सुधीर नांदगावकर

0
28

सिनेमारसिकतेच्या शोधात दहा दिशा…

सुधीर नांदगावकरनाटकाचे वेड असलेल्‍या महाराष्‍ट्रात सिनेमासारखी नवी विज्ञानाधिष्ठित कला रुजवण्‍याचे खडतर काम सुधीर नांदगावकरने केले. त्याने महाराष्‍ट्रात आणि भारतातही फिल्‍म सोसायटीची चळवळ पसरवली. नांदगावकरचा प्रवास छापील माध्‍यमाकडून दृकश्राव्य माध्‍यमाकडे असा झालेला दिसतो.
 

नांदगावकर हा साहित्यशास्त्राचा विद्यार्थी, तो मराठी घेऊन एम.ए. झाला. अनंत काणेकर, रमेश तेंडुलकर अशा प्राध्यापकगणांच्या संगतीत वाढला. त्‍याला कवितांची विशेष आवड होती. त्याने काही काळ मुंबईच्या पोद्दार कॉलेज मध्ये मराठी विषय शिकवलादेखील, पण त्या काळी सारा सांस्कृतिक माहोल बदलत होता. नव्या विचारांची व त्याचबरोबर नव्या कलांची समजूत समाजात पसरत होती, त्या टप्प्यावर नांदगावकर सिनेमाकडे, माध्यम म्हणून खेचला गेला. भारतदेश तसा सिनेमावेडा 1930 नंतर (बोलपट अवतरल्यानंतर) झाला होताच. स्वातंत्र्योत्तर, ते खूळ वाढतच गेले. पोटाला मिळाले नाही तरी लोक झुंडीने सिनेमा थिएटरांत जात होते.
 

भारतात सिनेमाने असे व्यसनाचे स्वरूप धारण केले असताना जगात सिनेमा माध्यमातील कलात्मकता शोधण्याचे प्रयोग चालू होते आणि ते नांदगावकरची पिढी वयात आली तोवर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, फिल्म सोसायटी चळवळ अशा व्यासपीठांमार्फत भारतात येऊन पोचले होते.

प्रभातच्या् एका कार्यक्रमादरम्याधन अभिनेत्री स्मिता पाटीलसोबत सुधीर नांदगावकरनांदगावकर ‘फिल्म फोरम’ या संस्थेचा सभासद बनला तो 1964-65 च्या सुमारास. तेथे तो जागतिक सिनेमा पाहून प्रभावित झाला आणि त्याच्या पुढाकाराने 5 जुलै 1968 रोजी प्रभात चित्र मंडळाची स्थापना झाली. नांदगावकर म्हणतो, की ‘प्रभात’ स्थापन करण्यामागे दोन हेतू होते: एक- फिल्म सोसायटी चळवळ दक्षिण मुंबईत केंद्रित झाली होती, ती उपनगरांत आणायची आणि दुसरा हेतू म्हणजे मराठी माणसांना चांगल्या सिनेमाची, या माध्यमातील ‘कले’ची जाण करून द्यायची.
 

प्रभात चित्र मंडळ अव्याहत चालू आहे. नांदगावकरने दोन्ही हेतू साधण्यासाठी परोपरीने प्रयत्न केले, पण त्याची खंत अशी, की मराठी समाज काही त्याच्या प्रयत्नांना बधला नाही. तो आपल्या डबक्यातील साहित्यकलेत खुळावून राहिला. टेलिव्हिजनचे माध्यम आल्यानंतर तर तो त्यात अधिकच रमून गेला! ‘प्रभात’ने जुने भारतीय-मराठी अभिजात सिनेमा दाखवले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवले, वेगवेगळ्या देशांच्या उत्तमोत्तम चित्रपटकृती आणवत त्यांचे प्रदर्शन घडवले, भारतीय समांतर सिनेमाची माहिती करून दिली, चित्रपटविषयक चर्चा घडवून आणल्या, ‘प्रभात’च्या या कार्यक्रमांचा कर्ता असे तो नांदगावकर. कार्यक्रमांना प्रेक्षक-श्रोत्यांची गर्दी होई, परंतु त्यांमुळे त्यांची उत्सुकता, जिज्ञासा वाढल्याचे आढळून आले नाही.
 

