सातवाहन – महाराष्ट्रातील पहिले राजघराणे

1
294

सातवाहन हे महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले राजघराणे. त्यांचा कार्यकाळ इसवी सनपूर्व 235 ते इसवी सन 225 पर्यंतचा आहे. साधारणतः साडेचारशे वर्षे. सिमुक (श्रीमुख) या सातवाहन राजाने त्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली तर त्याचा पुत्र सिरी सातकर्णी (श्री सातकर्णी) या कर्तृत्ववान राजपुरुषाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. सातवाहन घराण्याच्या सिमुक सातवाहनानंतर राजगादीवर आलेला हा दुसराच राजा होता. असे असताना त्याने त्याच्या कर्तृत्वाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. त्याला केवळ अकरा वर्षे कारभार करता आला, पण त्या कालावधीत त्याने अनेक मोठे यज्ञ केले आहेत. त्या यज्ञांची माहिती घेतली तर त्यातून शक्ती प्रदर्शन, सार्वभौमत्व आणि साम्राज्यविस्तार यांचे संकेत मिळतात. राजाचे कर्तृत्व नागनिका राणीने कोरवून घेतलेल्या नाणेघाट लेण्यातून कळते. सातकर्णी राजाची राणी ‘नागनिका’ ही त्या काळातील पहिली कर्तबगार ज्ञात स्त्री. ‘निका’ म्हणजे स्त्री. नागनिका ही जन्माने नागवंशीय होती. त्या काळात महाराष्ट्रात नाग सरदार अनेक होते. त्यांना श्रीमुख सातवाहनाने महारठी ही पदवी दिली होती. नागनिका ही त्रनकयिरो नावाच्या सरदाराची कन्या होती. ती सातकर्णी राजाची राणी झाली.

त्या राणीची माहिती जुन्नरच्या वायव्येस अठ्ठावीस किलोमीटरवर असलेल्या नाणेघाट येथील लेण्यात मिळते. लेणे आकाराने फार भव्य नाही, तरी लेण्याला दोन बाबींमुळे महत्त्व प्राप्त झाले. एक तर सातवाहन कुळातील व्यक्तींच्या प्रतिमा त्या लेण्यात आहेत आणि दुसरे म्हणजे नागनिका राणीचा प्रदीर्घ शिलालेख तेथे आहे. त्या शिलालेखात सातकर्णी आणि नागनिका यांनी केलेले यज्ञ व त्याप्रसंगी दिलेले दान यांचा तपशील आहे. त्यात अनेक यज्ञांची नावे आहेत – वाजपेय, राजसूय, अश्वमेध (दोनदा), अग्न्याधेय, अनारंभणीय, गवामयन, भगलदशरात्र, आप्तोर्याम, अंगिरसामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसात्रिरात्र, शतात्रिरात्र अशी. त्या प्रसंगी दान म्हणून गाई, हत्ती, घोडे, रथ, कार्षापण नाणी, सोन्या-चांदीचे अलंकार यांचा उल्लेख आहे. त्या वस्तूंची नगसंख्यादेखील नमूद आहे.

सातवाहनांचा काळ जैन व बौद्ध या पंथांच्या आक्रमक विस्ताराचा आणि वैदिक पंथाच्या आकुंचनाचा होता. बौद्ध व जैन या पंथांच्या शांतिपूर्ण तत्त्वांमुळे भारतावरील परकीय आक्रमणे नव्याने सुरू झाली. ती मधल्या काळात थंडावली होती. एकेक राज्य परकीयांकडून गिळंकृत होत गेले. वैदिक धर्म नष्ट होईल की काय, अशी परिस्थिती होती. अशा वेळी सातवाहन राजांनी वैदिक संस्थेचा पुरस्कार व तिचे पुनरुज्जीवन असे काम केले. सातवाहन राजांचे कर्तृत्व एवढे होते, की त्यांनी ते कार्य अवघ्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत (इसवी सनपूर्व 196  ते इसवी सनपूर्व 185) साधले.

राजा व राणी यांनी एकत्रितपणे यज्ञ केले आहेत, तेव्हा स्त्रियांना धार्मिक कार्यात महत्त्वाचे स्थान होते. नागनिका ही आरंभापासून शासनव्यवस्था चालवण्यात सक्रिय सहभागी होती. सातकर्णी राजाचे निधन झाले तेव्हा तिला पूर्ण राज्याचा कारभार हाती घ्यावा लागला. तिचे पुत्र वयाने लहान होते. तिने पुत्रांना घडवत राज्याची धुरा उत्तम रीत्या सांभाळली. 

