सिंधी व मराठी या भाषांची तुलना

1
62
carasole

सिंधी भाषा ही मुसलमानी रियासतीत खेडवळ लोकांची भाषा म्हणून मानत. शहरातील सुशिक्षित सिंधी व उर्दू – फार्सीच्या संस्काराने, मिश्र झालेली भाषा बोलत. तो राजकीय सत्तेचा दुष्परिणाम मानला जातो. भाषा अभ्यासकांच्या मते, राजकीय भाषा शहरात प्रभाव करते. पत्रव्यवहार ‘आमील’ या सरकारी नोकरांनी फार्सी भाषाच वापरली. खेड्यातील जनता शुद्ध स्वरूपातील सिंधी बोलते. सिंधी भाषा मुसलमान राजवटीत अरेबिक लिपीत लिहिली जाई. त्यामुळेही ती भाषा समाजप्रवाहातून बाजूला पडली. असे असले तरी, सिंध आणि कोकणपट्टी यांच्यात दळणवळण होते व संपर्कामुळे अनेक सिंधी वळणाचे शब्द मराठीत आले. मध्यंतरी, सिंधी भाषेचे लिखाण देवनागरी लिपीत व्हावे या विचाराने सिंधीचे आणि मराठीचे संपर्क क्षेत्र विकसित झाले. त्यासंबंधी, संस्कृती व भाषाभ्यासक वि.वि. दीक्षित यांनी, हा लोकबंध स्पष्ट केला आहे. – संपादक

सिंध प्रांत अनेक दृष्टींनी हल्ली महत्त्वास चढत आहे. त्याची गणना मुंबई इलाख्यात जरी मागासलेला म्हणून असली तरी सक्करचे धरण, मोहंजोदरो येथे सापडलेले प्राचीन अवशेष व राजकीय वातावरण इत्यादी गोष्टींमुळे सर्व हिंदुस्थानाचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे. त्या प्रांताचे महत्त्व ऐतिहासिक दृष्ट्यासुद्धा कमी नाही. त्याचा उल्लेख ऋग्वेद, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथांत आढळतो. अलेक्झांडरने हिंदुस्थानच्या स्वारीत त्यातील पुष्कळसा भाग पाहिला होता. महंमद बिन कासिमने तो ब्राम्हण (शुद्र?) राजापासून सातव्या शतकात हस्तगत केला. इस्लामचे निशाण या देशात प्रथम त्याच वेळी रोवण्यात आले. पुढील सातशे-आठशे वर्षांचा इतिहास जवळजवळ लुप्तप्राय झाला आहे. पंधराशे ते सर चा. नेपियरने एकोणिसाव्या शतकात तो जिंकीपर्यंत, राजघराण्याची सुसंगत माहिती सापडते. जेत्या अरब लोकांनी मुसलमानी पेहराव व चालीरीती जित लोकांमध्ये प्रसृत केल्या; पण ते आरबी अगर फार्सी भाषा जनसमूहावर लादू शकले नाहीत. इतकेच नव्हे, तर इंग्रजी अंमलापूर्वी आरबी लिपीसुद्धा लोकांत चालू नव्हती. देवनागरीपासून निघालेल्या अशा आठ लिपी सर्व सिंधभर निरनिराळ्या भागात चालू होत्या. १८४० साली छापलेला सिंधी शब्दकोश देवनागरी लिपीत आहे! ती इंग्रजी अंमलात, सर्व प्रांतास कारभाराच्या सोयीसाठी एकच लिखाण अमलात आणण्याचे ठरून, अरबी लिपीत थोडाफार फेरफार करून, सर्व लोकांवर कायद्याने लादण्यात आली. तेव्हापासून बाकीचा सर्व हिंदुस्थान व सिंध यांमध्ये एक अभेद्य तट निर्माण झाला असून उभयंतांचा परस्परसंबंध – सांस्कृतिक संबंध – जवळजवळ खुंटल्यासारखा आहे. सिंधी व मराठी या सख्ख्या बहिणींसारख्या असून एकीला दुसरीची स्मृतीसुद्धा राहिलेली नाही. सिंधी काही गोष्टींत, गुजरातीपेक्षाही आपणास जवळ आहे. यावरून अनुमान काढण्यास हरकत नाही; की सिंध व कोकणपट्टी यांमध्ये समुद्रमार्गाने प्राचीन काळी (सातशे-आठशे वर्षांपूर्वी) बरेच दळणवळण असावे. पुढे, बरेच दिवस तो मार्ग बंद पडला असला पाहिजे. जरी सिंधमध्ये शेकडा पंचाहत्तर टक्के मुसलमान वस्ती आहे, तरी हिंदू व मुसलमान एकच भाषा (सिंधी) बोलतात. हल्ली, उभय समाजांत तेढ उत्पन्न झाल्यामुळे निष्कारण भाषेचे हाल होत आहेत. प्राथमिक शाळांतील क्रमिक पुस्तकांतून संस्कृतजन्य शब्दांची हकालपट्टी करून आरबी अगर फार्सी शब्द घालण्याचा यत्न चालू आहे. ‘कटोरो’ हा संस्कृतजन्य शब्द वाटून त्याऐवजी वाटो (वाटी) हा शुद्ध सिंधी शब्द घालण्यात येतो. पण दुर्दैवाने तोही संस्कृजन्यच आहे; ही गोष्ट लक्षात येत नाही.

