’च्या (ह्याच कॉलेजचे नामांतर स.प. महाविद्यालयात झाले) बिल्डिंगचे उद्घाटन 1927 साली त्यावेळच्या मुंबई राज्याचे गव्हर्नर लेस्ली विल्सन ह्यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात एकतीस वर्षांच्या तरुण सोनोपंतांनी आभाराचे भाषण केले. त्यांच्या त्या भाषणाने व कार्यक्रमात त्यांच्याशी आलेल्या संपर्काने गव्हर्नर विल्सन एवढे प्रभावित झाले, की ते म्हणाले, Here is outstanding practical philosopher of your college (हे तुमच्या कॉलेजचे उत्कृष्ट व्यवहारचतूर तत्त्वज्ञानी आहेत) आणि त्यांनी त्यांना स्वागताच्या वेळी मिळालेला पुष्पगुच्छ सोनोपंतांना दिला.
सोनापंतांचा आध्यात्मिक अधिकार काय होता हे समजण्यासाठी दोन उदाहरणे देतो. माजी राष्ट्रपती व भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक एस. राधाकृष्णन सोनोपंतांनी स्थापन केलेल्या फिलॉसॉफिकल सोसायटीत भाषण देण्यासाठी आले होते. त्यांनी दिलेल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले-
I see nothing less in Prof. Dandekar a true follower of my friend Dr. Ranade (Gururdev Ranade), a great philosopher of today. (आजचे अतिश्रेष्ठ तत्त्वज्ञानी आणि माझे मित्र डॉ. रा.दा. रानडे यांचा खरा शिष्य म्हणून मला प्रा. दांडेकर यांच्यात कसलीच उणीव दिसत नाही).
गुरुदेव रानडे हे सोनोपंतांचे तत्त्वज्ञान ह्या विषयाचे मार्गदर्शक. दोघांना एकमेकांबद्दल आदरभाव होता. सोनोपंत गुरुदेवांना भेटण्यासाठी निंबाळला (गुरुदेव अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर म्हणून रिटायर झाल्यावर त्यांचे वास्तव्य – निंबाळ, जिल्हा विजापूर येथे असे) भेटण्यास गेले असताना, गुरुदेव रानडे यांनी सोनोपंतांना प्रवचन करण्याची विनंती केली. सोनोपंतांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन प्रवचन केले. प्रवचन झाल्यावर, गुरुदेवांच्या शिष्यांनी गुरुदेवांना प्रवचन कसे झाले असे विचारले, तेव्हा ते म्हणाले, की सबंध प्रवचनभर मला सोनोपंतांच्या जागी विठोबाच दिसत होता व मी त्याला पाहण्यात गुंग होऊन गेलो होतो! ह्यातून दोघांचा अधिकार दिसून येतो. सोनोपंतांनी तो अधिकार प्राप्त होण्यासाठी काय साधना केली किंवा करत होते हे त्यांनी कोणालाच कळू दिले नाही. बरे, साधना केव्हा केली तेही कळत नाही, कारण त्यांच्या भोवती माणसांची गर्दी नेहमीच असायची. त्याला एकच उत्तर आहे ते म्हणजे गुरुकृपा.
सोनोपंतांचे सामाजिक योगदानः
1. सर्व संतांना समाज सन्मार्गाला लागावा अशी आंतरिक तळमळ होती. त्या तळमळीतून त्यांनी प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांचा आदर्श सोनोपंतांपुढे असल्यामुळे त्यांनी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील खेडोपाड्यात जाऊन, कीर्तने-प्रवचने करून अनेकांना सन्मार्गाला लावले. अनेक वारकर्यांची कुटुंबे सुधारली, सावरली.
2. श्रीक्षेत्र आळंदी येथे जोगमहाराजांनी 1907 साली स्थापन केलेली ‘वारकरी शिक्षण संस्था’ महाराजांच्या निर्वाणानंतर सोनोपंतांनी पन्नास वर्षें समर्थपणे सांभाळली. त्या संस्थेतून अनेक कीर्तनकार-प्रवचनकार निर्माण केले.
3. ‘विवेकानंद सोसायटी’ची पुणे येथे स्थापनाः त्यांनी सोसायटीच्या स्थापनेत व कामात मोठ्या उत्साहाने भाग घेतला व तिला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुढे त्याच सोसायटीचे रूपांतर ‘रामकृष्ण मठा’त झाले. तो मठ भव्य स्वरूपात उभा आहे. शेवटी सोनोपंतांचे वास्तव्य त्याच ठिकाणी होते.
