Home संस्था सेवायोग कार्याने पाटण तालुका बहरला! (Sewayog Social Intervention In Karad Area)

सेवायोग कार्याने पाटण तालुका बहरला! (Sewayog Social Intervention In Karad Area)

 

कराड येथील सेवायोग सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षी सृजन यात्रेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्था, आदर्श व्यक्ती यांच्याशी भेट आणि संवाद साधणारी सामाजिक सहल म्हणजेच सृजन यात्रा. सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांच्या कामाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी आणि त्या प्रेरणेतून कोणीतरी ते काम त्यांच्या भागात सुरू करावे – तशा जाणिवा जागृत कराव्या हा यात्रेचा हेतू आहे. यात्रेची संकल्पना 2014 साली मांडली गेली. त्याच वर्षी यात्रेला सुरुवात झाली.
इंद्रजित देशमुख
सेवायोगची स्थापना सामाजिक भान जपणाऱ्या तरुणांच्या परस्पर सहकार्याने 2015 साली झाली. ते तरुण इंद्रजित देशमुख ऊर्फ काकाजी यांच्या घारेवाडी येथील शिवम प्रतिष्ठान या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी एकत्र आले होते. त्या ठिकाणी दुर्गम भागात काम करण्याची निकड सर्वांना वाटली. सेवायोग हे नावही ठरले. त्यांनी सेवायोगचा अर्थ सेवेसी जोडणेअसा लावला. सेवाभावातून लोकांसाठी, त्यांच्या समस्या जाणून घेऊन काम करणे हा हेतू ठरला. संस्थेची नोंदणी 2016 साली झाली. त्यांचे प्रेरणास्थान इंद्रजीत देशमुख हे कराड परिसरातील मान्यवर नाव आहे. ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त आहेत. इंद्रजीत यांचे वडील दत्ताजीराव हे आमदार होते. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली; रयत शिक्षण संस्थेस सत्तर एकर जमीन देणगी दिली. तेही सार्वजनिक कार्यात आहेत मुख्यत:जाणीवजागृती हा त्यांचा प्रांत आहे. त्या दृष्टीने ते देशभर व्याख्याने देत असतात. देशभरचे तरुण त्यांच्याशी जोडले गेले आहेत. ते देशमुख यांच्या शिवम् प्रतिष्ठानमधून कार्यास तयार होतात. सेवायोग ही त्यांच्याच प्रेरणेतून झालेली निर्मिती.
सेवायोगचे खंदे कार्यकर्ते आहेत – सुवर्णा, प्रमोद जाधव, मानसिंग पाटील, विकास गरुड, नितीन गरुड. आणखीही काही तरुणांचा फौजफाटा त्यांच्याबरोबर आहे. मानवतावादी व सेवाभावी विचार हा त्या सर्वांना एकत्र बांधणारा दुवा. सेवायोगचा मोठ्या प्रमाणात राबवला गेलेला पहिला उपक्रम म्हणजे सृजन यात्रा. सेवायोगचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात आहे. तेथे लोकांसाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, सामाजिक प्रबोधन व विशेष साहाय्य या क्षेत्रांमध्ये काम करून तेथील लोकांचा विकास साधण्याचा प्रयत्न ते करत असतात.
पहिली सृजन यात्रा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे 2015 साली झाली. त्यात सातत्य ठेवून पुढील चार वर्षे विदर्भ, मेळघाट, खानदेश आणि कोकणया ठिकाणी सृजन यात्रेचा प्रवास झाला. त्या यात्रेत प्रयास-सेवांकुर संस्था, पीपल फॉर ऍनिमल संस्था, सेवाश्रम आश्रम, पवनार आश्रम, बालग्राम, सहारा अनाथालय, शोधग्राम, आनंदवन, मेंढा लेखा, हेमलकसा, खानदेशातील नीलिमा मिश्रा यांचा गोधडी प्रकल्प, आदर्श गाव- बारीपाडा, गांधीतीर्थ, दीपस्तंभ, स्नेहज्योती अंध