सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग

1
352

सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत. सिनेमा बनवण्यामागील प्रेरणा स्पष्ट करताना सुमित्रा भावे एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, की “लोकांना कुणी शिकवलेलं आवडत नाही. त्यामुळे आम्ही प्रेक्षकाला शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही. आम्ही स्वत: चित्रपट जीवनाचा शोध घेण्यासाठी बनवावेत या मताचे आहोत. त्यातून प्रेक्षकांनाही अनुभव मिळतील, त्यांच्या दृष्टिकोनाच्या कक्षा विस्तारतील अशी आमची श्रद्धा आहे. कथा जगण्याच्या जवळ जाणारी आणि चित्रण वास्तव असले, की माणसाचे काळीज हलते. त्यांना त्यांच्या स्वत:च्या जगण्याकडे बघण्यासाठी आधार मिळतो, हे चित्रपट दाखवण्याच्या पहिल्या अनुभवामधून आम्हाला पक्के समजले आहे.”

त्यांनी सिनेनिर्मितीमागील हा धागा शेवटपर्यंत सोडला नाही. त्यांचा प्रत्येक सिनेमा समाजातील विशिष्ट प्रश्नावर बोट ठेवतो. त्यांचा सिनेमा अंध, मतिमंद, मूकबधिर, बालकामगार, बालसुधारगृह, रात्रशाळा, दत्तक मुले, बाललैंगिक अत्याचारग्रस्त मुले- मुलांचा सुधारगृहाचा अनुभव, नेत्रदान, थॅलिसिमिया, एड्स, आदिवासींचे विस्थापन, जंगल अधिकार अशा विविध विषयांवर व समस्यांवर बोलतो; बऱ्याचदा, पुढील मार्गाकडेही अंगुलीनिर्देश करतो.

‘दहावी फ’ हा सिनेमा परिवर्तनाचा मार्ग हिंसा नव्हे तर शिक्षण हाच आहे हे सांगतो. ‘संहिता’ मानवी आयुष्य त्याचे त्याने घडवण्यास हवे असे सांगतो. ‘दिठी’ मृत्यूच्या गर्भात असे नवसृजनाचा आविष्कार हे मांडतो. ‘दोघी’ मध्यमवर्गीय नीती-अनीतीच्या संकल्पनांवर क्ष-किरण टाकतो. ‘अस्तु’ विस्मरणाचा त्रास असलेला बाप आणि त्याच्या मुलींच्या अनेकपदरी नात्यावर भाष्य करतो. ‘वास्तुपुरुष’ हा ग्रामीण सरंजामी जीवनाचे ताणेबाणे दाखवतो. ‘एक कप च्या’ हा माहितीचा अधिकार कायद्याची ओळख हसतखेळत, कथेच्या ओघात करून देतो; तसेच, ‘मन की आंखे’, ‘फिर जिंदगी’, ‘बेवक्त बारीश’ असे सारे लघुपट, चित्रपट समाजावर भाष्य करत करत माणसांतील माणूसपण शोधत राहतात. त्यांच्या प्रत्येक सिनेमात नातेसंबंध, मानवी कोलाहल, अस्वस्थता, अस्थिरता या गोष्टी केंद्रस्थानी आहेत.

