सकाळी उठल्यापासून रात्रीचे बारा वाजेपर्यंत स्पर्धेच्या युगात वावरणाऱ्या छोटुकल्यांच्या आयुष्यातून स्पर्धाच काढून टाकली तर काय होईल? त्यांचं जीवन आहे त्याहून अधिक सौंदर्यदायी बनेल. पण ते शक्य आहे का? ते कोण करू शकेल? आई-वडीलच जिथे मुलांच्या करिअरबाबत आग्रही असतात; तिथे त्यांना मोकळा श्वास कोण घेऊ देईल? पण हे शक्य आहे. ठरवलं तर एक आई; अर्थात स्त्रीच हे करू शकेल.
सुचिता पडळकर यांचं वास्तव्य कोल्हापूरमध्ये. त्यांचं कार्यक्षेत्र बालवाडी फुलोरा आणि सृजन आनंद विद्यालय. स्त्रीचे हक्क, स्वातंत्र्य यांविषयी तर महिलादिनाला आवर्जून चर्चा होतात, पण लहानग्यांसाठी काम करणाऱ्या सुचिता पडळकर स्त्रीचं आणि सृजनाचं नातं वेगळं सांगतात.
प्रश्न : तुमचं बालपण कुठे गेलं? कुटुंबातील वातावरण कसं होतं?
उत्तर :चाळीस वर्षांपूर्वी एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील वातावरणासारखंच! वर्ध्याला गांधी -विनोबांच्या प्रेरणेनं स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलींसाठी सुरू झालेल्या महिलाश्रमात माझं बालपण गेलं. माझे आजोबा तिथं संगीत शिक्षक होते. तिथलं शिक्षण म्हणजे विविध भारतीय भाषा, कला, संस्कृती, सण, कृषिपरंपरा, लोककला यांचं संमेलन होतं.
प्रश्न : महाविद्यालयीन शिक्षण कोठे झाले? ते दिवस कसे होते?
उत्तर :वडिलांच्या बदलीमुळे माझं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण external होत गेलं. पुढे वर्ध्याला राज्यशास्त्र विषयात एम.ए.ची सोय नव्हती, त्यामुळे एम.ए.ही external केलं. नागपूर विद्यापीठाचं! यावेळी नाशिक-वर्धा इथं मी राष्ट्र सेवा दलाचं काम करायचे. याच कामासाठी बिहारमध्ये मी महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं. एस.एम. जोशी , अण्णासाहेब सहस्रबुध्दे, नानासाहेब गोरे, जयप्रकाश नारायण ही सगळी मोठी माणसं मला जवळून बघायला मिळाली. बाबा आमटे यांचा सहवासही घडला. या वातावरणाचा माझ्या मनावरील संस्कारांत वाटा आहे.
प्रश्न :लहान मुलांसाठी काम करावं असं कधी वाटलं?
उत्तर: लग्नानंतर कोल्हापूरला आले. त्या काळी बायकांनी शिकून नोकरी करावी, घराबाहेर पडून वेगळं करिअर करावं असा विचार फारसा नव्हता. पण माझी मोठी मुलगी शमीन बालवाडीत जायला लागली आणि दीड-दोन महिन्यांतच ती शाळेत जाणार नाही असं म्हणू लागली. तेव्हा शाळेविषयीच्या तिच्या तक्रारी ख-या आहेत का ते पाहण्यासाठी मी मुख्याध्यापकांच्या परवानगीनं आठवडाभर तिच्या वर्गात बसले. तिच्या म्हणण्यात तथ्य होतं. पण रूढ बालशिक्षणाबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं, म्हणून मी शिवाजी विद्यापीठात, बालवाडी शिक्षक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. ती आणि मी घरातच अभ्यास करू लागलो. त्या काळात समविचारी अशा ज्या मैत्रिणी भेटल्या त्या आणि मी मिळून, सगळ्यांनी आपल्या मुलांना आपणच शिकवायचं असं ठरलं आणि या कामाला सुरुवात झाली.
प्रश्न :पहिल्यांदा शाळा कोठे सुरू केली?
