सुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली ती अलिबागजवळ सासवणे या गावी गेलो तेव्हा. तेथे ख्यातनाम शिल्पकार करमरकर यांच्या कलाकृतींचे कायम प्रदर्शन त्यांच्याच घरात मांडलेले आहे. कोणत्याही दिवशी जाऊन पाहवे आणि आनंदित व्हावे असा तो खजिना आहे. विशेषत: करमरकरांनी कोरलेले प्रत्येक शिल्पकृतीचे डोळे… ते पाहणाऱ्याला गारद करतात. करमरकरांच्या सुनबाई सुनंदा त्या संग्रहालयाची देखभाल करतात, काळजी घेतात. एका भेटीत त्यांच्याकडून कळले, की चित्रकार सुहास बहुळकर तेथे येतो, करमरकरांच्या जुन्या डायऱ्या पाहतो, नोंदी करतो. सुहासच्या कलाविषयक आस्थेच्या विविध गोष्टी नंतर मग कळत गेल्या आणि मी त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे ओढला जाऊ लागलो. एका टप्प्यावर, आम्ही मित्रच होऊन गेलो!
तशी, चित्रकलेतील भली मंडळी मला परिचयाची होती. अगदी जुन्या पिढीतील बेंद्रे, आंबेरकर, मुर्डेश्वर, बी. प्रभा, प्रभाकर बरवे अशा मोठमोठ्या आर्टिस्ट्सकडे माझे जाणे ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील नोकरीच्या निमित्ताने झाले होते. त्यांच्या संबंधीचे लेखन व त्यांच्या चित्रकृती दिवाळी अंकांतून प्रसिद्ध करत असताना, त्यांची थोरवी मनावर बिंबली गेली होती. जहांगिर आर्ट गॅलरी व तेथील समोवार रेस्टॉरंट हा, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या समवेत आमचा अड्डा असे. पण ते चित्रकार त्यांच्या कलाविश्वात मग्न असत. त्यांना जगाचे अवधान व भान यांची फार फिकीर नसे. चित्रकारांचे जगच वेगळे असते, ते लोकांपासून दूर राहतात असा समज होता. ‘जे.जे.’चे प्रचंड आवार, मोठमोठ्या राजेशाही जुन्या इमारती, तेथील चित्रकारांचा उच्चभ्रू वावर आणि राजवाड्यातून बाहेर फुटाव्यात तशा तेथून कानी येणाऱ्या मोठमोठ्या चित्रकारांच्या रागालोभाच्या कुजबुजी यांमुळे तो समज दृढ होई. शिवाय, माझा संबंध अधिकतर ‘जे.जे.’च्याच आवारातील ‘अॅप्लाइड आर्टिस्ट’ लोकांशी असे. ती नावे, त्यांचे रागलोभ आपल्यातील वाटत- पद्मा सहस्रबुद्धे, बाळ ठाकूर, सुभाष अवचट, रंजन जोशी ते सतीश भावसार हे तसे चित्रकार… त्यांची ओळख त्यांची मुखपृष्ठे, इलस्ट्रेशन्स या निमित्ताने जवळची होऊन गेली होती. षांताराम पवार, र.कृ. जोशी हे त्यांच्या गुरू घराण्यात शोभावे असे. त्यांतून तर माझ्यासारख्या उत्सुक सर्वसामान्य लोकांची कलादृष्टी घडत गेली होती. त्यांची मनस्वीता, कलानिष्ठा आणि त्यांचा अभ्यास यांमुळे भारावून जायला होई. त्यांनी ‘अॅप्लाइड’ आणि ‘फाइन’ यांच्यातील भेदरेषा पुसून टाकली होती. तरी ‘फाइन’ आर्टच्या कलावंतांचा रुबाब तो रुबाबच!