भरतभेटीच्या धड्यात चाकरिआ (पादुका) हा शब्द काढून जुती हा उर्दू शब्द घातला गेला आहे. पण फायदा काय? उलट पादुका शब्दाऐवजी जोडा अगर वहाणा असा उपयोग करून पावित्र्याचा नाश मात्र होणार. हरिश्चंद्र राजाच्या कथेत ‘धन्य’ शब्दाऐवजी ‘शाबास’ घालून इस्लामी वातावरण मात्र उत्पन्न झाले. उलटपक्षी हिंदूही हिंदी भाषेतील नवेनवे शब्द उचलून संस्कृतजन्य शब्दांची विदग्ध वाङ् मयात रेलचेल उडवून देत आहेत.

चमत्कार असा, की खेड्यात प्रचलित जी सिंधी भाषा ती शुद्ध सिंधी व शहरांतील सुशिक्षित हिंदू जी सिंधी बोलतात ती फार्सीच्या संस्काराने भ्रष्ट म्हणून अशुद्ध सिंधी असे सांगण्यात येते. शाळा व कॉलेजे यांत शेकडा ऐंशी टक्के विद्यार्थी हिंदू आहेत व ते सर्व दुय्यम भाषा म्हणून फार्सी शिकतात. अर्थात, त्यास नित्य व्यवहारात फार्सी शब्द पुष्कळसे वापरण्याची सवय लागावी, यात नवल नाही. अभिजात सिंधी म्हणजे जिच्यात उर्दू, फार्सी व आरबी शब्द व अवतरणे यांचे प्राचुर्य सर्वत्र आहे ती! असा समज आहे. आपल्याकडेही विद्वान लोक संस्कृतचा सर्रास उपयोग करून मराठीस नटवण्याचा यत्न करतात. परंतु हल्ली शुद्ध सिंधीकडे काही लेखकांचा कल जात आहे.

महाराष्ट्रात एक काळ असा होता, की मराठीत ग्रंथरचना करणे कमीपणाचे मानत. सिंधीतही भर मुसलमानी रियासतीत सिंधी भाषा फक्त खेडवळ लोकांनी बोलण्यास योग्य समजत असत. सुशिक्षित लोक फार्सी बोलत व लिहीत. त्या काळी हिंदू लोकांनी फार्सी भाषेत कवनेही केली आहेत.

शुद्ध सिंधीत शेकडा ऐंशी टक्के शब्द संस्कृतजन्य व देशी आणि बाकीचे वीस टक्के फार्सी व आरबी भाषेतून उचललेले. शुद्ध सिंधी बोलणारे सर्व खेडवळ म्हणजे मुसलमान व भ्रष्ट भाषा बोलणारे नागरिक म्हणजे बहुतेक हिंदू. असा विपरीत प्रकार आहे. सिंधमधील मुसलमानी बहुमत हे राजकीय पारतंत्र्यामुळे, अरब अंमलानंतर उत्पन्न झाले असावे असे निर्विवाद ठरते. एरवी इतके प्राकृत व देशी शब्द खेड्यांतून आढळेना.

