मुंबईच्या वाकोला पोलिस स्टेशनात सहाय्यक पोलिस निरीक्षकाने गैरहजेरीची नोंद करण्याच्या मुद्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व स्वत: आत्महत्या केली. अधिकारीदेखील गोळ्यांना बळी पडले… ही मुंबईत घडलेली ताजी घटना. वाकोल्याच्या या घटनेनंतर, त्यात हत्या-आत्महत्या असली तरी तो गुन्हा नव्हे हे मुख्यमंत्र्यांनी जाणले व पोलिस खात्यास जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञांकडून मानसोपचार उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे! ही वेडाचाराची घटना अपवादात्मक आहे का? मुळीच नाही. थोडे बारकाईने पाहिले तर सहज तर्क लावता येत नाही अशा घटना-प्रसंग व्यक्तींच्या व सार्वजनिक व्यवहाराच्या संबंधात वेळोवेळी घडताना दिसतात. गेल्या वर्ष-दोन वर्षांतील अशा तीन घटना डोक्यात रुतून बसल्या आहेत. त्यांचे सहज स्पष्टीकरण देता येत नाही. त्यांबाबत त्या त्या वेळी मानसोपचारतज्ज्ञांचे भाष्य प्रकट झाले, पण त्यातून मनाचे समाधान झाले नाही. घटना सहजपणे नोंदतो –
… प्राध्यापकाने स्वत: च्या प्राध्यापक पत्नीला व मुलांना ठार मारून स्वत:स भोसकून घेतले.
… वसतिगृहाच्या अधीक्षिकेने, ती जिची पालक शोभेल अशा दहा वर्षांच्या मुलीला तिचेच मूत्र पिण्याची शिक्षा फर्मावली. मुलीचा गुन्हा काय? तर तिने गादीत शू केली.
… एस.टी.च्या ड्रायव्हरने बस ताब्यात घेऊन ती शहरातील रस्त्यांवरून हवी तशी फिरवत अपघात घडवून आणले; त्यात काही माणसे हकनाक बळी गेली. (त्या केसचा पुढे निकाल लागला)
मी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होणा-या, दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरून सांगितल्या-दाखवल्या व त्यानंतर रंगतदारपणे चर्चिल्या जाणा-या अशा बातम्या स्वेच्छेने वाचत नाही-पाहत नाही-ऐकत नाही. परंतु त्या नजरेत येतात-डोळ्यांसमोर दिसतात-कानांवर पडतात. त्यामुळे माझ्या मेंदूला भिडतात-पण मी त्या ‘जाणत’ नाही. आता तर, मला त्या नकोच असतात.
मी असंवेदनशील आहे का? मला तशी भीती कधी कधी वाटते. मी तसा असणार, कारण या प्रत्येक वेळी मी काही केले नाही. मी जगतोय, लग्ने-मुंजी-बारशांना जातोय-गोडधोड खातोय-सत्कार समारंभ पाहतोय-त्यांतील गौरव काही वेळा स्वीकारतोयसुध्दा! जवळपासच्या काही सभा-चर्चांना हजर राहतोय, जैतापूरपासून जागतिक मंदीपर्यंतचे परिसंवाद ऐकतोय व दूर असणारे सायना नेहवालचे विजय साजरे करतोय.
पण माझ्या एक लक्षात आले आहे, की या सर्व काळात मी अस्थिर आहे, अस्वस्थ आहे. माझ्या जिवास शांतता नाही. काही व्यक्तिगत कारणांनी, काही सार्वजनिक कारणांनी. मला त्याचा उलगडा होत नाही असे वाटते.
या अशा माहोलातदेखील…
… माझ्या मनात सतत राजुल वासा असते. तिला एकच ध्यास आहे की सेरिब्रल पाल्सीमुळे (अर्भकावस्थेतील मेंदुविकार) व पक्षाघातामुळे उध्वस्त झालेली कुटुंबे त्यांच्या पेशंटना बरे करून सावरायची. त्यासाठी तिच्याजवळ मात्रा आहे-साधनसंपत्ती आहे, पण ती तिला जगाची साथ मिळत नाही म्हणून खंतावते, तडफडते तेव्हा त्या वेदना मलाही सतावत असतात.
… मला सत्त्वशिला सामंत यांचा, त्यांच्या मृत्यूला वर्ष उलटून गेले तरी व्याकरणातील नेमकेपणाचा आग्रह मोह घालतो. त्यांचा लेखनासंबंधातला कडवेपणा असा, की अक्षराच्या चुकीच्या वापराने अपघात होतो आणि शब्दाच्या चुकीच्या वापराने मृत्यू संभवतो अशी त्यांची जवळजवळ पक्की भावना आहे. तो कडवेपणा मला कळतो व सुसंस्कृत जगण्यासाठी महत्त्वाचा वाटतो.
