सामाजिक उद्योजक ज्योती म्हापसेकर

5
155
Mhapsekar Jyoti1

ज्योती म्हापसेकर – सामाजिक उद्योजिकाज्योती ही जगन्मैत्रीण आहे. इंटरनेट दोन दशकांपूर्वी नव्हते, तेव्हाही ज्योतीचा लोकसंग्रह प्रत्यक्ष भेटी आणि टेलिफोन ह्यांच्या द्वारे अफाट होता. तिच्या लोकसंग्रहाला तेव्हा भारताच्या सीमांची मर्यादा होती, तरी तिचे जागतिक नेटवर्क आकार घेऊ लागले होते! त्याचे मुख्य साधन तिनेच लिहिलेले व स्त्री मुक्ती संघटनेने सादर केलेले ‘मुलगी झाली हो’ हे नाटक होते. नाटकाचे स्वरूप पथनाट्यासारखे होते, पण ते रंगमंचावर होई. नाटकाने अल्पावधीत प्रेक्षकांवर मोहिनी घातली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमधूनच नव्हे तर नाटकाला भारताच्या अन्य राज्यांमधून निमंत्रणे येत. नाटकाचे भाषांतर काही भारतीय भाषांमध्ये झाले होते.

‘स्त्री मुक्ती संघटना’ नाटकाच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्याचे, संघटना बांधण्याचे काम करत होती. त्या माध्यमातून परदेशी स्त्रियाही ज्योतीशी सहजपणे जोडल्या जात होत्या. क्रिस्टीन गिलेस्पी ही ऑस्ट्रेलियाची. ती कोल्हापूरला ‘मुलगी झाली हो’ बघायला आली आणि थोड्याच काळात ज्योतीची व ‘स्त्रीमुक्ती संघटने’ची मैत्रीण झाली. ज्योतीला ‘मुलगी झाली हो’ नाटकाची लेखिका म्हणून जागतिक नाट्यलेखिकांच्या परिषदेसाठी आमंत्रण आले तेव्हा अकरा जणींची ऑस्ट्रेलियातील राहण्या-जेवण्याची, लोकांना भेटण्याची, ऑस्ट्रेलिया बघण्याची सर्व व्यवस्था क्रिस्टीनने केली! तिने तेथील ‘स्त्री अभ्यास केंद्रा’मध्ये आणि विद्यापीठांमध्ये नाटकाचे प्रयोग घडवून आणले, स्त्री-प्रश्नांवर चर्चा आयोजित केल्या. परिषदेनंतर ज्योती जागतिक नाट्यलेखिका संस्थेच्या कार्यकारिणीची सभासद झाली. ज्योती जागतिक स्तरावर जाऊन पोचली. तीही अशी कर्तबगार, की तिने आंतरराष्ट्रीय नाट्य-लेखिकांचा एका आठवड्याचा मेळावा मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या मदतीने 2010 साली मुंबईत भरवला व यशस्वी केला.

मुलगी झाली हो या नाटकातील एक दृश्यज्योतीने ‘मुलगी झाली हो’नंतर स्त्रीसमस्यांना समाजापुढे आणणारी ‘हुंडा नको गं बाई’ आणि ‘बाप रे बाप’ ही नाटके लिहिली. पण ‘मुलगी’ काळजाला भिडते आणि विचारांनाही प्रवृत्त करते. त्या नाटकाचा होतो तसा परिणाम तितक्या प्रभावीपणे क्वचित कोणा नाटकाने वा कलाकृतीने साधला असेल!

ज्योतीच्या कामाला आरंभ झाला तो स्त्री मुक्ती चळवळीपासून, पण तिच्या कामाचा विस्तार झाला तो ‘परिसर विकास’ ह्या कचरावेचक महिलांच्या संघटनेच्या स्थापनेपासून. स्त्रीसमस्यांसंबंधी आणि स्त्रियांच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक दुय्यम स्थानासंबंधी जनजागृती आणि चळवळ करता करता ज्योती कचरावेचक महिलांच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या कामामध्ये खूप मोठी होत गेली.

