Home लेखसूची सुंता! नको रे बाबा तो अनुभव (Circumcision – Dreaded Experience)

सुंता! नको रे बाबा तो अनुभव (Circumcision – Dreaded Experience)

ते दिवस अजूनही लख्ख आठवतात. अंगणाच्या कोपऱ्यात गाडलेला रांजण. आजूबाजूला वस्ती. साधेच राहणीमान असणारी, परंतु नीटनेटक्या लोकांची. आई-वडील, दोघेही शिक्षक. शिक्षकांची मुले त्यांच्याच प्राथमिक मराठी शाळेत शिकायची. मी व माझी मोठी बहीण, दोघेही आईबरोबरच मेटकरी शाळेजवळच्या वस्तीत राहत होतो. बार्इंची मुले म्हटल्यावर तेथे रुबाब निराळाच असायचा. खास वागणूकसुद्धा मिळायची. वस्तीवरील आई-बाप त्यांच्या मुलांना विनाकारण आमचा आदर्श सांगायचे. सवंगडी हेसुद्धा जाम जिवाभावाचे. माँ-अब्बांनी गरिबीतील हाल सोसून, शिक्षण घेऊन हळूहळू जम बसवण्यास सुरुवात केली, त्यांनी त्याच व्यावहारिक परंतु मराठी माध्यमातील घेतलेल्या शिक्षणाची कास आम्हाला धरण्यास लावली. गरिबी हीसुद्धा खूप काही शिकवून जाते; आम्ही सधन घरात असतो, तर कदाचित मदरशातील शिक्षणावर जोर धरला गेला असता!

अब्बांनी सुरुवातीपासून अल्लाहची इबादत करण्यासाठी आम्हाला वर्षातून फक्त दोन दिवस सक्ती केली – रमजानला आणि बकरी ईदला. ते स्वतः मात्र प्रत्येक शुक्रवारी (जुम्माला) घरातच कुराण पठण आणि इतर धार्मिक पुस्तके यांचे वाचन करायचे. त्या वेळी सकाळी नळाला आलेल्या पाण्याचा लोटा भरून ठेवायचे. ते पाणी दुआ पढल्यावर घरात सर्वांनी वाटून प्यायचे, अगरबत्तीच्या भुकटीला गळ्यावर लावायचे. पण ते नमाज कधी पढायचे नाहीत- ना घरात, ना मशिदीत. फक्त वर्षातून दोनदा सामूहिक नमाज, तोसुद्धा ईदला. आमच्याबरोबर. त्यांनी तो शिरस्ता शेवटपर्यंत पाळला. त्यांचा घरातील जुम्मा चुकल्याचे कधीही माझ्या तरी नजरेत आले नाही. इंतकाल होण्याच्या वर्षभर आधी मात्र, कोणास ठाऊक, परंतु ते रोज मगरीबला मशिदीत जमातमध्ये जाऊ लागले. रमजानच्या महिन्यात इफ्तारचा छोटा डबा भरून रोज दालच्या खाना घेऊन घरी यायचे, ते फक्त त्यांच्या लाडक्या नातवासाठी. माझ्या मुलाला दालच्या खूप आवडतो. आम्ही दोघे त्याला तो सध्या अधून-मधून बनवून देतो, परंतु त्यालासुद्धा त्यांनी कधी जमाते-इबादतसाठी जोर नाही लावला. माँचेसुद्धा असेच काही तरी सारखे होते. ती गुरुवार (जुम्मेरात) मानायची. तिचा गुरुवारी उपवास असायचा. कुराण पठण, दुआ सगळे अब्बांसारखेच असायचे.

त्या दोघांनी शून्यातून विश्व निर्माण केले. प्रगती अगदी नजर लागण्यासारखी होती ती. आम्ही सारी भावंडे जे काही आहोत, ते त्यांच्या कष्टाचे आणि संस्कारांचे फळ आहे. जीवनात चढउतार तर येतातच, परंतु उतारावरून चढावर येण्यास तेच कामी आले. ती दोघे एवढ्या हलाखीतून वर आले तरी शेवटपर्यंत एका पैशाचे कर्जदार कधी बनले नाहीत. उलट, त्यांची भूमिका सढळ हाताने गरजवंतांना देण्याचीच असायची. एवढे विश्व निर्माण केले ते पै-पै जोडूनच.

अब्बांना जेवढे बघितले तेवढ्यावरून त्यांचे डोळे पाणावलेले कधीच बघितले नव्हते. अपवाद दादांचा जनाजा उचलताना आणि बहिणीला लग्नात रुक्सत करताना. अजून एक अपवाद होता- नातवाची सुंता करताना. त्याचा केविलवाणा आरडाओरडा असा होता, की काळीज पिळवटून जावे. तो तीन-चार वर्षांचा होता. पूर्ण कपडे काढल्यावर, आम्ही त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांच्या हवाली करत होतो, त्यामुळे तो बिथरला आणि दादाऽ दादाऽऽम्हणून किंचाळून रडू लागला. तेव्हा अब्बांचे डोळे पाणावलेले पुन्हा एकदा पाहण्यास मिळाले. ते त्याला आत नेल्यावर दवाखान्यातून गायब झाले, ते त्याला डॉक्टरांनी आमच्या हवाली केल्यावरच भेटण्यास आले.

