मराठी कवयित्री सरोज जोशी यांना मराठी भाषा दिनी, 27 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर काहीसा आकस्मिक मृत्यू आला. त्या त्याआधी तीन महिने हॉस्पिटलात होत्या. पडल्याचे निमित्त झाले. त्यांचा मणका दुखावला व त्यांना बेड रेस्ट सुचवण्यात आली आणि त्यांना बिछान्यावर पडून राहवे लागले. कधी त्या वेदनेने व्याकुळ होत. त्यांची तीन महिने काळजी त्यांच्या मैत्रिणींनी घेतली. आधी, साधना वझे त्यांना ठाण्याला डॉ.इंगळहळीकर यांच्या हॉस्पिटलात घेऊन गेल्या. तेथे त्या तीन आठवडे राहिल्या. त्यांचे ऑपरेशन शक्य नाही हे तेथे ध्यानी आले, तेव्हा त्यांना चेंबूरच्या राणे रुग्णालयात आणले गेले. ते त्यांचे हक्काचे ठिकाण होते. डॉ. संदीप राणे यांनी त्यांना तसा परवाना दिला होता. राणे हे स्वतः समाजभावी डॉक्टर. कार्यकर्ते व साहित्यिक यांचा त्यांच्याकडे मुक्त वावर असतो. ते स्वतःही पेस्तम सागर भागाचे प्रश्न घेऊन लढत असतात. सरोज जोशी त्यांच्या बाजूच्या गल्लीत राहत. त्या शहाऐंशी वर्षांच्या होत्या.
सरोज जोशी यांना भेटण्यास त्यांच्या मैत्रीण रश्मी दिघे या 27 फेब्रुवारीच्या संध्याकाळी हॉस्पिटलात गेल्या, त्या कुसुमाग्रजांच्या कविता घेऊन. त्यांचा बेत कविता हॉस्पिटलात सरोज जोशी यांच्यासमोर वाचायच्या असा होता. कवितावाचन हा सरोज जोशी यांचा सगळ्यात आवडता कार्यक्रम, पण त्या दिवशी मूड जमला नाही. मग भाषा दिनाचे औचित्य साधण्यासाठी रश्मी दिघे यांनी सुरेश भट-कौशल इनामदार यांची महाराष्ट्र गीताची कॅसेट लावली -लाभले आम्हास भाग्य! ती ऐकताना पुन:पुन्हा रमायला होतेच. दोघी त्यात गुंग झाल्या. त्याच पहाटे दोन वाजता सरोज जोशी यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू ओढवला. हॉस्पिटलने पहिली खबर त्यांची ‘केअरटेकर’ मैत्रीण अश्विनी रानडे हिला दिली. तिने सोयीच्या अंतरावर असलेल्या मित्रांना निरोप दिले. तोपर्यंत कोरोनाचे सावट महाराष्ट्राच्या अवकाशात आले होते. सरोज जोशी यांचा अंत्यविधी मोजक्या पाच-सात मंडळींच्या उपस्थितीत झाला.
सरोज यांना दोन मुली, एक मुलगा. मोठी सुषमा परांजपे चर्चगेटला राहते. तो जावई काळजी करणारा होता, पण त्याचा मृत्यू काही वर्षांपूर्वी झाला. सरोज यांची दुसरी मुलगी डॉ.स्वरूपा गद्रे आणि मुलगा सुव्रत अमेरिकेत सुखाने ‘सेटल’ झाले आहेत. स्वरूपाने खटपट करून, आग्रह धरून सरोज यांचे ग्रीनकार्ड वर्षापूर्वीच मिळवले होते. तोच तर सरोज यांचा डायलेमा होता. त्यांना तिकडे राहायचे नव्हते. सारख्या म्हणत, सगळे आटोपून तिकडे जावे का? पण माझे जग तर इकडे आहे!
त्यांचे जग कवितेचे होते. त्यांचे पतिराज तंत्रोद्योगी होते. त्यांचे निधन पंधरा-वीस वर्षांपूर्वी झाले. त्यानंतर सरोज त्यांच्या चेंबूरच्या घरी एकट्या मस्तीत राहिल्या. त्या रत्नागिरीच्या आणि सासर राजापूरचे. ते ऐश्वर्य, तो नेटकेपणा त्यांच्या राहणीत दिसे. त्यात मुलानातवंडांची आठवण मोजकी असे, पण कृष्णाची आठवण फार! त्या लीला त्यांना मोह घालत. तसा त्यांनी कृष्णगीतांचा कार्यक्रम (कदंबाच्या झाडाखाली) रचला, वर्षा भावे यांच्याकडून सादर करवून घेतला, दोन-तीन कार्यक्रम झाले. त्यांनी त्यासाठी लाखभर रुपये तरी खर्च केला. त्यांचे कविता व कथासंग्रह नंतर तसेच प्रकाशित झाले. त्यांचा शेवटचा संग्रह – ‘फिदा स्वतःवर’. ते शीर्षक फार योग्य आहे. ती त्यांची वृत्ती होती. ती त्यांनी कवितेच्या माध्यमातून छान जपली. त्या लौकिक आयुष्य कोकणस्थी व्यवहाराने जगल्या, पण कवितेत सतत हरवलेल्या राहिल्या. त्या ओढीनेच त्यांनी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’ची चेंबूर शाखा काढली, कवी मित्रमैत्रिणींचा गोतावळा जमा केला. त्यांनी ‘ग्रंथाली‘साठी कवितेचे व्यासपीठ नियमित काही वर्षे चालवले. त्यांचे लेखन मुख्यतः ‘रुची‘त प्रसिद्ध होई. त्यांनी त्यांचा शेवटचा लेख माझ्यावर ‘नव्या युगाचा नवा शिपाई’ या नावाने गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात लिहिला.