सुहास हा ‘फाइन’वालाच, पण त्या सर्वांहून वेगळा आहे. त्याची कलाकार म्हणून तन्मयता त्यांच्या इतकीच आहे, पण कलेचा संवर्धक व प्रसारक म्हणून त्याचा आवेग त्यांच्याहून वेगळा व विलक्षण आहे. त्यामुळे तो एकाच वेळी स्वत:त असतो आणि जगात भासतो. तो त्याचे स्वत:चे चित्र व लेखन यांच्याइतकाच शंभर वर्षांपूर्वीचे धुरंधर, केळकर, हळदणकर ते आजचे प्रभाकर कोलते-संतोष क्षीरसागर यांच्यापर्यंतच्या चित्रकारांच्या कामगिरीबद्दल बोलू शकतो, बोलत राहतो. गेल्या शतकभराचा चित्रकलापट त्याच्या तोंडी आहे. त्याचे काळाचे महात्म्य व व्यक्तीचे महात्म्य यांचे भान पक्के आहे. तो स्वत: उच्च कोटीचा चित्रकार असताना तसे अवधान सांभाळायचे ही गोष्ट फार मोठ्या मनाची द्योतक होय! त्याचे गुरूच म्हणावे अशा बाबुराव सडवेलकर यांना ती सिद्धी होती. त्यांनी स्वत:ची कला जोपासली-जपली नाही इतकी काळजी मुंबईच्या व महाराष्ट्राच्या कलासृष्टीची घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडणही सांस्कृतिक स्वरूपाची होती, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात करडेपणा होता. उलट, सुहासचा चित्रकलेच्या इतिहासातील रस ओतप्रोत आर्द्र व ओथंबलेला आहे. तो त्याबद्दल नदीच्या जोमदार प्रवाहासारखा बोलत राहतो. त्यातील एकेक तपशील त्याला मोलाचा वाटत असतो. त्याच बरोबर, त्याच्या हातून घडलेले चित्रप्रकल्प पुराणे आणि इतिहास यांच्या अभ्यासाने भरलेले आहेत. तो अभ्यास त्याच्या चित्रकृतींतून प्रतीत होत जातो आणि त्यातील सौंदर्य रंग-रेषांतून प्रकट होते.
वास्तविक भारतात ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ची स्थापना मुंबईत प्रथम झाली, पण चित्रकृतींकडे पाहण्याची दृष्टीच येथे घडली नाही. चित्रकारही सतत अलगसे जीवन जगत राहिले आहेत. सुहास बहुळकर ही बहुधा एकमेव चित्रकार व्यक्ती आहे जी सगळीकडे मुसंडी मारू पाहते – साहित्य–कला–नाट्य या अन्य कलांमध्ये रस घेते. चित्रकला हा तर सुहासचा जीव की प्राण! त्याने लहानपणापासून तोच ध्यास घेतला. शालेय विद्यार्थी म्हणून त्याने इंदिरा गांधी व झाकिर हुसेन यांची व्यक्तिचित्रे त्यांच्यासमोर काढून, त्यांच्याकडून वाहवा मिळवली. पुढे, त्याने मुंबईत येऊन, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून कलाशिक्षण घेतले व त्यात प्राविण्य मिळवले; त्याला उच्च शिक्षणासाठी फेलोशिप मिळाली. त्याची घडण झाली ती मुख्यत: शंकर पळशीकर आणि बाबुराव सडवेलकर यांच्या तालमीमध्ये. बाबुरावांनी तर त्याला विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तो बाबुरावांच्या हाती विद्यार्थी व ज्युनियर प्राध्यापक या नात्याने आला, म्हणून त्याच्यामधील कलाकाराबरोबरच रसिकही घडला गेला. त्याने बाबुरावांनी सुचवल्यावरून नामवंत चित्रकारांची अमूल्ये चित्रे पैदा केली आणि त्याचबरोबर ‘जे जे’मधील शंभर वर्षांचा ‘चित्रखजिना’, जो धुळीत बंदिस्त पडला होता तो बाहेर काढला. त्यातून त्याची कलासंवर्धक म्हणून घडण होत गेली. भारताची, विशेषत: मुंबईची चित्रकला परंपरा नीट जपली व जोपासली गेली पाहिजे यासाठी त्याची खटपट चालू असते. ते त्याचे काम अपूर्व आहे. सुहास हा स्वत: अतिशय संवेदनाशील आहे. त्यामुळे त्याचा कलावारशाबद्दल भारतात जो हलगर्जीपणा आहे त्याबद्दलचा राग सात्त्विक रीत्या व तीव्रपणे व्यक्त होतो. त्यामुळे त्याचे लेखन वाचताना, त्याची भाषणे ऐकताना वाचकश्रोतेदेखील अस्वस्थ होतात.