‘स्त्री मुक्ती संघटने’ची चेंबूर, धारावी भागात रेशनची समस्या आणि स्त्रीसाक्षरता ह्या बाबींमध्ये काम करत असतानाच, तिची रस्तोरस्ती हिंडून कागद, प्लॅस्टिक कचरा वेचणार्‍या महिलांशी नाळ जोडली गेली. कार्यकर्त्यांना कचरावेचकांच्या दारुण परिस्थितीबद्दल जाणीव झाली. संघटनेने त्यांच्या वस्तीमध्ये ‘मुलगी झाली हो’चा प्रयोग केला. नाटक हा संघटनेचा ‘एंट्रीपॉईंट’ असे. ‘स्त्री मुक्ती संघटने’ने कचरावेचकांचे प्रश्न आणि त्यांची पार्श्वभूमी समजावून घेण्याच्या हेतूने मुंबईमध्ये कचरा वेचणार्‍या दोन हजार महिलांचे सामाजिक-आर्थिक आणि कौटुंबिक सर्वेक्षण केले. त्याच वेळी मुंबईमधील कचरा व्यवस्थापनाचे, त्यातील त्रुटींचे, महानगरपालिकेतील संघटित घनकचरा कामगार आणि त्यांच्या बरोबरीने काम करणार्‍या असंघटित महिलांच्या कामाचे, आरोग्याचे-कौटुंबिक समस्यांचे आणि त्यांच्या मुलांच्या भवितव्याचे प्रश्न सोडवणे हे केवळ त्यांच्या व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातूनच शक्य होईल हे ज्योती आणि तिच्या मैत्रिणी यांच्या लक्षात आले.

बंगलोरच्या अलमित्रा पटेल ह्या महिलेच्‍या प्रयत्‍नांमुळे घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचे कायदे 2000 साली केले गेले. प्रत्‍येक नगरपालिकेत हे कायदे राबवणे बंधनकारक ठरले, मात्र मुंबई महानगरपालिकेत त्‍यांची योग्‍य अंमलबजावणी झाली नाही आणि ज्योतीची या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी धडपड सुरू झाली. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या सहकार्याने कचरावेचक महिलांना ओळखपत्रे मिळवून देणे, नागरी भागातील कचरावेचक महिलांचे बचत गट स्थापन करणे, त्यांना ‘सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने’चे लाभ मिळवून देणे असे तर्‍हतर्‍हेचे प्रयत्न होते.

कचरावेचक महिलांचे नेतृत्व विकास शिबीरकोरडा कचरा हा मोठा आर्थिक व्यवसाय आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर कचरा माफिया असतात. त्या स्पर्धेला व्यावसायिक पद्धतीने तोंड द्यावे लागेल हा दृष्टिकोन नवा होता, पण तो या महिलांनी अंगीकारला. कचरासफाई हा व्यवसाय आहे. तंत्रज्ञान, अर्थकारण, व्यवस्थापन, उत्पादनक्षमता अशा अनेक गोष्टींचा विचार तेथे येतो. त्यासाठी ओला कचरा, सुका कचरा, संशोधन, यंत्रतंत्रे, व्यवस्थापन पद्धती अशी विविध माहिती ज्योतीला व महिला कार्यकर्त्यांना होऊ लागली. त्याच ओघात कोरडा कचरा म्हणजे सोने आहे ह्याची जाणीवही त्यांना झाली. त्यातून ‘परिसर विकास उद्योगा’ने आकार घेतला. कचरावेचक महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले. मुंबई महापालिका आणि खाजगी संस्था यांच्या देणग्यांमधून देवनारच्या कचरा डेपोच्या वस्तीजवळ प्रशिक्षण केंद्र उभे राहिले. त्यामध्ये महिलांचे आरोग्य, कौटुंबिक समस्या, पुरूषप्रधान व्यवस्था, नागरी व्यवस्थापन, मुलींचे शिक्षण, पर्यावरण, कायदे अशा विषयांचा समावेश केला गेला. त्यासाठी अभ्यासक्रम तयार झाला, पुस्तके लिहिली गेली. कचरावेचकांच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देणे हा हेतू महत्त्वाचा होता. कचरा वेचणा-या महिलांच्या मुलांसाठी खेळघर, मुलींच्या शिक्षणासाठी मदत असे उपक्रम सुरू झाले. मुंबईतील अनेक संस्थांनी कचरा वेचणाऱ्या कुटुंबांतील मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक बळ दिले. ज्योतीचा व संस्थेचा ‘परिसर विकास’विषयक कामामुळे देशी-परदेशी सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्थांशी संबंध येऊ लागला.

