शिवाजी माने. वय वर्षे सव्वीस. शाळेची पायरी सातवीपर्यंत चढलेला तरूण. त्याला बिकट परिस्थितीमुळे सातवीपुढे शिक्षण घेता आले नाही. अपुर्या शिक्षणामुळे, त्याच्या आयुष्याची नौका काही काळ भरकटली. तो गरिबीमुळे मोलमजुरी करत असे. शिवाजी कामाच्या शोधार्थ पुण्याच्या ‘आयुका’ पर्यंत पोचला आणि तेथेच त्याला आयुष्याला दिशा मिळाली. त्याने सफाई करता करता ‘आयुका’मध्येषकपरि युष्याची खरी दशिा विज्ञानखेळणी तयार करण्याचे कसब आत्मसात केले आणि त्याचा परिणाम असा, की आज निरनिराळ्या शाळा स्वतःहून, आनंदाने त्याला बोलावत आहेत. शिवाजी गावोगावच्या, ठिकठिकाणच्या शाळांतील मुलांना विज्ञानखेळणी तयार करायला शिकवत आहे. शिवाजीच्या घरचा चप्पलदुरुस्तीचा व्यवसाय तेथपासून… सफाई कामगार आणि आज विज्ञानखेळण्यांचा प्रशिक्षक येथपर्यंतचा त्याचा प्रवास रोमहर्षक आहे.
शिवाजीचे लहानपण लातूरच्या चाकोर तालुक्यातील जडाळा नावाच्या गावात गेले. चर्मकार हा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यांच्या घरी स्लीपर तयार करण्याचे मशीन होते. पण घरच्या व्यवसायात नुकसान झाले, मशीन विकावे लागले. वडील कर्जाच्या ओझ्याखाली आले. चार भाऊ, एक बहीण, आईवडील अशा मोठ्या कुटुंबाचा भार एकट्या वडिलांवर पडू लागला. एका शेजार्याने ‘केरळमध्ये ‘बुढ्ढी के बाल’, सोनपापडी तयार करण्याच्या कारखान्यात मुलांना काम देतो’ असे सांगितले. त्याने एका मुलासाठी वर्षाला पाच हजार रूपये देण्याची कबुली दिली. शिवाजीने नुकतीच सातवीची परीक्षा दिली होती. शिवाजी आणि त्याचा भाऊ प्रकाश या दोघांची केरळला रवानगी झाली. दोघा भावांचा वर्षभराचा पगार आधीच दिलेला असल्याने त्यांना पहाटेपासून रात्रीपर्यंत राबवून घेण्यात आले. दोघे भाऊ आपण घरासाठी राबतोय या भावनेने आनंदाने कष्ट उपसत होते. शिवाजी केरळहून परतताना आंध्रप्रदेशमध्ये कापसाच्या मिलमध्ये कापूस आणि बिया गोळा करण्याचे काम मिळवण्यासाठी हैदराबादला उतरला. तेथे कामगारांची भरती आधीच झाली होती! पुढे पुण्याला जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्याने आठ दिवस राबून पैसे जमवले आणि एका ट्रकवाल्याच्या मदतीने पुण्यापर्यंतचा प्रवास केला.
त्याने पुण्याला एका सिक्युरिटी एजन्सीत नोकरी पत्करली. मग एके ठिकाणी वेटरचे काम केले. तेथे स्वयंपाक शिकल्यानंतर अॅम्युनेशन फॅक्टरीत स्वयंपाक्याचे काम केले. त्यानंतर पुण्यातील सांगवी परिसरात एका चौकात हातगाडी लावून चप्पलविक्रीचा व्यवसाय करू लागला. त्यानंतर तो ‘आयुका’मध्ये सफाईकामगार म्हणून कामास लागला. शिवाजी ‘आयुका’मध्ये रमू लागला. मुक्तांगण विज्ञानशोधिकेची विज्ञानखेळणी बनवण्याची खोली त्याला आकर्षित करत असे. त्याची चौकस वृत्ती त्याला शांत बसू देत नव्हती. तो त्या विभागाचे केंद्रप्रमुख अरविंद गुप्ता, त्यांचे सहकारी विदुला म्हैसकर, अशोक रूपनेर, ज्योती हिरेमठ यांचे खेळणी बनवण्याचे काम पाहू लागला. पडक्या, फुटक्या, कच-यात टाकलेल्या वस्तूंपासून ही विज्ञाननगरी उभी राहिली याचे त्याला आश्चर्य वाटायचे! त्याने स्वत: विज्ञानखेळणी तयार करण्यास सुरूवात केली. त्याला खेळण्यांचे विश्व भुलवू लागले. अरविंद गुप्ता यांनी त्याच्या हातातील सर्जनशीलता ओळखली. त्यांनी शिवाजीला ‘हे काम पूर्णवेळ करणार का? ग्रामीण भागात जाऊन प्रात्यक्षिके द्यावी लागतील. यासाठी सहा हजार रूपये देतो, पण पूर्णवेळ यावे लागेल’ अशी विचारणा केली. शिवाजीला सहा हजार रुपये खूपच वाटले!
