साठमारी खेळ व त्यासाठी मैदान

0
149
_Sathamari_Maindan_1_0.jpg

साठमारी हा जुना खेळ आहे. तो भारतात फारच थोड्या ठिकाणी खेळला जात असावा. त्यातील एक होते कोल्हापूर संस्थान. साठमारी हा खेळ परदेशात खेळल्या जाणाऱ्या ‘बुल फाईट’सारखाच, पण त्याहून रोमांचकारी! खेळात एक मोठा बंदिस्त आखाडा असे, आखाड्यात काही अंतरावर संरक्षणाच्या दृष्टीने गोलाकार बुरुज (तटबंदी) असे. प्रत्येक तटबंदीला चार लहान दरवाजे असत. सर्व तटबंदीच्या भोवती खेळण्याला पुरेशी जागा असे.

खेळणारे वीर खेळाडू आखाड्यात उतरल्यानंतर तेथे मुख्य प्रवेशद्वारातून एक हत्ती सोडण्यात येई व ते दार बंद केले जाई. खेळाडू व हत्ती यांचा खेळ बंदिस्त आखाड्यामध्ये सुरू होई. खेळाडू हातातील भाल्याने हत्तीला टोचत व त्याला डिवचत. खेळाडूने त्याच्या अंगावर हत्ती धावून आल्यावर जवळच्या संरक्षित तटबंदीमध्ये घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे. हत्ती संरक्षित तटबंदीचे दार लहान असल्यामुळे आत जाऊ शकत नसे. दुस-या खेळाडूने तेवढ्या वेळेत हत्तीला दुसऱ्या बाजूने भाल्याने टोचायचे. हत्ती पहिल्याचा नाद सोडून देऊन दुसऱ्या खेळाडूच्या मागे धावे. जर का हत्तीने यदाकदाचित एखाद्या खेळाडूला पकडलेच तर त्याच्या सुटकेकरता, बाण व आपटबार (दारुकाम) घेऊन तयार असलेले लोक आपटबार उडवत व बाण हत्तीच्या अंगावर सोडत. त्यामुळे हत्ती घाबरून जाऊन पकडलेल्या व्यक्तीस सोडून देत असे. तरीदेखील काही वीरांना त्यांचे प्राण हत्तीच्या तावडीतून सुटू न शकल्यामुळे गमावावे लागले आहेत!

हजारो प्रेक्षक आखाड्यासभोवताली उंचावर बसून, हत्तीला हैराण करून त्याच्याबरोबर खेळण्याचा हा अत्यंत धाडसी खेळ पाहत असत. खेळातील वीरांचे कौतुक औत्सुक्याने केले जात असे. त्यांना इनामे देण्यात येत.

तसा खेळ कोल्हापुरात गेल्या सुमारे पाऊणशे वर्षांत खेळला गेलेला नाही. मंगळवार पेठेमधील शाहू स्टेडियमजवळ साठमारीचा खेळ होई. साठमारीचे नाममात्र अवशेष पाहण्यासही मिळतात.

खेळाला साठमार, साठमाऱ्या किंवा साठ्य असेही म्हणतात. खेळ भूतपूर्व कोल्हापूर व बडोदे संस्थानांत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोकप्रिय होता आणि तो खास पाहुण्यांसाठी विशेषतः इंग्रज गव्हर्नर वगैरेंसाठी प्रदर्शित केला जाई. त्या खेळातच डागदारी, हत्तींच्या टकरा इत्यादी प्रकारांचाही समावेश केला जाई. खेळासाठी भारी खुराक देऊन हत्ती तयार करत. त्यांना साठमारीच्या खेळाच्या वेळी दारू पाजून व ‘माजूम’ (साखर, बदाम, पिस्ते इत्यादी घालून बनवलेल्या भांगेच्या वड्या) खायला घालून बेफाम करत. हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी मस्तवाल हत्तीला खेळवणारी माणसे खास प्रशिक्षण देऊन तयार केली होती. मल्ल हत्तीचा मोहरा चुकवून त्याच्या पोटाखाली कधी कधी शिरत व त्याला जोरदार गुद्दे मारून हैराण करत.

हत्तीच्या झुंजीसाठी खास मैदान तयार केले जात असे, त्याला ‘अग्गड’ अशी संज्ञा होती. त्याला साठमारीचा आखाडा असेही म्हणत. अग्गड बडोदे येथे आहे. बडोदे येथील अग्गड सुमारे साडेतीनशे फूट (सुमारे. १०६.६८ मीटर) लांब व सुमारे दोनशेवीस फूट (६७ मीटर) रुंद अशा विस्तीर्ण जागेत असून त्याच्या मैदानाभोवती चारी बाजूंना पंचवीस फूट (७.६२ मीटर) उंचीचा तट बांधलेला होता. त्यात प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केली होती. मस्त हत्तीस अग्गडात आणण्यासाठी उत्तर-दक्षिणेस दोन मोठे दरवाजे ठेवलेले होते. ते भिंतीत बसवलेले वजनदार अडसर हत्ती आत येताच सरकावून बंद करत. त्याशिवाय तटाच्या भिंतीत काही ठरावीक अंतरांवर एकेकटा मनुष्य आत-बाहेर ये-जा करू शकेल अशी लहान दारे [ सात फूट (२.१३ मीटर) उंचीच्या कमानी] ठेवलेली आहेत. मैदानाच्या मध्यभागी गोलाकार, पण आतून मोकळा असा चाळीस फूट (१२.१९ मीटर) व्यासाचा लहान बुरुज आहे. त्याच्या आत जाण्यासाठी लहान कमानी दरवाजे आहेत. मस्त हत्ती साठमाराच्या अगदी जवळ आल्यास बचावाचा आपत्कालीन मार्ग म्हणून साठमार त्या कमानीतून बुरुजात शिरू शकत व दुसऱ्या बाजूने बाहेर पडून स्वतःचा बचाव करत. तसेच, साठमाराचा बचाव अग्गडाच्या एका बाजूस पस्तीस फूट (१०.६६ मीटर) व्यासाचा गोल कट्टा केलेला असून त्याच्याभोवती गोल फिरण्यानेही हत्तीपुढे पळणाऱ्याचा बचाव होऊ शकतो; कारण हत्ती समोर व सरळ रेषेत वेगाने धावू शकतो; तथापी तो त्याच्या बोजड शरीरामुळे वक्र गोलाकार रेषेत धावू शकत नाही. साठमाराला वाकडेतिकडे धावून त्याचा फायदा घेता येतो. खंडेरावमहाराज गायकवाड यांनी बडोदे येथे त्या खेळासाठी खास अग्गड बांधवून घेतले होते व सयाजीराव गायकवाडांनी सभोवतीच्या भिंतीवर प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधली होती. साठमारीचे आखाडे कोल्हापूरमध्ये व कोल्हापूर संस्थानात राधानगरी, सोनतळी, रूकडी आणि पन्हाळा येथे शाहू महाराजांनी बांधून घेतले होते.

