आम्ही पॅरिसकडे ५ जुलैच्या पहाटे प्रस्थान केले. साधारण चार वाजता पॅरिसच्या ‘चार्ल्स-द-गॉल’ विमानतळावर उतरलो. तेथूनच थेट आयफेल टॉवरवर गेलो. मुंबईच्या वाहतुकीवर मात करेल अशा गर्दीच्या वाहतुकीतून, अरुंद रस्त्यांवरून आमचा बसचालक, अजिबात हॉर्न न वाजवता बस चालवत होता. फ्रेंचांची शिल्पकला चौकाचौकात, मोठमोठ्या इमारतींवर बहरलेली दिसली. म्युझियम, आर्ट गॅलरी अशा इमारती तर पुतळे आणि मूर्ती यांनी नटलेल्याच!
एका गोष्टीने विशेष लक्ष वेधून घेतले. सगळीकडे फ्रान्सचे झेंडे लावलेले दिसत होते. तसे का आहे म्हणून विचारल्यावर आमच्या टूर ऑपरेटरने सांगितले, की १४ जुलै हा फ्रान्सचा स्वातंत्र्यदिन आहे. त्याची तयारी सुरू आहे. बॅस्टिलचा तुरुंग फोडण्याची, फ्रेंच राज्यक्रांतीतील महत्त्वाची घटना त्या दिवशी घडली. दुसऱ्या दिवशी तेथील लोकल गाईडने सांगितले, की त्या घटनेची स्मृती म्हणून १४ जुलै हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. जुन्या जगाला निरोप देऊन नव्या जगात प्रवेश करण्याचा दिवस तो स्वातंत्र्यदिवस! मला स्वातंत्र्याची ती कल्पना भावली. खरे तर, फ्रेंच राज्यक्रांतीने साऱ्या जगालाच नवीनतेचे, स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवले. पण अजूनही स्वातंत्र्याच्या त्या कल्पनेत बसेल असे जग कितीसे आहे?
आयफेल टॉवरवर रात्री आठ वाजता पोचलो. चक्क ऊन होते, फक्त बोचरे वारे वाहत होते, आयफेल टॉवरच्या पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यांवरून पॅरिसचे सुंदर दर्शन होते. समोरचे फुटबॉल ग्राऊंड, पॅरिसच्या मधोमध वाहणारी सिएन नदी, ट्रायम्फल आर्क (फ्रेंच राज्यक्रांती व नेपोलियनच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ बांधलेली कमान) सगळे वरून दिसत होते. शिवाय, नट-बोल्टच्या साहाय्याने उभारलेल्या जगातील एका आश्चर्यावर उभे राहून ते पाहण्याचा आनंद वेगळा होता. रात्री हॉटेलवर येऊन झोपायला अकरा वाजले.
आम्हाला मार्सेलिसला ७ जुलैला संध्याकाळपर्यंत पोचायचे होते. (याचा फ्रेंच उच्चार मार्से किंवा मारसाय असा आहे.) त्यासाठी आम्हाला आख्खा फ्रान्स उभा पार करून त्या देशाच्या दक्षिण टोकाला जायचे होते. तो प्रवास दोन दिवसांचा होता.
आमचा प्रवास मार्सेकडे सुरू झाला. जुलै महिना होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंला शेते होती. कापणी झाली होती. उरलेली धाटे छाटून त्यांच्या पॅकबंद छान गुंडाळ्या केलेल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी बारीक-बारीक हिरवे पीक आले होते. हिरवीगार, लांबच लांब पसरलेली एकसारखी शेते मनाला इतकी प्रसन्न वाटत होती, की खिडकीबाहेरून नजर निघतच नव्हती! कोरडी जमीन दिसतच नव्हती. संपूर्ण प्रवासभर दोन्ही बाजूला अशी सुंदर, रेखीव आणि टवटवीत शेते होती. फारच सुंदर! आमचा तो प्रवास कमालीचा नेत्रसुखद झाला.
मध्ये लिऑनला मुक्काम होता. रात्री साडेआठ वाजले तरी उजेड मस्त होता. संध्याकाळी रस्त्याच्या बाजूच्या फूटपाथवर हॉटेलांची टेबले लागलेली. तेथे बसून आरामात पेयांचा आणि खाद्यांचा आस्वाद घ्यायचा ही तेथील लोकांची पद्धत! ती माणसे इतके ‘मॅन-अवर्स’ अशा गोष्टीत कसे काय वाया घालवतात असा प्रश्न माझ्या मनाला सहज पडला. कदाचित रोजच्या खाण्या-पिण्यासाठी जेथे फारसा संघर्ष करावा लागत नाही, तेथे अशा कामांसाठी वेळ मिळत असावा!
लिऑन हे शहरही सुंदर आहे. इमारतीच्या संपूर्ण भिंतीवर वरपासून खालपर्यंत केलेली पेंटिंग्ज, फ्रेडरिक बार्थोली याने बनवलेले कारंजे ही त्या शहराची वैशिष्ट्ये! (फ्रेडरिक बार्थोली म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा बनवणारा जगप्रसिद्ध कलावंत) तेथे मोठी बॅझिलिका आहे. आमची गाईड छान होती. तिने चर्च, कॅथिड्रल आणि बॅझिलिका यांची दिलेली एकूण माहिती सुंदर होती. (चर्च म्हणजे साधे प्रार्थना मंदिर, जेथे बिशप असतात ते कॅथिड्रल आणि तीर्थयात्रेचे स्थळ म्हणजे बॅझिलिका असा ढोबळमानाने फरक सांगता येईल) बॅझिलिकाच्या वर ‘व्हर्जिन मेरी’ची सोनेरी मूर्ती लक्षवेधी आहे.
