सुरेश पाटील यांचा धरणमातीचा ध्यास

1
45
_Suresh_Patil_3.jpg

धरणांमध्ये जमा झालेला गाळ काढला तर त्या धरणांची साठवण क्षमता टिकवून ठेवता येणार नाही का? हा प्रश्न बुद्धिवंतांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचाराधीन आहे. पुणे शहर परिसरात असलेल्या खडकवासला धरणात सुरू झालेला प्रयोग त्या दृष्टीने उद्बोधक वाटेल. पुणे शहरात निवृत्तीनंतर स्थायिक झालेले कर्नल सुरेश पाटील हे त्या प्रयोगामागील आधार आहेत. धरणे बांधण्यासाठी जगभर जेवढ्या आदर्श जागा होत्या त्या शोधून काढून तेथे धरणे बांधण्यात आली आहेत. धरणे बांधण्यासाठी सुयोग्य अशा जागा अत्यंत कमी उरलेल्या आहेत, पण धरणात साचणारा गाळ हा वेगळाच प्रश्न बनून गेला आहे. पाणी धरणात वाहत येत असताना ते स्वतः बरोबर गाळ आणत असते. वर्षानुवर्षें साचत गेलेल्या गाळाचे प्रमाण काही ठिकाणी तर इतके जास्त झाले आहे, की ती धरणे काही वर्षांनंतर कायमची निकामी होतील, की काय अशी भीती वाटू लागली आहे!

पाटील १९६८ साली सेनासेवेत सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. त्यांनी १९७१ च्या युद्धात भाग घेतला. पाटील १९९३ साली निवृत्त झाले. ते युद्धातील जखमा भरून काढण्यासाठी दवाखान्यात भरती असताना, तेथील डॉक्टर म्हणाले, ‘आता तुम्ही बोनस जीवन जगत आहात.’ ते शब्द त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. त्यांनी जखमी होऊन निवृत्त झालेल्या जवानांसाठी व युद्धात मृत्यू पावलेल्या जवानांच्या विधवांसाठी, त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या मुलाबाळांसाठी काही तरी करावे अशी खूणगाठ बांधली. त्यांनी सेनासेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसमवेत ‘जस्टिस फॉर जवान्स’ नावाची संस्था सुरू केली. त्यांना ढासळत चाललेले पर्यावरणही खुणावत होतेच. त्यांनी पर्यावरणप्रेमी मित्रांसमवेत ‘ग्रीन थंब’ नावाचीही संस्था स्थापन केली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड सुरू केली.

ते पर्यावरण संरक्षणानिमित्त ब्राझील देशात आयोजित केल्या गेलेल्या ‘रियो परिषदे’ला १९९२ साली स्वखर्चाने जाऊन आले. त्यामुळे त्यांना जागतिक नकाशावर पर्यावरण संरक्षणासंबंधात कोणत्या दिशेने विचार चालू आहेत याची जाण आली. त्यांच्या मन:पटलावर स्वतः भविष्यात काय करायचे आहे त्याचा आराखडा तयार झाला. त्यांनी भारतीय सेनेच्या जागेवर त्यांचे प्रयोग सुरू केले. त्यांनी पुण्यात सेनेच्या ताब्यात असलेल्या एकशेसत्तर एकर जागेवर वृक्ष लागवड सुरू केली. त्याच जागेवर जेथे जेथे जमिनीवर खड्डे होते, तेथे त्यांनी सेनेची यंत्रसामुग्री वापरून पस्तीस तळी निर्माण केली. त्यांपैकी दोन आकाराने खूपच मोठी झाली. त्या ठिकाणी जे वन निर्माण झाले आहे, त्या वनाला ‘अब्दुल हमीद पक्षीतीर्थ’ असे नाव ठेवण्यात आले आहे. अब्दुल हमीद यांना युद्धात केलेल्या असामान्य कामगिरीसाठी मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. तोच प्रयोग त्यांनी कोल्हापूरलाही राबवला. स्थानिक लोक तेथील सेनेच्या जागेचा वापर प्रातर्विधीसाठी करत. त्यांनी ती प्रथा थांबवण्यासाठी तेथे ‘टेंभलाई पक्षीतीर्थ’ स्थापन केले. विविध प्रकारचे पक्षी तेथे येऊ लागले. प्रयत्नांना थोडीशी अशी धार्मिक बाजू दिल्याबरोबर प्रातर्विधीचा प्रकार आटोक्यात आला व चांगली झाडी तेथे तयार झाली. त्यांना त्या कामगिरीसाठी ‘दुबई इंटरनॅशनल अॅवार्ड’ मिळाले. पुण्यातील कॅम्प एरियामध्ये सात नाले नदीत सांडपाणी ओतत होते. त्यामुळे होणाऱ्या नदीच्या पाण्यातील प्रदूषणाकडे पाटील यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी ते सांडपाणी नदीत जाऊ नये म्हणून त्या नाल्यांचे पुनरुज्जीवन करून आदर्श घालून दिला.