… माझ्या सततच्या चिंतनात गडचिरोली जिल्ह्यात ‘दिल्ली-मुंबईत आपले सरकार-आमच्या गावी आमचे सरकार’ अशी घोषणा देऊन पाचशे आदिवासींचे खेडे स्वत:च्या पायावर उभे करणारे देवाजी तोफा- मोहन हिराबाई हिरालाल असतात. माझ्या मनाला त्यांचा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांपेक्षा किंचित अधिकच भिडतो.
हस्तलिखित पोथ्यांचे संरक्षण करून इ-लायब्ररी उभारू इच्छिणारे नाशिकचे उपाध्याय दिनेश वैद्य, आशियात वैशिष्ट्यपूर्ण ठरेल असे कमळांचे उद्यान उभे करू पाहणारे चिंचवड-पुण्याचे लाँड्रीवाले सतीश गदिया, एड्सग्रस्त तीनशे अनाथ मुलांचे आजोबा झालेले नगरच्या ‘स्नेहालय’मधील सुधीर नाईक … महाराष्ट्राच्या सुमारे तीनशेऐंशी तालुक्यांत असे वेड कमीजास्त प्रमाणात घेऊन काम करणारे लोक मला माझे सगेसोयरे वाटतात. त्यांच्यामुळे मला संस्कृती-विकृती यांचे अर्थ कळतात व संस्कृती समृध्द होत जाते अशी माझी धारणा आहे. त्यांची पालखी घेऊन समाजासमोर जावे असे मला वाटत असते.
पण त्याच वेळी मला हे कळत नाही, की अशा चांगल्या जीवनदृश्यांचे आकर्षण समाजातील तथाकथित चांगल्या लोकांना का वाटत नाही? तो प्रभाव पसरावा म्हणून सज्जनशक्तीला आवाहन करणारे चंद्रशेखर धर्माधिकारी–भवरलाल जैन यांच्यापासून पुण्याचे व्यवस्थापन तज्ज्ञ सु.गो. तपस्वी यांच्यापर्यंत डझन-दोन डझन लोक आहेत. तपस्वी यांनी तर उच्चाधिकार पदावरील निवृत्तीनंतर पदरचे दोन लाख रुपये खर्च करून मोठे ‘नेटवर्क’ उभे करण्याचा चंग बांधला, ते दोन वर्षेपर्यंत महाराष्ट्रभर दौरे करत फिरले. पण हाय! त्यांचे विफल अनुभव फक्त पुस्तकात प्रसिद्ध झाले!
मी माझ्या मनाशी ‘शेतक-यांच्या आत्महत्या’ हे शब्द उच्चारले गेलेले ऐकले तरी विविध भावनांनी गलबलून जातो, त्यासंबंधीच्या अनेक कविता, काही कथा, एखादा चित्रपट, कमिशनचे अहवाल…हे सारे मनात काहूर निर्माण करते व मला आहोत तसे रस्त्यावर यावे आणि त्या प्रश्नावर कामास लागावे असे वाटते. मी करत काही नाही, तेव्हा मला सर्व बाजूंनी कोंडी झाल्यावर सैरभैर अवस्थेत वेडाचार करणारा ‘डोंबिवली फास्ट’ चित्रपटाचा हिरो आठवतो. त्यातून मन जरा शांत होते तेव्हा लक्ष्मण लोंढेची कथा मनात डोकावते. कथानायक त्याच्या आयुष्यभराचे स्वप्न वाटावे अशा झकास, समुद्रकाठच्या फ्लॅटमध्ये राहायला येतो, तर त्याला त्याच्या कानात दूर अंतरावरून सतत घुसणारा ठोक-ठोक आवाज त्रास देऊ लागतो. त्याला कळते, की तेथे काही अंतरावर बेकायदा फॅक्टरी दिवसरात्र चालते, तेथील तो आवाज आहे. तो फॅक्टरीविरुध्द सत्याग्रहापर्यंत जातो, तर सरकारी यंत्रणा त्यास वेडा ठरवते आणि त्याच्या बायकोसह सर्व शेजारीपाजारी हतबल असतात!
