साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक ही छटाकभर मतदारांची लोकशाही प्रक्रिया होऊन गेली आहे. ती मुठभरांची लोकशाही 2017 सालापर्यंत होती- म्हणजे वेगवेगळ्या प्रादेशिक साहित्यसंस्थांनी निवडलेल्या सुमारे आठशे लोकांना त्यात मताधिकार होता. पण त्यासाठी लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीचा सारा सरंजाम करावा लागे. त्यात ज्यांनी अध्यक्षपदाकरता अर्ज भरले अशा उमेदवारांची दमछाक होई. त्यांच्या वेळोवेळच्या विधानांतून उद्भवलेल्या आणि साहित्यविषयक उथळ भूमिकेला माध्यमे बरीच फोडणी देत. त्यातून चहाच्या पेल्यातील वादळे होत. आरोप-प्रत्यारोप, साहित्य संस्थांची दादागिरी, मतपत्रिकांची जमवाजमव असे सारे खेळ चालत. दुय्यम लेखकांची उमेदवारी. साराच सावळा गोंधळ. त्यावर महामंडळाची घटनादुरुस्ती होऊन नवीन निवडपद्धत आली. अरुणा ढेरे यांची निवड त्या पद्धतीने फारच शांततेने जाहीर झाली. मजा नाही आली! काही निवडणूक लढवू म्हणणाऱ्यांची नव्या व्यवस्थेने स्वप्ने करपली. प्रगतिशील नागपूरकर महामंडळ अध्यक्षाने निवडणूक नाट्य घडू न दिल्याने महाराष्ट्रीयांची बिनपैशांची करमणूक थांबली, ते फारच वाईट झाले. पुन्हा छटाकभरांचे लोकशाही हक्क हिरावले गेल्याने तेही बिच्चारे नाराज झाले. विदर्भाचे लॉबिंग चालू असल्याने ती संशयाची सुई अनेकांना टोचली. ‘मराठवाडा साहित्य परिषदे’ने त्यांची नावे आयत्या वेळी मागे घेतली. यवतमाळ येथे संमेलन होणार असल्याने ‘विदर्भ साहित्य संघा’ने सुचवलेला उमेदवार गादीवर बसणार असल्याची आवई उठवली गेली. अरुणा ढेरे यांचे नाव पुणेकरांनी सुचवलेले होते. मात्र त्यांचे ते एकमेव नाव नव्हते. उदाहरणार्थ त्यांनी देशीवादाचे पुरस्कर्ते भालचंद्र नेमाडे यांचेही नाव सुचवलेले होते. पुण्याचे नेतृत्व रावसाहेब कसबे यांच्याकडे असल्याने नेमाडे यांचे नाव लोणच्यापुरते आहे असा संशय अनेकांना होता. तो खरा ठरला. नेमाडे-महानोर यांनी नावे मागे घेतली. अरुणा ढेरे ही खरी पुण्याची पसंती. तेथे प्रगतिशील नागपूरकर नम्र झाले. त्यांना नाव कसे ठेवणार? छटाकभरांची लोकशाही चिमूटभरांची दासी झाली.
महामंडळाशी संलग्न संस्थांतील काटाकाटी, अहमहमिका यांतून अरुणा ढेरे हे डावातील सरस प्यादे ठरले. त्यात ‘मराठवाडा साहित्य परिषदे’ने सुचवलेली नावे महत्त्वपूर्ण असूनही ती नावे मागे घेऊन प्रगतिशील महामंडळ अध्यक्षांची गोची मराठवाड्याने करून टाकली. त्यांचे प्रेमानंद गज्वी हे महत्त्वाचे नाव. चिमूटभरांच्या हातात निवड गेली, की ब्राह्मणी व्यक्तींना झुकते माप मिळेल असा होरातज्ञांचा अंदाज होता. अरुणा ढेरे यांना ब्राह्मणी चेहरा म्हणून उघड कोणी विरोध करणार नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडीत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद पूर्वीही झाले आहेत. इतक्यात ते रंगणार नाही. पण प्रेमानंद गज्वी यांची संधी कसबे प्रभृतींमुळे गेली हे जाती अंतवाले म्हणू शकतील. या अर्थाने रावसाहेब कसबे यांचीही गोची ‘मराठवाडा साहित्य परिषदे’ने गज्वी यांचे नाव सुचवून करून टाकली आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडीत मधल्या काळात निवडणूक लढवणाऱ्या व निवडून येणाऱ्या दुय्यम मंडळींमुळे नवी व्यवस्था उदयाला आली आहे. बिच्चारे (लिमिटेड) लोकशाही मार्गाने निवडून आले होते. पण ‘कोण हे?’ असे म्हणण्याची वेळ मराठी समाजावर आली होती. त्यामुळे नव्या व्यवस्थेला स्वीकारण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता आणि नाही. नव्या व्यवस्थेतही दोष आहेतच. छटाकभरांची लोकशाही चिमूटभरांची दासी झाली हा महत्त्वाचा दोष. साहित्य संस्थांमधील काटाकाटीचे राजकारण चालू राहिले हा आणखी एक दोष. त्यामुळे प्रत्येक अध्यक्ष निर्मळ मनाने निवडला जाईलच याची शाश्वती देता येणार नाही. महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद पुढेही असतील. अरुणा ढेरे यांची निवड सार्थ असली तरी त्यामागचे ताणेबाणे हे आहेत. नवी व्यवस्था स्थिरस्थावर होईपर्यंत ते राहतील आणि त्यावर चर्चाही होत राहील. अरुणा ढेरे यांचे अभिनंदन !
– शंकर बोऱ्हाडे, shankarborhade@gmail.com