4. पुणे विद्यापीठाची स्थापनाः त्यांचा सिंहाचा वाटा पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत आहे. स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून अनेक महाविद्यालयांना पुणे विद्यापीठाशी संलग्न करून घेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
5. आध्यात्मिक वाङ्ममय प्रकाशन ट्रस्टची स्थापनाः 1951 साली ते स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून रिटायर्ड झाले त्यावेळी पुण्यातील एकशेपंधरा सामाजिक संस्थांनी त्यांचा जाहीर सत्कार करून, मानपत्र व गौरव निधी दिला. त्या सत्काराच्या वेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बी.जी. खेर, मुंबई राज्याचे राज्यपाल राजामहाराजसिंग व बिहारचे राज्यपाल लोकनायक अणे व केंद्रीयमंत्री न.वि. गाडगीळ, त्यावेळी अमेरिकेत अॅम्बॅसिडर म्हणून असलेल्या विजयालक्ष्मी पंडित अशा अनेक मान्यवरांचे संदेश आले. वरील गौरव निधीतून त्यांनी ‘आध्यात्मिक वाङ्मय प्रकाशन ट्रस्ट’ची स्थापना केली व पालघर येथे एक व्यायामशाळा बांधून दिली. (जोग महाराज व त्यांचे बंधू पांडोबा हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध मल्ल होते. ह्या संस्काराचा परिणाम असावा)
6. ‘शासकीय संत वाङ्मय प्रकाशन समिती’चे अध्यक्षपद : समितीतर्फे संशोधित ज्ञानेश्वरी अर्थासहित प्रकाशित केली गेली. ज्ञानेश्वरीचे संपादक सोनोपंत हे होते. महाराष्ट्रात ती ज्ञानेश्वरी अधिकृत धरली जाते व सोनोपंतांची ज्ञानेश्वरी म्हणून ती प्रसिद्ध आहे.
7. येरवडा तुरुंगातील कार्यः 1930 च्या सुमारास येरवडा (पुणे) जेलचा तुरुंगाधिकारी मेजर डॉईल हा सोनोपंतांच्या संबंधात आला होता. तो सोनोपंतांच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित झाला होता. त्याने सोनोपंतांना विनंती केली, की सोनोपंतांनी जेलमध्ये येऊन कैद्यांना नीतीची शिकवण द्यावी. त्यामुळे सोनोपंत येरवडा जेलमध्ये प्रवचन देण्यासाठी जात असत. एकदा गर्व्हनरसाहेब तुरुंगाला भेट देणार होते. त्या भेटीच्या वेळी निगरगट्ट व न ऐकणार्या कैद्यांनी गर्व्हनरसाहेबांच्या भेटीच्या वेळी काही गडबड करू नये हे कैद्यांना समजावून सांगण्यासाठी सोनोपंतांना मुद्दाम बोलावले गेले होते. सोनोपंतांनी सांगितल्यावर कैद्यांनी गडबड न करण्याचे मान्य केले होते. ह्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव काय होता ते दिसून येईल.
8. शासनातर्फे त्यांना शासकीय कार्यक्रमातून कीर्तनाद्वारे नशाबंदीचा प्रचार करावा अशी विनंती करण्यात आली. अशाच एका कीर्तनाला गुलझारीलाल नंदा व यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी परमिट घेऊन दारू पिण्याची सोय शासनातर्फे करून दिल्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सोनोपंतांनी अनेक मासिकांतून अनेक लेख मराठी व इंग्रजीतून लिहिले, त्यांची यादी देणे शक्य नाही. परंतु गुरुदेवांनी ‘मिस्टिसिझम इन महाराष्ट्रा’ ह्या त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात सोनोपंतांना ‘एकनाथांचे भागवत’ ह्या विषयावर खास लिहिण्यास सांगितले व ते लिखाण त्यांच्या पुस्तकात छापले. ही गोष्ट मुद्दाम उद्धृत करणे गरजेचे आहे. सोनोपंतांनी तत्त्वज्ञान परिषदेत अनेक पेपर्स वाचले. त्यांपैकी फक्त तीन पेपर्सची माहिती किंवा हेडिंग्ज देतो. 1. फिलॉसाफी अॅण्ड साधना, 2. ज्ञानदेव अॅण्ड वेस्टर्न फिलॉसाफी, 3. इज गौडपाद ए बुद्धिस्ट? गौडपाद म्हणजे आद्य शंकराचार्यांचे गुरू, तेव्हा हे काय गौड बंगाल आहे असा विचार येईल. खरे म्हणजे ह्या शोधनिबंधाचा शोध घेणे जरूरीचे आहे. सोनोपंतांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या, त्यांचीसुद्धा यादी देणे शक्य नाही. परंतु एका पुस्तकाच्या प्रस्तावानेबद्दल लिहिणे जरुरीचे आहे.
सोनोपंतांचे वारकरी संप्रदायाप्रती काय योगदान आहे याबाबत महत्त्वाचे मुद्दे लिहितो.
1. खरा वारकरी कसा असतो ते स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले.
2. कीर्तने-प्रवचने व लिखाण ह्यांतून पंथाचा प्रचार तर केलाच, पण अनेकांना सन्मार्गाला लावले.
3. सुशिक्षितांच्या मनात वारकरी संप्रदायाबद्दल आदर निर्माण केला व सुशिक्षितांना ज्ञानेश्वरी व संताच्या गाथा अभ्यासण्याची प्रेरणा दिली.