महाराष्ट्रात लिपीची सुधारणा करण्याची वावटळ उठली आहे. त्याचप्रमाणे हिंदूमहासभेच्या चळवळीमुळे देवनागरी लिपीत सिंधी लिखाण निदान हिंदूंपुरते तरी प्रचलित व्हावे, अशी खटपट चालू आहे. हल्लीची लिपी कृत्रिम असून शास्त्रीय दृष्ट्या दोषपूर्ण ठरते. शिवाय, आरबीचा व सिंधीचा काही एक संबंध नसताना ती विनाकारण लोकांवर लादली गेली आहे. ट्रंप या व्याकरणकाराच्या मते सिंधी ही प्राकृतजन्य भाषा असल्यामुळे देवनागरी हीच तिची नैसर्गिक लिपी ठरते. परंतु मुसलमानांचे बहुमत लक्षात घेऊन देवनागरी प्रसृत करणे कठीण दिसते. तथापी, उर्दू लिपी थोड्या फरकाने सुरू केल्यास हल्लीचे पुष्कळ दोष कमी होतील. ज्या वेळी इंग्रजी अधिकाऱ्यांनी ती लिपी प्रचारात आणली तेव्हा सर्व सरकारी नोकरवर्ग हिंदू होता. मुसलमान जरी राज्यकर्ते होते तरी त्यांनी लढणे व ऐषाराम भोगणे या पलीकडे काहीच केले नाही. मुख्य दिवाण पुष्कळ वेळा हिंदू असे. दप्तर तर हिंदूंनीच सांभाळले होते. आमिल नावाने प्रसिद्ध असलेली हिंदूतील एक जात. त्यातील लोक सरकारी नोकरी करणारे असे दर्शवते (आमिल = सरकारी नोकर). या आमिल लोकांना कित्येक शतके देवनागरी लिपी पारखी झाली व फार्सी भाषेत सर्व राजकीय व्यवहार होत असल्यामुळे, तिच्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले. याच आमिल नोकर वर्गाने अव्वल इंग्रजीत अरबी लिपीस विरोध केला नाही; इतकेच नव्हे तर स्वत: त्यांना देवनागरीचा गंध नसल्यामुळे अरबीचा पुरस्कार केला असावा, असे दिसते.

हल्लीसुद्धा देवनागरीच्या प्रचारास सुशिक्षित आमिल वर्गाकडूनच विरोध होत आहे. कारणे काय तर १. अरबी मोडीप्रमाणे झरझर लिहिण्यास येते आणि २. मुसलमान व हिंदू यांच्यामध्ये निष्कारण तेढ उत्पन्न होईल. हिंदू माणसास मुसलमान मित्रांशी लेखन व्यवहार, भाषा एक असूनही करता येणार नाही. खरे कारण एकच; अंगवळणी पडलेली लिपी टाकून देणे आर्य संस्कृतीविषयी पर्वा वाटत नसल्यामुळे नकोसे वाटते. दोन्ही लिप्या शिका. एक मुसलमानांच्या मोहबतीखातर व दुसरी हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आणि अखिल हिंदू समाजाशी दळणवळण (सांस्कृतिक) राहवे म्हणून असे सांगितले, तरी दुहेरी श्रम करण्याची तयारी नाही. मानववंश शास्त्रदृष्ट्या फार्सी रक्त आमिल लोकांच्या अंगात खेळत आहे असे काहींचे मत. ते खरे असल्यास हिंदू संस्कृतीविषयी त्यांस विशेष प्रेम का वाटावे? एक सिंधी गृहस्थ तर लिपीत फेरफार करण्याविषयी बोलणे निघाले असता म्हणाले, ‘आरबी सदोष आहे, गोष्ट कबूल; पण देवनागरी तरी पूर्ण निर्दोष आहे कुठे?’ फरकच करायचा तर पिटमनच्या लघुलेखनपद्धतीनुसार पुष्कळ श्रम वाचवणारी लिपी का स्वीकारू नये? त्यावर देवनागरी लिपी आर्य संस्कृतीच्या भावनेने स्वीकारणे इष्ट आहे हेच उत्तर. तार्किक वादविवादात कदाचित रोमन लिपीसुद्धा सरस ठरेल, किंबहुना सर्व हिंदवासियांनी स्वभाषा अजिबात सोडून फ्रेंच अगर इंग्रजी भाषा तान्ह्या मुलांस शिकवण्यास प्रारंभ करणे, आर्थिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरेल पण – पण मनुष्य हा निर्जीव यंत्र नाही, त्याला भावना आहे, हीच अडचण.

आता आपण  उभय भाषांतील साम्याचा विचार करू.

प्रथम सिंधी भाषेतील काही कवितांचे नमुने देऊन नंतर काही लोकांस रुक्ष वाटणारा पण अत्यंत चित्ताकर्षक व्याकरणविषयक भाग देऊ.

बुडंदे बूडनिखे के हातिख हथ विझनि
एडो लज लतीफु चवे पसो साणु कखनि
हेकर कंधिअ कनि: नत साणुनि वञत्नि सीरमें

(नदीत) बुडणारे (लोक) बुडखे हातात धरतात व लतीफ म्हणतो पाहा (पसो) गवताजवळ एवढी लाज (अब्रू) आहे. बुडणा-यांना एकतर (हेकर) काठावर आणतील नाहीतर (नत) त्यांसह पाण्यात वाहवत जातील.