शिवाजी म्हणतो, ‘हे सहा हजार रुपये वर्षांचे असावेत असा माझा समज झाला. यावर गुप्तासरांनी हा पगार दरमहा देणार असल्याचे सांगितले आणि माझ्या डोळ्यांत पाणीच आले! माझ्यासारख्या सातवी पास मुलाला ही संधी देऊ केल्याबद्दल गुप्तासरांना काही जणांशी अक्षरशः भांडावे लागले.’ शिवाजीला विज्ञानखेळण्यांच्या सान्निध्यात काम करतानाच शिक्षणाची गोडी लागली आणि त्याचे महत्त्व कळू लागले.
गणित आणि विज्ञानाचे शिक्षण नसताना विज्ञानखेळणी बनवणे आणि ‘विज्ञानवाहिनी’च्या सोबतीने आठवड्यातून दोनदा महाराष्ट्राच्या विविध भागांतील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञानखेळण्यांचे प्रशिक्षण देणे ही कामे शिवाजी करत आहे. त्याला विज्ञानातील अनेक नियम पक्के माहीत झाले आहेत.
शिवाजीची ज्या ‘आयुका’च्या परिसराशी ओळख सफाईकामाच्या निमित्ताने झाली, त्याच ‘आयुका’ने शिवाजीला वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी दिली आणि त्याने त्या संधीचे सोने केले! ‘आयुका’मध्ये शिवाजीला भेटायला गेले, तर तो आनंदाने आपले स्वागत करतो आणि आपल्याला त्याच्या खेळण्यांच्या जगात घेऊन जातो. आपल्यासमोर तुटक्या, फुटक्या वस्तूंपासून एखादे खेळणे झटकन तयार करून दाखवतानाचा त्याचा आनंद शब्दातीत असतो. विज्ञानाच्या अनेक संकल्पना तो अशा सोप्या पद्धतीने समजावतो, की जणू काही शाळेतल्या विज्ञानाच्या तासाची सफरच! मग एकदम तयार केलेली ती विज्ञानमयी वस्तू सहजासहजी मोडून तो ‘करून पाहणार का?’ असा प्रश्न करतो. शिवाजीला भेटायला, कधीही जा, असा अनुभव येणार यात शंकाच नाही.
इंग्रजी भाषा येत नसली तरी तो इंग्रजी शाळेत आत्मविश्वासपूर्वक वावरतो. विज्ञानाच्या संकल्पना, परिभाषा इंग्रजीतून सांगून उर्वरित माहिती हिंदीतून देतो. पुढल्या वर्षी पुन्हा त्या शाळेत गेल्यावर सगळेच जण त्याला ओळखतात आणि मागील वर्षी काय काय शिकलो याची न विचारता उजळणी होते.