त्याला बालपणी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पुण्याच्या विविध स्तरांतील व क्षेत्रांतील सुसंपन्न कलाजीवन अनुभवण्यास मिळाले. त्यात भीमसेन जोशी यांचे गाणे, तमासगीरांचे जगणे, पुणेरी मिसळ असे सर्व घटक होते. त्यातून त्याचे समृद्ध मन घडत गेले. त्याला कलाशिक्षण ‘जे जे’त मिळाले. पुढे, त्याने तेथेच दोन दशके अध्यापनाचे कामही केले. स्वतःच्या चित्रकलेसाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्याची संकल्पना नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन संचलनात मांडल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथांना याच काळात लाभली. त्याच्या संकल्पनेतून साकारलेल्या चित्ररथांना 1981 आणि 1984 अशी दोन वर्षं सुवर्णपदके प्राप्त झाली होती. त्याची ती पंधरा-वीस वर्षे भारलेली होती. सुहासने त्या काळात चित्रकलेची फार मोठमोठी म्युरल व चित्रांकन यांची कामे लिलया पार पाडली आहेत. त्यामध्ये सर्वांत लक्षणीय म्हणजे चित्रकूट येथील ‘रामदर्शन’, ‘टिळक स्मारका’साठी पुण्यात ‘लोकमान्य टिळक दर्शन’, मुंबईतील ‘सावरकर स्मारका’साठी ‘क्रांतिकारकांचे दर्शन’, पुण्याच्या ‘केळकर म्युझियम’साठी ‘इतिहास दर्शन’… तशी कामे विलक्षण मोठ्या संयोजनाची, एकाग्रतेची आणि आयुष्याची वर्षानुवर्षांचा वेळ खाणारी असतात. त्या कामांची जातकुळी लेणी खोदण्याच्या कल्पक मेहनतीचीच आहे.
सुहासने गेल्या दोनशे वर्षांत चित्रकलेत जे कलावंत होऊन गेले त्यांची नोंद एका मोठ्या दृश्यकला कोशात केली आहे. त्याने ते अवाढव्य काम ‘विवेक साप्ताहिका’च्या बृहद् प्रकल्पासाठी दीपक घारे व रंजन जोशी यांच्या मदतीने पूर्ण केले. त्या कोशाची इंग्रजी आवृत्ती ‘पंडोल’तर्फे प्रसिद्ध होत आहे. त्याने पुऱ्या केलेल्या प्रकल्पांतील अशा प्रत्येक कामासाठी सुहासचा बहुमान केला गेला पाहिजे.
सुहासला तो ‘जे जे’चा विद्यार्थी असल्यापासूनच मोठमोठ्या कलावंतांचा सहवास लाभत गेला. तो त्यांच्याकडून शिकलाही भरपूर. त्यामुळे गंमत अशी झाली, की सुहासकडे चित्रकला नोंदींचे खूप मोठे साहित्य जमा झाले आहे आणि तो ते वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये टिपत चालला आहे. त्याची पुस्तके – ‘गोपाळ देऊसकर: कलावंत आणि माणूस’, ‘शिल्पकार करमरकर’, ‘बॉम्बे स्कूल – आठवणीतले, जगातले’ हे ग्रंथराज आहेत. ते कलाचित्रांनी संपन्न आहेत. त्याशिवाय त्याने , ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ आणि ‘ए ए आलमेलकर – इन्स्पिरेशन अँड इम्पॅक्ट’ हे ऐतिहासिक दस्तावेज तयार केले आहेत. ते प्रत्येक पुस्तक म्हणजे कलाइतिहासातील मोठा ऐवज आहे.
