Home मंथन अस्पृश्यता निवारणाचे सातवे सोनेरी पान ! (Untouchability: Sawarkar, Gandhi And Ambedkar)

अस्पृश्यता निवारणाचे सातवे सोनेरी पान ! (Untouchability: Sawarkar, Gandhi And Ambedkar)

महाराष्ट्राच्या इतिहासात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मान्यवर नेत्यांमध्ये जे राजकीय, सामाजिक संघर्ष झाले त्याला, राम गणेश गडकरी यांच्या एकच प्यालानाटकामधील भाषेचा आधार घेत आकाशातील नक्षत्रांच्या शर्यतीअसे संबोधले जाते. त्यामधील कौतुकाचा भाग सोडला तरी त्या पुढील काळात प्रत्येक बाबीचे ध्रुवीकरण होत गेले आहे. लोकमान्य टिळक यांच्या निर्वाणानंतर हिंदुस्थानात गांधी युगसुरू झाले. गांधीजींनी देशाला काही नवा कार्यक्रम दिला. अस्पृश्यतानिवारण चळवळीचा त्यामध्ये समावेश होता. टिळक ते गांधी हे नेतृत्वांतर सहजासहजी झालेले नाही. टिळक हे महाराष्ट्राचे असल्याने ते नेतृत्वांतर महाराष्ट्राच्या सहज पचनीही पडले नाही. त्यामुळे टिळक यांच्या अनुयायांमध्ये दोन गट सरळ पडले. त्यांमधील एक लगेच महात्मा गांधी यांच्या छावणीत दाखल झाला तर दुसरा स्वतंत्र राहून आपण टिळक यांचे राजकारण पुढे चालवत असल्याचा दावा करू लागला. कालांतराने, त्यांमधील बहुतेकांनी हिंदू महासभेचा आश्रय घेतला. ही झाली काँग्रेसची गोष्ट. टिळक यांना विरोधी असणारा बाबासाहेब आंबेडकर यांचाही गट होता. तो पुढेही गांधीजींच्या पर्यायाने काँग्रेसच्या विरोधात राहिला. त्याखेरीज अनेक लहानमोठे गट त्यावेळी महाराष्ट्रात कार्यरत होते.

 

महाराष्ट्रात असा अंतःसंघर्ष चाललेला असताना 1924 साल उजाडले. त्यावेळी ब्रिटिश साम्राज्यशाहीने अटकेत असणाऱ्या वि.दा. सावरकर यांची सुटका केली. त्यांची सुटका पाच वर्षे राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध राहणे या अटींवर झालेली होती. राजकीय चळवळीत भाग घेण्यास बंदी असल्याने, सावरकर यांनी त्यांची सारी शक्‍ती ही सामाजिक समतेच्या पायावर हिंदू संघटना उभी करण्याकडे लावली. साहजिकच, अस्पृश्यतेचा समूळ नायनाट करणे हे त्यांच्या चळवळीचे प्रमुख ध्येय ठरले. महात्मा गांधी हेदेखील खिलाफत चळवळ ओंफस झाल्यापासून येरवड्याच्या कारागृहातच होते; सरकारने त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचीदेखील मुक्तता केली. सावरकर यांच्यापाठोपाठ महात्माजींनीदेखील सुटकेनंतर अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला आरंभ केला. आंबेडकर यांनी त्याच वर्षाच्या जुलै महिन्यात अस्पृश्य वर्गाच्या सामाजिक आणि राजकीय अडचणी सरकारपुढे मांडण्यासाठी एक मध्यवर्ती मंडळ असावे या उद्देशाने अस्पृश्य समाजातील कार्यकर्ते व समाजसेवक यांची सभा बोलावली आणि सभेमधील ठरावानुसार बहिष्कृत हितकारिणी सभाया संस्थेचा जन्म झाला. थोडक्यात गांधीजी, सावरकर अणि आंबेडकर हे तीन दिग्गज अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी एकाच वेळी सिद्ध झाले होते!