२०१० साली ज्योतीला अमेरिकेच्या अतिशय मानाच्या ‘क्लिंटन फाउंडेशन’ने सन्मानित केलेओला म्हणजेच जैविक कचरा हा सुद्धा सोन्याइतकाच मूल्यवान असतो, पण तो वेगळा केला जात नसल्याने कचरावेचक महिलांचे आरोग्य धोक्यात येते. शिवाय, त्या कचऱ्यामध्ये तेव्हा माफिया नव्हते. ओल्या कचऱ्याचे सोने, म्हणजेच खत करण्याचा उद्योग कचरा डेपोमध्ये सुरू झाला. कालांतराने, मुंबईच्या भाभा अणुशक्ती केंद्राचे डॉ. शरद काळे ह्यांनी विकसित केलेले ‘निसर्ग ऋण प्रकल्पा’चे – जैविक कचर्‍यापासून उपयोगी वायू आणि खत बनवण्याचे – तंत्रज्ञान ‘परिसर विकास’च्या मदतीने प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. कचरा उद्योगाचा विस्तार ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई येथेही झाला. ‘स्त्री मुक्ती संघटना’ आणि ‘परिसर विकास’च्या कामाच्या नोंदीमुळे तिचे राष्ट्रीय आणि जागतिक सामाजिक नेटवर्क विस्तारले. ज्योतीला आणि विशेष म्हणजे कचरा वेचण्याचे काम करणार्‍या व ‘परिसर विकास’च्या अध्यक्ष असणार्‍या साबळेबाईंना २००९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलविषयक परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रण मिळाले. तेथे स्त्री मुक्ती संघटनेच्या ‘परिसर विकास’च्या कामाला जागतिक दाद मिळाली. त्यानंतर २०१० साली ज्योतीला अमेरिकेच्या अतिशय मानाच्या ‘क्लिंटन फाउंडेशन’ने सन्मानित केले. २०११ सालचा ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा सामाजिक कामाचा पुरस्कार ज्योतीला मिळाला आहे आणि तीसुद्धा ज्योतीच्या कामाला मिळालेली प्रतिष्ठेची पावती आहे.

ज्योती ‘स्त्री मुक्ती संघटने’ची अध्यक्ष असली तरी प्रत्येक काम ती कार्यकर्ती म्हणून करत असते. सर्व ऊर्जा एकवटून, झोकून देऊन काम करणे ही ज्योतीची कार्यपद्धत. तिच्या कामाच्या झपाट्याने ‘परिसरविकास’मधील महिलाही वेगाने कामाला लागतात. ती त्यासाठी ज्या कोणाची मदत मिळण्याजोगी असते त्या सर्वांना जाऊन भेटते. ती कधी शासकीय धोरणातील तरतुदी अंमलात आणण्यासाठी, कधी परिसर भगिनींच्या संघटनेला आर्थिक बळ मिळवण्यासाठी, कधी माहिती तर कधी तंत्रज्ञान मिळवण्यासाठी धडपडत असते. विशेष म्हणजे तिच्या तळमळीक़डे बघून महानगर पालिकेचे वा राज्य सरकारचे अधिकारी, नगरसेवक, मोठ्या कंपन्यांचे अधिकारी, आर्किटेक्ट, इंजिनीयर्स असे लोक तिला तत्परतेने मदत करतात. सरकारी कार्यालयांतील महिला अधिकारी तर तिच्या मैत्रिणीच बनतात आणि सरकारी प्रकल्प राबवण्यासाठी तिची आणि ‘स्त्री मुक्ती संघटने’ची मदत घेतात. स्त्री मुक्ती संघटनेचा ‘जिज्ञासा’ प्रकल्प हा असाच, सहकार्यातून उभा राहिला. महापालिकेच्या शाळांमधील मुला-मुलींच्या लैंगिक शिक्षणासंबंधी जागरुकता निर्माण करणारा तो प्रकल्प पोलिस कमिशनर कै. हेमंत करकरे आणि ठाण्याचे डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांच्या सहकार्याने सुरू झाला. त्याचा लाभ महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या सात लाख मुलामलींना मिळाला आहे!