उत्तर:कोल्हापूरला माकडवाल्यांच्या वसाहतीत सुरेश शिपुरकर, व्यंकप्पा भोसले यांच्याबरोबर बालवाडी सुरू करण्यात माझाही सहभाग होता. भटक्या-विमुक्त जमातींतील मुलं पहिल्यांदा या शाळेत आली. पुढे चार-पाच वर्षांनी ती शाळा बंद झाली. माझ्या मुलीच्या बालवाडी शिक्षणाच्या वेळी मग आम्ही ‘फुलोरा’ सुरू केली.
प्रश्न :‘फुलोरा‘मधील अभ्यासक्रम कसा आहे?
उत्तर :आमच्या बालपणी आम्ही ज्या शाळांतून शिकलो. तिथं मुलांना फक्त साक्षर केलं जात होतं. ठोकळेबाज अभ्यासपध्दत होती. त्यामुळे आपला वेळ त्याच त्या निरर्थक गोष्टी करण्यात गेला असं वाटतं. म्हणूनच ‘फुलोरा’ मध्ये रूढ अभ्यासक्रम नाही. शाळेचा प्रत्येक दिवसाचा दिनक्रम वेगवेगळा असतो. रोज नवं करायचं या उर्मीतून मुलांना नवे अनुभव घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देतो. त्यातून तीही वेगळं काही बघायला, करायला शिकतात.
प्रश्न :इतर शाळांतील मुलं आणि‘फुलोरा‘ तील मुलं यांत काही फरक जाणवतो का?
उत्तर : नक्कीच! एका वेगळ्या अंगानं पुढे निघालेली ही शाळा गेली वीस वर्षं चालू आहे. आमची शाळा मराठी माध्यमाची आहे. महत्त्वाचं म्हणजे इतर रूढ शाळांमध्ये पालकांचा सहभाग मुलांना दिलेलं होम वर्क करून घेणं, फार तर पाल्याची चौकशी करणं, मीटिंग अटेंड करणं एवढाच असतो. आमच्या शाळेत शिक्षकांइतका पालकांचा सहभाग असतो. मुलांना विविधरंगी अनुभव घेण्याची संधी द्यायला पालक उत्साहानं पुढे असतात. ते देखील त्यांच्याबरोबर तो अनुभव घेतात, त्यावर बोलतात. त्यांना उपक्रमात मदत करतात. त्यामुळे मुलांना शाळा म्हणजे शिक्षक आणि पालक यांनी चालवलेलं कुटुंब वाटतं. शाळा ही नुसती माहितीनं भरलेली बंद खोली नसून जीवनाकडे नव्यानं पाहायला शिकवणारी खिडकी आहे, याचा प्रत्यय आल्यानं शाळेत यायला ती खूष असतात. शाळेत पालकांनी चालवलेलं वाचनालयही आहे.
प्रश्न :हे सगळं करताना घरच्यांची मदत कितपत झाली?
उत्तर :माहेरी सामाजिक कार्याचे संस्कार होते. सासरीही माझ्या कामाला पाठिंबा आहे. ब-याचदा, एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला मी हजर राहू शकत नाही, तरीही कौतुकानं घरात माझ्या कामाचा उल्लेख केला जातो आणि मला वेळ नसतो हे त्यांनी गृहीत धरलंय.
प्रश्न :तुम्ही हे काम एकही पैसा न घेता करता. तुमची ती आवड आहे. पण घरी, नातेवाईकांमध्ये मोबदल्याची अपेक्षा केली जाते का?
उत्तर :हो. काही वेळा होतं असं. नातेवाईकांमध्ये माझ्या वयाच्या ज्या बायका नोकरी करतात, त्यांना त्यांच्या श्रमाचे पैसे मिळतात. पण माझ्या श्रमाचे, वेळेचे पैसे मला मिळत नाहीत, अशी प्रतिक्रिया पूर्वी व्यक्त व्हायची. सुरुवातीला थोडं खटकायचं, पण अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते. मला कामातून मिळणारा आनंद महत्त्वाचा वाटतो.