अस्पृश्यतानिवारणाबाबतची गांधीजींची भूमिका ही तथाकथित स्पृश्य हिंदूंच्या अंतःकरणामधील सद्भावना आणि भूतदया जागी करून, चातुर्वर्ण्याची व्यवस्था न मोडता अस्पृश्यांना पंचमवर्ण म्हणून समाजामध्ये स्थान द्यावे अशी होती, तर सावरकर यांना समता आणि संघटना यांच्या पायावर जातिविहीन हिंदू समाज निर्माण करायचा होता आणि त्यांचे ध्येय या एकसंध हिंदू समाजावर अधिष्ठित असे सामर्थ्यशाली हिंदू राष्ट्र उभारण्याचे होते. म्हणजे गांधीजींची अस्पृश्यतानिवारणाची कल्पना ही भूतदयेने प्रेरित झालेली होती तर सावरकर यांच्या बाबतीत ती राजकीय उद्देशाने प्रेरित झालेली होती. त्या दोघांनी जो विचार मांडला होता तो पाहता अस्पृश्यतानिवारणाचा विचार त्यात सामाजिक दृष्ट्या केला गेलेला नव्हता या निष्कर्षाप्रत यावे लागते. आंबेडकर यांनी जन्मापासूनच अस्पृश्यतेच्या यमयातना भोगलेल्या होत्या. त्यामुळे त्यांची अस्पृश्यतानिवारणाची भूमिका अन्य दोघांपेक्षा मुळातच वेगळी होती. त्यांना स्पृश्य हिंदूंच्या भूतदयेचे दान नको होते. त्यांना हवे होते ते हक्क! त्यामुळेच त्यांनी आत्मोद्धारासाठी झगडत राहण्याचा संदेश अस्पृश्यांना सातत्याने दिला. गुलामाला गुलामीची जाणीव झाल्यानंतर त्याच्या ठायी बंडाची जी प्रवृत्ती निर्माण होते ती आंबेडकर यांना अस्पृश्यांकडून अपेक्षित होती. त्यामुळे गांधीजी जी भूतदया स्पृश्य हिंदूंकडून अस्पृश्यांसाठी अपेक्षा करत होते त्याची आंबेडकर यांना चीड होती. सावरकर यांना समतेच्या पायावर हिंदू राष्ट्र उभारायचे होते. त्यांची गरज ही प्रामुख्याने राजकीय स्वरूपाची होती. सावरकर यांच्या अनुयायांमध्ये सनातनी मंडळींचा भरणा असल्याने, त्या हिंदू राष्ट्रात अस्पृश्यांचे स्थान नेमके काय असणार हा प्रश्न महत्त्वाचा होता. आंबेडकर स्वतःचा उल्लेख प्रोटेस्टंट हिंदूअसा करत असत. त्यामुळे सावरकर यांच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र त्यांना पसंत पडणे अवघड होते.

गांधीजींनी स्पृश्य हिंदूंना केलेले आवाहन हे भूतदयेला प्रेरित करणारे होते, तर सावरकर यांचा भर हिंदूंची बुद्धी जागी करण्यावर होता. आणि आंबेडकर यांनी अस्पृश्यांचा आत्मविश्वास जागा करण्याचे व्रत घेतलेले होते. त्यामुळे या तीन महापुरुषांनी सुरू केलेल्या अस्पृश्यतानिवारण चळवळीची तोंडे तीन दिशांना होती. अस्पृश्यतानिवारण हे समान उद्दिष्ट असूनही ती मंडळी कधी एका व्यासपीठावर आली नाहीत, ना त्यांनी कधी कोठला समान कार्यक्रम राबवला. आंबेडकर यांचे नेतृत्व प्रस्थापित झाल्यानंतर गांधीजींचा ते अस्पृश्यांसहित सर्वांचे नेते आहेत हा जो अट्टाहास होता तो कमी झाला. साम्राज्यशाहीने त्याचा फायदा घेत गोलमेज परिषदेत सर्वांच्याच तोंडाला पाने पुसली. पुढे तर, गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामधील संघर्ष अधिकच तीव्र होत गेला. गांधीजींच्या अस्पृश्यांना हरिजनया नावाने संबोधण्यासदेखील हरकत घेतली गेली. शेवटी, अस्पृश्यतानिवारण हा काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणून उरला.

