साधना व्हिलेज

carasole

मतिमंद प्रौढांना कौटुंबिक जिव्हाळ्याचे आणि हक्काचे घर' म्हणजे कोळवण खोर्‍यात वसलेले साधना व्हिलेज . मतिमंद मुलांना वाढवणे ही आईवडिलांना तारेवरची कसरत असते. अशा प्रौढांसाठी म्हणून 1993 मध्ये ‘साधना व्हिलेज’ची निर्मिती झाली. ‘साधना व्हिलेज’ सुरू करण्यामागे प्रौढ मतिमंदांना दुसरे घर मिळवून देणे, त्यांना अर्थपूर्ण आणि सन्मानाचे आयुष्य जगण्याचा हक्क मिळवून देणे हे उद्देश होतेच, पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्यासारख्या असलेल्या व्यक्तींबरोबर समानतेचे, मैत्रीचे आणि आनंदाचे जीवन जगण्याची संधी मिळावी हाही विचार होता.

चार घरे, त्यात राहणारे आमचे एकोणतीस ‘विशेष मित्र ’, त्या घरांच्या गृहमाता, सोबत राहणारे देशीविदेशी स्वयंसेवक, आजुबाजूच्या गावांतून दररोज कामाला येणार्‍या पंधरा-वीस मावश्या-काका, संस्थेचे इतर कार्यकर्ते असा ‘साधना व्हिलेज’ परिवार आहे. विशेष मित्रांची एकूण चार घरांतून, प्रत्येक खोलीत दोन अशी राहण्याची सोय आहे. प्रशस्त घर, व्हरांडे, स्वच्छ संडास-बाथरूम, हवेशीर खोल्या दिलेल्या आहेत. प्रत्येक घराला एक गृहिणी गृहप्रमुख असून, तिच्याकडे त्या त्या घरातील मुलांचे पालकत्व असते.

सर्वांची दिनचर्या ठरवून दिली गेलेली आहे. चहा, नाश्ता, जेवण यांच्या वेळा, व्यायाम, खेळाच्या वेळा ठरवून दिल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या कार्यशाळांतून त्या त्या व्यक्तीच्या कलाप्रमाणे त्यांना कौशल्य शिकवले जाते, काम दिले जाते. मेणबत्त्या करणे, कागदाच्या पिशव्या बनवणे, विणकाम-भरतकाम, टोपल्या बनवणे, बागकाम करणे यांचे तंत्र शिकवले जाते. त्यातून विक्रीयोग्य वस्तू बनवणे हा मुख्य उद्देश न ठेवता या मुलांसाठी ‘थेरपी’ म्हणून या कामांचा उपयोग जास्त होतो. इथल्या ‘विशेष मित्रां’नी फुलझाड, भाजीपाल्याचे मळे शास्त्रशुद्ध पद्धतीने लावलेले आहेत.  

या व्यतिरिक्त तेथे चित्रकला, संगीत, खेळ, समूहगान, योगसाधना, गोष्‍टी, खेळ यांसारख्या छंदांना जोपासले जाते. वाढदिवस, धार्मिक सण, राष्ट्रीय सण, उत्सव या सर्वांतून आनदांची देवघेव चालू असते. वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याची नियमित तपासणी यांवर कटाक्ष असतो. अनेक ‘विशेष मित्र’ संस्थेच्या दैनंदिन कामाचाही भार आनंदाने उचलताना आढळले. त्या सर्वांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा आहे. तिथ येणा-या पाहुण्यांबाबत ‘विशेष मित्रां’ना कुतूहल असते आणि ते पाहुण्यांशी संपर्क करायला उत्सुक असतात. सगळे जण सर्व कामे खेळीमेळीच्या वातावरणात करतात. आपापल्या कुटुंबापासून दूर असलेल्या ह्या व्यक्तींसाठी साधना व्हिलेज हेच हक्काचे, स्वत:चे असे घर आहे. सर्वांचे मिळून एक मोठे कुटुंब तयार झालेले आहे.

साधना व्हिलेज ’चे हे केंद्र पुण्यापासून चाळीस किलोमीटरवर ग्रामीण भागात वसलेले आहे. ‘विशेष मित्रां’ची वेगळी ‘कम्युनिटी’ निर्माण करताना त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटू नये; उलट, बाहेरच्या जगाने त्यांना स्वीकारावे या अपेक्षेतून आजुबाजूच्या खेड्यांतून ग्रामविकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली. यातून संस्था जवळपासच्या सर्व गावांशी जोडली गेली. महिला बचत गटापासून काम सुरू झाले. पंचायत राज्य, आरोग्य, कौटुंबिक हिंसा, आर्थिक बचत आणि नियोजन यांसारख्या मुद्यांवर प्रशिक्षण घेतले जाते. आमच्या चौदा आरोग्यसेविका आपापल्या गावांत कार्यरत आहेत. त्यांद्वारे महिलांचे मानसिक सक्षमीकरण हे मोठे काम होत आहे. या भागात कौटुंबिक हिंसेचे प्रमाण उग्र आहे. समुपदेशनातून त्याबद्दल काम सुरू आहे. गावक-यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचे महत्त्वाचे काम या संस्थेने केलेले आहे.