नागनिकेविषयी शिलालेखात म्हटले आहे, की ती अंगियकुलवर्धन कललायनामक महारठीची कन्या, अत्यंत श्रेष्ठ अशा सातकर्णीची भार्या आणि वेदश्री राजा व श्रीमान सती (शक्ती) यांची माता होती. तिने पतिनिधनानंतरही काही व्रतवैकल्ये केली होती व ब्राह्मणांना दानही दिले होते. नागनिकेने ताकदीने राज्यकारभार पाहिला व धर्मकार्ये चालू ठेवली. नागनिका आणि सातकर्णी यांचे चांदीचे संयुक्त नाणे 1976 मध्ये सापडले. त्यावर ब्राह्मी लिपीत नायनिका (नागनिका) व सिरी सातकर्णी (श्री सातकर्णी) ही नावे कोरलेली आहेत. जिच्या नावाचे नाणे काढले गेले अशी जगातील ती पहिली सम्राज्ञी असावी. नंतरच्या काळात ती वैराग्यपूर्ण व व्रतस्थ जीवन जगत होती.

सातवाहन राजांनी धर्मप्रसारार्थ निघालेल्या बौद्ध भिक्खूंच्या पावसाळी निवासाची सोय व्हावी म्हणून लेणी कोरण्यास साहाय्य केले. व्यापारी मार्गांवर लेणी खोदण्यास सातवाहनांच्या काळातच सुरुवात झाली. त्यांच्याच काळात ती सर्वाधिक खोदली गेली. त्यातून सातवाहन राजांची सहिष्णू वृत्ती दिसून येते.

सातवाहनांपैकी हाल या राजाचा काळ इसवी सन 21 असा मानला जातो. त्यांचे नाव संस्कृत आणि प्राकृत साहित्यात गाजत होते. त्याला कारण म्हणजे त्यांनी संपादित केलेला ‘गाहासत्तसई’ म्हणजेच ‘गाथासप्तशती’ हा सातशे गाथांचा संग्रह. त्यांनी लक्षावधी गाथांमधून त्या सातशे गाथा निवडल्या होत्या. त्या काळी लोकांच्या, विशेषतः ग्रामीण जनतेच्या मुखी असलेल्या गाथा म्हणजेच श्लोक किंवा सुभाषिते यांचा तो संग्रह. म्हणजे ते काव्य एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रातिनिधिक ठरते. त्यातील गाथांचे रचनाकार केवळ कवी नव्हते; अनेक कवयत्रींच्या गाथांचाही समावेश त्यात आहे.

सातवाहन कुळातील गौतमी बलश्री या राणीचे इतिहासातील योगदानही महत्त्वपूर्ण आहे. तिचा काळ इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहे. सातवाहन घराण्याचा प्रभाव क्षीण झाला होता. इसवी सन 35 ते 90 ही पन्नास-पंचावन्न वर्षे महाराष्ट्र प्रदेश शक सत्तेखाली होता. तशा प्रतिकूल काळात बलश्री गौतमी हिचा पुत्र गौतमी सातकर्णी इसवी सन 72 साली गादीवर आला. त्याचा प्रमुख शत्रू होता बलाढ्य शक क्षत्रप नहपान. त्याने सातवाहनांचे प्रदेश ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. शक, कुशाण, हूण हे लोक म्हणजे भारताच्या वायव्य सरहद्दीच्या वर राहणाऱ्या रानटी टोळ्या होत. त्यांना कोणतीही संस्कृती नव्हती. ते भारतात स्थायिक झाले तेव्हा त्यांनी बौद्ध पंथाच्या अनुसरणास सुरुवात केली. त्यांपैकी शक लोक भारतात आधी आले, परंतु त्यांच्यात राज्य स्थापन करण्याची कुवत नव्हती. ते त्यांच्या नंतर भारतात येऊन साम्राज्य स्थापणाऱ्या कुशाणांकडे सरदार (क्षत्रप) म्हणून राहिले. मात्र अशाच एका शक क्षत्रपाने स्वत:ची सत्ता काठेवाड, गुजरात, पश्चिम राजपुताना येथे स्थापन केली होती. नहपान हा त्याचा वंशज होय. त्याने त्याचा जावई उषवदात (वृषभदत्त) याच्या मदतीने थेट जुन्नर, कार्ले येथपर्यंतचा प्रदेशसुद्धा ताब्यात घेतला होता. गौतमीपुत्र त्याच्या विरुद्ध उभा राहिला, तो सातवाहन घराण्याची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करावी या निर्धाराने. त्यानुसार त्याने नहपानाच्या ताब्यातील एकेक प्रदेश मोकळा करून घेण्यास आरंभ केला. गौतमीपुत्राने उत्तरेस स्वारी करून नहपान व त्याचा जावई वृषभदत्त यांना रणांगणावर कंठस्नान घातले. गौतमीपुत्राने त्या युद्धात नहपानाच्या क्षहरात वंशाला निर्वंश करून त्यांचा शत्रू संपवला ! त्या विजयानंतर एका नवीन पर्वाची सुरुवात म्हणून प्रसिद्ध शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली. त्यानंतर त्याने दक्षिणेत शिरलेल्या परकीयांचा उच्छेद करावा या इराद्याने दक्षिणेत जेवढे म्हणून शक, यवन (ग्रीक), पल्हव (पर्शियन) होते; त्यांच्या विरुद्ध आघाडी उघडली. गौतमीपुत्राने महाराष्ट्राला परकीयांच्या सत्तेपासून मुक्ती देत सातवाहन घराण्याला पूर्वीची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