कोल्हापुरातील खासबागेनजीकचा साठमारीचा आखाडा औरसचौरस असून दोनशे फूट (६०.९६ मीटर) लांब व दोनशे फूट (६०.९६ मीटर) रुंद असा आहे. सामान्यतः साठमारीचा आखाडा वर्तुळाकार असतो व त्याचा व्यास दोनशे फूट (६०.९६ मीटर) असतो. त्याच्या सभोवती पंधरा फूट (४.५७ मीटर) उंचीचा भक्कम दगडी कोट बांधलेला असतो. जुन्या वाड्यात ज्याप्रमाणे भिंतीतून जिने असतात, त्याप्रमाणे तटबंदीच्या ठरावीक अंतरावर एक माणूस शिरेल एवढीच दिंडी व आतून कोटावर जाता येईल असा कोटाच्या भिंतीतून जिना ठेवलेला असतो. ६०.९६ मीटर व्यासाचा जो आखाडा तयार होतो, त्यास खेळाचे ‘रंगण’ म्हणतात. रंगणामध्ये पोकळ व बळकट असे गोल बुरुज बांधलेले असतात. त्या बुरुजांना आरपार जाणाऱ्या दिंड्या असतात. खेळाचे सर्वसाधारण स्वरूप असे : मस्त हत्तीस रंगणात एका कमानीजवळ आणून उभे करतात. जवळच्या कमानीत उभे राहून साठमार हत्तीच्या मागच्या पायात बांधलेले साखळदंड सोडतात. त्याचवेळी साठमार हत्तीच्या पुढच्या पायांत असलेली काट्यांची पोची आकडीने काढतात. बिगुलाचा इशारा होताच हत्तीस मोकळे सोडण्यात येते. आजुबाजूस उभ्या असलेल्या साठमारांपैकी एक जण हत्तीच्या पुढे जातो व त्याच्या जवळचा भाला अगर डोक्यावरील रंगीत फेटा सोडून, तो हत्तीपुढे नाचवून त्याला डिवचतो. चिडलेला हत्ती त्या साठमारामागे धावू लागताच, दुसरा साठमार त्याला दुसरीकडून चिडवून त्याला त्याच्या स्वत:च्या अंगावर घेतो. तितक्यात तिसरा साठमार त्याच्याकडे हत्तीचे लक्ष वेधून घेत त्याला त्याच्यामागे धावण्यास भाग पाडतो. साठमाराने हत्तीला चिडवून त्यांच्या अंगावर घेणे व हत्तीला हुलकावण्या देऊन पळावयास लावणे ह्यात साठमाराचे साहस, कौशल्य व चपळपणा पणास लागतो. हत्तीही चिडून चिडवणाऱ्याच्या मागे सैरावैरा धावू लागतो. साठमाराने हत्तीला सर्व मैदानभर पळवण्यात व त्याच्यापासून स्वत:चा बचाव करण्यात खेळाची गंमत आहे.

हत्ती जरी स्थूल व अवाढव्य प्राणी असला तरी त्याची सरळ दौड मनुष्यापेक्षा जास्त वेगवान असते. म्हणून साठमार त्याला एकाच माणसाच्या मागे एकसारखे धावू देत नाहीत. दुसरा साठमार पहिल्याच्या बचावासाठी हत्तीचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेऊन त्याला त्याच्या अंगावर घेतो. अशा संकटप्रसंगी कित्येकदा साठमारास त्याचा भाला व फेटा जागच्या जागीच टाकून पलायन करावे लागते आणि स्वतःचा बचाव करावा लागतो; तर काही प्रसंगी अग्गडात दारुचे बाण सोडून व धुराच्या साहाय्याने हत्तीस घाबरवून साठमारास वाचवावे लागते. एखाद्या साठमाराच्या अगदी जीवावर बेतल्यास हत्तीच्या मागच्या पायांत चिमटे टाकून त्याला जेरबंद केला जातो व खेळ थांबवतात. हत्तीच्या पायांत चिमटे टाकण्याचे काम जोखमीचे असते, कारण बिथरलेला हत्ती अचानक मागे वळून चिमटे टाकणाऱ्या साठमारावर हल्ला चढवण्याचा संभव असतो. बडोदे व कोल्हापूर येथील साठमारीमध्ये मैदानपरत्वे थोडा फरक आढळतो; कारण कोल्हापूरच्या साठमारीत मैदानाऐवजी बरेच बुरुज आहेत.

(‘कुस्ती-मल्लविद्या डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून साभार)

About Post Author