सुमित्रा भावे यांचे सजग समाजभान त्यांच्या सिनेमात डोकावते. त्यांनी समाजसेविका म्हणून पाहिलेले तळागाळातील लोकांचे जीवन, ग्रामीण जीवनातील ताणेबाणे, त्यांची सुखदुःखाच्या प्रसंगी व्यक्त होण्याची तऱ्हा सुमित्रा यांनी संवेदनशील मनाने टिपलेली असते आणि ती सिनेमात योग्य ठिकाणी योग्य प्रकारे चितारलेली असते. अन्यथा, मुलाच्या मृत्यूने विदीर्ण झालेला आणि त्याच वेळी निर्मितीच्या वेणांनी शांत झालेला ‘दिठी’मधील रामजी रसरशीतपणे पडद्यावर उमटलाच नसता. ‘अस्तु’मधील चन्नम्मा, स्वतःचे घर विसरून तिच्या पालावर येऊन राहिलेल्या अप्पांची सेवा मनापासून करते. त्यामुळे अप्पा त्याच्या मुलांसोबत घरी जाऊ लागतो तेव्हा अप्पाने चन्नम्माला नमस्कार करण्याऐवजी चन्नम्माच त्याच्या पायावर डोके ठेवते. मानसिक रीत्या आजारी असलेल्या पाहुण्यात देव पाहणाऱ्या चन्नम्माच्या मनोभूमिकेत शिरल्याशिवाय आणि त्या समाजाच्या रूढी, चाली, श्रद्धा यांचा अभ्यास असल्याशिवाय तो सीन सुचूच शकत नाही. प्रत्येकीला मळलेली वाट खुलेआम नाकारता येत नाही, चाकोरी थेट मोडता येत नाही, तशा प्रसंगी ‘चाकोरी’ सिनेमातील सीता लपवाछपवी करून, तिची निर्भरशील आत्मसन्मानाची नवी वाट शोधण्यासाठी काळोखाशी झुंज सुरूच ठेवते. सुमित्रा यांच्या प्रत्येक सिनेमात असे कित्येक सीन आहेत की ज्यातून त्यांचे समाजभान प्रकर्षाने लक्षात आल्यावाचून राहत नाही.

सुमित्रा यांचा सिनेमा- त्यातील प्रसंग, त्यातील संवाद हे तरल कविता किंवा ललित लेख यांच्याप्रमाणे पडद्यावर साकार होतात. डोळ्यांतून अश्रूंचा आख्खा समुद्र वाहून गेला आहे, डोळे कोरडेठाक पडले आहेत, चेहरा सुखाच्या अपार अशक्यतेने पार सुकून गेलेला आहे. हा सगळा शारीरिक, मानसिक गळाठलेपणा एका वाक्यात मांडताना ‘दिठी’मध्ये एक काव्यमय वाक्य येते- ‘तो संडून गेला आणि तुझ्या देहाची रिकामी पिशवी झाली.’ ‘दोघी’मधील एका प्रसंगात नि:शब्दतेतून सोनाली कुलकर्णी आणि रेणुका दफ्तरदार या अगदी तरलतेने एकमेकींशी (आणि प्रेक्षकांशी) जे बोलल्या आहेत, तो केवळ एक प्रसंग त्या सिनेमाला काहीच्या काही उंची मिळवून देतो !

‘दिठी’मध्ये किशोर कदम गाईचे बाळंतपण करताना, गाईच्या वेदनेशी तादात्म्य पावतो, त्याचा तिच्याशी संवाद सुरू होतो. तिच्या वेदना त्याच्या वेदना होतात, प्रेक्षकाला गाईचे हंबरणे ऐकू येते आणि वेदनेने भरलेला रामजीचा चेहरा दिसत राहतो. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर गाईच्या नव्हे तर स्वतःच्याच सुखरूप प्रसूतीची आस दिसते आणि गाईचे बाळंतपण सुखरूप झाल्यावर, पोथी सुरू केल्यावर, त्याला त्याच्या गेलेल्या मुलाची सय येते. जन्म-मृत्यू, सृजन-निर्वाण, सुख-दु:ख अशा टोकाच्या भावनांच्या सरमिसळतेची अगतिकता जाणून, त्याला हंबरडा फोडून रडू येते, तेव्हा ती पडद्यावरील करुण कविताच भासते !

