Home व्यक्ती ‘सहित’चे संवत्सर नेमाड्यांच्या ‘नावे’

‘सहित’चे संवत्सर नेमाड्यांच्या ‘नावे’

sahit1

 अठ्ठावीस वर्षांचा किशोर शिंदे त्याच्या वयाच्या मानाने विविध कार्याने संपन्न वाटतो; आणि विशेष म्हणजे त्याचे काम मराठी साहित्य संस्कृती यांच्या प्रसाराला वेगळे, नवे आणि आधुनिक वळण देण्याचे आहे! तो बोलतो शांत, मृदू. तो जनसंपर्क अधिकारी म्‍हणून काम करतो, पण त्याला ओढ आहे मराठी साहित्याची . त्याने वयाच्या आठव्या वर्षापासून मराठी साहित्य वाचनास सुरुवात केली आणि सोळाव्या वर्षी ‘कोसला’ वाचली तेव्हा तो सर्दावून गेला! त्याला बोरकरांपासून ग्रेसपर्यंतचे कवी मुखोद्गत आहेत. त्याचे कवितेवर, विशेषत: ग्रेसच्या काव्यावर जरा जास्तच प्रेम आहे.

 मराठी चित्रपटांना प्रसिद्धी या व्यवसायात जम बसून पुण्यात स्थिरावल्यावर, त्याने त्याचे जुने स्वप्न काव्यदर्शिका म्हणजे कवितांचे कॅलेंडर दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केले. प्रसिद्धिपटूच तो! त्याने कॅलेंडरची दोन हजारांची आवृत्ती महिनाभरात संपवली. त्याने गेल्या वर्षी निवडक कवयत्रींच्या कवितांचे कॅलेंडर प्रकाशित केले. लक्षात ठेवा, त्याची ही हौस; व्यवसाय नव्हे, पण ती स्वावलंबी, स्वखर्चपूर्ण होईल हा त्याचा कटाक्ष होता.

 तो सांगतो, की त्याने कवितांच्या कॅलेंडरची कल्पना सहा वर्षांपूर्वी कवी ग्रेस यांच्याजवळ बोलून दाखवली होती. त्यावेळी किशोर मुंबईत ‘तरुण भारत’मध्ये पत्रकार म्हणून नोकरी करत होता. ग्रेस म्हणाले, की ‘‘हे भलते साहस अकाली करू नकोस. प्रथम आयुष्यात स्थिर हो!’’ किशोरने ती अवस्था तीन वर्षांत गाठली आणि कॅलेंडर निर्मितीचा संकल्प सोडला. तो दोन वर्षे पूर्ततेस नेला. त्यानंतर वर्ष आले ते होते भालचंद्र नेमाडे यांच्या अमृतमहोत्सवाचे आणि ‘कोसला’च्या सुवर्ण महोत्सवाचे.

 किशोरने मनाशी धरले, की नेमाडे यांच्या या संवत्सरानिमित्ताने लेखकाच्या नावाने शक सुरू करू. एक लेखक एक वर्ष! पहिली बारी नेमाड्यांची. त्यात किशोरने अभिनवता आणली. नेमाड्यांच्या ‘कोसला’तील प्रवेश नेपथ्यासहित नाट्यरूपात बसवले, त्यांच्या ‘देखणी’ या कवितासंग्रहातील काही कविता निवडून त्यांचे सादरीकरण तयार केले. त्‍या दोन्ही साहित्यरूपांसाठी अनुरूप सेट तयार करवून घेतला व पहिला प्रयोग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगावच्या आर.पी.डी. कॉलेजात केला. त्याचे ‘एक लेखक – एक वर्ष’ आहे ऑक्टोबर ते सप्टेंबर!

 तो बेळगावचा प्रयोग संपवून मुंबईत आला तेव्हा मी त्याला मुंबईत भेटलो. त्याच्या चेहर्‍यावर झकास समाधान व शांतता होती.