[कखनि = कक्षा = रज्जु (गवताचे दोर करत);]

चवे (सं. वच्, मराठी वचवच);

सिंधीत आद्यन्त विपर्यय झाला आहे…

पँहँजी पोख संभारि प्राणी पेहे ते चड़ही
खिमा रवांभाणिअसां कढें कल्पत झारी

ड़ेई वाडि वेसाहजी सामी भर्मु निवारि
त खणें बेहदि बारि अनभइ अखुट अनाजजी

प्राण्या, पीठावर चढून आपले पीक सांभाळ. (क्षमारूपी) गोफणीने कल्पनेचे पक्षी काढून टाक (हाक). विश्वासाची (वेसाहजी) वडी देऊन (करून) सामी (म्हणतो) भ्रम निवारण कर तर (म्हणजे) आत्मानुभवरूपी अकुंठित (अखुट) अन्नाची बेहद्द रास घेशील.

[वाडी = वल्ली = वई (म.); भर्मू = भ्रम:  – भम्मो – भम्मु (अपभ्रंश)]

अकारान्त पुल्लिंगी शब्दाचे शेवटी ‘उ’ अवशेष विसर्गाचा राहिला आहे. ज्ञानेश्वरीसारख्या जुन्या मराठीतही तो आढळतो. ती  ‘उ’ लकब कानडीतीलच हे मत लंगडे पडते. अखुट हल्लीच्या मराठीत आढळत नाही, पण खेडवळ भाषेत दिसतो. ‘माझे काय त्यावाचून खुटले आहे’. खुंटा वगैरे सर्व कुंठपासूनच निघाले आहेत.

दिलि करि दरख्त जे दस्तूर
(आपले मन झाडाप्रमाणे कर)
छाडप लबे छुगा छणनि मेवा ऐं ब्यो बूर
कुहाडो लगे कूक न करे दर्दु न रखे सूर
वढीं-दरसां वरु न रखे तोडे भञी करे चूर
पाणू जलाए छांव करे नितु इन्हींअ ते नूर

(जर) झोडपले (हलवले) तर झुबके (छुगा) खाली पडतात. शिवाय, फळे व फुले (मिळतात). [छुगा = गुच्छ = गुत्स]

कुऱ्हाड (कुहाडो) लागली तरी कूं कूं करत नाही (व) वेदना आठवत नाही.

लाकूडफोड्याशी वैर राखत नाही. (तो) तोडो फोडो वा चूर करो. स्वत: जळून (तापून) (इतरांस) सावली करतो. नित्य अशा प्रकारचे त्याचे तेज (नूर = ईश्वरी प्रकाश = प्रासादिक वागणूक) आहे.

[ब्यो = दोन = वेकंबे (मराठी पाढा)]

कूक (कण्हण्याच्या आवाजावरून निघालेला शब्द) कूं कूं अगर कांकू
वढींदरसां विध् (विद्ध) – विड्ढ-वीढ-वढीं+दर (करणारा) + सां वैदिक
सा अथवा सह; म. सीं (शीं); मूळ मराठी प्रत्यय सीं जुन्या मराठींत रूढ आहे.
पाणु = स्वत:, आपला, अंतरंग  = आपण, मीपणा (मराठी) = अहंपणा
‘मुलगी पणात आली’ येथे वयात आली; स्वत: सिद्ध जाहली.
पाणमें वेटो आहे = अंतर्गृहात (अगर गूढ विचारात) बसला आहे.

पाणी (सिंधी) ओळखणे म्हणजे अंतरंग समजणे. आपण (स्वत:) ची षष्ठी आपला अशी होते, पण सिंधीत नेहमीचाच प्रत्यय जो जी लागतो. उदाहरणार्थ, पाणजो पुटु.

पाणजो माण्हूं आहे = आपला (च) मनुष्य आहे. छांव = छाया = सावली. सिंधी शब्द संस्कृतला अधिक जवळ आहे.]

जेङो तुंहिजो नांउं बाझ बि ओडियाई मङा
रे थंभे रे थूणिअ तूं छांइ
कुजारो कहांइ तोखे मैलूम सभका (शहा लतीफ).

(ईश्वरा) जेवढे तुझे (तुंहिजो) नाव मोठे तेवढी कृपासुद्धा (मी) मागतो.

खांबांशिवाय व खोडाशिवाय तू छप्पर व छाया आहेस. (फार) काय सांगू, तुला सर्वांविषयी ज्ञान आहे. [(जेडो नांउं ओडियाई बाझ = जेवढे नाव तेवढी कृपा.)

रे = ऋते. (म.) रें रें करत परत आला. रें रें करू नको.
थूणिअ = स्थूणा. थंभु = स्तंभ = खांब (अधिक परिणत)]
अल्लाह इएं म होइ जिअं आउं मरां बन्दमें
जुसो जंजीरुनिमें रातो डींहां रोइ
पहरी वत्रां लोइ पोइ मरू पुजनभि डींहडां.