सुमित्रा भावे यांच्या सिनेमात ठोस विचार आहे. प्रत्येक सिनेमात किमान एक थेट संदेश आहे. अप्रत्यक्ष दिलेले संदेश तर पावलोपावली विखुरलेले आहेत ! त्यांच्या ‘दोघी’पासून ते ‘कासव’ किंवा ‘वेलकम होम’पर्यंत सगळ्या सिनेमांचा लसावि काढला तर तो असेल ‘समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जा, त्यावर मात करण्यास शिका.’ ‘दिठी’मध्ये मृत्यू ही संकल्पना सगळ्या घटनाक्रमाच्या केंद्रस्थानी असली तरी त्यातही शेवटी, जीवनातून मृत्यू आणि मृत्यूतून जीवन हे जीवनचक्र अधोरेखित केले आहे. ‘दिठी’ या चित्रपटात म्हटले आहे, शत्रू आणि मित्र हे वेगवेगळे नाहीतच. ते दोन्ही माणसाच्या मनात असतात. ‘वेलकम होम’ मधील सौदामिनी (मृणाल कुलकर्णी) आणि तिचे वडील रिटायर्ड कलेक्टर (मोहन आगाशे), यांच्यातील संवादात वडील त्यांच्या लेकीला सांगतात, की त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक जीवनाचा परीघ वेगळा आणि घराबाहेरचा समाज-व्यवसाय यांचा परीघ वेगळा. सौदामिनीला वडिलांचे ते समर्थन पटत नाही. ती म्हणते, या परिघाचे स्वरूप वेगळे असेल; पण दोन्हीकडे मूल्ये तीच असण्यास हवीत. ती वेगवेगळी असून कशी चालतील? पुन्हा स्वकृतीचे समर्थन करताना वडील म्हणतात, की ‘‘वेगळी मूल्यं हा व्यवहार दुटप्पीपणाचा असेल. पण वर्षांनुवर्ष हेच चालत आलंय.’’ यावर सौदामिनी प्रश्न उपस्थित करते, की एखादी कृती पुन:पुन्हा केली की तिची प्रथा होते, त्याची परंपरा बनते आणि नंतर संस्कृती. मग ती कृती अन्याय्य हे जाणवते; तरीही ती सुरू ठेवणे हे चूकच नाही का?

त्यांच्या सिनेमात पदोपदी आशावाद डोकावत असतो, एका सिनेमात त्या म्हणतात, ‘‘मुळात कुणाही माणसाला चांगलंच वागण्याची इच्छा असते. त्या दिशेने त्याला आधार मिळाला, की कुणीही प्रामाणिक आणि चांगलाच वागतो. ‘अस्तु’द्वारे सुमित्रा स्मृतिभ्रंशासारख्या आजाराच्या विषयाला हात घालतात. आणि त्या आजाराच्या निमित्ताने ‘को ऽ हम’ या प्रश्नापर्यंत प्रेक्षकाला आणून ठेवतात. माणूस स्वत:चीच ओळख विसरला, तर त्याचे अस्तित्व उरते की नाही? ‘नितळ’ चित्रपटात नीरजा या अंगावर पांढरे डाग असलेल्या नायिकेलासुद्धा जाणीव होते, की तिच्या चेहऱ्यावरील पांढरे डाग हे निसर्गातील सुंदर रंगीबेरंगी पानांसारखे आहेत. ती स्वतःला हेही समजावते, की ‘सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असते. संस्कृतीने स्त्रीला सौंदर्याच्या संकल्पनेच्या तुरुंगात जे अडकावले आहे त्यातून तिला बाहेर पडायचे आहे अन् एक कुशल माणूस व्हायचे आहे, बस्स !