4. वारकरी व रामदासी संप्रदायांतील तेढ कमी करण्यासाठी सोनोपंत व जोग महाराज दासनवमीला मुद्दाम कीर्तन करत असत. (ते कधी कधी सज्जनगडावर जाऊन कीर्तने करत)
5. कीर्तनात, निरूपणाचे प्रमाण वाढवले. त्याआधी एका पाठोपाठ एका अर्थाचे अभंग म्हणण्यावर जोर दिला जाई, परंतु त्या अभंगांतून संतांना काय सांगायचे आहे ह्याचे विवरण विशेषत्वाने दिले जात नसे. सोनोपंतांनी ती पद्धत बदलून जरुरीपुरते समान अर्थाचे अभंग म्हणावेत ही पद्धत रुढ केली.
सोनोपंतांना अवडंबराचा तिटकारा होता. त्यामुळे 1. ते स्वत:चा हार घातलेला फोटो कोणाच्या हाती पडणार नाही ह्याबाबत कमालीची दक्षता पाळत, 2. ते कीर्तन झाल्यावर त्यांच्या पायाला हात लावून कोणी नमस्कार करू नये म्हणून ताबडतोब निघून जात, 3. त्यांना कीर्तन मंडपावर रोशणाई केलेली आवडत नसे. ते म्हणत – ईश्वरभक्ती जर एवढी महागडी असेल तर सामान्य माणसाने काय करावे?
सोनोपंतांनी त्यांच्या आचरणातून व सहज बोलण्यातून माणसाने समाजात कसे वागावे हे सांगून ठेवले आहे ते असे:
1. परद्रव्य व परस्त्री या संबंधी वासना ठेवू नये.
2. ज्ञानेश्वरी, गाथा वगैरे संत साहित्याचा खोल अभ्यास करावा व नंतर तो दुसर्यास सांगावा.
3. व्यक्ती स्वत: जितके आचरते तितकेच तिने लोकांना सांगावे. ज्ञानाची पोकळ व्याख्याने देऊ नयेत.
4. कीर्तन प्रवचन करणार्यांनी कीर्तनाचा धंदा करू नये.
5. आचरण शुद्ध असावे. व्यक्तीने तिचा भार दुसर्यावर टाकू नये.
6. साधकाने साधक म्हणूनच जन्मभर राहवे. मठ बांधून महाराज बनू नये. बुवाबाजी अजिबात करू नये.
7. कर्मे करावीत, पण त्यात कर्मठपणा शिरू देऊ नये.
8. व्यक्तीवर पडलेल्या जबाबदार्या परमार्थाच्या नावाखाली टाळण्याचा प्रयत्न करू नये. अंगावर पडलेली जबाबदारी ईश्वरसेवा समजून आनंदाने, कुरकुर न करता पार पाडावी.
9. व्यक्तीने तिला झेपतील एवढीच कामे अंगावर घ्यावीत.
10. साधकाने मोठ्या व श्रीमंत लोकांच्या मागे आशाळभूतपणे लागू नये.
11. व्यक्तीने तिची वृत्ती सदा प्रसन्न ठेवावी. जगात अगोदरच माणसे दुःखी असतात, त्यात आपण भर घालू नये.
शेवटी एकच सांगतो – ज्यांचे ‘मी’पण पूर्ण लोपलेले आहे अशा व्यक्तीच सामान्यांपासून असामांन्यांपर्यंतच्या सर्व तर्हेच्या लोकांच्या मनावर अधिराज्य करत असतात. सोनोपंत हे असे ‘मी’पण लोपलेले व्यक्तिमत्त्व होते. स्वाध्याय चळवळीचे प्रमुख पांडुरंग शास्त्री सोनुमामांचे वर्णन करतात –
तत्त्वज्ञानाचे व्यासंगी पंडित, ज्ञानेश्वरीचे मार्मिक मीमांसक, वारकरी संप्रदायाचे प्रणेते, दैवी संपत्तीचे गुणसंपन्न पुरुषोत्तम, स.प. महाविद्यालयाचे कुशल प्राचार्य आणि आधुनिक संत अशी ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात कीर्ती असलेले सोनोपंत दांडेकर.
धुंडामहाराज देगलूरकर यांनी सोनोपंतांचे वर्णन ज्या ओवीने केले आहे ती ओवी उद्धृत करून हा लेख पूर्ण करतो.
मार्गाधारे वर्तावे! विश्व मोहरे लावावे! अलौकिक नोहावे! लोकांप्रती!!
सोनोपंतांनी ह्या ओवीतील प्रत्येक शब्द आचरणात आणून दाखवला आहे.
सोनापंतांची ग्रंथ संपदा
1. ज्ञानदेव : चरित्र, ग्रंथ व तत्त्वज्ञान
2. ईश्वरवाद
3. ज्ञानदेव व फ्लेटो
4. वारकरी संप्रदायाचा इतिहास
5. अभंग संकीर्तन भाग 1, 2, 3
6. गीतेच्या श्लोकांवरील प्रवचने भाग 1 व 2
7. अध्यात्मशास्त्राची मूलतत्त्वे
8. जोग महाराजांचे चरित्र
– सुधीर दांडेकर 9823133768, palgharmitra@gmail.com
Sunder
Sunder