तर खरा विषय तो, हाच- सुंता. मुस्लिम समाजात पुरुषांसाठी सुंता ही धार्मिक आणि पारंपरिक परंतु सक्तीची बाब आहे. मी असे ऐकलेय की मुस्लिम पुरुषांची सुंता झाली नसेल, तर त्याला लग्नही करता येत नाही आणि त्याला दफनही करता येत नाही. इस्लाम धर्मात, कुराणात न लिहिलेली परंतु काही हदीसमध्ये उल्लेखलेली मुस्लिम पुरुषांची- नव्हे, लहान लहान बालकांचीच म्हणण्यास हरकत नाही- करतात ती सुंता. जगात जवळपास तीस टक्के लोकांची अशी सुंता झालेली आहे. त्यात मुस्लिम पुरुष सत्तर टक्के आहेत. त्या गोष्टीला बरेच आक्षेप व समर्थनपर मुद्दे आहेत. वैज्ञानिक समर्थनसुद्धा आहे, परंतु काही अटींवर. योग्य आणि नेमलेल्या तज्ज्ञांकडूनच सुंता झाली तर ठीक, नाही तर त्यातून आजार उद्भवण्याचा संभव जास्त. मानवाधिकाराच्या कक्षेत तर सुंता या क्रियेला कडवा विरोधच होतो. WHO, UNO, CDS यांच्या माहितीनुसार, सुंता केल्यामुळे HIV-AIDS होण्याचा संभव कमी आहे. परंतु ते इतर साधनांप्रमाणे प्रतिरोधक म्हणून वापरू शकत नाही.

खरे तर, मी सुंता ही क्रिया माझ्या मुलाला लागू न करण्याचा निश्चय केला होता, परंतु त्याला लघवीच्या जागी संसर्ग झाल्यामुळे लघवी करताना त्रास सुरू झाला. शहरात डॉक्टरांकडे दाखवल्यानंतर त्यांनी निदान केले, की त्या ठिकाणी संसर्ग होऊन जखम झाली आहे. ती जागा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि जखमेवर उपचार करण्यासाठी सुंता करावी लागेल. डॉक्टरांना म्हणालो, ‘‘उपचार करा, परंतु सुंता करू नका.’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘त्या उपचारालाच सुंता म्हणतात. लिंगावरील चामडे काहीसे कापून दूर करावे लागणार, म्हणजे ती जागा पुन्हा बाधित होणार नाही. तो उपचार फक्त मुस्लिम नाही, तर इतर धर्मीय व्यक्तींनासुद्धा अशा वेळी करावा लागतो.’’ तेव्हा मी तयार झालो. माझी स्वत:ची सुंता झाल्याची आठवण होतीच. मी पुढे काय परिस्थिती होणार आहे, हे आठवून थोडा बधिर झालो. त्यात मुलाचे कपडे काढून त्याला भूल देण्यास घेतले, तर नसच सापडेना. तो कोणाला हातही लावू देत नव्हता. सुई इतरत्र टोचली जाण्याचा धोका होता. त्याचे दोन्ही हात घट्ट धरले. त्याचा ‘‘पप्पाऽ दादाऽऽ पप्पाऽ दादाऽऽ’’ असा आक्रोश मन हेलावून सोडत होता. शेवटी, पायाच्या नसेलाच सलाईन लावले.