‘आयुका’त शिवाजीला भेटायला गेल्यावर त्याचा संवाद खेळण्यांपासूनच सुरू होतो. निरनिराळे खेळ दाखवत विविध संकल्पना तो आपल्याला सांगू लागतो. लहान मुलांना खेळणी मोडून ती कशी तयार झाली आहेत हे पाहण्याची उत्सुकता असते. बाजारातली खेळणी मोडता येतात, मात्र पुन्हा जोडता येत नाहीत. विज्ञानखेळण्यांचे तसे नसते. विज्ञानखेळणी सायकलची ट्यूब, सीडी, तुटलेली चप्पल, पाण्याच्या बाटल्या, कागद अशा घरातील ऐंशी टक्के टाकाऊ वस्तूंचा वापर करून बनवलेली असतात. त्यामुळे मुलांच्या जिज्ञासू वृत्तीसोबत त्यांच्या कल्पकतेलाही वाव मिळतो.
शिवाजीने विज्ञानखेळण्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतेक गावे पालथी घातली आहेत. त्याचबरोबर त्याने बंगलोर, गुजरात येथेही शिक्षकांना खेळणी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. गुजरातमध्ये तर त्याने तीन हजार मुले आणि दोनशे शिक्षकांची कार्यशाळा घेतली होती. शिवाजीने आतापर्यंत महाराष्ट्रातील दीडशेहून अधिक शाळांना भेट दिली असून दोनशेपेक्षा जास्त कार्यशाळाही घेतल्या आहेत. अखिल भारतीय चर्मकार संघाकडून २०११ साली ‘संत रोहिदास पुरस्कार’ देऊन त्याचा गौरव करण्यात आला. याच वर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्नी उमासोबत महर्षी कर्वे बचतगटाच्या मार्फत खेळणी बनवून विक्री करण्याचे काम शिवाजी करत आहे. त्याच्या लहानशा खोलीत खेळण्यांचा पसारा आहे. शिवाजी आणि त्याच्या कुटुंबाला हा पसाराच जास्त प्रिय वाटतो. खेळण्यांनी त्याचं आयुष्य घडवलं आहे.
न्यूटनला ज्या सफरचंदाच्या झाडाखाली गुरूत्वाकर्षणाच्या नियमाचे ज्ञान झाले त्या सफरचंदाच्या झाडाचे एक बीज आयुकात लावण्यात आले आहे. त्याच ‘आयुका’च्या सान्निध्यात आल्यावर विज्ञानापासून अनभिज्ञ असलेल्या शिवाजीला ते ज्ञान व्हावे आणि त्याच्या आयुष्याची निश्चित दिशा ठरून जावी हा न्यूटनच्या शोधाइतकाच योगायोग नाही का!
शिवाजी माने
ए-56, राजीव गांधीनगर,
पिंपळे गुरव, पुणे – ४११०२७
भ्रमणध्वनी : ९९२२६८८०३९, इमेल : shivajigmane@gmail.com
आयुका – मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र, पुणे विद्यापीठ परिसर,
– हिनाकौसर खान
* पुणे विद्यापीठ परिसरातील ‘आयुका’मध्ये मंगळवार आणि गुरूवार या दिवशी विज्ञानप्रेमी आबालवृद्धांसाठी मोफत कार्यशाळा घेण्यात येते. ‘आयुका’ची ही विज्ञाननगरी शालेय मुलांनी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळात फुलून गेलेली असते. यामध्ये विज्ञानखेळणी पाहण्याबरोबरच ती तयार करण्यासही शिकवले जाते. *
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्याच्या पत्रकार. त्यांनी दैनिक ‘लोकमत’मध्ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी ‘युनिक फिचर्स’च्या ‘अनुभव’ मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या ‘डायमंड प्रकाशना’मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्या व्यक्तीमत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे. त्या प्रामुख्याने स्त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘नाशिक जिल्हा संस्कृतिवेध’ 2016 मध्ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत ‘तीन तलाक विरूद्ध पाच महिला’ हे पुस्तक ‘साधना’कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना ‘बुकशेल्फ’ नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत.
Naava pravanech Kastache sone
Naava pravanech Kastache sone kele
Khoopach chan. Ashyach
Khoopach chan. Ashyach pragatichya, unnatichya samaj prabhodanachya goshti prasarit karat ja. Dhanyawad!
Khoopach preranadayi
Khoopach preranadayi vyaktimattwa shivaji mane.
Shivaji the Great … !!!
Shivaji the Great … !!! proud of you Shivaji …. !!!
खरा लोकवैज्ञानिक
खरा लोकवैज्ञानिक
Comments are closed.