त्याने विकसित केलेली चित्रकलेतली एक स्वतंत्र शैली म्हणजे स्मरणरंजनात्मक कथनशैली. एकोणिसाव्या शतकातील पेशवेकालीन वाडे, आधुनिक जीवनपद्धतीत त्यांचा होत चाललेला ऱ्हास आणि त्यातून प्रतिबिंबित होणारा संस्कृतिसंकर अभिव्यक्त करणारी ती चित्रे आहेत. त्याने 1975 ते 1993 अशी तब्बल अठरा वर्षं देशभरातील अनेक चित्रस्पर्धांत सहभाग घेतला, पारितोषिके पटकावली. त्याने देश-विदेशात मिळून एकोणीस एकल आणि अठावन्न समूह प्रदर्शनांमधून भाग घेतला. ती प्रदर्शने भरवत असतानाच जहांगीर आर्ट गॅलरीसाठी आठ प्रदर्शने भरवली आणि निधी उभारून दिला. विस्मरणात गेलेल्या सुमारे एकवीस चित्रकारांची चित्रे या निमित्ताने लोकांपुढे आली आणि त्यातून लक्षावधी रुपये गॅलरीला; तसेच, त्या कलाकारांच्या कुटुंबीयांना मिळाले. त्याने ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’च्या तीन प्रदर्शनांसाठी क्युरेटर म्हणून काम पाहिले. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसाठी (Bhandarkar Oriental Research Institute) तर जवळजवळ विनाशुल्क काम केले.
खरे तर, सुहासचे नाव व्यक्तिचित्रकार म्हणून भारतात अनन्य आहे. शंकर पळशीकर, वासुदेव गायतोंडे, बाबुराव सडवेलकर, संभाजी कदम असे त्याचे पूर्वसुरी आहेत. पण सुहासचा अभ्यास-संशोधनाचा ध्यास त्याला त्यांच्या पुढे चिंतन-मननाच्या व अर्थात्व यांच्या पातळीवर खोलपर्यंत घेऊन गेला आहे.
माझा सुहासच्या आधी त्याची पत्नी साधना हिच्याशी परिचय होता. ती स्वत: ‘जे जे’चीच विद्यार्थिनी. ती तेथून पास झाल्यावर ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये कामाला लागली. परंतु तिलाही कलेचे जतन व संवर्धन यांबद्दल आस्था आहे. त्यामुळे ती ‘महाराष्ट्र टाइम्स’ व अन्य वर्तमानपत्रांत पस्तीस-चाळीस वर्षांपासून लिहीत असे. तिचे सार्वजनिक क्षेत्रातील कलाविषयक अनास्थेबद्दलचे काही लेख अत्यंत गाजले. उदाहरणार्थ, नवीन विधिमंडळाच्या इमारतीसाठी नामवंत चित्रकारांकडून चित्रे काढून घेण्यात आली. परंतु त्यांचा दर्जा समाधानकारक नव्हता. साधनाने कठोर शब्दांत त्या चित्रांच्या गुणवत्तेचा समाचार घेतला होता. त्यामुळे अवघे कलाविश्व हादरून गेले होते. साधनाची त्या लेखनामागील कळकळ लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच भावनेने तिचे लेखन होत असते. तीही चित्रकलेतील डॉक्युमेंटेशनचे काम करत आहे. सुहास आणि साधना या दोघांचेही काम परस्परपूरक आहे. सुहासला ‘चतुरंग’चा तीन लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार (2018) लाभला आहे. त्याने त्यावेळी ‘चतुरंग’ला उलट एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आणि चित्रकलाविषयक अधिकाधिक कार्यक्रम योजण्याचे सुचवले. सुहासची कलाध्यास आणि त्याची कलाआस्था खोल परिणाम साधणारी आहे. तो कलाकार म्हणून एकटा शिखर होऊ इच्छित नाही, त्याला त्याच्याबरोबर सारा समाज कलाजाणिवेच्या शिखरावर हवा आहे.
– दिनकर गांगल, dinkargangal39@gmail.com
Very informative article…
Very informative article about art,
Comments are closed.