सावरकर यांच्या कार्यात आंबेडकर यांच्याशी तसा काही संघर्ष झाल्याचे आढळत नाही. सावरकर यांनी आंबेडकर यांच्या कार्याला पाठिंबा देत त्यांना रत्नागिरीस येण्याचे आमंत्रण अनेक वेळा दिले. परंतु तो योग आला नाही. अस्पृश्यांची शिक्षण परिषद मालवण येथे 1929 मध्ये भरली होती. आंबेडकर नियोजित अध्यक्ष होते. पण त्यांना मुंबईमधील गिरणी कामगार संपामुळे मालवणला जाणे अशक्य झाले. त्या वेळी संयोजकांनी सावरकर यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली, ती सावरकर यांनी मानली. ते त्यांच्या भाषणात म्हणाले, ‘‘मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो आहे. त्यापेक्षा महार कुळात जन्मास आलो असतो, तर ब्राह्मणाच्या अहंकारापासून परमेश्वराने दूर ठेवल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले असते. सावरकर यांनी त्यानंतर नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला पाठिंबा एक पत्रक काढून व्यक्‍त केला होता. सावरकर यांनी त्या वेळी ‘‘मी जर आज मोकळा असतो तर नाशिकच्या सत्याग्रहात भाग घेऊन इतरांच्या आधी तुरुंगात गेलो असतोअसे उद्गार एका प्रकट सभेत काढले होते.

सावरकर यांनी आंबेडकर यांना रत्नागिरीच्या भागोजी कीर यांच्या पतितपावन मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी निमंत्रण धाडले होते. पण आंबेडकर यांनी आधी ठरलेली कामे पाठीशी असल्याने ते निमंत्रण स्वीकारता येत नसल्याचा खेद व्यक्त करून सावरकर यांना लिहिले – सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात, त्या विषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे. अस्पृश्य वर्ग हा जर हिंदू समाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल, तर अस्पृश्यता नुसती जाऊन भागणार नाही. चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे. ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे, त्यांपैकी तुम्ही एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो.त्यानंतरच्या काळात सावरकर यांनी अस्पृश्यता निवारक परिषद, सोमवंशी महार परिषद अशा कार्यक्रमांना अध्यक्ष म्हणून उपस्थिती लावली. सारांश, गांधी-आंबेडकर असा एक द्वंद समास हिंदुस्थानच्या राजकारणात आणि समाजकारणात कायम अस्तित्वात होता, तशी अवस्था सावरकर-आंबेडकर यांच्याबाबत नव्हती. सावरकर यांनी त्यांची बिनशर्त मुक्तता झाल्यानंतर, 1937 साली हिंदू महासभेचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर मात्र सावरकर यांचे सारे राजकारणच पालटले. धर्मांतराच्या प्रश्नावरून आंबेडकर आणि सावरकर यांच्यामध्ये वाददेखील झाले, तो इतिहास प्रसिद्धच आहे. धनंजय कीर यांनी महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांची चरित्रे लिहिली आहेत. त्यांनी त्यांच्या आंबेडकर चरित्रात अस्पृश्यता निवारण चळवळीच्या कार्याचे मूल्यमापन करताना आईच्या नि दाईच्या प्रेमात जे अंतर असते तेच आंबेडकर व गांधी किंवा सावरकर यांच्या कार्यात होतेअसे विधान केलेले आहे.

अनेक लेखकांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्या विषयावर विपुल लेखन केले. आंबेडकर हे अस्पृश्यतानिवारणाचे महानायक ठरल्याने बाकी साऱ्या जणांचे त्या बाबतीतील कार्य आपोआपच अडगळीत गेले. गांधीजींच्या अनेक गोष्टींप्रमाणे अस्पृश्यतानिवारण हेदेखील त्यांचे फॅडमानले गेले. खुद्द अस्पृश्यांची गांधीजींबद्दलची भावना पुणे करारापासून कडवट झालेली होती. त्याचे प्रत्यंतर तत्संबंधीच्या साऱ्या लेखनातून येत होते. सावरकर हिंदू महासभेत गेल्यावर त्यांची गणना सनातनी मंडळींमध्ये होऊ लागली आणि अस्पृश्य व सावरकर यांमधील दरी अधिकच रुंद होत गेली.