त्यांची एकूण मित्रमंडळींत पाणी प्रश्नाची व्यापक पातळीवर उकल कशी होऊ शकेल यावर चर्चा होत असे. शहरांची पाण्याची गरज भागवण्यासाठी नवीन धरणे बांधणे शक्य नाही. सर्वांचे एकमत तशा परिस्थितीत, अस्तित्वात असलेल्या धरणातील जलसाठे, त्यात जमा झालेला गाळ काढला तर कमी खर्चात वाढवले जाऊ शकतात या विचारावर झाले. 

_Suresh_Patil_1_0.jpgपाटील आणि मंडळींनी खडकवासला धरण परिसरात फेरफटका मारला. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील माती वाहून गेली व त्यामुळे शेतांची उत्पादकता कमी झाली असे सांगितल्याने तो वेगळा मुद्दा पाटील यांच्या लक्षात आला. उलट, तो गाळ खडकवासला धरणात जमा झाल्यामुळे तेथे बेट तयार झाल्याचे दिसून आले! तो गाळ काढण्यात आला तर धरणातील जलसाठा वाढेलच आणि त्याबरोबर जमा झालेली माती शेतकऱ्यांच्या शेतांत नेऊन टाकल्याने त्यांचे उत्पादन वाढीला लागेल. शिवाय, पुन्हा गाळ वाहून येऊ नये म्हणून धरणाच्या काठावर दोन्ही बाजूंनी पाणलोट ट्रीटमेंट करून झाडी लावण्यात आली तर भविष्यात माती वाहून येण्याचे प्रमाणही कमी होऊ शकेल, असे विविध मुद्दे त्यांच्या ध्यानी आले. सेनेमधील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या पेन्शनमधून दर महिन्यास प्रत्येकी पाच हजार देण्याचे निश्चित केले. लक्ष्मण साठे, अजित देशपांडे, रवी पाठक, जनरल पाटणकर, अशोक ठोंबरे, विजय कौशिक हे अधिकारी व समाजातील काही दानशूर मंडळी पुढे आली. त्यांनीही काही भार उचलला.

सेनेच्या ‘सदर्न कमांड’मधील अधिकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘सदर्न कमांड’चे मोठे ट्रेनिंग सेंटर आळंदीला आहे. त्या ठिकाणी जवळपास अडीच हजार जवान प्रशिक्षण घेत असतात. त्यांच्याजवळ पोकलेन, जेसीबी यांसारखी माती हलवण्याची अद्यावत मशीनरी आहे. मेन, मटेरियल व मशीन या तिन्ही गोष्टींची उपलब्धता झाली. चौथ्या एमची-म्हणजेच मॅनेजमेंटची गरज लोकसहभागातून भरून काढली गेली. ‘रसिकलाल धारिवाल ट्रस्ट’, ‘कमिन्स’, ‘प्राज फाउंडेशन’, ‘टाटा मोटर्स’, ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ यांसारख्या संस्था त्यासाठी पुढे आल्या व प्रकल्पाचे चित्रच पालटले! ‘कमिन्स, पुणे’ या संस्थेत प्रेझेंटेशन दिल्यावर त्यांच्याकडून पन्नास लाख रुपयांचा चेक हाती पडला. एवढेच नव्हे तर दर महिन्याला त्यांच्याकडून दहा लाख रुपयांचे योगदान उपलब्ध झाले. सिंचन खात्याचे मंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर त्यांच्याकडून सहकार्य मिळण्यास सुरुवात झाली.

शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. तो गाळ शेतकरी स्वखर्चाने वाहून नेतात. त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. त्यांच्या शेतांची उत्पादकता वाढली असून, त्यांची युरियाची मागणीही कमी झालेली आहे. त्या भागात या मातीला ‘काळे सोने’ या नावाने संबोधले जाते, ते खरेच आहे.

संस्थेने दहा लाख ट्रकलोड गाळ काढला आहे. त्याचाच दुसरा अर्थ असा, की त्या धरणाची जलधारण क्षमता तेवढ्याने वाढलेली आहे असे पाटील अभिमानाने सांगतात. पुणेकरांना चांगल्या प्रकारचा पिकनिक स्पॉट तेथे उपलब्ध झाला आहे. वीक एंडला तो परिसर लोकांनी फुलून गेलेला दिसतो. सामाजिक संस्था-शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वेच्छेने तेथे येऊन वृक्षारोपण करतात व निसर्गाशी समरस होतात. सर्व लोकांच्या साहाय्याने जवळपास दहा लाख झाडे लावली गेली व जगवली गेली आहेत.

_Suresh_Patil_2_0.jpgनितीन गडकरी इतर काही मंत्र्यांबरोबर परिसराला भेट देऊन गेले. त्यांनी ‘ती जलक्रांतीच आहे’ अशा शब्दांत योजनेचा गौरव केला. केंद्रीय मंत्री उमा भारतीही त्या परिसराला भेट देऊन गेल्या. इतर राज्यांत ‘खडकवासला प्रकल्पा’प्रमाणे प्रतिकृती बनवण्यासाठी काय करता येईल या बद्दल चर्चा होत आहे.

पाटील म्हणाले, की “मला दुर्दैव एकाच गोष्टीचे वाटते, ते हे की धरणांतील गाळ काढण्याबद्दल गेल्या अडुसष्ठ वर्षांत समाजात साधी चर्चाही होताना दिसली नाही. महाराष्ट्रात हजारो गणेश मंडळे आहेत. त्या सर्व गणेश मंडळांनी स्वतःच्या व राज्यातील उद्योगपतींच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रातील पाचशे धरणे दत्तक घेतली आणि त्यांतील गाळ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला तर भविष्यात अडीचशे धरणे बांधण्याचा खर्च वाचू शकेल!”

त्या परिसरातील गोऱ्हे बुद्रुक, खडकवासला, खानापूर, गोऱ्हे खुर्द या गावांत बावीस किलोमीटरचे काम पूर्ण होत आले असून, हे काम चव्वेचाळीस किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा संकल्प आहे. त्या कामात पुणे परिसरातील चारही धरणे समाविष्ट होतील. पुणे जिल्ह्यातील साडेतीनशे गणेश मंडळे त्या कामात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहाय्याने त्या परिसरात पन्नास लाख झाडे लावण्याचा भव्य कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.

देशात पंचावन्न-साठ हजार सैनिक दरवर्षी निवृत्त होतात. पाटील यांनी त्यांना त्या कामात सहभागी करून घेण्याचा विचार व्यक्त केला. पाटील यांचे स्वप्न मोठे आहे, ते म्हणाले, धरणांतील गाळ काढणे हा माझ्या कार्याचा फक्त एक भाग झाला, मला पर्यावरणात सुधारणा घडवून आणायची आहे, हवा सामान्य नागरिकाला मोकळा श्वास घेता यावा इतकी शुद्ध करायची आहे, मला पुणे शहर परिसरात सांस्कृतिक क्रांती घडवून आणायची आहे, तेथे मोठे पर्यटन स्थळ उभे करायचे आहे, माणसाच्या मनात मला पर्यावरणाबद्दल आस्था निर्माण करायची आहे, खडकवासला धरणाकाठी लाइट अँड म्युझिक शो उभारायचा आहे, योग्य ठिकाणी विश्वेश्वरैया यांच्या स्मरणार्थ म्युझियम उभारायचे आहे. ते माझे स्वप्न आहे व ते साध्य करण्यासाठी मी उर्वरित आयुष्यभर झगडणार आहे!

– डॉ. दत्त देशकर

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.