देवा असे न होवो की (ज्यामुळे) मी बंधनांत मरेन;
(माझा) देह जंजाळात (साखळदोऱ्यांत) रात्रंदिवस रडतो (शोक करतो);
प्रथम (मला) (स्व) लोकास जाऊ दे, मग भले दिवस जावोत.
[आऊं = आं = मां = अहम् = मी : सिंधीत तीन शब्द आहेत.
पहिरीं प्रहर. म. पहिली वइली राम पहारा. अथवा प्रथम = पहभर = पहिमर = पहिरी.
मरु = मृ = मरोत, मरूं दे, जाऊ देत, अशा लाक्षणिक अर्थाने.]

मरणा अगे जे मुआ से मरी थिअनि न माति
हून्दा से हयाति जिअणा अगे जे जिया

मरणापूर्वी जे मेले ते (पुन्हा) मरत नाहीत व कोणी त्यांना मारत नाही.
ते जिवंत (सदा) राहतील, जे जीवनाच्या (या जन्माच्या) पूर्वी जिवंत होते.
तुकारामाच्या ‘आपुले म्या मरण पाहिले मी डोळा’ या वचनानुरूप वरील उद्गार आहेत.(?)
[हयाती = हयात – गांवढळ – हैति (आहेत ऐवजी) जे, से = जे, ते.]

सभेई सुहागिण्यूं सभिनी मुंहं जडाउ
सभकंहि भांयों पाणखे ईंदो मूं धरि राउ
पेठो तिनि दरांउ जे पसीं पाण लजा इयूं

सर्व सुवासिनी आपापली मुखें (अलंकारांनी) जडवून (बसल्या). सर्वांना मनात वाटले, आपल्या घरात राजा (प्रियकर) येईल. घरात प्रतीक्षा करत बसल्या. जेव्हा त्याला (आलेला) पाहिले (तेव्हा) त्या मनात लज्जित झाल्या.

[सुहागिण्यूं = सुभागिनी = सुहागिणी – ण्यूं (अनेकवचन).
दराँउ = दूर् = घर. म. दार.
मुंहं = मुख. जडाउ = जडवून, जडावाचे दागिने. जइ = घट (सं.)]

या उताऱ्यांवरून मराठी व सिंधी यांचा सापेक्ष संबंध काय आहे याची बरीच कल्पना येईल. आता क्रियापदे, नामे, विशेषणे इत्यादिकांत जेथे विशेष साम्य आहे ती उदाहरणे पाहू.

क्रियापदे

उघु (पुसणे) उगा, उगा (सं. वह्) – ओघळ. डोळे पुसण्याच्या क्रियेवरून सान्त्वनपर अर्थ पडला आहे.
चंबुडु = जवळ चिकटणे; चुंबळ, चंवड-चंबू (गवाळे).
चुघु = भोक पाडणे; चघळ (छिद्रान्वेषी). चूक (खिळा).
चुणु = चूण पाडणे
चुमु = मुका घेणे-चिम (वि.) सं. चुम्ब
बकु = बडबडणे – बकबक फार करू नये.
(कारक) बुझु (बुध्) = समजणे. बुझावूं शकेना विधाता तयाला
भञु भुञु (भज्ञु), भडर्भुजा (फोडणे, भाजणे).
मुँजु = धाडणे, मुंज (उपनयन) गुरुगृही धाडणे. सं.
मुंजा = गवत
बिहणु (उभे राहणे), कारक (बिहारणु) उभारणे. मूळ क्रिया. उभणे असावे.
लुणु (लु) शेत कापणे – लोण (आट्या-पाट्यातील).
लवण या शब्दाशी संबंध नाही.
सुण्कु सिण्कु = शिंकरणे, बाळ सुंकर (इं. ‘स्नीझ’)
नाकातील आवाजावरून शब्द बनला असावा.
बचुडु = गुंतवणे, गुंफणे; बुचडा.
कशणु (कृष्) = ओढणे, कसणे(जमीन नांगरणे).

सिंधीत मूलार्थ कायम आहे. मराठीतही कसून मेहनत करणे, यात मूलार्थ सापडतो. त्याने खसकन् दोरी ओढली, यात कृष् व बह् दोन्ही क्रियापदे विशेष जोर दाखवण्यासाठी योजली आहेत.

