सुरेश लोटलीकर याची अर्कचित्रे (Caricaturist Suresh Lotlikar)

3
88
सुरेश लोटलीकर हा हौशी व्यंगचित्रकार आहे. त्याचे विचार प्रगल्भ असतात आणि टिप्पणी मार्मिक. त्यामुळे तो अचूक वर्म पकडून व्यक्तीचे वा घटनेचे मर्म सूक्ष्मतेने चितारून टाकतो. त्या दृष्टीने त्याची राजकीय व्यंगचित्रे व अर्कचित्रे पाहण्यासारखी आहेत. मराठीत अर्कचित्रे काढणाऱ्यांची मोठी परंपरा आहे. ती दलाल-ठाकरे यांच्यापासून सुरू होते. प्रभाकर भाटलेकर व लोटलीकर यांनी त्या प्रकारांत रेखाटनाची वेगळीवैशिष्ट्यपूर्ण शैली विकसित केली. पैकी भाटलेकर यांनी दैनिकांत काम केल्यामुळे त्यांना त्यांची कला हुकमी राबवावी लागली. लोटलीकर हौशी चित्रकार आहे आणि त्याची कला तो नोकरीतून निवृत्त झाल्यावर व संगणक आल्यानंतर बहरली. त्यामुळे ती बहुरंगांनी खुलली. किंबहुनात्याच्या अर्कचित्रांमध्ये रेषांचा खेळ जेवढा सूक्ष्मपणे व्यक्त होतो तेवढे रंगछटांचे विभ्रम हळुवारपणे बोलतात. लोटलीकर याची आणखी खासीयत म्हणजे त्याने तो प्रकार कलात्मक पातळीवर नेला. त्याची चित्रे व्यक्तिवैशिष्ट्य टिपत असतातचपरंतु त्याचबरोबर ती संबंधित व्यक्तिमत्त्वांपेक्षा विशाल रूपात व्यक्त होतात – जणू झूम होतातम्हणा नाअर्कचित्रांची परंपरा गेल्या पंचवीस वर्षांत बरीच पुढे गेली आहे. काही व्यंगचित्रकार ती कला चोखंदळपणे हाताळताना दिसतात. त्यामध्ये प्रभाकर वाईरकरनिलेश जाधवसतीश उपाध्ये या आजच्या व्यंगचित्रकारांचा उल्लेख करावा लागेल.

 

लोटलीकर यास विचारसरणी आहे. तशी ती प्रत्येक व्यक्तीला व कलाकाराला असतेच; किंबहुनात्याखेरीज माणसाच्या विचारक्षमतेला अर्थ उरत नाही. पण लोटलीकरची विचारसरणी जाणती व परिपक्व आहे. लोटलीकर गेल्या पन्नास वर्षांच्या पुरोगामी विचारवर्तुळात वाढला. त्याने वयाची पंच्याहत्तरी डिसेंबर 2018 मध्ये पार केली (जन्मदिन – 2 डिसेंबर 1944). तो मेकॅनिकल ड्राफ्ट्समन म्हणून फिलिप्स कंपनीत नोकरीला लागला. त्याने तेथील युनियनमध्ये काम केले. तो चळवळ्याच होता. त्यामुळे त्याचा मोर्चे-संप-बंद यांचा अनुभव दांडगा होता. माणूस शहाणा असेल तर जमावाच्या अशा कृतींतून फार शिकतो. लोटलीकर याने ते शहाणपण दाखवले. त्याने कामगार कायदे जाणून घेतले व त्याच्या कामगारकृतीला अर्थ दिला. त्याने निवृत्तीनंतर अनेक कामगारांची प्रकरणेएकीकडे चित्रकलेचा ध्यास घेतलेला असताना धसास लावली. अशा समयी माणसाची कला आणि कृतीदोन्ही कसोटीला लागतात. लोटलीकर त्या कसोटीला वेळोवेळी उतरला आहे. लोटलीकर याने हॅम्लेट-2020 या नावाचे नाटक लिहिले आहे. त्या नाटकाला सध्याच्या न्यायालयीन प्रक्रियेची पार्श्वभूमी आहे.