2009 साली मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘आतंरराष्ट्रीय नाट्यलेखिका परिषदेत’ डॉ. जब्बार पटेलांसमवेत ज्योती म्हापसेकरज्योतीचा हातखंडा एका वेळी अनेक प्रकारची कामे करणे हा आहे. तिची स्मरणशक्ती अफाट आहे. ज्योती अॅकॅडेमी ऑफ आर्किटेक्चर (रचना) कॉलेजमध्ये लायब्ररीयन म्हणून काम करत असताना सहकार्‍यांना कामे सांगत असे, विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात उपयोगी ठरतील अशी पुस्तके सुचवत असे, त्याचवेळी त्या मुलामुलींची माहिती स्वत:च्या मेंदूत साठवत असे, त्यांच्या काही समस्या असतील तर त्याही सोडवण्याचा प्रयत्न करत असे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या समस्या सोडवू शकणार्‍या व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करून देत असे. ज्योती ही अभ्यासाच्या, नोकरीच्या आणि कौटुंबिक समस्यांतही विद्यार्थ्यांना मोठा आधार असे. कॉलेजमधली लग्न झालेली मुस्लिम मुलगी एकदा ज्योतीकडे आली. वेगळ्या राहणार्‍या नवर्‍याने गोव्याहून येऊन तिच्या तीन वर्षांच्या मुलीला पळवून नेले होते. तिला मुलीचा ताबा हवा होता. कोर्टाकडून तो मिळवण्यात प्रचंड वेळ गेला असता. ज्योतीने एका वकील मैत्रिणीच्या सल्ल्याने, आपल्या एका धाडसी मित्राच्या मदतीने गोव्यात जाऊन छोट्या मुलीला मुंबईला आणले आणि कोर्टाकडून तिचा कायदेशीर ताबा प्रस्थापित करून घेतला! महत्त्वाचे म्हणजे तिला पर्यावरण प्रश्नाच्या जागतिक समस्येचे भान कॉलेजमधील कामातून मिळाले. कॉलेजनेही ज्योतीला तिच्या कामात वेळोवेळी अनेक प्रकारचे सहाय्य केले.

स्त्रियांच्या आणि विशेषत: गरीब स्त्रियांच्या कोणत्याही समस्यांना सोपी, साधी उत्तरे नसतात. ती संस्कृती, धर्म, जात, समाज, अर्थव्यवस्था, राजकारण, पर्यावरण ह्यांच्याशी; तसेच स्थळकाळाशी निगडित असतात. समस्या अनेकदा वैयक्तिक पातळीवर व्यक्त होत असल्या तरी बहुतेक वेळेला त्यांचे स्वरूप व्यापक असते. स्त्रियांची गरिबी, बेकारी, अज्ञान, अशिक्षितता, अंधश्रद्धा, अत्याचार ह्या सर्व गोष्टींचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे हे ज्योती जाणते आणि म्हणूनच तिचे काम एकांगी नसते. सामाजिक-राजकीय क्षेत्रावर संकुचित आणि स्वार्थी मानसिकतेचा प्रभाव आहे. एकांगीपण आणि दुराग्रह ह्यांचा शापही अनेक चळवळींना मिळालेला दिसतो. अशा वेळी ज्योती त्यांपासून कशी काय दूर राहिली असेल असा प्रश्न माझ्या मनात नेहमी येतो.

ज्योतीच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू असंख्य आहेत. ते कोणी पाडले असतील? तिचे हे वैश्विक भान कोठून आले असेल? मला वाटते, ह्याचे उत्तर ज्योतीच्या बालपणाशी निगडित आहे. ज्योतीची सामाजिक तळमळ, गरिबांच्या स्थितीसंबंधीची काळजी आणि स्त्रियांचे होणारे शोषण असे अनेक पैलू लाल निशाण गटाशी बांधिलकी मानणार्‍या तिच्या आई-वडिलांकडून मिळाले असावेत. परंतु तिचे वास्तवाचे भान, प्रत्यक्ष व्यवहारातील काम हे सैद्धांतिक साम्यवादी तत्त्वांत बसणारे नाही. करुणा हा तिच्या मूलभूत पेशीरचनेचा डीएनए आहे. रचनात्मक, नाविन्यपूर्ण, सृजनशील कामाचा पसारा त्यातून निर्माण झाला आहे. आदर्शवादाने भारलेल्या लोकांना सहसा व्यावहारिक आणि व्यावसायिक बाबींबद्दल आकस असतो; आर्थिक व्यवहारांबद्दल तिटकारा असतो. परंतु ज्योती त्याला अपवाद आहे. तिला वास्तवातील सर्व प्रकारच्या मर्यादांचे भान असते आणि उपलब्ध साधनांमधून मार्ग काढून जास्तीत जास्त सामाजिक लाभ मिळवण्यासाठी तिची धडपड चाललेली असते. त्यामुळेच तिची सृजनशीलता, कल्पकता जितकी तिच्या गाणार्‍या गळ्यातून आणि नाटकातून व्यक्त होते, तितकीच ती तिच्या उद्यमशीलतेतूनही दिसते. ज्योतीला सातत्याने प्रोत्साहन देणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. त्यात शारदा साठे ह्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल आणि पतिराज सुभाष म्हापसेकर! तो स्वत: खासगी कंपनीत उच्चाधिकारी असूनदेखील निकडीच्या वेळी कार्यकर्त्यांप्रमाणे ज्योतीच्या मागे उभा राहतो. त्या दोघांना विवाहित मुलगी व मुलगा आहेत.