प्रश्न :तुम्हाला दोन मुली आहेत. त्यांचा तुमच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
उत्तर :माझी मोठी मुलगी शमीन होमी भाभा संस्थेत सायन्स एज्युकेशन मध्ये पीएच.डी. करते. धाकटी रसिया पर्यावरणशास्त्रात एम.एससी. करते. त्या दोघी ‘फुलोरा’ शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्याचबरोबर त्या ‘सृजन आनंद’ विद्यालयातही शिकलेल्या आहेत. त्या दोघींनी आईचा शाळेसाठी जाणारा वेळ पहिल्यापासून स्वीकारलाय. महत्त्वाचं म्हणजे सामाजिक काम करणं ही विशेष गोष्ट आहे असं त्यांना वाटत नाही. ते करायचं असतं, स्वाभाविकपणे! असं त्यांचंही मत आहे. शिक्षणामध्ये होणारे नवनवे बदल त्यांच्याद्वारे माझ्यापर्यंत पोचतात. जे जे नवीन येईल ते ते शाळेत आलं पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांची आई शाळेत आहे म्हणून नव्हे तर आपण त्या शाळेत शिकलो या भावनेतून शाळेबद्दल त्यांना वेगळं affiliation आहे. त्यांची वैचारिक मदत मला खूप वेळा होते आणि जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष मदत लागली तेव्हा त्यांनी तीही केली.
प्रश्न :‘सृजन आनंद‘ विद्यालयाबद्दल थोडं सांगा.
उत्तर :लीलाताई पाटील यांनी कोल्हापुरात 1985 मध्ये ‘सृजन आनंद’ विद्यालय सुरू केलं. ही शाळा मराठी माध्यमाची, फक्त प्राथमिक शिक्षण देणारी आणि प्रयोगशील आहे. ती विनाअनुदानित आहे. माझ्या मुलींचं बालवाडीनंतरचं शिक्षण तिथं झालं. मी विद्यालयात प्रथम पालक म्हणून सहभागी झाले. इथं रूढ शिक्षणातील क्रमिक पुस्तकं शिकवली जातात. फक्त शिकवण्याची पध्दत मात्र रूढ नाही. ती प्रायोगिक! अनुभवांवर आधारित. मी ‘फुलोरा’ बरोबर याही शाळेत शिकवते.
प्रश्न :आजचं युग स्पर्धेचं आहे. जो तो कळायला लागण्याआधी स्पर्धेत उतरतो. त्याला उतरवलं जातं. टिकण्यासाठी, प्रगती करण्यासाठी स्पर्धा अपरिहार्य आहे असंही म्हटलं जातं, पण तुमच्याशाळांमधील उल्लेखनीय बाब म्हणजे तुमच्याकडे स्पर्धा नाही. त्याविषयी काही सांगा
उत्तर :स्पर्धा नाही. त्यामुळे बक्षिसांचंही आमिष नाही. ‘फुलोरा’ मध्ये एकदा मुलांची अडथळ्याची दौड सुरू होती. सगळे पालक प्रेक्षक होते. चार खेळाडूंपैकी प्रियदर्शन या मुलाचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे प्लास्टरमध्ये होता. तरीही हारजितीचं भय नसल्यानं तो खेळणार होता. अनेक अडथळ्यांपैकी डोक्यातून रिंग घालायचा एक अडथळा होता. डोक्यातून रिंग घालायची, पायातून काढायची आणि पुढे पळायचं. प्रियदर्शननं डोक्यातून रिंग घातली पण ती प्लॅस्टर घातलेल्या आडव्या हातामुळे त्याला खाली घेता येईना. यावेळी उरलेले तीन खेळाडू त्याच्या मदतीला आले. सगळ्यांनी मिळून त्याची रिंग खाली घेतली आणि त्याला पळायला सांगितलं. स्पर्धा नसल्यानं केवळ हे शक्य झालं.
