‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे –
“महाराष्ट्रात साहित्य, संगीत, नाटक या कला जेवढ्या लोकप्रिय आहेत तेवढ्या प्रमाणात आमची चित्र-शिल्पकला दुर्लक्षित आहे. त्याला सर्व समाज, राज्यकर्ते आणि आम्ही स्वत: चित्र-शिल्पकारदेखील जबाबदार आहोत. आम्ही समाजापर्यंत पोचण्यात कमी पडतो… पूर्वी कॅलेंडरे, सण-उत्सव, सिनेमांचे बॅनर, पुस्तकांची मलपृष्ठे यांतून तरी चित्रसंस्कार व्हायचा. तोही कमी झाला आहे. चित्रकार बोलत नाहीत, समीक्षक समजेल असे लिहीत नाहीत. मग ही ‘दूरी’ वाढतच चालली आहे. सर्वसामान्यजन आधुनिक भारतीय चित्र-शिल्पकलेपासून कोसो दूर आहेत. श्रीमंत भारतीय लोक चित्रे फक्त ‘इनव्हेस्टमेंट’ म्हणून खरेदी करत आहेत. त्याचे प्रतिबिंबच समाजात सभोवती दिसते. नागरिक लाखो रुपयांचे फ्लॅट विकत घेतात; पण त्यात ओरिजिनल चित्र सोडाच, चित्राचा प्रिंटदेखील लावला जात नाही. निदान काही घरांत पुस्तके असतात, समाजात साहित्याची चर्चा चालते, प्रकाशनांचे जंगी समारंभ होतात, पण चित्रसंस्कार व्हावा, दृश्यकलेचा आनंद मिळावा म्हणून घरात काहीही नसते. हे बदलावेच लागेल.
“महाराष्ट्र शासनही त्याबाबतीत अत्यंत उदासीन आहे. महाराष्ट्रात तर चित्रकला शिक्षकच शाळांतून हद्दपार केले जात आहेत. मुंबईतील जे.जे.सारख्या दीडशे वर्षें जुन्या संस्थेत कायमस्वरूपी शिक्षक वर्षानुवर्षें नेमले गेलेले नाहीत. मग इतर कलाशिक्षण संस्थांची गोष्टच सोडा. राज्यात चित्र-शिल्पकारांसाठी शिष्यवृत्ती नाहीत; स्टुडिओसारख्या सोयी नाहीत. महाराष्ट्र राज्य हे इतर बाबतींत कितीही प्रगतिशील असले तरी दृश्यकलेच्या क्षेत्रात सोयी-सवलतींसंदर्भात देशात सगळ्यात मागासलेले राज्य आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यात कला व संस्कृती यासाठी बजेट शंभर कोटी रुपये आहे; ओरिसाचे बजेट तीनशे कोटी, तर हरयाणाचे बजेट सहाशे कोटी रुपये आहे. महाराष्ट्राचे त्यासाठी बजेटच सत्तर-ऐंशी कोटी रुपये आहे. मग मराठी कलावंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे कसे जाणार?
“मुंबईत एकशेतीस वर्षांची जुनी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’सारखी संस्था आहे; एकशेएक वर्षांची जुनी ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ आहे. पण त्या संस्थांना एकाही पैशाचे सरकारी अनुदान नाही. हे वास्तव आहे. त्यातून मार्ग काढावाच लागेल. मी त्याची सुरुवात करत आहे. मी मला ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने दिलेल्या तीन लक्ष रुपयांपैकी एकावन्न हजार रुपये चित्रशिल्पकलेवरील कार्यक्रम ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे आयोजित करण्यात यावेत यासाठी देत आहे. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे साहित्य-काव्य-नाट्य अशा विषयांवर अनेक कार्यक्रम होतात, पण त्यात चित्रशिल्पकलेचा अंतर्भाव कमी प्रमाणात असतो. तो वाढवावा.”
दिनकर गांगल यांचेही पुरस्कार वितरण समारंभात भाषण झाले. त्यांनी समारंभानिमित्त निघालेल्या स्मरणिकेतील बहुळकर यांच्याबाबतच्या लेखात महाराष्ट्रातील चित्रकलेच्या सद्यस्थितीचा उल्लेख केला आहे, तो असा – “चित्रकलेला महाराष्ट्रात फार मर्यादित स्थान आहे. सांस्कृतिक विश्वात संगीत, नाटक आणि अलिकडच्या काळात चित्रपट यांना जसे महत्त्व लाभले आहे तसे ते चित्रकलेच्या वाट्यास आलेले नाही. मुले शाळा-शाळांतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास होतात. सरकार त्या नियमाने घेते. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांना कलेची ओळख झाल्याचे समाधान लाभते. पुढे, त्या चित्रकलेचे काहीच होत नाही. घराघरांतील चित्रकलेची जाण म्हणजे मुख्य दालनात हंड्या-झुंबरांसहित लावलेली राजा रविवर्मा यांची चित्रे आणि दलाल व मुळगावकर यांनी एके काळी सजवलेली व आता, नव्या चित्रकारांची कमीजास्त कलात्मक फरकाने असलेली दिवाळी अंकांची मुखपृष्ठे. सर्वसाधारण मराठी माणूस ‘शोभे’पलीकडे कलाजाणिवेच्या पातळीवर कधी गेला नाही.”
– नितेश शिंदे
Khup sunder lekh
Khup sunder lekh