त्याची आई गौतमी बलश्री हिचे योगदान त्याच्या आयुष्यात फार मोठे होते. गौतमीपुत्र हा सातवाहन घराण्यातील पहिला राजा आहे ज्याने आईचे नाव लावले आहे. या राणीला महादेवी गौतमी बलश्री म्हणत. काही अभ्यासकांचे असे मत आहे की गौतमी, वाशिष्ठी हे शब्द राण्यांचे माहेरचे गोत्र दर्शक आहेत. त्याकाळी राजाला अनेक राण्या असत. म्हणून राजपुत्रांना राणीच्या गोत्रावरून ओळख दिली जाई. म्हणून बलश्री राणीचा पुत्र हा गौतमीपुत्र सातकर्णी म्हणून ओळखला जात असावा असे काही अभ्यासकांचे अनुमान आहे. परंतु दोन गोष्टी इतिहासकारांनी स्वीकारल्या आहेत – 1. महादेवी गौतमी बलश्री हे राणीचे नाव व 2. गौतमीपुत्र सातकर्णी हे तिच्या पुत्राचे नाव. इतिहास संशोधक वा.वि. मिराशी हे तर गौतमी बलश्री हिची तुलना त्यानंतर सुमारे दोन हजार वर्षांनी जन्मलेल्या शिवाजीमहाराजांना घडवणाऱ्या जिजामातेबरोबर करतात. त्या सम्राटाला इतिहासात आईच्या नावावरूनच ओळखले जाते. नावापुढे आईचे नाव लावणारा सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा पहिलाच राजा आहे. गौतमी बलश्री हिने नाशिकजवळील पांडव लेण्यांत पुत्राच्या प्रशस्तिपर शिलालेख कोरवून घेतला आहे.

‘पांडवलेणी’ टेकडीवर खोदली आहेत, तिला पूर्वी त्रिरश्मी टेकडी म्हणत. तेथे विविध कालखंडांतील एकूण चोवीस लेणी आणि सत्तावीस शिलालेख आहेत. तेथे नहपानाचे एक लेणे असून त्याचा मंत्री आयम याचा शिलालेखही आहे. गर्द झाडीने आच्छादलेली भरपूर पायऱ्यांची चढण चढत त्या लेण्यापाशी पोचावे लागते. त्यांतील क्रमांक तीनचे लेणे गौतमी बलश्रीचे आहे. त्या राणीला महादेवी गौतमी बलश्री म्हणत. ते ‘देवी लेणे’ या नावाने ओळखले जाते.

संदर्भ -महाराष्ट्र संस्कृती- लेखक: पु. ग. सहस्रबुद्धे, (महाराष्ट्र स्रोत), सह्याद्री – लेखक: सदाशिव आत्माराम जोगळेकर, महाराष्ट्र संस्कृती घडण आणि विकास – लेखक: ह.श्री. शेणोलीकर, प्र.न. देशपांडे

दीपा मंडलिक 9768801191 dvmandlik@gmail.com
(साहित्य, फेब्रुवारी-मार्च-एप्रिल 2023 वरून उद्धृत. संपादित-संस्कारित)

About Post Author

1 COMMENT

  1. वस्सतु संगहालय सांगली, हा लेख अप्रतिम सुंदर आहे, मला एक ऐतिहासिक नाणी व वस्तु संग्राहक म्हणुन खुप आवडला.सन्माननीय साहेब आपले व श्रीमान बाळासाहेब पाटील यांचे हार्दिक अभिनंदन.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here