ती बाई तीन कर्ती मुले असून एकटी राहिली – एकाकी, रसिकतेने मनमोकळी जगली; तिने जिवंतपणी छोटेमोठे हेवेदावे केले, पण तिचे लक्ष तिकडे नसेच. सरोज जोशी यांच्यासाठी शोकसभा चेंबूरला ‘कोरोना‘च्या छायेतच झाली. त्यावेळी त्यांचा टेक्नॉलॉजी प्रवीण मुलगा सुव्रत अमेरिकेतून आला होता. त्याने आईची आवडती कविता ‘डॅफोडिल्स’ म्हणून दाखवली. तो म्हणाला, की मलाही आईसारख्या कविता आवडतात. माझी इच्छा आहे कविता करण्याची -त्या इंग्रजीत असतील! कविता हा भावनाशील वृत्तीचा उद्रेक असे म्हणतात. ती वृत्ती सरोज जोशी यांच्या निवडक नातेसंबंधांत जाणवली, जेथे कविता होती. एरवी त्या बाई एकट्या आल्या, एकट्या जगल्या, एकट्या गेल्या असेच शोकसभेतील भाषणे ऐकून वाटले. सभेचा शेवट होत असताना स्मिता राजे म्हणाल्या, की आपण वेगवेगळी माणसे संबंधित एकाच व्यक्तीला किती वेगवेगळ्या तर्हांनी ओळखत असतो. प्रत्येकाची स्मृती वेगळी, संदर्भ वेगळे! खरे तर, हे सारे ती व्यक्ती हयात असताना, तिच्यासमोर उलगडले जाणे अधिक योग्य ठरेल! तेवढा मोकळेपणा आजच्या समाजजीवनात आला आहे. मला राजे यांची सूचना विचार करण्यायोग्य वाटली.
– दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
————————————————————————————————————
सरोज जोशी अमेरिकेत मुलीकडे असताना
|
जोशी यांची पुस्तके |
सरोज जोशी ह्यांचे काळाच्या पडद्याआड जाणे खूपच चटका लावणारेआहे .परंतू त्यांच्या काव्यसंग्रह कथासंग्रह ह्या रुपात त्या सर्वांच्याच लक्षात राहतील .सौ. अंजली आपटे.
सुंदर!
बाप रे ! हा धक्का आहे. करोनाच्या ह्या हाहाकारात सरोज बाईंचे जाणे असे झाकोळून जावे.? खरेतर त्या अमेरिकेत न राहता इकडे आल्या त्या कवितेत रमायला !आणि किती प्लॅन्स केले होते त्यांनी कार्यक्रमांचे !बाप रे ! सरोज जोशी बाई गेल्या? विश्वासच बसत नाही. कोणीच कसे कळवले नाही. की कोणालाच कळले नाही? त्यांना सदगती मिळो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो असं कसं म्हणू? त्यांचा आत्मा तर इथेच खुटमळत असेल. सॉरी सरोज मॅडम, सॉरी. अमेरिकेतून परत आल्याची बातमी किती उत्साहाने सांगितली होतीत मला.आपले भेटायचे राहून गेले. आणि अशी तुमची बातमी येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. उगाच अपराधी वाटू लागलेय. आणि हतबल.
करोनाने दिलेला पहिला झटका… अत्यंत हृदयद्रावक.
27 फेब्रुवारीला गेल्या म्हणजे करोनाचे हे भयानक सत्र सुरु व्हायच्या खूप आधी गेल्या. मग त्यांच्या जाण्याची बातमी कशी नाही?
त्यांचे मंद स्मित खूप बोलके होते ..ग्रंथालीच्या अनेक कार्यक्रमातून त्यांना ऐकले पहिले होते
सरोजताई उत्तम साहित्यिक तर होत्याच. मला त्या भेटायच्या माझ्या बहिणीकडे, समारंभात. नाजूक चेहरा, मंद स्मितहास्य, अभिरूची कपड्यात, मोजक्या दागिन्यांत समजून यायची. एका सहृदय, वरकरणी कोमल पण एकटेपण आनंदाने स्वीकारणाऱ्या, नव्हे, निवडणाऱ्या स्त्रीला मनःपूर्वक श्रद्धांजली !
अनुराधा ठाकूर