काळ सरतो, माणसे अंतरतात. पण, त्यांच्या आठवणी मात्र अजरामर राहतात. दादा कोंडके यांच्यासारख्या कसलेल्या, हजरजबाबी कलाकाराने घेतलेली फिरकी, केलेल्या कोट्या आयुष्यभराची पुंजी होऊन जातात.
दादा कोंडके, वसंत सबनीस यांचे वगनाट्य ‘विच्छा माझी पुरी करा’ अफाट लोकप्रियतेच्या वारूवर मांड ठोकून भरधाव वेगाने दौडत होते. पुण्यात एका संध्याकाळी ‘विच्छा माझी पुरी करा’चा प्रयोग रंगात आला होता. प्रयोगाला बाळ कोल्हटकर आलेले होते. तेही तेव्हा ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’च्या लोकप्रियतेच्या लाटेवर आरुढ होते. कोल्हटकर पहिल्या रांगेत बसलेले. त्यांच्या शेजारी मी. कोल्हटकर यांना बघून दादा कोंडके यांना स्फूर्ती न येती तरच नवल! त्यांनी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’वरून काही भन्नाट ‘अॅडिशन’ घेतली आणि आख्खे नाट्यगृह हास्याच्या धबधब्यात बुडून गेले. त्याच प्रयोगाला बाळ कोल्हटकर यांचा एक चाहता हजर होता. तो आमच्या मागेच काही रांगा सोडून बसला होता. त्याला दादा कोंडके यांनी घेतलेली बाळ कोल्हटकर यांची फिरकी आवडली नसावी. तो मागच्या रांगेतील खुर्चीतून जोरात ओरडला, ‘दादा, काय चेष्टा लावलीय राव?, कोल्हटकरांसारखी एकतरी कविता येते का करता तुम्हाला? टिंगलीच मारा तुम्ही फक्त!’ खळखळत्या नाट्यगृहात एकदम शांतता पसरली. पण, दादा कसलेले! त्यांनी रंगमंचावरच एक मुरकी मारली, गिरकी घेतली आणि म्हणाले, ‘काय कविता पायजे म्हन्ता व्हय? घ्या की राव!’ – आणि पुढील श्वासाला पहिल्या रांगेत बसलेल्या बाळ कोल्हटकर यांच्याकडे पाहून दादांनी सुरुवात केली :
सुंदर पोहे पातळ पातळ; खमंग तुकडे, खोबरे पुष्कळ
शेंग, चुरमुरे अन् डाळ
या सर्वांनी, विविध चवींनी
असा बनविला चविष्ट चिवडा
पडते ज्यावर उडी; बांधतो ही चिवड्याची पुडी!
आता काय बोलणार यावर? अशी किती माणसे, किती प्रसंग… तो काळ सरला, माणसे अंतरली; पण, त्यांच्या आठवणी, त्या मात्र अजरामर आहेत. माझ्या आयुष्यभराच्या संवादयात्रेत भेटलेल्या अशा अद्वितीय माणसांच्या, त्यांच्या सहवासाच्या आणि संवादाच्या आठवणी हीच माझी पुंजी!
– सुधीर गाडगीळ 9822046744 sudhirggadgil@gmail.com
———————————————————————————————————————-