दरम्यान, नांदगावकर फिल्म सोसायटी चळवळीचा कार्यकर्ता बनून गेला होता. तेच त्याचे ‘मिशन’ झाले होते. भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय, ब्रिटिश चित्रपट समीक्षक मारी सेटन या मंडळींनी भारतातील फिल्म सोसायटी चळवळीला चालना दिली. आरंभापासून, सरकारी आश्रय लाभल्याने चळवळीचे अधिष्ठान देशाच्या चारी टोकांना पसरले, परंतु त्याचमुळे चळवळीचे कामकाज समाजात पसरायला अडचणी येऊ लागल्या, तेथे संस्थाशाही निर्माण झाली. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया व त्यांचे देशातील चार विभाग यांवर बंगाली वरचष्मा लादला गेला.
 

नांदगावकरने फेडरेशनमध्ये घुसून तेथील ‘बाबुशाही’ नष्ट केली, तेथे चळवळीचे ‘स्पिरिट’ आणले. तो स्वत: फेडरेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदापर्यंत पोचला. आरंभापासून, फेडरेशनच्या अध्यक्षपदी चित्रपटक्षेत्रातील नामांकित व्यक्ती -सत्यजित राय, श्याम बेनेगल- असत. नांदगावकरने फेडरेशनचा कारभार सुरळीत केला. त्यात लोकशाही कार्यपद्धत आणली. ते त्याचे संघटनकार्य कौशल्याचे म्हणून वाखाणले जाते. फेडरेशनला पन्नास वर्षे झाली तेव्हा त्याचा सुवर्णमहोत्सव दिमाखदारपणे व हेतुपूर्णरीत्या साजरा करून, नांदगावकरने फेडरशनमधून व ‘प्रभात’मधूनही अंग काढून घेतले आणि त्याने महाराष्ट्रात पन्नास फिल्म सोसायटी सुरू करण्याचा संकल्प सोडला. त्यासाठी फेडरेशनचा ‘महाराष्ट्र चॅप्टर’ निर्माण केला. नांदगावकर तीन वर्षांत त्या टप्प्याजवळ पोचला आहे.
 

प्रभात चित्र मंडळ आणि रूईया फिल्म सोसायटीकडून आयोजित करण्यागत आलेल्या फिल्म कॅम्पचे क्षणचित्रनांदगावकरने याच काळात आग्रहाने विद्यापीठीय विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सिनेमाची अभिरूची निर्माण होईल यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी ‘कॅम्पस फिल्म सोसायटी’ हा नवा उपक्रम राबवला. तेथेही त्याच्या प्रयत्नांना उत्तम यश लाभले आहे.
 

नांदगावकर गेली चाळीस वर्षे चांगल्या सिनेमाची जाण मुंबई-महाराष्ट्रात, मुख्यत: मराठी समाजाला यावी यासाठी झटत आहे. त्याने मुंबई या शहराचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मामी) सुरू करून दिला, हे त्याचे श्रेय तर फार मोठे आहे. त्यामुळे तो स्वत:ही जागतिक स्तरावर पोचला आणि त्याने कानसहित अनेक चित्रपट महोत्सवांत परीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. अनेक नवनव्या माध्यमांमुळे जागतिक कीर्तीचे चित्रपट घरबसल्या पाहायला मिळतात, अशा वेळी ‘आपण व आपले शेजारी आणि त्यांची संस्कृती’ हे सूत्र पकडून त्याने एशियन फिल्म फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आणि त्यामार्फत दरवर्षी आशियाई चित्रपट महोत्सव (थर्ड आय) मुंबईत होऊ लागले. आता, तेच ‘पॅकेज’ राज्याच्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांतून प्रदर्शित होऊ लागले आहे. एकाच व्यक्तीने जमीन नांगरण्यापासून पीक काढेपर्यंत शेतीची सर्व कामे करावीत तसा नांदगावकरचा चित्रपट अभिरुची संवर्धनासंबधातला आतापर्यंतचा हा प्रयत्न आहे.
 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व प्रयत्नांत नांदगावकरचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले आहे. त्याची स्वत:ची समजूत प्रगल्भ झाली आहे. तो ‘शब्दमाध्यमाकडून चित्रमाध्यमा’कडे या संकल्पनेपर्यंत पोचला आहे. त्याचे सूचन त्याच्या ‘सिनेमासंस्कृती’ या पुस्तकात होते. त्याच्या चाळीस वर्षांच्या परिश्रमाचे हे फलित आहे आणि महाराष्ट्रभर पसरत असलेल्या चित्रपटविषयक सुजाणपणाला योग्य अशी सामग्री या पुस्तकामधून मिळू शकते. नांदगावकर स्वत: चित्रपटमाध्यमाची ओळख करून देणारे पॉवरपॉइंट लेक्चर झकास देतो. त्याचा सर्वात आवडता दिग्दर्शक सत्यजित राय व आवडता चित्रपट म्हणजे अपु ट्रिलॉजी. त्याबद्दल तो हळवा होऊन बोलतो. नांदगावकरचे ‘अभिजात’ नावाचे राय यांच्या चित्रपटांबाबतचे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध आहे. संघटक म्हणून सुधीर नांदगावकरच्या कामाचे चीज या समाजात झाले नाही.
 