‘फोरम अगेन्स्ट सेक्स सिलेक्शन’ मार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवण्याचे प्रयत्न केले जातातज्योतीच्या कामामधून तिने अफाट लोकसंग्रह केला आहे. ‘मुलगी झाली हो’ नाटकातील ज्योतीच्या मुलीला सासरी जाताना संदेश देणार्‍या गाण्याने रडणार्‍या महिला तिच्या मैत्रिणी होतात. ती ‘परिसरविकास’मधील कचरावेचक महिलेच्या झोपडीतील घरी ज्या सहजपणे जाते तितक्याच सहजपणे ती मोठमोठ्या कंपन्यांच्या, बॅंकांच्या मुख्याधिकार्‍यांशीही नाते जोडते. कचरा वेचणार्‍या असंघटित महिलांसाठी अनेक मोठ्या कंपन्यांतील कचरा व्यवस्थापनाचे काम मिळवणे हे तिला सहज जमते. त्याच बरोबर नागरी प्रशासकीय अधिकारी, सरकारी अधिकारी, सचिव आणि डॉ.अनिल काकोडकर ह्यांच्यासारख्या जगप्रसिद्ध वैज्ञानिकांशी तिचे असलेले सौहार्दपूर्ण संबंध हे आश्चर्यचकित करणारे वाटतात. काही ना काही शिकत राहणे, स्वत: कोणत्याही वैचारिक सापळ्यात न अडकणे आणि त्यासाठी स्वत:मध्ये सातत्याने बदल घडवणे हे ज्योतीचे वैशिष्ट्य आहे. स्वत:च्या आणि संघटनेच्या क्षमता वाढवत नेणे – त्यासाठी संगणक, इंटरनेट ह्यांसारखी अद्यावत माध्यमे वापरणे, व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आर्थिक व्यवस्थापनाचे, वैज्ञानिकांकडून विज्ञानाचे, तंत्रज्ञांकडून तंत्रज्ञानाचे आणि कलाकारांकडून कलेचे धडे सातत्याने घेत असणे हा तिच्या कामाचा गाभा आहे. त्यासाठी तिची चौफेर अक्षरश: लगबग चालू असते. अनेक व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी तिला मदत करायला आणि ‘परिसरविकास’, ‘स्त्री मु्क्ती संघटने’त अनुभव घेण्यासाठी देश-परदेशांतून येतात तेव्हा ती त्यांच्याकडून संघटनेच्या कामाचेही ऑडिट करून घेत असते. कामे सोपी आणि चांगली करणार्‍या नवनवीन तंत्रज्ञानाशी तिची झटकन मैत्री होते. तिला आलेल्या इ-मेलची उत्तरे तर ती देतेच, पण त्या माहितीच्या जाळ्यातही ती सातत्याने नेटवर्किंग करून लोकांना जोडून घेत असते.