स्पर्धेमुळे एकमेकांना मागे खेचण्याची वृत्ती लहानपणापासून आपल्या मनावर बिंबते. आम्ही हे बदलण्याचा प्रयत्न केला. ‘सृजन आनंद’ विद्यालयातही स्पर्धा नाही. फक्त बौध्दिक आणि खेळ यांविषयीची परीक्षा वर्षातून एकदा होते. तिथंही स्पर्धेनंतर प्रत्येकाचं मूल्यमापन अधिक केलं जातं. नंबरापेक्षा त्याचे गुण व कमतरता यांवर चर्चा अधिक होते. ‘फुलोरा’ आणि ‘सृजन आनंद’, दोन्ही ठिकाणी बक्षीस म्हणून काही देताना एखादं फळ किंवा भाजीची पेंडी असं दिलं जातं. मुलं घरी जाऊन आपल्याला बक्षीस मिळालेल्या पालकाची भाजी खातात, तेव्हा त्यांना वेगळाच आनंद मिळतो.
प्रश्न :तुम्ही म्हणालात, ‘फुलोरा‘ त रोज नवा अभ्यासक्रम असतो. तो तुम्ही कसा ठरवता?
उत्तर :पूर्वी माझ्याबरोबर काही पालकांची मुलं ‘सृजन आनंद’ विद्यालयात शिकत होती. आमची मोठी मुलं त्या शाळेत जात होती. विद्यालयाचे शिकवण्याचे हेतू, पध्दती, नवनवे उपक्रम यांकडे मी ओढली गेले. लीलाताई आमच्या आदर्श होत्या. त्यांच्या सहवासात आम्हाला शिक्षणाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभली आणि आमच्या क्षमताही गवसत गेल्या. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. असं काम बालशिक्षणातही करता येईल असं वाटलं, मग आम्ही पालकच ‘फुलोरा’ चे शिक्षकही झालो. कुणी मुलांसाठी गाणी रचू लागल्या. कुणी चित्रं काढू लागल्या. कुणी नाटक बसवू लागल्या. कुणी हस्तकला शिकवू लागल्या आणि रोज नवा अभ्यासक्रम तयार होऊ लागला.
प्रश्न :‘फुलोरा‘ व ‘सृजन आनंद‘ या दोन्ही शाळांची अॅडमिशन प्रोसेस कशी आहे?
उत्तर :‘फुलोरा’ मध्ये येणाऱ्या पहिल्या वीस मुलांना व ‘सृजन आनंद’मध्ये येणा-या पहिल्या पस्तीस मुलांना अॅडमिशन मिळते. संख्या एवढीच मर्यादित आहे. बाकी जात-धर्म-आर्थिक परिस्थिती, मेरिट, काहीही बघितलं जात नाही.
प्रश्न :शिक्षकांची निवड तुम्ही कशी करता?
उत्तर: ‘फुलोरा’ व ‘सृजन आनंद’, दोन्ही ठिकाणी शिक्षक निवडण्याची पध्दत रूढ पध्दतीसारखी नाही. ‘फुलोरा’ मध्ये क्रमिक पुस्तकं नसतात. ती बालवाडीच आहे. पण ‘सृजन आनंद’मध्ये जिथं क्रमिक अभ्यासक्रम शिकवायचा असतो, तिथं नव्या शिक्षकाला आम्ही सहा महिने आमच्या वर्गाचं निरीक्षण करायला सांगतो. त्याचबरोबर त्याच्या आवडी-निवडी, कौशल्य, कलात्मकता, अभ्यास, सगळे गुण जोखूनच वर्ग त्याच्या हातात सोपवतो. शिवाय, दोन्ही शाळांत सगळे honorary शिकवतात. याचा फायदा असा होतो, की बालशिक्षणात interest असणारा माणूसच आमच्याकडे येतो. आमच्याकडे एक निवृत्त प्राचार्य चौथीला इंग्रजी शिकवतात. एक आर्किटेक्ट मॅडम विज्ञान शिकवतात. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा मुलांना मिळतो.
प्रश्न :‘सृजन आनंद‘ विद्यालयाला सरकारी अनुदान नाही. मग शाळेचे आर्थिक प्रश्न तुम्ही कसे सोडवता?
उत्तर :सरकारी अनुदान नसलं तरी, पालक आमच्याबरोबर असतात. पालक आपला वेळ देतात. तसंच पैसा, समाजातील त्यांचे संबंध, प्रतिष्ठा, सगळं ते शाळेसाठी वापरतात. आणि तसं, आम्ही nominal शुल्क मुलांकडून घेतो.
