रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील सुनील मुकनाक या तरुणाने त्याच्या अपंगत्वामुळे खचून न जाता, त्याशी धैर्याने सामना करत ‘गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा’ उभारली आहे. त्याची जिद्द व परिश्रम हे सुदृढ व्यक्तिमत्त्वाला लाजवणारे आहेत. त्याचे जीवन त्याने त्याला पोलिओ झाल्याचा बाऊ न करता जिद्दीने सुखी केले आहे. सुनील त्या कार्यशाळेत फक्त सुबक गणेशमूर्तींना नव्हे तर त्याच्या स्वततःच्या आयुष्यालाही आकार देत आहे.
सुनील मुकनाकचे वास्तव्य गुहागरमधील काळसुर कौंढर जोयसेवाडी येथील दुर्गम भागात आहे. सुनीलचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्याने जन्मानंतर फक्त एक वर्ष मोकळा श्वास घेतला. तो एक वर्षाचा असताना त्याला पोलिओचा आजार झाला आणि त्यााला अपंगत्व आले. त्याचे दोन्ही पाय विकलांग झाले. मात्र कुटुंबातील सदस्यांनी सुनीलला आधार देत त्याची जगण्याची उमेद वाढवली. सुनील दोन्ही पायांनी अधू आहे. तो हातांवर अथवा कुबड्या घेऊन चालतो.
सुनीलने त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण केले. त्याने पुढे, पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये प्रवेश केला. सुनील काळसुर कौंढर ते शृंगारतळी एवढे अंतर रोज तीनचाकी सायकलने जात असे. सुनील दहावीत असताना त्याला त्याच्या नशिबाने पुन्हा दगा दिला. त्याची दहावीची परीक्षा जवळ आली असतानाच नेमकी तीनचाकी सायकल नादुरुस्त झाली. त्यामुळे त्याला दहावीच्या परीक्षेला बसता आले नाही. शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर, त्याने चिखली येथील सुभाष पडवेकर यांच्या गणेश कार्यशाळेत गणपती बनवण्याचे शिक्षण घेतले. ती कला चार वर्षे शिकल्यानंतर, त्याने स्वत:च्या घरी गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा सुरू केली. त्या अपंग तरुणाने त्याची मेहनत व कला पणाला लावत आकर्षक मूर्ती बनवण्याचे काम गेली बारा वर्षे चालवले आहे. त्याने त्याच्या भावाला सोबत घेऊन ती कार्यशाळा सुरू ठेवली आहे व मोठ्या धैर्याने अपंगत्वाचा सामना दिला आहे. सुनीलने तो दुर्गम भागात राहत असूनही 2014 या वर्षी दीडशे गणेशमूर्तींची निर्मिती केली.
सुनीलने अपंगांच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धांमध्ये (औरंगाबाद) थाळीफेक व गोळाफेक यांमध्ये सुर्वणपदक तर भालाफेकीमध्ये रजतपदक मिळवले आहे. सुनीलला सहभाग घेता यावा यासाठी त्यावला उदय रावणंग (अपंग पुनर्वसन संस्था, गुहागर) यांनी सहकार्य केल्याचे त्याने सांगितले. रावणंग सांगतात, की सुनील ‘अपंग पुनर्वसन संस्थे’चा सभासद असून त्यांने संस्थेच्या माध्यतमातून तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवर अपंगांसाठीच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. तो सुरेख रांगोळ्याही काढतो. त्याने रांगोळ्यांच्या अनेक स्पर्धांतून भाग घेतला असून तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये सणांसाठी रांगोळी काढण्याकरता सुनीलला आमंत्रणे येतात.
सुनीलबरोबर त्याच्याा कुटुंबात आईवडील, त्याचा लहान भाऊ, भावाची पत्नी आणि मुलगी राहतात. सुनीलने संस्थेच्या मदतीने जोडधंदा म्हणून गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पेट्रोलपंपासमोरील जागेत चहाची टपरी सुरू केली आहे. तो बॅलन्स व्हिल लावलेल्या दुचाकीने दुकानदार, व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक यांना चहा पुरवतो.
सुनील मुकनाक
मु. पो. काळसुर कौंढर जोयसेवाडी,
ता- गुहागर, जि-रत्नागिरी,
भ्रमणध्वनी – 7350832024
-संतोष कुळे
(मूळ लेखन -प्रहार, 1 सप्टेंबर 2014)
complementary for his hard
complementary for his hard work
very nice lekh
very nice lekh
सुनिलच्या जिद्दीला सलाम
सुनिलच्या जिद्दीला सलाम
Comments are closed.