सुंता झाल्यावर इंजेक्शनमुळे बधिर झालेले त्याचे शरीर हातात घेताना गळ्यापर्यंत हुंदका दाटून आला होता. ते पाहून माझ्या बायकोची हालत तर त्याहून खराब झाली होती. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘भूल उतरली आणि मुलाने लघवी केली, की तासाभरात तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता.’’ चार-पाच वाजता भूल उतरली, परंतु तो भीतीमुळे लघवी करत नव्हता. त्याला त्रास होत असणार. त्याला त्याच्याबरोबर, काही तरी विचित्र केले आहे हे जाणवले. तो रात्री आठ वाजले तरी काही ऐकेना. शेवटी दवाखान्यात मुक्काम करायचा ठरवले. त्याला रात्री नऊ-दहा वाजता बाहेर फिरण्यासाठी आणले. सारखा घरी कधी जायचे?’ असे म्हणायचा. त्याला लघवी कर, आपण घरी जाऊ असे दोघेही समजावून सांगायचो. तो थोडं पुढे घेऊन चला मी करतोअसे म्हणायचा. आम्ही थोडे पुढे- थोडे पुढे करत-करत दवाखान्यापासून बऱ्याच अंतरावर आलो, तरीही तो लघवी करत नव्हता. रस्त्यावर उभे करून लघवी करम्हटले तर त्याचे परत रडगाणे, ‘थोडं पुढे चला.रस्त्यावरून येणारी-जाणारी माणसे आम्हा दोघांकडे संशयाने बघू लागली. एक जण तर पोरे पळवणारी टोळी नाही ना, म्हणून एकदम समोर येऊन जाब विचारू लागला. तो त्याला परिस्थिती सांगितल्यावर हसत-हसत निघून गेला. शेवटी, वैतागून आम्ही दोघांनी त्याला पुन्हा दवाखान्यात आणले. तो चेकअप झाल्यावर त्याच्या आईबरोबर स्पेशल रूममध्ये झोपला. मी बाहेर गेस्ट रूममध्ये झोपलो. तो रात्री बायकोला काही झोपू देत नव्हता. लघवी होण्यासाठी आधीच इंजेक्शन दिले होते. त्याने शेवटी रात्री दोन-तीन वाजता लघवी केली. आणि लगेच ओरडण्यासही सुरुवात केली, ‘‘आता लघवी झाली, चला घरीऽ, चला घरीऽऽ’’ मला उठवण्यास आला. ‘‘पप्पा, चला घरी.मलाही हसू का रडू असे झाले. शेवटी, आम्ही त्याची समजूत काढून सकाळी त्याला घरी घेऊन आलो. आम्ही माझ्या सुंतेनंतर केलेले ओबडधोबड धार्मिक विधी मात्र त्याला लागू केले नाही. त्याकडे आम्ही वैद्यकीय उपचार म्हणूनच पाहिले.

माझा स्वत:चा अनुभव तर यापेक्षा भयंकर होता. ते साल 1987-88 असेल. मी आणि माझा चुलत भाऊ अंगणात काचेच्या गोट्या खेळत होतो. तेवढ्यात चुलते आले आणि त्याला व त्याच्या मोठ्या भावाला बाजारात घेऊन गेले. तो चुलत भाऊ जाताना दम भरून गेला, ‘‘माझा डाव आहे, गोट्या हलवायच्या नाहीत… आलोच मी सुंता करून.’’ मला काय माहीत- त्याला उचलून – आणून थेट पलंगावर झोपवून पंखा लावतील! मी आपला बापडा आमचा डाव कोणी हलवू नये, म्हणून डोळ्यांत तेल घालून बसलो होतो. चुलत्याने आणि जमातवाल्यांनी माझ्या अब्बांनाही माझ्या व धाकट्या भावाच्या सुंतेसाठी आग्रह धरला होता, परंतु त्यांनी तो मान्य केला नाही. बाजारात कोठलेसे फकिरवजा दोघे जण आले होते. ते मुलाला मांडीवर घेऊन, डोळ्यांवर रुमाल टाकून झटक्यात काम करायचे आणि नंतर कसलेसे औषध लावायचे. ते त्या क्रियेसाठी कोठल्याही प्रकारच्या भुलीचा प्रकार वापरत नव्हते. अब्बांनी कदाचित तो अघोरी प्रकार बघूनच त्या गोष्टीला तयारी दाखवली नसेल. सुंता करण्याचा तो प्रकार समाजात अजूनही पाहण्यास मिळतो.

मुस्लिम जमातीत राहायचे म्हटले, की सुंता तर करावीच लागणार. नातेवाइकांच्या दबावात मावशीच्या लग्नाला गेलो असताना, तेथील एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे मला आणि माझ्या धाकट्या भावाला नेण्यात आले. भूल देण्याआधी लिंगावरील चामडी बाजूला करण्यासाठी जो जोर लावण्यात आला, त्या वेळी मी जोरजोरात किंचाळू लागलो. अब्बांनी माझा आवाज ऐकून धाकट्याला लगेच दवाखान्याबाहेर आईबरोबर बसवून ठेवले. त्यांचा धीरच होईना, धाकट्याचीसुद्धा सुंता करण्याचा. त्यांनी ती त्या वेळी टाळलीच. शेवटी भूल देऊन माझी सुंता उरकल्यावर मला आजोळी आणण्यात आले. मी मावशीचे लग्न होईपर्यंत लुंगीवरच मिरवत होतो!

सुंता या जबरदस्तीने कराव्या लागणाऱ्या धार्मिक, पारंपरिक विधीमुळे माझ्या दैनंदिन जीवनात जन्मल्यापासून आजपर्यंत काहीच फरक पडल्याचे जाणवलेले नाही. ती केली असती काय किंवा नसती काय, फरक पडणार नव्हताच. आणि फार मोठा फायदा तर होणारच नव्हता- नव्हे, झालाच नाही. एक वैद्यकीय उपचार म्हणून फायदा झाला असेल कदाचित.