प्रश्न :तुमच्या शाळेत शिकलेली मुलं इतरत्र अॅडमिशन घेऊ शकतात का?
उत्तर :चौथीनंतर मुलं रूढ शाळांमध्येच जातात. अनुदान नसलं तरी आमच्या शाळांना सरकारची मान्यता आहे, आणि दुसरं एक सांगते- ‘फुलोरा’ , ‘सृजन आनंद’ यांसारख्या शाळांमध्ये ज्या पध्दतीचं शिक्षण दिलं जातं त्या पध्दतीनं आपली मुलं शिकावीत असं ज्यांना वाटतं, असे समविचारी लोक एकत्र येऊन कुठेही अशा प्रकारची केंद्रं चालवू शकतात.
प्रश्न :‘फुलोरा‘ शाळेला वीस वर्षं झाली. तुमची पहिली बॅच आता ग्रॅज्युएट झाली असेल. ती मुलं तुम्हाला भेटायला येतात का? येतात तेव्हा शाळेबद्दल ती कोणत्या भावनाव्यक्त करतात?
उत्तर: येतात ना. मागे आम्ही get together ठेवलं होतं त्यांचं. ती आवर्जून येतात. ती मुलं आम्ही दिलेल्या शिकवणुकीच्या प्रकाशात वाटचाल करतात. शाळेनं तुम्हाला काय दिलं असं विचारताच एक मुलगा म्हणाला, ‘आजकालच्या काही तरुण मुलांसारखा मुलींबाबत सवंग विचार आम्ही करत नाही. म्हणजे आम्हाला मैत्री करावीशी वाटते, पण मुलींमागे व्यर्थ फिरणं, त्यांना त्रास देणं असं काही करण्याचं आमच्या मनात येत नाही.’ मी त्याला म्हटलं, ‘हा तुझा वैयक्तिक गुण असू शकतो.’ तो म्हणाला, ‘नाही. मीच नव्हे तर माझ्याबरोबरची सगळी मुलं असा विचार करतात. म्हणजे त्यात शाळेनं केलेल्या संस्काराचा भाग असणारच.’
प्रश्न :आजकाल मुली शिकतात. करिअरला महत्त्व देतात. त्यांना तुम्ही काय सांगाल? एक शिक्षिका म्हणून?
उत्तर :आपल्याला आवडणार्या कोणत्याही क्षेत्रात आपण करिअर करावं. परंतु शिक्षण घेत असताना त्या प्रक्रियेकडे डोळसपणे पाहावं. शिक्षण घेणं म्हणजे नुसती माहिती डोक्यात साठवणं नव्हे, तर इथं आतून बाहेर येण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. शिक्षण घेणं म्हणजे आपल्या हातून काही निर्मिती होऊ शकेल.
प्रश्न :शाळा हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. शाळेव्यतिरिक्त तुम्ही काय करता? किंवा इतर छंद आहेत का?
उत्तर :आम्ही वर्ध्याला राहायचो. तिथं त्या काळी अभ्यासाव्यतिरिक्त कलांचं प्रशिक्षण देणारे असे काही वर्ग नव्हते. कोल्हापूरला आल्यावर शमीनबरोबर मी कथ्थक शिकले. अगदी परीक्षा वगैरे दिल्या; पोहायला शिकले. हे सगळं मी तिशीच्या आसपासच्या वयात केलं. आजही कॉम्प्युटर शिकण्यात वेळ जातो. आजकालची मुलं नवीन तंत्रज्ञान किती पटापट शिकतात! नव्या वेगाशी जुळवून घेताना धावावं लागतं. पण मला आवडतं हे सगळं करायला.
प्रश्न :मुलांसाठी काम करत असताना रोज नवनवे प्रयोग करावे लागतात त्याविषयी‘शिक्षणप्रवाहाच्या उगमापाशी‘ हे पुस्तक तुम्ही लिहिलंत. सध्या काही लेखन चालू आहे का?