इतिहास निःसंग असतो, अज्ञातामध्ये दडलेले एखादे असे सत्य सप्रमाण समोर येते, की त्याने भल्याभल्यांची मती गुंग होते. सोलापूर मार्शल लॉहा माझा अभ्यासविषय. मी त्या संदर्भात धांडोळा घेत असतो. त्या अभ्यासात माझ्या हाती असे काही संदर्भ लागले, की सावरकर यांनी अस्पृश्यतानिवारणाचा जो कार्यक्रम आरंभलेला होता, त्यामधून घडलेल्या कार्यकर्त्यांचे सहाय्य आंबेडकर यांना जीवितकार्यास सुरुवात करताना लाभले! तेवढेच नाही तर त्या पायावर त्यांचा पुढील भक्कम डोलारा उभा राहिला आणि तो केवळ योगायोग नव्हता, तर पुढे एक दशकाहून जास्त काळ त्यात नवनव्या प्रकल्पांची भर पडत गेली. त्यामधील काही संस्था अस्तित्वात आहेत. आंबेडकर यांच्या चरित्रामध्ये त्या संस्थांचा उल्लेख आला आहे. पण त्यामागील गौप्य शोधण्याचा प्रयत्न कोणत्याही लेखकाने केलेला नाही. किंबहुना त्यामागे काही गौप्य असेल असे त्यांना वाटण्याची शक्‍यताही नव्हती. आंबेडकर-सावरकर तसा काही संबंध असेल असे वर वर वाटतच नाही. त्याचे आकर्षण पारतंत्र्याचा काळ असल्याने व घटना काँग्रेसविरोधी गोटात घडत असल्याने त्या काळच्या सत्याग्रहींनादेखील वाटले नाही. त्यामुळे आंबेडकर यांना जीवितकार्यास आरंभ करताना सावरकर यांच्या अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीची मोठी मदत झाली हे विधान प्रथमदर्शनी विचित्र वाटले तरी सत्य आहे.

बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेत सवर्ण हिंदूंचा समावेश का केला याचा खुलासा सभेच्या प्रथम वार्षिक प्रतिवृत्तात दिला आहे. तो असा – ‘‘ज्या वर्गाच्या सुधारणेसाठी संस्था स्थापन करावयाच्या त्या वर्गाचे किंवा तशाच परिस्थितीने गांजलेल्या लोकांचे कार्यकर्ते संस्थेत असल्याखेरीज संस्थेचे ध्येय व हेतू फलित होणे शक्‍य नाही. हे मान्य असले तरी ज्यांनी ही संस्था स्थापन केली आहे त्यांना पक्के माहीत आहे, की वरिष्ठ वर्गातील सधन आणि सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांचे सहाय्य असल्याखेरीज अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीच्या अवाढव्य कार्यक्रमाची सिद्धी होणे केव्हाच शक्‍य नाही.संस्था केवळ अस्पृश्यांची न ठेवता त्यामध्ये सवर्ण हिंदूंचे सहाय्य घेण्याविषयीचा आंबेडकर यांचा दृष्टिकोन असा स्पष्ट होता. सभेचे ध्येय व उद्देश यांपैकी पहिला उद्देश हा विद्यार्थी वसतिगृहाद्वारे अगर अन्य साधनांच्या द्वारे बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे हा होता. सभेने त्यानुसार अस्पृश्य मुलांच्या राहण्याची, खाण्याची व शिक्षणाची सोय करण्यासाठी वसतिगृहे चालवण्यास प्रारंभ केला.