 मला त्याला भेटायचे होते ते कवितांच्या कॅलेंडरसाठी. माझी रोजची सकाळ त्याच्या कॅलेंडरमुळे प्रसन्न होते हे त्याला सांगायचे होते. त्यातील अरुणा ढेरे यांचा चेहरा व त्यांची कविता मला फारच मोहक वाटतात. पण मी हे सारे बोलण्याआधी किशोरने त्याच्या ‘एक लेखक–एक वर्ष’ उपक्रमाची हकिगत सांगितली आणि मी त्याच्या साहित्यप्रेमाने चक्रावून गेलो. त्याच्या साहित्यप्रसाराला पूरक साहित्य बनवण्याच्या व ते लोकांपर्यंत नेण्याच्या उपक्रमातील अभिनवतेने मला आकर्षून घेतले. तो जे बनवत होता ते एक प्रकारे साहित्यप्रसाराचे मर्कंडाईझच म्हणायचे!

 ‘सहित’च्‍या प्रयोगात ‘कोसला’तील चार प्रमुख पात्रे – पांडुरंग सांगवीकर, मधुमिलिंद, गिरिधर आणि बबताबुवा यांच्या माध्यमातून कादंबरीतील प्रवेश साकार होतात. किशोरने पुण्यात गेल्यावर त्याचा ‘सहित’ ग्रूप बनवला आहे. त्याचे मुंबईचे जुने साथीदार त्याच्या सोबत आहेतच. त्यामुळे ‘सहित’ ही चळवळ वाटते.

 साहित्‍य नजरेसमोर ठेवून विविध उपक्रम राबवणा-या सहित प्रकाशनने नववर्षाचे स्वागत वेगळ्या स्वरूपात करायचे ठरवले आणि बालदिनदर्शिकेचीनिर्मिती केली. सहितने त्‍या दिनदर्शिकेत कविता, गाणी, चित्रे अशा विविध गोष्‍टींचा समावेश करून नावीन्‍यपूर्ण मांडणी केली आहे. कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्तेदिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. दिनदर्शिकेतअनंतभावेयांच्या छान छान कविता, गाणीचित्रेआहेत. आणि सोबत आहे एक कोरे पान. कोरे पान का बरे!तर लहान मुलांनी त्यावर चित्र काढून आपलीदिनदर्शिका रंगवावी यासाठी!दिनदर्शिकेतून मुलांच्‍या भावविश्वाची नवनिर्मिती करण्‍याचा सहितचा प्रयत्‍न दिसतो. तसेच लहान मुलांनी कायवाचावे,यासाठी प्रत्येक महिन्याचा खाऊदेखील आहे. या आगळ्यावेगळ्यादिनदर्शिकेचे प्रकाशन करण्‍यासाठी किशोर पाडगावकरांकडे गेला तो पराग कुलकर्णीला घेऊन. किशोरचा परागला दिलेला तो शब्‍द होता. पराग कविता करतो.त्‍याचा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हाहा काव्‍यसंग्रह सहितनेच प्रकाशित केला आहे. त्‍याचे औपचारिक प्रकाशनसुद्धा पाडगावकर यांच्‍या  हस्‍ते झाले.

 किशोर शिंदेने हा योग जुळवून आणला. त्‍यावेळी पाडगावकरांनीआपल्या शैलीत प्रेम म्हणजे काय, ‘म्हणजे राणी प्रेम करणं, ‘आपण पहिल्यांदाभेटलो तेव्हाया कविता वाचून दाखवल्‍या. पाडगावकरांनी त्‍यांच्‍या अनेक आठवणींना उजाळा दिला.

 किशोरचे शिक्षण घरच्या परिस्थितीमुळे नोकरी करत झाले. त्याला योगायोगाने पत्रकारितेची नोकरी करण्यास मिळाले. त्याचे वाचन होतेच, नोकरीमुळे लेखकांशी संपर्क आला. त्याने सहा वर्षे नोकरी केली ती ‘तरुण भारत’, ‘पुण्यनगरी’ या दैनिकांत. ती साहित्यवृत्तांसाठी प्रसिध्द वर्तमानपत्रे नव्हेत. त्यामुळे किशोरने व त्याच्या मित्रांनी साहित्याबद्दलची जादा ओढ ‘सहित’ नावाचे अनियतकालिक काढून भागवण्यास आरंभ केला. त्यामधून त्याचा मुंबईचा ‘ग्रूप’ घडत गेला. मग वेगळ्या सिनेमाचे आकर्षण. त्यातून फिल्म सोसायटींच्या कार्याशी परिचय. त्‍यात त्‍याने ‘सकाळ’मध्‍येही काही काळ पत्रकारिता केली. किशोरची अभिरूची अशी घडत गेली व तिचा झकाससा स्फोट नेमाडे यांच्या संवत्सरानिमित्ताने घडून आला.