उत्तर :आहे ना. फलटणला Centre for Language Literacy and Communication अशी भाषाशिक्षणात काम करणारी संस्था आहे. या विषयात काम करण्यासाठी ही संस्था फेलोशिप देते. मी ती घेतलीय. भाषा चांगली आली की बाकीचे सगळे विषय चांगल्या पध्दतीनं शिकता येतात. हे तर सिध्दच झालेलं आहे. पण इतर विषयांमुळेही भाषा कशी समृध्द होते यावर मी अभ्यास करते. त्यासाठी ‘भूगोल’ हा विषय मी निवडला. या निमित्तानं शाळांमधून जाणं, संबंधित व्यक्तींना भेटणं, बोलणं, मुलांबरोबर प्रयोग करणं चालू असतं.
प्रश्न :स्त्रीस्वातंत्र्याबद्दल आपण सगळेच फार वेळा बोलतो. तुम्ही स्त्रियांशी निगडित असं काही काम केलंय का?
उत्तर :कोल्हापूरला आल्यावर, सुरुवातीला, मी महिलादक्षता समितीचं काम करत होते. तिथं कुटुंबीयांच्या त्रासानं घर सोडून आलेल्या, घराबाहेर काढल्या गेलेल्या, वेगवेगळ्या प्रश्नांनी, अडचणींनी ग्रासलेल्या स्त्रिया यायच्या. त्यांची कुटुंबामध्ये परत जाण्याची धडपड असायची; ती बघून मी अस्वस्थ व्हायचे. निम्न स्तरावरील स्त्रिया इथं मोठया प्रमाणात यायच्या. कितीही त्रास झाला तरी कुटुंबाचा एक भाग बनूनच जगण्याची त्यांची इच्छा कायम असायची. तिथं काम करताना मला खूप त्रास व्हायचा. तिथं मी फार दिवस काम करू शकले नाही. मी माझं कार्यक्षेत्र बदललं आणि आज बोलायचं तर स्त्रियांची घर आणि करिअर सांभाळताना फार ओढाताण होते. पण त्यांनी काही ना काही केलं पाहिजे.
प्रश्न :‘फुलोरा‘ , ‘सृजन आनंद‘ यांसारख्या शाळांची समाजाला खरी गरज आहे. पुस्तकं, दफ्तरं, परीक्षा, शिक्षा, क्लास अशा वेगवेगळ्या वजनांच्या ओझ्यांनी वाकलेली मुलं तुमच्या शाळेत यायला एका पायावर तयार होतील. तुमच्या शाळेला शुभेच्छादेऊन शेवटचा प्रश्न विचारते. शाळेबद्दलच्या तुमच्या भविष्यातील योजनाकाय आहेत? किंवा तुमची स्वप्नं काय आहेत?
उत्तर: शाळा हा माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मी मुलांमध्ये रमते. मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. शाळेबाहेर आल्यावरही माझ्या डोक्यात शाळा असतेच. पण ज्या दिवशी हे सगळं करण्याचा माझा उत्साह संपेल त्या दिवशी मी थांबेन. शाळेसाठी नवं करण्याचा ध्यास आहे, पण हे काम मी नाईलाजानं ओढत राहणार नाही. कामात तोचतोपणा आला की ते काम थांबवलेलं चांगलं असं मला वाटतं.
भविष्यातील मोठमोठया योजना, स्वप्नं अनेकजण सांगतात. पण आनंद मिळेपर्यंतच काम. हा कामातील प्रामाणिकपणा आणि मोकळेपणा सुचिताताईंच्या लोभस व्यक्तिमत्त्वाला खुलवतो. आणि त्यांचा उत्साह कधी मावळेल असं वाटतच नाही. रोज उठून आपल्या मुलांचं भविष्य कसं घडणार? या चिंतेत असणार्या आयांना मुलांच्या बालपणीच त्यांच्या अंतरंगात डोकावून सृजनाचे नवे रंग शोधणा-या सुचिता पडळकर नक्कीच प्रेरणादायी ठरतील.
सुचिता पडळकर suchita121@gmail.com
– डॉ. मानसी गानू
1/28 बी, राजवाडा कॉलनी, पटवर्धन हायस्कूलसमोर,
पिन नं. 416416.
9423 030 506