सिनेमासंस्कृती’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासमयी उपस्थित असलेले (डावीकडून) सुधीर नांदगावकर, एशियन फिल्म फाऊण्डेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम, नाटककार जयंत पवार, ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल आणि प्रभात चित्र मंडळाचे सचिव संतोष पाठारेनांदगावकर असे ध्यासपूर्ण जीवन जगला तरी त्याचे बालपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छायेत गेले. त्यामुळे त्याने सतत भाजपचा पाठपुरावा केला. वाजपेयी-आडवाणी यांच्यावर त्याची अपार श्रध्दा. त्याने भाजपसाठी मुंबई शहरापुरती अनेक कामे केली; विशेषत: प्रसिध्दीच्या बाबत. मात्र त्याने राजकारण सिनेमाच्या क्षेत्रात येऊ दिले नाही. त्याचा जन्म (11जून 1939)रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदगावचा. त्याचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाल्यावर तो कोल्हापूरला कॉलेजात गेला व त्याने पदव्युत्तर शिक्षण मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमधून घेतले. तेव्हाच, तो ‘मराठा’ दैनिकात काम करत होता. पुढे, त्याने वसंत सोपारकरच्या सहाय्याने ‘रंजना’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. ते अल्पजीवी ठरले. त्यानंतर तो तिकोने यांच्या सहकार्याने मुद्रण व्यवसायात शिरला. त्याचा तोच उद्योग चालू आहे. त्याची पत्नी सुनंदा आणि दोन मुलगे व एक मुलगी असे त्याचे कुटुंब आहे.
 

नांदगावकर दिसायला राजसगोजिरा आहे. त्याला स्वत:ला तरूणपणी छान छान कपडे घालून सभा-समारंभ साजरे करायला आवडत. त्याच्या प्रकृतीत भारतीय संस्कृतीतील काही आचार-वर्तनव्यवहार पक्के मुरून गेले आहेत; नव्हे त्याची त्यावर श्रद्धा आहे. त्यामुळे तो ‘बाबा वाक्य’ प्रमाण जरी नाही, तरी खूप प्रमाणात सत्य मानतो. उलट, आजचे जग येणार्‍या प्रत्येक विधानावरच नव्हे, तर चित्रावरदेखील संशय घ्यावा असे आहे. त्यामुळे त्याच्या काही श्रद्धा, त्याचे काही विश्वास हे भाबडे वाटू शकतात, परंतु त्याची ‘सिनेमासंस्कृती’वरील श्रद्धा अविचल आहे. दृकप्रत्ययाच्या सद्यकाळात जग ‘सिनेमा’पुढे जाऊ शकते हे मानायलाही त्याचे मन तयार होणार नाही इतका तो त्या संस्कृतीत मुरला आहे.
सुधीर नांदगावकर
9323941897
 

दिनकर गांगल,
9867118517,

thinkm2010@gmail.com 

About Post Author

Previous articleजनता गाढव आहे का?
Next articleगांगलांची ‘अण्णा हजारेगिरी’
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.