विद्यालय, सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ (चिपळूण), कासव मित्र मंडळ, लोकसाधना ट्रस्ट, प्राचीन कोकण संग्रहालय, स्वप्ननगरी पुनर्वसन केंद्र, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थांना भेटी दिल्या गेल्या. आतापर्यंत अडीचशेपेक्षा अधिक तरुण यात्रांत सहभागी झाले आहेत. सावली फाउंडेशन, उद्योगवर्धिनी (सोलापूर), उमेद फाउंडेशन, विद्योदय, शाहूवाडी तालुका शिक्षक इत्यादी स्थानिक सामाजिक संस्था व त्यांचे सभासद यात्रांत सहभागी होतात. यात्रांमध्ये नव्या सामाजिक संस्थांची उभारणी, सामजिक संस्थांत स्वयंसेवक म्हणून दाखल होणे, यात्रांत सहभागी सामाजिक संस्था व प्रतिनिधी यांचे परस्पर सहकार्य, त्यातून वाढणारी कामाची व्याप्ती, संकल्पनांची देवाणघेवाण असे सारे घडत असते.
सृजन याच नावाने सेवायोगचा आणखी एक उपक्रम आहे, तो म्हणजे सृजन भारती. त्या उपक्रमातून पथनाट्य, वक्तृत्व, चित्रकला, हस्तकला, प्रशिक्षण शिबिर सामाजिक साहित्य आणि काव्य संमेलन अशा कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येते. देशभक्तीला अनुकूल अशी जनजागृती हा त्या उपक्रमाचा हेतू आहे. तसाच अक्षरवारी हा उपक्रम. दुर्गम भागातील लोकांना जगाची ओळख पुस्तकांद्वारे व्हावी हा उद्देश. विज्ञान, संस्कारक्षम, चरित्रात्मक गोष्टी, कादंबरी, आध्यात्मिक अशा एकूण शंभर पुस्तकांची एक पेटी प्रत्येक गावात दिली जाते. सहा महिन्यांनी पेट्या बदलल्या जातात. त्याच सहा महिन्यांतून एकदा वाचक मेळावा आयोजित करण्यात येतो. पेटीची जबाबदारी, त्यातील पुस्तकांचे वाटप, पुस्तके जमा करणे-बदलणे इत्यादी कामे गावांतील इच्छुक तरुण-तरुणींकडून केली जातात. अक्षरवारी उपक्रम कराड तालुक्यातील येणके आणि पाटण तालुक्यांतील उरुल, ठोमसे आणि तळमावले अशा सात ठिकाणी सुरू आहे.
बालसंस्कार शिबीर
सेवायोगतर्फे आवड/कल चाचणी हा उपक्रम घेतला जातो. ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थी यांच्यासाठी तो असतो. शासनाच्या व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था यांच्याकडून प्रशिक्षित शिक्षक, समुपदेशक यांची मदत त्यासाठी घेतली जाते. सेवायोगतर्फे दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन केले जाते. दिवाळी सुट्टीत लहान मुलांना नैतिक अन् वैचारिक पाठ देण्यासाठी तीन दिवसांचे निवासी शिबिर भरवले जाते. योगासने, पर्यावरण, बालआरोग्य, विज्ञान गमती-जमती, संस्कारक्षम गोष्टी, गाणी, पथनाट्य असे विविध कार्यक्रम मुलांसाठी असतात. संध्याकाळी मुलांच्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला जातो. पहिले बालसंस्कार शिबिर 2015 साली पाटण तालुक्यातील जिंती गावात भरले. तेथे दरवर्षी नित्य शिबिरे झाली.
सेवायोग गरीब कुटुंबांना दिवाळी किट देते. त्यात उटणे, साबण, तेल, पणत्या, रांगोळी, मुलांसाठी फटाके, फराळ हे सर्व साहित्य असते. सेवायोग शैक्षणिक व वैज्ञानिक साहित्याचे वाटप मुलांना करते. त्यामध्ये संगणक, खेळाचे साहित्य, इ-लर्निंग व्यवस्था, विज्ञान प्रयोगशाळा व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी खाजगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मदत मिळवली जाते. तसे साहित्य पाटण तालुक्यातील बोडकेवाडी या शाळेच्या प्रयोगशाळेसाठी देण्यात आले. त्याला डॉक्टर अब्दुल कलाम प्रयोगशाळा नाव ठेवले आहे. कराड तालुक्याच्या येणके शाळेला पाच नवीन संगणक देण्यात आले आहेत.