खांइणु = जळणे, जाळणे; खाईत टाकले
लिको (भूतभूतकाळ) = लपलेला. कोकणातील लिकणे
चखणु = चाखणे, रुचकर लागणे
छाडपनुं (छिद्  का.) = झडपणे
छाडप = झडप
झलणुं = झेलणे
मुर्किणो = मुर्का मारणे
छुहु (स्पृश्) = शिवणे (स्पर्श करणे)
मोटणुं = मोटी-मोडणे, मागे वळणे, नागमोडी

संयुक्त क्रियापदे

खाई वठु =  जलदी खा, खा-उठ
करे सघणू =  करू शकणे

पहंदो रहणुपढत = (शिकत) राहणे
करण लगणु = करू लागणे

नकारवाचक शब्द

अण (डिठो) = अ + दृष्ट (दैव)
ना (चडो) = न चांगले (वाईट). नाचक्की
अ (धर्मी) = अधर्मी
नि (भागो) = अभागी
बे (गुणो) = विगुणी, बे (अक्कल)
ला (चारू) = लाचार (चारो=उपाय)
रे (कमो) = रि + (कामा)

नामांपासून विशेषणे

को प्रत्यय (सं. इक) हाणे – हाणे+ को
(हल्लीचा) म. (दीड+का) दीड + का
(म. दीड पायाचा)
कारा-कारा + इतो कराईत (उपयुक्त)
डंदि + (रु) दंता +  डा  सं.  शरा  + रु
पुजा + रो   पुजा  +री
पिंजा   +रो    पिंजा   +री

भाववाचक नामे

चडो = चडाई, चांगुलपणा, महागाई, शिलाई, स्वस्ताई
घटि  (कमी)  ताई  कम+(ताई) घटत साधुपणु
पणो   साधूपण, साधूपणा
माण्हूं – (मनुष्य) माणुसपण, पणा. माण्हि + पी, + पो,  +   पाई  +   पणो   पणु

तांद्धत शब्द कर्तृवाचक
मेहि  (म्हैस) = मेंह्युनिवारो  म्हैसवाला,  गोवारी
लोहु  (लोह)  = लुहरु   लोहार
धणु  (धन्  =  धावडवणे)  = धन  (गो)  धन  + रु अक्षरांच्या उलटापालटीने धन  (गो)  रु  =  धनगर
धनारू  =  गुराखी

क्रियाविशेषणे

मस = कष्टानें   म.  मस  =  पुष्कळ
मसे = श्रमाने
मसां
ओचितो = अवचित
भेरे  भेरे  (भेरो = काळ) = नेहमी, सतत. भैरव व काल  =  म.  (काल) भैरव यांचे तादात्म्य झाले आहे  =  भिरीथिरी  हिंडतो
मुखामुखी = तोंडातोंडी

अव्यये वगैरे

एबजि = ऐवजी
साम्हुणे = सामने
माझ्या सामने येऊ दे
बोलायला
बदरि = बदली
लगि   लगे    लागी
भर = वर भरीला आणखी पाहुणा घेऊन आला आहे गिळायला
कोन  (कोsन्य:) = कोण = कौन (हिंदी) गांवढळ  कोन
जेकर = जर  करून
पिणि   पुणि  बि,  पि     मी पण (पुन्) बि जाईन
नत  नातरि (नाहीतर)
सूषां  (पर्यंत; आजसुद्धा पूर्ववैभवाची साक्ष तेथे पटते.)

उद्गारबोधक

छि छा हुं  (नापसंती दर्शक) = छे छे! हेड
थू  थू
मरा वा मारु काम केलेंत
भली     भले
वाहु      वाहवा

अपशब्दांतही वैदिक कालचा कृदन्त शब्द सा कायम आहे.

भेण (बहीण) सां वै. गोsसा, अश्वsसां (धियम्). मराठीतील भानचोदाचा भेणसां हा भाऊ आहे.
फक्त सन् ऐवजी चुद् वापरला आहे. पण लवंडिसां यांत सन् (जिंकणे, मिळवणे) कायम आहे.

नात्याचे शब्द

ससु (श्वश्रू)  = सासू
नुहुं  (स्नुषा) =  सून
आई आजी, आई तरुण असल्यामुळे उत्तर सिंधांत आजीला उद्देशून हा शब्द वापरतात. मराठीतही पुष्कळ ठिकाणी तसा उपयोग करतात.
भाणेजो (भागिनेय) =  भाचा
पुटु (पुत्र)              =  पूत (मायेचा)
जाट्रो (जामातृ)       =  जावई
बापु                     =  बाप
हा शब्द कानडीतूनच आला हे म्हणणे टिकणार नाही.
भाभी                    = भावजय
भाव                       =भाऊ
संडु                        = साडू

जुना वर्तमानकाळ

असणुं (अस्)

एकवचन                          बहुवचन
प्र. पु. आह्यां (अह्यि प्रा.)              आंह्यूं
द्वि. पु. आहीं                              आह्यो
तृ.पु.  आहे                                आहिनि

मराठीशी याचे विलक्षण साम्य आहे.

सिंधीत सामान्य वर्तमानकाळ थो थी (पु. व स्त्री. एकवचन) व था, थ्यूं (अनेकवचन) लागून होतो. मराठीत तो ते, तें, व तों तां, तात असे भिन्न प्रत्यय लागतात. सिंधींत नपुंसकलिंग नाही.