 

 

लोटलीकर याच्या समाजातील सहज वावरामुळे त्याच्या कलेचे मोठेपण ध्यानी येत नाही. परंतु जगभरची व्यंगचित्रकला जाणलेलात्या संदर्भात मराठी व्यंगचित्रकलेचे वैशिष्ट्य कळलेला आणि खुद्द चित्रकार असलेला मराठीत तो एकच माणूस. त्याने जागतिक व्यंगचित्रकलेचे संदर्भ देत महाराष्ट्रातील त्या कलेचे सामर्थ्य व तिच्या मर्यादा सांगणारे सदर लेखन साप्ताहिक सकाळमध्ये एक वर्षभर केले. त्या लेखनातून त्याच्या व्यंगचित्रकलेतील व्यासंगाचा प्रत्यय येतो. तो केवळ चित्रकार नाहीतर त्याने त्या कलेचा अभ्यास केला आहे हे जाणकारांच्या त्यानंतर लक्षात आले. वसंत सरवटे यांच्या चित्रांमुळे मराठी सुशिक्षित जनांना व्यंगचित्रकलेचे मर्म कळू लागले. महाराष्ट्र टाइम्समधील आर.के. लक्ष्मण आणि मार्मिकमधून बाळ ठाकरे यांनी व्यंगचित्रांतील उपहास मुख्यत: प्रकट केलातोही त्या सुशिक्षित जनांपर्यंत पोचत राहिला. परंतु मराठी वाचक पुरेसा जिज्ञासू नाही हे पुन्हा एकदा लक्षात आले. तो या काही ठरावीक नावांच्या पुढे गेला नाही. व्यंगचित्रांचे अभ्यासक तर सरवटे सरवटेच करत राहिले आहेत. सरवटे यांच्यासंबंधी नऊ पुस्तके मराठीत आहेत!

 

 

 

लोटलीकर व्यंगचित्रातील विधायकता जाणीवपूर्वक आचरणारा बहुधा एकमेव कलाकार असावा. त्याने निवृत्तीनंतर तीन महत्त्वाचे प्रकल्प केले. एक म्हणजे सर्व मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची अर्कचित्रे काढली. त्याची ती लोकसत्तेतील मालिका गाजली. नंतर त्या कृतींची काही ठिकाणी प्रदर्शनेही भरली. पैकी पुणे येथील बालगंधर्व कलादालनात भरलेले प्रदर्शन विशेष गाजले. दोन – त्याने पुलं आणि आम्ही’ नावाचे व्यंगचित्रांचे मार्मिक पुस्तक लिहिले व चितारले आहे. त्यातील पुल दांपत्याची चित्रे व त्याखालील मार्मिक भाष्य पाहून-वाचून पुल-सुनिताबाई व मराठी समाज यांचे सुखद व सूक्ष्म दर्शन होते. त्यामधून वाचकांच्या मनावर नकळत कोरला जाणारा आशय महत्त्वाचा. तो पुलंचे या समाजातील स्थान दर्शवून देतो. तीन – लोटलीकर महात्मा गांधी यांच्या प्रेमात अनेक वर्षे आहे. त्याने वेळोवेळी त्यांची अर्कचित्रे काढली आहेतपरंतु तो गांधीजी यांच्या दीडशेव्या जन्मदिनापासून (2019) तशी चित्रे काढत सुटला आहे. गांधीजीवनातील वेगवेगळ्या प्रसंगानिमित्ताने लोटलीकर याच्या कुंचल्यातून निघालेले उद्गार आहेत ते. ती संख्या इतकी वाढत चालली आहेकी ना गांधीजींचे जीवनप्रसंग संपतना लोटलीकर याची बुद्धी व त्याचा हात थकत. त्याच्या गांधीचित्रांनी त्याचे घर भरले जाईल बहुधालोटलीकर संगणक आला तेव्हा त्यावर चित्रे खूप रेखाटत असे. परंतु त्याला जे रंगछटांचे खेळ करायचे असत त्यास संगणक कमी पडे. म्हणून त्याने संगणकाच्या सहाय्याने चित्रांकन एका टप्प्यावर बंद केले आणि तो हात व कुंचला यांच्या मदतीने रेखाटने व रंगकाम करू लागला.  लोटलीकरने आता2 ऑक्टोबर 2020 या गांधी जयंतीच्या दिवशी संकल्प केला आहेकी 30 जानेवारी 2021 या गांधी स्मृतिदिनी गांधीजींबाबतचे त्याचे सारे काम लोकांसमोर मांडायचेत्या दृष्टीने आम्ही मित्रांनी त्याचा पाठपुरावा करण्याची तयारी ठेवली आहे. लोटलीकरचे एकूण काम वेब साइटच्या माध्यमातून मांडायचा बेत आहे.