सभेने पहिले वसतिगृह सोलापूर येथे 1925 सालच्या जानेवारी महिन्यात सुरू केले. त्याचे पर्यवेक्षक म्हणून सोलापूर नगरपालिकेचे सभासद जीवाप्पा सुभाना कांबळी यांना नेमण्यात आले. सभेच्या कार्यात शंकर सायन्ना परशा आणि सोलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. वि.वा. मुळे ह्यांनी अतिशय सहाय्य केलेअशी नोंद धनंजय कीर यांनी आंबेडकर चरित्रात केलेली आहे. आंबेडकर यांनी त्यांच्या कार्याचा आरंभ सोलापूरमधून केला. त्यावेळी सोलापूर नगरपालिकेचे अध्यक्ष रावबहादूर डॉ.वि.वा. मुळे हे होते. मुळे हे सोलापूर नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष! ते नगरपालिकेचे अध्यक्ष एकंदर तीन वेळा – 1923 ते 1930, 1931 ते 1933 व 1936 ते 1938 असे होते. मुळे यांच्यावर केळकर पंथीयांचा, पर्यायाने सावरकर यांचा मोठा प्रभाव होता. केळकर गटाने गांधींजींच्या चळवळीला धड पाठिंबा द्यायचा नाही आणि विरोधही करायचा नाही अशी विचित्र भूमिका स्वीकारलेली असल्याने सोलापूरातील स्थानिक काँग्रेसची जी मंडळी होती त्यांचे व मुळे यांचे फारसे सख्य नव्हते. रावबहादूर असल्याने सरकार पक्षाशी असणारी मुळे यांची जवळीक गांधीजींना मानणाऱ्या काँग्रेसमधील मंडळींना न पटणारी होती. मुळे यांनी सोलापुरात अनेक नव्या गोष्टींचा प्रारंभ केलेला असल्याने सामान्य जनतेत मात्र ते लोकप्रिय होते. सावरकर यांच्या प्रेरणेने मुळे अस्पृश्यतानिवारण कार्याकडे वळले होते. आंबेडकर यांचा काँग्रेसला असलेला विरोध आणि सरकार पक्षाबरोबरची जवळीक या दोन बाबींचा सांधा जुळला व मुळे यांनी अस्पृश्यता निवारणाचे काम मिशनम्हणून स्वीकारले.

आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा विसर्जित 1928 साली केली व भारतीय बहिष्कृत’, ‘समाज शिक्षण प्रसारक मंडळआणिभारतीय समाज शिक्षण प्रसारक मंडळया संस्था स्थापन केल्या आणि जून महिन्यात अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूर व बेळगाव येथे वसतिगृहे सुरू केली. सोलापूरचे वसतिगृह नव्या संस्थेच्या नावाखाली नव्याने सुरू झाले. यावेळी सरकारने त्या कामासाठी काही ग्रँट मंजूर केली, परंतु कमी पडणारा पैसा स्थानिक संस्थांकडूनच खर्च केला जात होता.

सविनय कायदेभंगाची चळवळ 1930 साली देशात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. त्यावेळी सोलापूरातील वातावरणदेखील तापलेले होते. नगराध्यक्षपदी मुळे असताना 6 एप्रिल 1930 रोजी सोलापूर नगरपालिकेवर राष्ट्रीय झेंडा लावण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरले. तो झेंडा फडकावण्यासाठी पाहुणे म्हणून लक्ष्मण बळवंत तथा आण्णासाहेब भोपटकर यांना पाचारण केले गेले. भोपटकर यांनी निशाण फडकावल्यानंतर केलेल्या भाषणात सोलापूरकरांना उदाहरण दिले ते आयर्लंडचे क्रांतिकारक डी. व्हेलेरो यांचे! म्हणजे चळवळ गांधीजींची, निशाण फडकावण्यास आलेला पाहुणा केळकर-सावरकर पंथाचा आणि त्याने भाषण केले ते सशस्त्र क्रांतीचे उदाहरण देत! असा वेगळाच प्रकार सोलापूरकरांना पाहण्यास मिळाला. ल.ब. भोपटकर पुढे, हिंदू महासभेत गेले व त्यांनी सावरकर यांचे विधिज्ञ म्हणून काम पाहिले. सारांश, मुळे आणि सावरकर हे नाते अशा तऱ्हेचे होते.