स्त्री आणि स्त्रीवादी दृष्टिकोन हा सुमित्रा यांच्या हरेक सिनेमाचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्या प्रत्येक सिनेमातील प्रत्येक स्त्री पात्र हे हाडामांसाचे जिवंत पात्र वाटते. त्या स्त्री पात्राच्या प्रत्येक वागण्या-बोलण्याला तार्किक अधिष्ठान असते. त्यांच्या सिनेमातील कोणतेही पात्र ब्लॅक अँड व्हाईट रंगात रंगवलेले नसते आणि ही बाब स्त्री पात्रांबाबतीत अधिक ठळक रीत्या जाणवते. त्यांच्या ‘बाई’ या पहिल्याच लघुपटातील आई तिच्या मुलाला सुनावते, ‘‘मेल्या, माझी लेक शिकंल. नापास झाली तरी काही बिघडत नाही. पुन्हा परीक्षा दील. पुरुष मानसं आईच्या पोटात नऊ महिने काढत्यात आन बाया काय पाच महिने, व्हय?’’ स्त्री सक्षमीकरण खेड्यापाड्यातही पोचले आहे, पोचावे हे अधोरेखित करणारा हा प्रसंग आहे. ‘नितळ’मधील नीना कुलकर्णी यांची काकू आणि दीपा श्रीराम यांची लाघवी आज्जी, या दोघींमधील सौम्य गोडवा काहीसा ‘लार्जर दॅन लाइफ’ वाटला तरी तो अवास्तव किंवा खोटा वाटत नाही. एकंदर, सिनेमाचा परिणाम टोकदार करण्यात त्या दोन स्त्रियांमधील संवाद मोलाची भूमिका बजावतो. नेहमी पिरपिर करणारी, करवादणारी वयस्क मंडळी बऱ्याच सिनेमांत दिसते; पण गरिबीत, आर्थिक हालअपेष्टांतही निखळ हसणारी ‘एक कप च्या’मधील म्हातारी (कमल देसाई) त्या गंभीर विषयावरील सिनेमाचा ‘टोन’ हलकाफुलका ‘सेट’ करते.

सुमित्रा यांच्या सिनेमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी माणसांचे शारीरिक, मानसिक आजार योग्य कथांच्या माध्यमातून लोकांसमोर पोचवले. त्या आजाराबाबतचे समज-गैरसमज, आजारी व्यक्तींचा मनोव्यापार आणि नातेवाईकांच्या बऱ्या-वाईट भावभावना या सगळ्यांचा उभा छेद घेऊन प्रेक्षकालाच त्याचे बरेवाईट कंगोरे तपासण्यास लावले. त्यांनी माणसांच्या मनात उभ्या ठाकणाऱ्या गुंतागुंतीचे सहजचित्रण ‘देवराई’ (स्किझोफ्रेनिया-छिन्नमनस्कता), ‘नितळ’ (सफेद डाग / कोड), ‘जिंदगी जिंदाबाद’ (एचआयव्ही- एड्स), ‘अस्तु’ (डिमेन्शिया-विस्मरण), ‘कासव’ (डिप्रेशन-नैराश्य) या सिनेमांतून केले आहे. त्या सिनेमांच्या ‘बॅलन्स्ड ‘हाताळणीतून त्या त्या आजाराचे गांभीर्य, त्याची कारणे-उपचार-परिणाम लोकांपर्यंत पोचतातच; पण त्याहीपलीकडे, माणसांमाणसांतील निखळ व गुंतागुंतीच्या नात्यांचा, जगण्यातील आशा-निराशेच्या खेळाचा आणि कधी माणूसपणाचा साक्षात्कार होत जातो. त्यामुळे ते सिनेमे निव्वळ एक रंजक कथापट किंवा डॉक्युमेंट्री न राहता मानवी समाजमनाचा आरसा होतात.

सामान्यतः आजार आणि आजारावरील सिनेमे हे निराश करणारे, वेदना देणारे, दु:ख-अश्रू देणारे असल्याने, सर्वसामान्य प्रेक्षक तशा सिनेमांपासून दूर राहणे पसंत करतो, पण टाळल्याने प्रश्न सुटत नाहीत, अधिक जटील होत जातात म्हणून त्या आजाराशी, त्या प्रश्नाशी भिडणे महत्त्वाचे. त्यामुळे ते प्रश्न सुटण्याची शक्यता निदान पन्नास टक्के तरी निर्माण होऊ शकते. आशेची ही रुपेरी कडा सुमित्रा यांच्या सर्व सिनेमांत पाहण्यास मिळते.