 

लोटलीकर याची काही निरीक्षणे 

·      व्यंगचित्रांबद्दलची समजूत वाढवण्यासाठी महाराष्ट्रात काही मंडळींनी गेल्या पन्नास वर्षांत विशेष प्रयत्न केले. त्यामध्ये वसंत सरवटेमधुकर धर्मापुरीकर (नांदेड)शकुंतला फडणीसमनोहर सप्रे (चंद्रपूर) यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यास हवा.

·      व्यंगचित्रहास्यचित्रअर्कचित्रनि:शब्द की सशब्द व्यंगचित्र अशा विविध प्रकारांबाबत वेगवेगळी निरीक्षणे असतातवाद झडतात. ते निरर्थकही असतातकारण चांगलेअर्थपूर्ण चित्र कोणत्याही चांगल्या कलाकृतीप्रमाणे लोकांपर्यंत पोचतेच पोचते. अर्थात वाद निरर्थक असले तरी आवश्यक आहेतकारण त्यामधून तत्त्वबोध होत जातो हे सनातन सत्य आहे.

·      ख्याल गायकाला तीन मिनिटांचे गाणे गाण्याची आस असतेतशा प्रकारे प्रत्येक मोठ्या चित्रकाराला व्यंगचित्र काढण्याची ओढ असतेच असते.

·      व्यंगचित्र समजते – न समजते हा वाद अलाहिदा; व्यंगचित्र लोकांना भुरळ घालते हे नक्कीअन्यथा प्रत्येक दैनिकनियतकालिक व्यंगचित्र छापते ना. माणसाला त्याचा स्वत:चा सुदृढपणा जसा हवा असतोतसे त्याचे उणेपण जाणून घेण्याचेही औत्सुक्य असते; किंबहुना ती त्याची पूर्णतेची आस असते. व्यंगचित्र माणसातील ती उणीव अचूक दाखवते आणि म्हणूनच कार्टूनकार्टून फिल्मअॅनिमेशन या गोष्टी विकसित होत व विस्तारत गेल्या आहेत.

·      व्यंगचित्र समजावून सांगण्याकडे वाढता कल आहेपरंतु व्यंगचित्र म्हणजे सुडोकूसारखे कोडे नव्हेकी ते सोडवावे. ते वाचकास समजतेसमजत जाते.

सुरेश लोटलीकर 99200 89488 lotlikars@gmail.com 

 दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com

(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

———————————————————————————————-

About Post Author

Previous articleअहिल्याबाईंच्या गौरवार्थ इंग्रजी पोवाडा (English Ballad in Praise of Ahilyabai Holkar)
Next articleमहात्मा गांधीजी आणि व्यंगचित्रे (Gandhi in World Cartoons)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

3 COMMENTS

  1. लोटलीकरांची आणखी ८-१० व्यंगचित्रे, अर्कचित्रे या लेखात दिली असती तर बहार आली असती, त्यांना शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here