टीप –

इबादत – पूजा, उपासना, आराधना, सेवन, अर्जन ही संविधानाच्या अनुसार प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे.

 

मगरीब – सूर्यास्ताची दिशा, पश्चिम दिशा, इस्लामला अनुसरुन सुर्यास्तानंतरची वेळ, तेव्हा पढली जाणारी नमाज

 

इफ्तार – मुस्लिम लोकांची रोजा सोडण्याची क्रिया

 

दालच्या खाना – मटण, डाळ मिळून बनवलेली भाजी जी भाताबरोबर खातात

 

जुम्मेरात – गुरुवार, Thursday

 

रुख्सत – निरोप घेणे, विदाई भाव, प्रस्थान करतानाचे भाव

 

हदीस –  मुसलमानांचा धार्मिक ग्रंथ, पै. मुहम्मद के कर्म कलाप और वचनों का संग्रह

(साधना, जानेवारी 2021 अंकावरून उद्धृत, संपादित- संस्कारित)

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

– अल्तापहुसेन रमजान नबाब  09545604192 altapnabab78@gmail.com

अल्तापहुसेन नबाब हे मेकॅनिकल इंजिनीयर. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. ते सध्या पुण्यात स्टील उद्योगात मेंटेनन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गायन, वाचन आणि लेखनाचा छंद आहे. ते मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेसाठी लेखन करतात.

——————————————–——————————————————————————————-

About Post Author

12 COMMENTS

  1. “सुंता!नको रे बाबा तो अनुभव” हा श्री अल्तापहुसेन रमझान नबाब यांचा लेख वाचला।लेख अतिशय छान आला आहे।हा लेख वाचल्यावर मला श्री अभिराम भडकमकर यांच्या इंशाअल्लाह या कादंबरीतील कयुमचा पुतण्या सन्नी याच्या सुंताचा प्रसंग आठवला।अभिरामने हा प्रसंग अत्यंत प्रत्ययकारी रंगविला आहे।कादंबरीत हा प्रसंग संज्ञाप्रवाहाच्या अंगाने येतो।सन्नीचा आकांत, तिथलं वातावरण या पार्श्वभूमीवर झुल्फिला आपली सुंता आठवू लागते।ती वेदना, ओशाळलेपण, उपस्थितांकडून घेतली जाणारी मजा यासह झुल्फि सन्नीच्या वेदनेशी समरस होतो आणि वाचक श्वास रोखून, त्या यातनेशी एकजीव होत तो थरार अनुभवतो।

  2. विलक्षण योगायोग ! मी अगदी या क्षणी कादंबरीतला तो प्रसंग वाचून संपवला आणि या कादंबरीचे एक सशक्त अंतःसूत्र इस्लाम-चिकित्सा कसे आहे, याचा विचार करीत बसलो आहे !��

  3. मोनिकाने हा विषय धर्म श्रद्धा इ कथांमधून खूप तरल पद्धतीने हाताळला आहेतो ही वाचावाखरेतर शेषराव मोरे यांचे दोनही ग्रंथ निवांतपणे वाचावेत.

  4. धन्यवाद सर. मोनिकाताईंच्या कथा आणि मो-यांचे चार प्रेषित हे वाचले नाही! पण प्रेषित ग्रंथाचे मा.गो.वैद्य यांनी भाष्य मध्ये केलेले प्रभावी टीकात्मक परीक्षण वाचले होते!

  5. इंधन (ले. हमीद दलवाई) वाचून फार दिवस झाले. त्यात मुस्लिम कुटुंबाचे चित्रण व चिकित्साही होती, पण कादंबरी लहान होती.

  6. सुंताविषयक लेख वाचला.वैद्यकदृष्टया करावी लागली तरच ठीक आहे. लेखकाचे धर्मनिरपेक्ष सुधारक विचार योग्य.

  7. काही अनिष्ट प्रथा बंद व्हावयास हव्यात.समाज जागृती करणारा हा लेख आवडला . विज्ञानाची कसोटी आणि श्रद्धा यांचेत समन्वय साधून जे हिताचे ते करावे.लेखकास चांगला लेख लिहिला म्शुहणून भेच्छा .

  8. इंधन कादंबरीत फक्त मुस्लिम नव्हे तर भारतीय संस्कृतिचे यथार्थ चित्रण आणि चिकित्सा केलेली आहे.धर्मनिरपेक्ष आणि एकात्मिक भारताचे चित्र तसेच भारतीय समाजाच्या क्रिया-प्रतिक्रिया या भिन्न धर्म-जाती असल्या तरी किती एकसारख्या आहेत हेच दर्शविते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version