बॅकवर्ड क्लास विद्यार्थिगृह

मी मुळे यांनी एक मिशन म्हणून अस्पृश्यतानिवारणाचे कार्य स्वीकारल्याचा उल्लेख यापूर्वी केलेला आहेच. मुळे यांनी सोलापूर जिल्हा डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशनल सोसायटी या नावाची संस्था 1932 साली स्थापन केली. ते स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष म्हणून पापय्या बाबाजी यांना नेमले गेले. त्या संस्थेची घटना वा अन्य सभासद कोण कोण होते याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. त्या संस्थेने बॅकवर्ड क्लास विद्यार्थिगृहनावाचे वसतिगृह 1932 सालच्या नोव्हेंबर महिन्यात गव्हर्नरसाहेब यांच्या हस्ते सुरू केले. त्याची एक शाखा 1936 साली मुलींच्यासाठी म्हणून सुरू करण्यात आली. बलुतंकार दया पवार यांच्या पत्नी हिरा कसबे-पवार यांनी त्याच वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. त्यांनी त्यांच्या सांगायची गोष्ट म्हणजेया आत्मचरित्रात त्या वसतिगृहाचा व मुळे यांचा उल्लेख केलेला आहे. मुळे यांनी सुरू केलेली ती दोन्ही वसतिगृहे चालू आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकर यांनी सोलापूरला भेट त्यानंतर, 1938 साली दिली, सोलापूर नगरपालिकेने त्यांना मानपत्र 4 जानेवारी 1938 रोजी भागवत चित्रमंदिरात दिले. नगरपालिकेचे अध्यक्ष मुळे हेच होते. त्यांनी मानपत्राचे वाचन केले व ते आंबेडकर यांना अर्पण केले. आंबेडकर यांनी त्या मानपत्रास जे उत्तर दिले त्यामध्ये संसदीय लोकशाहीचे कार्यया विषयाचे विवेचन केले आहे. ते गांधीजींवर टीका करताना म्हणाले, मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी, की हिंदी लोक परंपरेने बुद्धिवादी नसून श्रद्धाळू वृत्तीचे आहेत. जो सर्वसामान्य माणसाहून विक्षिप्तपणे वागतो आणि जो त्या विक्षिप्त वागण्यामुळे इतर देशांत पागल ठरेल तो ह्या देशात महात्मा किंवा योगी ठरतो. आणि धनगराच्या पाठीमागून जशी मेंढरे जातात तसे लोक त्याच्या पाठीमागून जाऊ लागतात.

आंबेडकर आणि मुळे यांचे सख्य सरकारपक्षासाठी जवळीक आणि काँग्रेसला विरोध या दोन गोष्टींमुळे जुळले असे विधान मी यापूर्वी केलेले आहे. आंबेडकर यांनी त्या गोष्टीची कबुलीच भाषणाच्या समारोपात दिलेली आढळते. ते म्हणाले, “ज्याच्या जवळ ऐकण्यासारखे काही आहे त्याचे बोलणे लोकशाहीने सन्मानपूर्वक ऐकले पाहिजे. सोलापूर नगरपालिकेने मला मानपत्र देऊन एक मोठा नवा पायंडा पाडला आहे. कारण सर्व लोकांनी ज्या पक्षाला उचलून धरले आहे व जो आपणास एकमेव राजकीय पक्ष समजतो त्या पक्षाचा मी सभासद नसताना सोलापूर नगरपालिकेने मला मानपत्र दिले याविषयी मला आनंद होत आहे.ते कार्य एक दशकाहून जास्त काळ सोलापूरात चाललेले होते. पण मुळे रावबहादूरअसल्याने स्थानिक काँग्रेसच्या दृष्टीने ते साम्राज्यशाहीचे हस्तक ठरले होते, त्यामुळे अस्पृश्यतानिवारणाचे एवढे मोठे कार्य सोलापूरात चाललेले असतानादेखील काँग्रेसच्या मंडळींनी त्याची काडीमात्र दखल घेतली नाही. मुळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निशाण फडकावण्याचा कार्यक्रम झाला. मात्र मुळे यांनी त्यापुढील कायदेभंगाच्या चळवळीत केळकर गटाच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार तटस्थ धोरण स्वीकारले. त्या पाठोपाठ सोलापूरात मार्शल लॉचे महाभारत घडले. त्या काळात गव्हर्नर महोदयांनी सोलापूरला भेट दिली. प्रथेप्रमाणे सारे रावबहादूर, खानबहादूर, रावसाहेब गव्हर्नरांच्या भेटीसाठी उपस्थित राहिले. त्यामध्ये मुळेदेखील होते. त्यामुळे त्यांची गणना सरकारी चहाडखोरांबरोबर झाली. त्या पुढील काळात त्यांची प्रतिमा काँग्रेसकडून राष्ट्रीय चळवळीचे विरोधक अशी सातत्याने रंगवली गेली. मुळे यांचा राजकीय प्रवासदेखील त्या पुढील काळात अन्य सावरकरी अनुयायांप्रमाणे हिंदू महासभेकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असा झाला. त्यामुळे अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्यामधील त्यांचे श्रेय अक्षरशः अज्ञातात गेले; त्यांनी उभारलेल्या संस्था मात्र टिकून राहिल्या आहेत.