केवळ चार भिंती आणि वर छप्पर असल्यास घर होत नाही. घराला घरपण असावे लागते- घराला घराचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व असावे लागते. घरात राहणाऱ्या लोकांच्या एकमेकांशी असलेल्या नाते-संबंधाची सावली त्या घरावर पडलेली असते. त्या घरातील कुटुंबात घडलेल्या घटना, आनंद-दुःखाचे प्रसंग, आलेली संकंटे या सर्वांतून त्या घराचे व्यक्तिमत्त्व उभे राहते. ‘वास्तू’ नुसत्या श्रीमंताचे घर, मध्यमवर्गीयांचे घर किंवा गरिबाचे घर अशा ढोबळ वर्गवारीने ठरत नाहीत. कथेतील पात्रांचा व्यवसाय, जीवनशैली, विचारशैली, कथानकाच्या काळातील त्यांची संस्कृती हे सर्व त्या वास्तूत दिसते; किंबहुना, ते तसे दिसावे हा सुमित्रा यांचा अट्टाहास त्यांच्या सिनेमातील झोपडी, घर, वाडा, फ्लॅट किंवा इतर वास्तू यांच्या निवडीतून आणि चित्रिकरणातून दिसून येतो.

सुमित्रा यांचे घरासंबंधीचे हे विचार त्यांच्या सिनेमात येत राहतात. ‘वेलकम होम’मधील एका प्रसंगात सौदामिनी (मृणाल कुलकर्णी) स्वत:च्या घरात येऊन, त्या घराकडे बघून म्हणते, ‘‘हे घर म्हणजे काय फक्त यातल्या वस्तू आहेत का?’’ याउलट, ‘दोघी’ चित्रपटात थोरली बहीण गौरी (रेणुका दफ्तरदार) मुंबईच्या व्यस्त जगण्यातून परत गावच्या शांत वातावरणात येते आणि धाकटी बहीण कृष्णा हिला (सोनाली कुलकर्णी) म्हणते, की ‘‘आपल्या घरात, आपल्या माणसांत, किती बरं वाटतं, नाही?’’ ‘नितळ’मध्ये डॉ. नीरजा कौशिक (देविका दफ्तरदार) हिचे आयुष्य वसतिगृहामध्ये गेलेले आहे. ती तिच्या मित्राच्या घरी पाहुणी म्हणून आल्यावर ती त्याचे घर बघून, मोठे एकत्र कुटुंब बघून त्याला म्हणते, ‘‘हे कसं घर वाटतं आहे. नाही तर मी आपली नुसती खोल्यांमध्ये राहते.’’

सुमित्रा यांनी केवळ घर नव्हे तर सिनेमाचा पोत बघून त्यानुसार वाडेदेखील वैशिष्ट्यपूर्ण निवडलेले दिसतात. ‘दोघी’ सिनेमातील वाडा हा सधन शेतकऱ्याचा आहे त्यामुळे त्या वाड्यात धान्यधुन्य; तसेच, शेतीचे इतर सामान साठवण्याची सोय आहे. ‘वास्तुपुरुष’मधील वाडा हा इनामदारांचा आहे. तो भिंतीवर काढलेल्या पौराणिक चित्रांमुळे, मोठ्या देवघरांमुळे आणि मोठ्या नक्षीदार खिडक्यांमुळे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न दिसतो. सरकारी रुग्णालयात येणारी गरीब माणसे, त्यांचे काळजीग्रस्त चेहरे या सगळ्यांचे प्रतिबिंब ‘जिंदगी झिंदाबाद’मधील एड्स रुग्णांच्या ‘वॉर्ड’वर पडलेले दिसते. ‘दिठी’तील वाण्याच्या दुकानावर असलेला पोटमाळा, वाकून चालावे लागेल अशी त्याची अपुरी उंची हे सर्व कथानकाला पूरक नव्हे तर पुढे नेणारे आहे. ‘दहावी-फ’ मधील फोपडे उडालेली, फर्निचर तुटलेली शाळेची इमारत, त्या शाळेतील मुलांच्या निराशेचे, कष्टाचे आणि आकांक्षांचे चटके नेमकेपणाने पोचवण्याचे काम करते.