संस्थेने गावक-यांच्या मदतीने नदीवर बंधारे बांधले आहेत. शेतीसाठी पंप लावून सामुदायिक पाणीवाटप योजना अंमलात आणलेली आहे. संस्था स्त्रियांच्या सबलीकरणाकरता जागरूक आहे. गावांतून स्वमदत गट , बचत गट करून लहानमोठ्या उद्योगांसाठी पैशांचा पुरवठा करणे, घरगुती अत्याचारांविरुद्ध सावध राहून स्त्रियांना न्याय मिळवून देणे असे कार्य करत असताना संस्थेने गेल्या पाच-सहा वर्षांपासून आजुबाजूच्या गावांतील मुलांच्या शिक्षणाविषयीचे प्रश्न हाताळायला सुरूवात केली आहे. गावांमध्ये प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पूरक वर्ग सुरूवातीला चालवण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांचे कौटुंबिक प्रश्न जास्त तीव्रतेने पुढे आले आणि त्यातून ‘दत्तक पालक योजना’ सुरू झाली. सुमारे दीडशे गरजू मुलांना प्रायोजक पालक शोधून त्या मुलांच्या शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजा भागवल्या जातात. त्याशिवाय दहा गावांमध्ये दर रविवारी संस्थेतर्फे वर्ग चालवले जातात. हे वर्ग ‘खेळांतून शिक्षण’ या तत्त्वानुसार चालतात. गावागावातील तरूण मुला-मुलींना प्रशिक्षण दिले आहे. ते हे वर्ग चालवतात. त्यातून केवळ शालेय शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्वविकाससुद्धा साधायचा प्रयत्न होतो. एक विद्यार्थी-एक प्रायोजक योजनेला देश-परदेशांतून चांगला पाठिंबा मिळालेला आहे. याशिवाय कॉम्प्युटरवर्ग, ब्युटिपार्लर वर्ग असेही शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. संस्थेचा गावातल्या तरुण वर्गासाठी शैक्षणिक उपक्रम घेण्याचा विचार आहे. उदाहरणार्थ, फिनिशिंग स्कूल, कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आणि आजुबाजूच्या गावातील साडेतीन हजार कुटुंबांसाठी सर्व्हिस सेंटर.

या सर्व उपक्रमांतून सतरा ते वीस वयाच्या तीस-पस्तीस कार्यकर्त्यांची फळी गावागावांतून उभी राहिली आहे. यांतील काही मुली हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग यांसारख्या क्षेत्रांत शिक्षण घेत आहेत. काही मुलगेही यात उत्साहाने सामील झाले आहेत.

‘साधना इंग्लिश स्कूल’ – वाल्ड्रोफ शिक्षणपद्धतीवर आधारित पण भारतीय ग्रामीण संस्कृतीची नाळ न तोडता मुलांना सक्षम करणारी शाळा असावी असा शाळेचा प्रयत्न असणार आहे. तिस-या यत्तेपर्यंत सव्वाशे विद्यार्थी आहेत. सहा शिक्षक-शिक्षिका आहेत.

भारतातील आणि परदेशांतील अनेक संस्थांमधून तरुण कार्यकर्ते ‘साधना व्हिलेज ’मध्ये तीन ते सहा महिने राहून, संस्थेचे काम शिकून, संस्थेला आणि ‘विशेष मित्रां’ना मदत करतात, जवळपासच्या गावांसाठी आपल्या कौशल्याचा व ज्ञानाचा उपयोग करतात. संस्थेला नि:स्वार्थीपणे कायमस्वरूपी मदत करणा-या कार्यकर्त्यांची गरज जाणवते. पण पूर्णवेळ काम करू शकणारे कार्यकर्ते मिळत नाहीत ही सर्वात प्रमुख अडचण आहे.

संस्थेचा पत्ता :
साधना व्हिलेज,
1 प्रियांकित अपार्टमेंट,
लोकमान्य कॉलनी, पौड रोड,
वनाजसमोर, पुणे – 411038
020-25380792, 25381112,
9689917063/61/62/ 9850589088.
www.sadhana-village.org
adm@sadhana-village.org, sadhanavill@gmail.com

सतीश राजमाचीकर
smrajmachikar@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. सेवाभावी व ग्रामोपयोगी काम
    सेवाभावी व ग्रामोपयोगी काम अभिनंदनीय आहे. काही शिकण्यासाठी संस्थेला भेट लवकर देईल.

Comments are closed.