साने गुरूजींचे साहित्य ‘कॉपीराइट फ्री’ झाल्यानंतर ते सर्व आता वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही अभिनव वेबसाइट चालवणार्या ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने ……
’थिंक महाराष्ट्र’चा उपक्रम
साने गुरूजींचे साहित्य ‘कॉपीराइट फ्री’ झाल्यानंतर ते सर्व आता वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही अभिनव वेबसाइट चालवणार्या ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने ‘www.saneguruji.net’ ही वेबसाइट तयार केली असून, ती सोमवार, 30 मे 2011 रोजी मराठी जनतेस अर्पण करण्यात येईल.
दादरच्या साने गुरुजी विद्यालयात सोमवार 30 मे रोजी सायंकाळी 6 वा. होणार्या समारंभात या वेबसाइटची झलक दाखवली जाईल. या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. शांती पटेल व र.ग.कर्णिक हे असणार आहेत. धारप असोशिएट्स या पनवेल-कर्जत भागात प्रामुख्याने कामे करणार्या विकासकसंस्थेने ही साइट स्पॉन्सर केली आहे. पूजासॉफ्ट टेक्नॉलॉजीने या साइटची निर्मिती केली आहे.
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या साइटवर गेले वर्षभर महाराष्ट्राचे कर्तृत्व व सांस्कृतिक संचित यांची नोंद केली जाते. आता ही नोंद दैनिक स्वरूपात होणार आहे. ‘दैनिक मल्लिनाथी’ व ‘चित्र महाराष्ट्राचे’ अशा दोन विभागांत प्रकट होणार्या नव्या स्वरूपातील ‘थिंक महाराष्ट्र साइट’चे प्रसारणदेखील 30 मे पासून सुरू होणार आहे. त्या ‘साइट’ची झलक किरण क्षीरसागर सादर करतील.
साने गुरूजी डॉट कॉम या साइटवर साने गुरूजींची सर्व पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. हे साहित्य सुमारे अकरा हजार पृष्ठांचं आहे. त्यातील कोणताही भाग, कोणताही वाचक केव्हाही साइटवर वाचू शकेल, अथवा डाउनलोड करून घेऊ शकेल. ते युनिकोडमध्ये असल्यामुळे संशोधनास सोपं झालं आहे. ‘श्यामची आई’पासून मुलांच्या छोट्या छोट्या पुस्तकांपर्यत सर्व साहित्य वाचकांच्या सतत नजरेसमोर राहील हा मोठाच लाभ होय, असे कार्यक्रम संयोजक आदिनाथ हरवंदे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, की रवींद्रनाथ टागोरांची दीडशेवी जयंती साजरी होत आहे. बंगालच्या सांस्कृतिक जीवनात रवींद्रनाथांना जसे अनन्यस्थान आहे तसेच स्थान महाराष्ट्राच्या भावजीवनात साने गुरूजींना आहे. योगायोग असा, की 30 मे रोजी साइटचे उदघाटन झाल्यावर लगेच 12 जूनला साने गुरूजींचा स्मृतिदिन येत आहे.