मी ज्योतीला तीन दशकांपेक्षा जास्त काळ ओळखते. चारचौघींसारखी, साधी भासणारी, नोकरी-घरसंसार हे सर्व सांभाळून ‘स्त्री मुक्ती संघटने’चे काम करणारी ज्योती किती विलक्षण आहे, किती वेगळी आहे हे आम्हा मैत्रिणींना सतत जाणवते. शाश्वत विकासाची संकल्पना वास्तवात आणण्याचे प्रयत्न जगभर होत आहेत. आर्थिक विकासाला सामाजिक विकास आणि पर्यावरण रक्षण यांची जोड देणे हे त्यासाठी आवश्यक मानले जाते. ज्योतीचे सामाजिक काम म्हणजे शाश्वत विकासाची संकल्पना व्यवहारात आणण्याची धडपड आहे. समाजातील सर्व घटकांशी सौहार्दाचे आणि सहकार्याचे संबंध हे ज्योतीच्या उद्योजकतेमधून गुंतवले जात असलेले मोठे भांडवल आहे. कार्यकर्ती ज्योती मोठी सामाजिक उद्योजक झाली आहे, पण ती सभोवतीच्या सर्वसामान्य महिलांसाठी कार्यकर्तीच आहे. ती सहजता तिने जपली आहे. समाजासाठी नफा मिळवणे हे तिचे ध्येय आहे, पण तो नफा केवळ पैशांमध्ये मोजता येणार नाही. तो ज्योतीच्या धडपडीतून मोजावा लागेल.

ज्‍योती म्‍हापसेकर
मोबाईल – 9867724529

सुलक्षणा महाजन,
८, संकेत अपार्टमेंटस, उदय नगर,
पाचपाखा़डी, ठाणे- ४०० ६०२
दूरध्‍वनी – 022 22662920, 22662957, भ्रमणध्वनी – 9819357358
Fax – 022 22626889
इमेल – sulakshana.mahajan@gmail.com

About Post Author

Previous articleगणपतीचे काही अप्रसिद्ध पैलू
Next articleटाळ
सुलक्षणा महाजन या आर्किटेक्ट आहेत. त्या शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांचे संशोधन करतात. त्यांनी जे जे कॉलेज, येथून 'बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची' पदवी 1972 साली मिळवली. त्यांनी आय.आय.टी. पवई येथून इन्डरस्ट्रियल डिझाईनची पदवी मिळवली. त्यांनी अॅन ऑर्बर, मिशिगन, यूएसए येथे नगर नियोजन शास्त्राचे अध्ययन 2000 साली केले. त्या मुंबईच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’च्या मुंबई ट्रान्‍सफॉर्मेशन सपोर्ट युनियनमध्ये सल्लागार आहेत. तसेच घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स् कन्सल्टंट, ठाणे या खासगी क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये‍ आर्किटेक्ट म्हणून नोकरी करतात. त्यांनी 'हॉबिटाट' या जागतिक संस्थेाच्या सस्टे‍नेबल सिटीज प्रकल्पातर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास केला आहे. त्यांची 'जग बदललं', 'अर्थसृष्टी : भाव आणि स्वभाव', 'लंडननामा' ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या 'महानगर', 'लोकसत्ता','सकाळ','आजचा सुधारक', 'साधना', 'दिव्य् मराठी' या दैनिकांत लेखन करतात.

5 COMMENTS

  1. very glad to hear this i am
    very glad to hear this i am extension officer industry at drda thane
    i will be very happy to meet you

  2. ज्योती म्हापसेकरांचं बाकी काम
    ज्योती म्हापसेकरांचं बाकी काम चांगलं आहे. पण त्यांनी लिहिलेलं समतेकडे वाटचाल हे नाट्य मनाला खटकतं..
    यात स्त्रीवादी चळवळींचा आलेख आहे. त्यात देशातील आणि परदेशातील स्त्री संघटना स्त्रियांच्या हक्काविषयी कशी जागरुकता आणत होत्या, ते सांगितलं आहे. पण राष्ट्रसेविका समितीचा उल्लेखही नाही. त्यामुळे माहिती अर्धवट वाटते.
    राष्ट्रसेविका समितीचं काम खूप मोठं आहे. स्त्रियांना आपल्या शक्तीची जाणीव तर करून दिलीच, पण त्याबरोबरच कुटुंब बांधणे, त्यायोगे राष्ट्राची उभारणी हे काम ही संघटना अतिशय समर्थपणे करते.
    ज्योतीताईंनी समितीच्या कामाचा व्यवस्थित उल्लेख त्यांच्या नाट्यात करावा, हा आग्रह…!

  3. अतिशय सुंदर काम आहे

    अतिशय सुंदर काम आहे. हार्दिक शुभेच्छा!

  4. ताई आपले काम प्रेरणादाई आहे
    ताई आपले काम प्रेरणादाई आहे . तमाम विकासापासून वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारे आहे पुढील कार्यास शुभेच्छा

Comments are closed.