‘एक कप च्या’मधील कंडक्टरच्या मनात द्वंद्व सुरू असताना घेतलेला घाटातील शॉट, ‘कासव’मधील मासळी बाजार, तेथे चाललेले लिलाव किंवा ‘घो मला असला हवा’ मधील किनाऱ्यावरचा बाजार आणि छोट्या-छोट्या जहाजांचा धक्का, ‘अस्तु’मधील स्मृती गेलेल्या आणि हरवलेल्या आप्पांचे प्रसन्न चेहऱ्याने, नदीकाठी आभाळात उडणारी पाखरे बघणे, ‘दोघी’तील आईला ती तिच्या मुलीवर अन्याय केल्याची जाणीव होऊन देवळात जाऊन, रडवेली होऊन, एकटीच बसते. तेव्हा दिसणारी शेजारून चाललेली, जगण्याचा आटापिटा करणारी, मुंग्यांची रांग ही लोकेशन्सची निवड त्या त्या सीन्सच्या आणि सिनेमाच्या विषयाला ठसवण्यात मोलाचे योगदान देतात.

सुमित्रा यांच्या सिनेमात प्रतीके मुबलक पेरलेली असतात, पण त्यात प्रतीकात्मकता कोंबण्याचा प्रयत्न ओढूनताणून आणलेला नाही. त्यांचा सिनेमा प्रतीकांशिवायही कळतो, पोचतो, पण ती प्रतीके समजून घेतली तर त्या ‘कळण्या’ची धार अधिक तीक्ष्ण होते. ‘देवराई’त एक गूढ अनुभव आहे. तेथील झाडे एकेकटी, सुटीसुटी उभी नाहीत. सगळ्या झाडांची मुळे, फांद्या, वेली, जमिनीवर पडलेल्या सुक्या काटक्या, पालापाचोळा ही सर्व परिसंस्था एकमेकांत गुंतलेली आहे, परस्परांवर अवलंबून आहे. वाहत्या वाऱ्याने भित्र्या मनाला ‘देवराई’त भुताचा भास होतो, तर आशावादी मनाला मंजुळ शीळ ऐकू येते.

‘चाकोरी’ सिनेमातील नवऱ्याने टाकलेली सीता सायकल शिकण्याचे गुपचूप ठरवते. तिचे सायकल चालवणे ही एक कृती नाही आहे तर ती बंडखोरीची एक प्रतिमा आहे. एके दिवशी तिला अचानक सर्वांसमोर सायकल चालवावी लागते आणि सीता ती समोर ठेवलेल्या पुरुषी, दांडा असलेल्या सायकलवर साडी नेसलेल्या अवस्थेत पाय टाकत सर्वासमोर चालवते. तिच्या पायातील पैंजण गळून पडते ! चित्रपटाचा सारा आशय त्या एका प्रसंगातून ठसवलेला आहे.

‘देवराई’तील वेडसर शास्त्रज्ञाचा संबंध देवराईतील झाडांशी आहे, ‘अस्तु’मधील मानसिक आजाराने ग्रस्त असणारा संस्कृत विषयाचा निवृत्त प्राध्यापक याचा संबंध मामुली माहुताच्या तालावर खेळ करणाऱ्या बुद्धिमान, शक्तिमान हत्तींच्या प्रतीकाशी आहे. ‘कासव’मधील नैराश्याच्या गर्तेत अडकलेला तरुण मानव, ज्ञानेंद्रिये न वापरता आक्रसून घेणाऱ्या कासवाशी नाते सांगत आहे.