गांवढळ मराठीत स्त्रीलिंगी प्रत्यय ईकारान्तच (सिंधी थी प्रमाणे) असतो हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, ती जाती (जाते ऐवजी). मी बसती (बसते).

भूतकाळ व भविष्यकाळ यांचे प्रत्यय भिन्न आहेत. उदाहरणार्थ, सुभाणे मिहु वसे जान वसे परिंहँ  त वसंदो (उद्या मेघ वर्षेल वा न वर्षेल, परवा तर वर्षेलच.)

जे मार्यां थो सपखे त पापुथो थिएमि अँउँ जे न मार्यां त डंगेमि थो. (जर सापाला मारावे तर पाप लागते आणि जर न मारावे तर तो डसतो.)

वर्तमानकालीन थो थी वगैरे क्रियापदांच्या पुढे अगर मागे येऊ शकतात व क्रियापदापासून ते पृथक् लिहिण्याची वहिवाट आहे.

लुंडु                                 = लवंडा (महिना)
लुण्ठ                              = लुण्डा  (कान)
लंगडे असणे                    = रिकामे असणे
चपुटि                             = चिमुट (चत्र्चूपुट)
अछुत                             = अस्पष्ट=स्वच्छ
बभूत                              = विभूति  (देवाचा अंगारा)
वडवर                             = वरव्रत; वडवते (वटसावित्री पूजेसंबंधी.)
वींढो                               = नथ (वेढणे)

मोठ्या नथीला नथच शब्द आहे.

हंघ                                     = हंत (रुण)
जणीस्त्री,                            = सातजणी (जनी)
आर (आरि)                         = आरी    पराणी
वैदिक आरा                         = दाभण, चाबकाचे लोखंडी टोक
लुध्रो (लभ् + रो)                   = लुब्रा (मनुष्य)

झमठमल्ल  कमठमल्ल (कूर्माववतार) एक नाव

पखाल (पयख्खल)                      = पखाल
निलो  (नील=आकाश)                  = निवळ
गचु                                          = पूर्ण, गच्च
बिन्द्रो (विद्रूप)                             = बुद्रुक, ठेंगू
ढोल्यो (स्थूल)                            = ठोल्या  (जार)

(प्रियकर या अर्थीही उपयोग)

तिखी काती (कर्तु)                        = तिखट (तीक्ष्ण) चाकू
फोटो (स्फोट)                              = बुडबुडा, फुटणे या क्रियापदाशी साम्य
सवा (१।)                                   = सवा
सिरापु (शाप)                              = श्राप (शराप)
जाचे                                          = परीक्षा करून चाचणी
बैरागी  (बेरग्ग प्रा.)                      = बैरागी
जत्ता  (यात्रा)                              = जत्रा
पथरु (प्रस्तर) दगड,                     = पाथरवट, पत्थर
संइसारु                                       =  सवसार
अंगारु                                         = अग्नी-इंगळासारखे डोळे
जिति तिति                                   = जेथे तेथे
जिअ तिअ                                    =  यदा तदा
पुरुसु                                           = पुरुष
गरो (गुरु)                                    = जड, गार झालो भाषण ऐकून
सेणू  शेणा                                   = शहाणा  (स्नेही, सणेह) (मूळ अर्थ स्नेही)
रिणु (इरिण)                                 =  रान (ओसाड प्रदेश)
पीजु (पेय)                                   = पेज
पुठि  (पुष्टि) (अगर पृष्ठ)              = सत्ता

त्याच्या पुठ्यातील आहे तो. यात हातातील, ताब्यातील असाही अर्थ संभवतो.

डबलु (दुर्बळ)                                = दुबळा
ढापणु (पृप्त होणे)                         = ढइणु (तृप्त करणे) (म. ढइ+कर=ढेकर)

प्राकृताप्रमाणेच सिंधीमध्ये पुष्कळ स्वर एकत्र आले तरी संधी होत नाही. एकत्र आलेल्या स्वरांत वेगळेपणा राहवा म्हणून सिंधी लोक अनुस्वारांचा उपयोग भरपूर करतात. एकंदरीत नाकातून बोलण्याची लकब आढळते. रत्नागिरीतील मराठीपेक्षाही अनुस्वार सिंधी शब्दांत अधिक सापडतील.

सुखा-सुखाउं (अनेकवचन  आउं) = व्रते निश्चय
गंउं (गउ)                                = गाय (गौ)

शब्दाच्या शेवटी दीर्घ स्वर आल्यास जोर देण्यासाठी

प्रीं (प्रिय)                                 = मित्र
भूं                                           = (भू)भूमी

सिंधी ही प्राकृताला मराठीपेक्षा बरीच जवळ आहे. सामान्यपणे ज्ञानेश्वरीतील मराठी व आजची शुद्ध सिंधी या उभयता एकाच पायरीच्या भाषेच्या उत्क्रांतीच्या दृष्टीने उतरतील असे वाटते.

