सासवडपुढे सगळं जग फुक्काट….!

1
29

सासवड हे गाव पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून जेजुरीला जाताना, दिव्याचा घाट ओलांडून गेले की आपण सासवडला पोचतो. सासवड गावात पुरंदरे वाड्यात 13 ऑगस्ट 1899 या दिवशी आचार्य अत्रे यांचा जन्म झाला.

सासवडचा इतिहास खूप जुना आहे. संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान यांनी क-हेच्या काठी संजीवन समाधी घेतली. थोडक्यात सासवड हे सातशे वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहे. ते पुण्याहून जेजुरीला जाणा-या रस्त्यावर आहे. त्यामुळे खंडोबाच्या दर्शनाला जाणा-या भाविकांच्या परिचयाचे आहे. शिवाजी महाराजांचा पुरंदर किल्ला तिथून जवळच आहे.

बाळाजी विश्र्वनाथ पेशवे यांनी बांधलेला वाडा  व बाळाजी विश्वनाथांची समाधी सासवडला आहे. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हे सासवड पंचक्रोशीतल्या हिवरे गावचे!

अफजल खानाशी सल्लामसलत करून, त्याला आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर प्रताप गडाच्या पायथ्याशी घेऊन येणारे शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपिनाथ यांचा वाडा सासवडलाच आहे. त्यांचे आडनाव बोकील! हे बोकील घराणे मराठी दौलतीच्या सेवेतच राहिले. पेशव्यांचे मुत्सद्दी सखारामबापु बोकील हे पंताजी गोपिनाथांच्या घराण्यातले.

सासवड या गावाबद्दल माझे मत पूर्वी फारसे चांगले नव्हते. मी आईबरोबर तीन साडेतीन वर्षांचा असताना गेलो होतो. त्यावेळी तिथे पाहिलेली डुकरांची पलटण माझ्या मनात बरीच वर्ष होती. त्यामुळे सासवड म्हणजे डुकरे! हे समीकरण मनात घट्ट रुतून बसले होते.

पण नंतर जेव्हा सासवडला गेलो तेव्हा तिथली मंदिरे पाहिली, आजूबाजूचा परिसर पाहिला आणि माझे मत बदलले! आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जसजसा परिचय होत गेला तसतसा मी सासवडच्या प्रेमात पडलो. इतका की कधी कधी सासवडची आठवण अनावर झाली की मी तडक सासवडला जातो, तिथल्या गल्लीबोळांतून हिंडतो. सासवडची माती कपाळावर लावण्यातले समाधान तर मी प्रत्येक वेळी मिळवतो. कारण बाबू अत्रे या उपद्व्यापी मुलाचा आचार्य अत्रे होण्याचा पाया या सासवडमध्येच घातला गेला आहे.

अत्र्यांचा पिंड तिथल्या मातीवर पोसला गेला. अत्र्यांना घरातल्या संस्कारांबरोबरच घराबाहेर झालेल्या संस्कारांच्या शिदोरीची सोबत जन्मभर लाभली. त्यांची प्रतिभा तिथल्या वातावरणात फुलली आणि त्यांची लेखणीही प्रवाही राहिली ती
क-हेच्या प्रवाहाप्रमाणे. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य अत्रे यांनी जे कार्य केले किंबहुना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आचार्य अत्रे या एकाच व्यक्तीमुळे झाला. त्याला स्मरून प्रत्येक ‘महाराष्ट्रीयन’ माणसाने सासवडला तीर्थक्षेत्रच मानले पाहिजे.

प्रत्येकाला आपले गाव प्रिय असते, आपल्या गावावर प्रत्येकाचे प्रेम असते. मग त्या गावात काही पिको किंवा न पिको; आचार्य अत्र्यांचेसुध्दा आपल्या सासवड गावावर असेच प्रेम होते. पण ते वाजवीपेक्षा जास्त असावे असे वाटते हे नक्की. अत्र्यांच्या सासवड प्रेमाची सुरूवात होते ती दिवेघाटापासून! ते साहजिकही आहे, कारण अत्र्यांचे आजोबा विनायकबुवा अत्रे यांनी दिवेघाट बांधणीच्या वेळी त्या कामावर  काही काळ नोकरी केली होती. त्यांच्या त्या नोकरीचे कौतुक का?  तर अत्रे घराण्यात नोकरी करणारे विनायकबुवा अत्रे हे पहिले! कारण त्यांच्या पूर्वी कोणीही नोकरी करत नव्हते, कारण शेती आणि पिढीजात जोशीपण आणि कुलकर्णीपण हाच व्यवसाय.

दिवेघाट हा घाटासारखा घाट आहे, पण त्याच्याबद्दल बोलतानासुध्दा ”दिव्याच्या घाटा इतका अवघड घाट, पश्चिम महाराष्ट्रात दुसरा क्वचितच असेल” अशा शब्दांत अत्रे आपले प्रेम व्यक्त करतात.

दिवेघाटाचे सौंदर्य पहिला पाऊस पडून गेल्यावर खुलते हे मात्र निश्चित. त्यातूनसुध्दा पंढरपूरला जाताना ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेव्हा दिव्याचा घाट चढते ते दृश्य शब्दांनी वर्णन करता न येण्यासारखेच आहे. त्याची प्रचीती दिवेघाटाच्या वरच्या टोकाला जाऊन प्रत्यक्ष पाहावी हेच खरे!

एके दिवशी अत्रे त्यांच्या स्नेह्यांच्याकडे गेले. त्या स्नेह्यांचे चिरंजीव नुकतेच युरोपच्या दौ-यावरून परत आले. अत्र्यांनी लंडनचे टिचर्स डिप्लोमा केले तेव्हा ते तिकडे जाऊन राहिले होते. अर्थात तो काळ दुस-या महायुध्दापूर्वीचा होता.

स्नेह्यांच्या चिरंजीवांनी लंडन-पॅरिसचे भरभरून वर्णन केल्यावर अत्र्यांनी विचारले,

”लंडन-पॅरिस सोड, तू सासवड पाहिलेस का?”
”नाही का?”
”तू जर अजुन सासवड पाहिले नाहीस तर जग पाहून आलास तरी ते फुक्काट आहे!”

 

About Post Author

Previous articleधान्यापासून मद्य…
Next article‘स्नेहसेवा’
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

  1. लेख आवडला , मी आचार्य अत्रे…
    लेख आवडला , मी आचार्य अत्रे यांचे ‘ क_हेचे पाणी ‘ या विषयावर PhD केली आहे . मी सासवड चा आहे

Comments are closed.