आंबेडकर यांनी सोलापूरला भेट 1946 साली पुन्हा एकदा दिली. त्यावेळी नगरपालिका आणि लोकल बोर्ड ह्यांनी त्यांना (16 जानेवारी) मानपत्र दिले. आंबेडकर यांनी त्या संस्थांनी अस्पृश्य वर्गाच्या उद्धाराचे चांगले कार्य केल्याविषयी त्यांचे आभार मानले. त्यांनी त्यांच्या त्या भाषणात मुळे यांच्या सहकार्याने मी वीस वर्षांपूर्वी सार्वजनिक कार्यास आरंभ केलाअसा स्पष्ट आणि भावनापूर्ण उल्लेख केला. धनंजय कीर यांनी त्यांच्या आंबेडकर चरित्रामध्ये या घटनांचा उल्लेख केलेला आहे. पण त्यांनी मुळे यांच्या प्रेरणा काय होत्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा त्यांनी मुळे यांच्याकडून पुढे जे काही कार्य झाले, ‘सोलापूर जिल्हा डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशनल सोसायटीसारखी नवी संस्था या मंथनातून निर्माण झाली याचादेखील उल्लेख केलेला नाही. कदाचित ती माहिती त्यांना उपलब्ध झालेली नसावी; अन्यथा सावरकर आणि आंबेडकर या दोघांची चरित्रे लिहित असताना त्यामध्ये असणारी संगती त्यांच्या लक्षात आली असती, अर्थात त्यामुळे त्यांच्या लेखनाचे मोल कमी होत नाही. एकाच लेखकाला एका वेळी सर्वच बाबी ज्ञात असाव्यात अशी अपेक्षा करणे चुकीचे असते, कारण इतिहासाची मौज अशी असते, की बर्‍याच वेळा दोन घटनांमधील संगती अत्यंत दीर्घ काळानंतर लक्षात येते.

कोणतेही इतिहासलेखन हे अंतिम कधीच नसते, नित्य नवे पुरावे जसजसे समोर येत जातात. तसतसा इतिहासात- त्याच्या लेखनात बदल करावा लागतो. केवळ सावरकरांचे हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्रयावरून त्यांना प्रतिगामी ठरवणाऱ्यांसाठी आणि पुरोगामित्वाचा वसा केवळ आपणाकडे आहे अशांचा भ्रम दूर करण्यासाठी सावरकर यांच्या अस्पृश्यतानिवारण चळवळीचा हा पुरावा म्हणजे एक लखलखते सोनेरी पान आहे. ते आजवर अज्ञातात होते. सावरकर-आंबेडकर असा काही बंध होता याची खात्री पटवणारे हे पुरावे पाहिल्यानंतर इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज वाटू लागते.

(किस्त्रीम’, दिवाळी 2016 वरून उद्धृत, संस्कारित)

– अनिरुद्ध बिडवे (02182) 220430, 9423333912 bidweanirudha@gmail.com

‘अनुप्रभा’, 1873, महेन्द्रनगर करमाळा, (सोलापूर) 413203

अनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम, एम ए, एलएल बी असे शिक्षण घेतले आहे. ते एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत दोनशेहून अधिक इतिहासविषयक लेखांचे लेखन केले आहे. त्यांची बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख ही पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच, ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोधसोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

———————————————————————————————————————

About Post Author

5 COMMENTS

  1. छान अभ्यासपूर्ण लेख.सामान्यांच्या सहज लक्षात न येणारी संगती. धन्यवाद.

  2. अत्यंत तळमळीने लिहिलेला,संशोधन कसे असावे याचा उत्कृष्ट वस्तुपाठ म्हणजे हा लेख!लेखक अनिरुद्ध यांचे हार्दिक अभिनंदन!💐

  3. उत्कृष्ट लेखन , इतिहासाचा गाढा अभ्यास.अतिशय चांगली माहिती वाचावयास मिळाली. धन्यवाद अनिरुद्ध बिडवे.धन्यवाद थिंक महाराष्ट्र.सुनंदा प्रदिप आडसूळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version