मार्सेच्या मार्गावर अशा अनेक विचारांनी मन भरून आले होते. मार्सेला पोचलो, मात्र पहिले दर्शन फारसे सुखावह नव्हते. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलच्या मागचा भाग बकाल होता. पाकिस्तानी हॉटेलमधील जेवण मात्र झकास होते.
सगळेजण ८ जुलैला सकाळी मार्सेच्या समुद्रकिनाऱ्यावर हजर झालो. सर्वांनी पांढरे पोषाख घातले होते आणि सावरकरांची प्रतिमा असलेली मेडल्स लावली होती. जगभरातून आलेल्या असंख्य लोकांतील बहुतांशी भारतातून आलेले होते. काही मोजकी मंडळी इंग्लंड-अमेरिकेतून आली होती. खरे तर, अनेक भारतीय फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड या देशांमध्येही आहेत. इंग्लंडमध्ये तर आहेतच, पण त्या कार्यक्रमात फारसे कोणी दिसले नाही. भारतातून जवळजवळ दीड-पावणेदोनशे माणसे प्रत्येकी अंदाजे दीड लाख रुपये खर्च करून समारंभासाठी तेथे जमली होती. शंभर वर्षांत समुद्रकिनाऱ्यात बराच फरक पडला आहे. ती मोरिया बोट कुठे होती, सावरकरांनी कुठे उडी मारली, कुठल्या भिंतीवरून ते चढले, हे अजिबात सांगता येणार नाही. परंतु त्यांनी एवढ्याशा खिडकीतून बाहेर पडताना सोलवटलेल्या शरीराने समुद्राचे खारे पाणी कापत किनारा गाठला हे अचंबित करणारे सत्य आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ती एक मोठी घटना. त्यांची स्वत:ला फ्रेंच पोलिसांच्या ताब्यात देऊन स्वातंत्र्ययुद्धाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची योजनाही तशी अद्भुतच! परंतु त्यांना त्यांच्या योजनेत फ्रेंच पोलिसांच्या भ्रष्टाचारामुळे यश आले नाही. पुढे, त्या घटनेचे पडसाद जगभर उमटून शेवटी फ्रेंच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला! सावरकरांचे स्मारक त्या किनाऱ्यावर उभे करण्यासाठी पार्ल्याच्या ‘सावरकर सेवा केंद्रा’चे कै. रामभाऊ बर्वे यांनी प्रयत्न केले. तेथील (मार्सेच्या) मेयरशी संपर्क साधून त्या संबंधात पत्रव्यवहार केला. मार्सेच्या मेयरने तेथे सावरकरांचे स्मारक व्हावे यासाठी १९९९ सालीच परवानगी दिली आहे. त्यासाठी थोडी जमीन भारत सरकारला देण्यासही त्यांची तयारी आहे. मेयरचे पत्र तेथे त्यावेळी आम्हास वाचून दाखवण्यात आले. परंतु भारत सरकार जमीन घेण्यास तयार नाही. सरकारचे धोरण असे का आहे याचे कारण कळत नाही. हेच राजकारण!
सर्वजण संध्याकाळी एका ऑडिटोरियममध्ये जमलो. बऱ्याच जणांची भाषणे झाली. गिरीश दाबके यांचे छोटेसेच पण अभ्यासपूर्ण भाषण विशेष उल्लेखनीय! ‘प्रचंड वेदनेतून साहित्याचा जन्म आणि मग त्या साहित्यातून स्वत:च स्फूर्ती घेऊन जीवनाला सामोरे जाणे’ हा सावरकरांविषयीचा विचार वेगळा वाटला. शेवटी पं. हृदयनाथ मंगेशकरांचा सावरकरांच्या गाण्यांचा अप्रतिम कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाने सावरकर आदरांजलीची सांगता झाली.
आम्ही नंतर स्वित्झर्लंड आणि इटालीला जाऊन भारतात परत आलो. आमच्या त्या यात्रेत आमचा दहा समविचारी लोकांचा एक छान ग्रूप तयार झाला आहे. प्रत्येकाचे पत्रकार, बँकर, युनियन लीडर, अॅक्युप्रेशरिस्ट असे वेगवेगळे व्यवसाय असले तरी सावरकर या एका समान धाग्याने आम्ही बांधले गेलो आहोत. आमच्या सर्वांच्या परिवारात आणखी नऊ जणांची भर पडली आहे. आमच्या या प्रवासाची ही मोठीच फलश्रुती!
सावरकर स्मारक होईल तेव्हा होईल, पण त्यासाठी एक चिमुकले पाऊल टाकण्यात आपला सहभाग होता हे समाधान प्रत्येक यात्रेकरूला झाले असणार! मार्सेच्या किनाऱ्यावर सावरकरांना वाहिलेली आदरांजली हा आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एक चिरंतन ठेवा झाला आहे.
दीपाली हरेश देशपांडे
अ/ ६, नालंदा सोसायटी,
राम मारुती क्रॉस रोड नं. ३,
डॉ. बेडेकर हॉस्पिटल जवळ,
नौपाडा, ठाणे ४०० ६०२
९८६७५१०१९५
deshpande_dh@yahoo.co.in
सावरकर आणि कानडी भाषा
Good one. Keep it up
Good one. Keep it up
Very true, hats off to t
Very true, hats off to t great leader shatshaha vandan!! Artical uttam!
Great !
Great !
Let us see if the attitude of government changes now, after a Savarkar disciple coming to power.
Comments are closed.