सुमित्रा यांच्या सिनेमातील, काही अगदीच नि:शब्द किंवा फार कमी संवाद असलेले प्रसंग कसे जिवंत होतात आणि थेट काळजाला भिडतात याची ही केवळ झलक! ‘दोघी’मधील दोन बहिणींचे खूप काळानंतर, सूर्यास्तानंतर संधिकाली भेटणे, एकमेकींशी आणि प्रेक्षकांशी बोलणे असलेला प्रसंग. त्या दोघी एकमेकींच्या डोळ्यांत पाहत राहतात. काहीतरी खूप महत्त्वाचे हरवलेले शोधत राहतात. सरल्या काळाच्या आठवणी, पुसट झालेल्या खुणा, विरह, प्रेम, मनाविरुद्ध वागताना झालेली घुसमट.

तसेच ‘देवराई’तील सीनाचा शेवटचा निघण्याचा सीन. ती गाडीत बसल्यावर वळून पाहते, तेव्हा हळदकुंकू लावलेल्या तिच्या चेहऱ्यावर दिसणारी वेदना प्रेक्षकांच्या काळजावर ओरखडा उमटवल्यावाचून राहत नाही. ‘दिठी’मध्ये गाईचे बाळंतपण करताना, गाईच्या वेदनेशी रामजीचे झालेले तादात्म्य, गाईचे बाळंतपण सुखरूप झाल्यावरची त्याची देहबोली… त्याचा चेहराच नव्हे तर शरीरावरील नस न् नस त्या वेदनांचा हुंकार बनते, सुटकेची अंगाई बनते.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीच्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा व त्यांच्या गोष्टी या, वास्तव जगण्यातील अनुभवांच्या मुशीतून आलेल्या आहेत. त्यांच्या सिनेमाला साहित्यिक मूल्य आहे. त्यांचा सिनेमा हा एक सुंदर पुस्तक वाचल्याचा अनुभव देतो. त्यांच्या सिनेमांत मानवी स्वभाव आणि नातेसंबंध यांची गुंतागुंत, व्यवस्थेतील प्रश्न, मृत्यू, मृत्यूचा मानवी मनावर पडणारा परिणाम इत्यादी बऱ्याच गडद संकल्पना यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रेक्षकाच्या मनावर दुःखाची काजळी काही काळ धरते. मात्र सिनेमाच्या शेवटाकडे मनात येणारी भावना आशादायी असते. तो आशावाद भाबडा नसून प्रॅक्टिकल असतो. त्यांचा सिनेमा मानवाच्या चांगुलपणाने, संवादाने प्रश्न सुटू शकतील; तो व्यवस्थेतील उणिवांवर मात करू शकेल असा विश्वास देत आला आहे. तो विचार ‘धिस टू शाल पास, कितीही नैराश्यपूर्ण काळ असला तरी, हेही दिवस जातील… काहीतरी चांगले घडेल, असा असतो.

व्यक्ती-व्यक्तीमधील संबंध, व्यक्ती आणि समाजातील संबंध, व्यक्तीचे तिच्या सभोवतालच्या परिसराशी, निसर्गाशी असलेले संबंध आणि व्यक्तीचा स्वतःच्या अंतरात्म्याशी असलेला संबंध असा चौफेर इहवादी अध्यात्माचा शोध सुमित्रा यांच्या सिनेमात घेतलेला असतो. काहीएक ठोस विचार, दिशा आणि प्रेरणा देण्यासाठी, सामाजिक बांधिलकी म्हणून सिनेमे बनवणाऱ्या सुमित्रा भावे हे एक वेगळेच रसायन होते !

सॅबी परेरा 9987872554 sabypereira@gmail.com

——————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. माहितीपूर्ण लेख.सुमित्रा भावे ह्यांचे सर्व सिनेमे पहिलेच पाहिजेत ही इच्छा हा लेख वाचल्यानंतर जागी होते.
    एका चांगल्या लेखाबद्दल अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here