हल्लीच्या मराठीत पुष्कळ तत्सम संस्कृत शब्द घेतल्यामुळे जुने तद्भव व देशी शब्द मागे पडले. परंतु सिंधी बोलणाऱ्या लोकांचा संस्कृताचा व्यासंग जवळजवळ एक हजार वर्षे कायमचा तुटल्यामुळे त्या भाषेतील तद्भव शब्द कायम राहिले आहेत.

सिंधी लिखाण देवनागरीत सुरू झाल्यास ती कित्येक शतके परस्परांपासून विभक्त होऊन भेटलेल्या भगिनीप्रमाणे मराठीस दिसेल यांत नवल नाही.

देवनागरीत लिहिलेली क्रमिक पुस्तके हल्ली काही संस्कृत पाठशाळांतून सुरू आहेत. शिक्षणखात्याने मुलींच्या प्राथमिक शिक्षणांत देवनागरीचा उपयोग करण्याची संमती दिली आहे. परंतु जोपर्यंत हायस्कूलच्या अखेरच्या परीक्षेत अरबी लिपीच सिंधी भाषा लिहिताना वापरावी असा निर्बंध आहे; तोपर्यंत देवनागरीस उत्तेजन मिळणे कठीण दिसते. सिंधमधील ब्राम्हण वर्ग तर तिला म्लेंच्छ भाषा समजतात. काही लोकांच्या मते, हिंदी हीच मातृभाषा म्हणून शिकवण्यात यावी कारण सिंधी शिकून मनुष्य पिंजऱ्यात पडल्याप्रमाणे होतो. एकंदर, सिंधी बोलणाऱ्यांची संख्या अवघी तीस लक्ष आहे व तिच्यात नाव घेण्यासारखे वाङ्मय जवळजवळ नाहीच म्हटले तरी चालेल. विश्वविद्यालयात मराठी व इतर मातृभाषांबरोबर तिला स्थान मिळाल्यामुळे मॅट्रिकपासून एम.ए.च्या परीक्षेपर्यंत पुस्तके नेमणे कठीण झाले आहे. जे पुस्तक बी.ए.ला नेमतात ते विशेष अडचणीशिवाय इंग्रजी पाचवीतील मुलगा वाचू शकतो. तथापी, मातृभाषेच्या अभिमानाखाली असले प्रकार झाकले जातात. भाषेची प्रगती होण्यास प्राकृत व संस्कृत यांचे ज्ञान अवश्य पाहिजे. त्याचा संबंध परीक्षांच्या उद्देशपत्रिकेत कोठेच निर्देश केला नाही. सिंधी भाषा घेऊन विद्यार्थी थोड्या श्रमाने परीक्षांच्या चरकातून बाहेर पडतात हाच एक फायदा दिसतो.

मराठीप्रमाणे तिचा गुजराथीशीही निकट संबंध आहे. दोन्ही शौरसेनी प्राकृतपासून निघाल्या आहेत असा तर्क आहे.

मराठी भाषेचा सांगोपांग अभ्यास करणाऱ्यास सिंधी भाषेच्या व्याकरणाचे व वाङ्मयाचे सामान्यज्ञान उपयोगी पडेल असे वाटते. काही मराठी शब्दांची व्युत्पत्ती सिंधीच्या मदतीने होते हे दर्शवले आहे. विशेष अभ्यास केल्यास असे कित्येक शब्द सहज उलगडतील.

[वि. वि. दिक्षित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका ऑक्टोबर १९३० (महाराष्ट्र साहित्य पत्रिका सप्टेंबर २०१३) वरून साभार]

टिप –

१. पेहु = पीठ (- म. पिढें जात्याखालील) = पक्षी हाकलण्याची उंच जागा.
२. मराठीतही षष्ठीचा जो प्रत्यय आहे. उ. श्री रायाजा प्रथानू (नागांव शिलालेख – म. सा. प. व. १ अं. १ पाहा.)

(वि. वि. दिक्षित यांनी ऑक्टोबर १९३० मध्‍ये महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत सिंधी व मराठी या भाषांची तुलना करणारा लेख लिहिला होता. तो येथे पुनःप्रसिद्ध केला आहे. हा लेख महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्‍या सप्टेंबर २०१३ च्‍या अंकातही प्रसिद्ध करण्‍यात आला होता.)

Last Updated On – 30th June 2016

About Post Author

1 COMMENT

  1. सर्व भाषा बद्दलची संपुर्ण…
    सर्व भाषा बद्दलची संपुर्ण माहिती

Comments are closed.