 त्याने ‘नेमाडे संवत्‍सर’ कार्यक्रमाची योजना समर्पक केली. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते उद्घाटन, प्रभा गणोरकर-प्रवीण बांदेकर-वासुदेव सावंत-रणधीर शिंदे-गोविंद काजरेकर यांची समयोचित भाषणे व त्याने तयार केलेले सादरीकरण असा दिवसभराचा कार्यक्रम होता. बेळगावचे साहित्यप्रेमी, कॉलेजांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी अशा सुमारे अडीचशे मंडळींनी कार्यक्रमाची मजा लुटली. किशोर भरून पावला होता, परंतु कार्यक्रम संपत असतानाच आणखी आठ कार्यक्रमांसाठी बोलावणे त्याला मिळाले, कारण नेमाडे पंथाचे आजचे कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांची साथ त्याला मिळाली आहे.

 त्याने पहिली काव्यदर्शिका २०१० मध्ये प्रसिध्द केली. त्यात साठोत्तरी महत्त्वाचे कवी म्हणून करंदीकर , पाडगावकर , अरुण कोलटकर, शांता शेळके अशांचा समावेश होता. ‘सहित’ने काही पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांमधील विकास सबनीसांच्या ‘व्यंगनगरी’चा उल्लेख त्याच्याकडून वारंवार होतो. ‘व्‍यंगनगरी’ हे सहित प्रकाशनचे पहिले पुस्‍तक व पहिलेच ईबुक असल्‍याने त्‍या पुस्‍तकाबद्दलचा जिव्‍हाळा किशोरच्‍या बोलण्‍यातून व्‍यक्‍त होतो. ‘सहित’ प्रकाशनाच्‍या इतर पुस्तकांत हिरवे गाणे, दुराशा – परिवर्तनाच्या वाटेवर मुस्लिम समाज (अस्लम जमादार), सुपरस्टार खन्ना यांचा समावेश आहे.

 ‘सहित’ ग्रूप मूळ बारा-पंधरा जणांचा. त्यांपैकी बरेच सांताक्रूझच्या महानगर पालिका शाळेत शिकलेले. त्यात किशोरच्या पुण्यात झालेल्या स्थलांतरामुळे त्या शहरातील आठ-दहा जण सामील झाले आहेत. ही साखळी अशीच बांधली जाईल असा किशोरचा विश्वास आहे.

आशुतोष गोडबोले,
इमेल – thinkm2010@gmail.com

किशोर शिंदे,
सहित, पहिला मजला,
इरा इंटरप्राइजेस,
श्री चिंतामणी सोसायटी, १०२५-बी,
सदाशिव पेठ नागनाथ पार,
पुणे – ४११०३०

सहित, ४०२-A,
आनंदनगर, भालचंद्र नगरजवळ,
चंदनसार, विरार पूर्व,
मोबाइल – ८९८३४१२६४०
इमेल – edit.sahit@gmail.com , krrish.shinde@gmail.com

About Post Author

12 COMMENTS

  1. अनेक शुभाशिर्वाद.
    अनेक शुभाशिर्वाद.

  2. महाराष्ट्राच्या वॆचारिक
    महाराष्ट्राच्या वॆचारिक क्षेत्रात ज्ञानाचे नवे दालनाची मुहूर्तमेढीसाठि अभिनंदन।

  3. वाढ दिवसच्या लक्ष लक्ष
    वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

  4. खुपच सुंदर लेख सर ….
    खुपच सुंदर लेख सर …. किशोरच्याही कार्याचे खुप खुप कौतुक ….. माय मराठीची अशीच सेवा घडत राहो या शुभेच्छा …

  5. किशोर, तू खूपच वेगळ्या
    किशोर, तू खूपच वेगळ्या पद्धतीचे काम करत आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा!

  6. किशोरला लाख लाख शुभेच्छा…
    किशोरला लाख लाख शुभेच्छा
    अशीच प्रगती होवो ही सदिच्छा

Comments are closed.

Exit mobile version