सिन्‍नरचा डुबेरे गड

_Dubere_Gad.jpg

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील डुबेरे गडाची प्रसिद्धी भारत देशात सर्वदूर झालेली आहे. सिन्नर शहरापासून दहा किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या डुबेरे गावातदेखील नावाजलेल्या डोंगराच्या कथेत बरेच काही सांगण्यासारखे आहे.

ही डोंगरकथा दोनशे वर्षांपूर्वीची आहे. डुबेरे हे गाव त्याच नावाच्या गडाच्या पायथ्याशी वसलेले होते. तेथे वेगवेगळ्या समाजाच्या व्यक्ती राहत होत्या. डोंगरावर अशपीर नावाचे पीरबाबाचे स्थान होते, तेव्हा त्याला अशपीर गड असे म्हणत. परंतु ती देवी सप्तशृंगी माता (वणी) गडावरील आहे. वणी गडाच्या देवीचे जे मंदिर आहे तेथील कडा तुटल्यामुळे त्या देवीने डुबेरे गावातील गोपाळा कबीर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. तेव्हा गोपाळा कबीर व गावातील काही व्यक्ती त्या डोंगरावर गेले आणि त्या देवीस शोधू लागले. त्यांना एका ठिकाणी एका दगडावर हळदीकुंकू दिसले. गावातील स्त्रिया आणि पुरूष यांनी त्यांच्या कपाळाला कुंकू लावले, परंतु ते कधीच संपले नाही, आहे तेवढेच राहते, त्यात काहीच कमी होत नव्हते. म्हणून त्या ठिकाणी देवीचे मंदिर बांधण्याचे गावकर्‍यांनी ठरवले व देवीचे मंदिर बांधले. तेथेच काही अंतरावर एक तळे आहे. त्या देवीची यथासांग पद्धतीने पूजा केली गेली व तिची स्थापना त्या डोंगरावर झाली. त्या अंधभक्तीने भरलेल्या काळात अशपीर गड या नावाचे रूपांतर डुबेरे गड असे झाले. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीतील सर्व लोक त्या देवीची पूजा करतात. नवरात्र उत्सवात देवीची यात्रा भरवली जाते. देवीला मानपानदेखील दिला जातो.

डुबेरे हे पहिले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ आहे. ते जेथे होते तेथील लोकांनी त्यांची वस्ती वाड्याच्या जवळपास स्थलांतरित केली. डोंगराच्या पायथ्याशी स्वामी जनार्दन यांचे सुंदर व भव्य असे मंदिर बांधलेले आहे. डोंगरावर जाण्यासाठी पायर्‍या बांधल्या आहेत. डोंगराला पाचशे पायर्‍या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी दाट अशी झाडी आहे. पावसाळ्यात तेथील वातावरण तर अगदी बहरून निघते. दूरवर सर्वत्र हिरवे – हिरवे रान दिसते.

– जयश्री दिनकर भागवत

(मूळ लेखन ‘लोकपंरपरेचे सिन्नर’ या पुस्तकातून)

About Post Author

3 COMMENTS

  1. मला अभिमान वाटतो कि माझ्या…
    मला अभिमान वाटतो कि माझ्या डुबेरे गावाचे नाव इतिहासाच्या पानावर आहे…..

  2. डुबेरे गावाला इतिहास आहे,पण…
    डुबेरे गावाला इतिहास आहे,पण तो जपण्यासाठी विशेष कोणाचं सहकार्य लाभत नाही….

  3. अशीच आपल्या सिन्नर, नाशिक ची…
    अशीच आपल्या सिन्नर, नाशिक ची ऐतिहासिक माहिती साठी सपंर्क साधा
    7410775285

Comments are closed.