एकीकडे मदतीचा हात पुढे करताना गावातील लोकांना स्वावलंबी कसे करता येईल हाही एक प्रयत्न सेवायोग करत आहे. त्या प्रयत्नांना यशही मिळत आहे. कापडी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देऊन मार्केटिंग करणे हे काम सुरू असते. साताऱ्यातील एका जोडप्याने (सचिन शेवाळे-स्नेहल जाधव) त्यांची लग्नपत्रिका कापडी पिशवीवर प्रिंट केली आणि परिचयातील लोकांना ती पिशवी भेट देऊन लग्नाचे आमंत्रणही दिले. त्या कापडी पिशवीच्या प्रिंटिंगचे काम सेवायोगला देण्यात आले होते. साताऱ्यातील ते जोडपे सेवायोगच्या 2018 च्या सृजन यात्रेत सहभागी होते.
सेवायोगच्या सुवर्णा आणि प्रमोद यांचे कार्यक्षेत्र दापोली आहे. सुवर्णा दापोलीच्या गटविकास अधिकारी आहेत. निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील गावांचे 2020 च्या जून महिन्यात फार नुकसान केले. तेथील लोकांच्या घर, बागा उध्वस्त झाल्या. सुवर्णा आणि प्रमोद यांनी चक्रीवादळात ज्यांचे नुकसान झाले अशा अनेक गावांना सहकार्य केले. वादळामुळे ती सगळी गावे अंधारात होती. अंधाराला भेदण्या माणुसकीची पणती हवीही टॅगलाईन वापरून सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. दापोलीतील पंधरा गावांतील दोन हजार कुटुंबांपर्यंत मदत पोचवण्यात आली. जीवनावश्यक वस्तू, त्यासोबत एक हजार डझन मेणबत्या, ब्लॅँकेट या वस्तू देण्यात आल्या. कोरोनासारखी आपत्ती असतानादेखील मदतकार्य सुरूच होते. त्या मदतकार्यात सेवायोगच्या सोबतीला शिवम प्रतिष्ठान (घारेवाडी), सावली फाउंडेशन (कोल्हापूर), उद्योगवर्धिनी (सोलापूर), आधार संस्था (मलकापूर) या संस्थांचा हातभार होता. सेवायोगने अंध लोकांसाठी स्वयंसिद्धता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचे सुरू केले आहे. दोन कार्यशाळा झाल्या आहेत. कार्यशाळेत पन्नासहून अधिक अंध लोकांनी नोंदणी केली होती. पांढऱ्या काठीचे महत्त्व आणि अंध बांधवांसाठी स्मार्ट फोन व त्याचा वापर यांविषयी मार्गदर्शन असे कार्यक्रम कार्यशाळेत घेतले गेले. सेवायोगचा ग्रामयोग नावाचा प्रकल्प सध्या चालू आहे. त्यात ग्रामीण महिलांना प्रशिक्षण देऊन कापडी पिशव्या, लेडीज पर्स, मास्क, फेसशील्ड अशा वस्तू तयार करण्यात गुंतवले जाते. संस्था पाटण तालुक्यात महिला-मुलींसाठी कायम प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

सेवायोग सामाजिक विकास प्रतिष्ठान, sewayogkarad@gmail.com

मु.पो. येणके, तालुका – कराड, जिल्हा – सातारा.
www.sewayog.org
मानसिंग पाटील – 8655574794
प्रमोद जाधव – 8484848063
सुवर्णा जाधव – 848484806
शैलेश पाटील 9673573148 patilshailesh1992@gmail.com
शैलेश पाटील हे कल्‍याणचे राहणारे. ते एम.एस.इ.बी.मध्‍ये कार्यरत आहेत. ते हौसेने लेखनही करतात. त्‍यांचा ओढा भवतालच्‍या सांस्‍कृतिक गोष्‍टींकडे आहे. थिंक महाराष्‍ट्रच्‍या नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेधया मोहिमेच्‍या निमित्‍ताने ते थिंक महाराष्‍ट्रच्‍या वर्तुळात आले.
———————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version