सव्वीस जुलै आणि सव्वीस नोव्हेंबर या तर समस्त मुंबईकरांना भेदून टाकणा-या!, छिन्नविच्छिन्न करणा-या तारखा. सव्वीस जुलै २००५ च्या महापुरात मुंबईतील सुमारे पंधरा लाख लोक रात्रभर रस्त्यांवर हीनदीन, भीतीग्रस्त अवस्थेत बेघर होते. चिपळूणपासून कल्याण-अंबरनाथपर्यंतच्या जलवर्षावाच्या व त्यामधून उद्भवलेल्या आपत्तींच्या कहाण्या अंगावर काटा आणणा-या आहेत. मानव निसर्गकोपासाठी व्यवस्था निर्माण करण्यात किती कमी पडू शकतो त्याचे विदारक दर्शन तेव्हा झाले. पाणी जगात तिसरे महायुध्द घडवून आणेल असे म्हणतात, पाण्याला जीवन असेही म्हणतात, त्या पाण्याने मानवी जीवन उध्वस्त केले. त्या नंतर उत्तर भारतात काश्मीरपर्यंत तसेच प्रलय घडून गेलेले आहेत.
दहशतवाद्यांचा सव्वीस नोव्हेंबर २००९ चा हल्ला हा मानवासमोर मानव किती दुर्बल ठरू शकतो त्याचा नमुना होता. दहा दहशतवाद्यांनी मुंबईचे (व देशाचे) अवघे जीवन कोंडून ठेवले. नाझींच्या दहशतीत वावरलेल्या अॅन फ्रँकची डायरी आठवली… सर्व संरक्षण यंत्रणा हतबल आणि आम्ही नागरिक जेवत-खात टीव्ही लावून ‘कडकलक्ष्मी’सारखे आमच्या मनाचे फटकारे आम्हाला मारून घेत होतो. लढाई संपली तेव्हा जनप्रक्षोभ एवढ्या शांतपणे व धीमेपणे, मेणबत्त्या लावून व्यक्त झाला, की वाटले, यामधून लोक शहाणे होणार-अतिरेकाविरुद्धची स्थायी व शांत कृती घडणार! माझ्याकडेच नागरिकांच्या काय कृती करावी म्हणून त्या काळात आठ-दहा विचारणा झाल्या. ना माझ्याकडे उत्तर होते-ना मला ज्याच्याकडे उत्तर आहे असा माणूस माहीत होता. ना तशी चर्चा गंभीरपणे घडवून आणण्यात कोणाला आस्था होती.
मात्र मला एवढे कळत आहे, की गेल्या दहा वर्षांतील निसर्गाच्या व माणसाच्या या दोन अतिरेकांना व अन्य वेडाचारांना रूढ विचारात व व्यवस्थेत उत्तर नाही. रूढ विचाराची व व्यवस्थेची तशी इच्छादेखील नाही. किंबहुना, टोकाचे हे अतिरेक (अतिरेकच टोकाचा असतो ना! पण मग रोज युद्धप्रसंगात जगणा-यांनी ‘युध्दकालाचे’ वर्णन कसे करायचे?) वगळले तरी प्रत्येक व्यक्तीला क्षणाक्षणाला अतिरेकास सामोरे जावे लागत आहे.
माणसाचे जीवन स्वस्थ, नियमित व व्यवस्थित ठेवण्यासाठी धर्म आणि प्रशासन या दोन्ही बाजूंनी अनेक त-हेचे विचार-सिद्धांत गेल्या दोन-पाच हजार वर्षांत मांडले गेले. त्यांतील काही तत्त्व-मंत्रांभोवती मानवी जीवन संघटितदेखील झाले. भारतातील व्यवस्था गेल्या हजार वर्षांत मुख्यत: धर्माने व धर्मविचाराने बांधली गेली, कारण भौतिक जीवन येथे नव्हतेच! सोन्याचा धूर वगैरे त्यापूर्वीचा. जेव्हा गेल्या चारशे वर्षांत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबर धर्म कालबाह्य झाला, त्याची जागा लोकशाही घटना घेईल असे अपेक्षिले गेले आणि भारतीयांना मानवी जीवन जगणे म्हणजे काय असते त्याचा अनुभव कळू लागला तेव्हा आपले भारतीयांचे जीवनतत्त्वज्ञान व आपले प्रत्यक्ष जगणे यांतील फारकत ध्यानी आली. ‘दुनिया में हम आये है तो जिनाही पडेगा’ हे मुरलेले तत्त्वज्ञान कोठे आणि शहरांतील मॉल आणि खेड्यांतील सब्सिड्यांची पॅकेजेस कोठे! तो पेच दिवसेंदिवस गहिरा होत चालला आहे. त्यामधून अवघ्या समाजाला कळेनासे झाले आहे, की आपल्याला झाले आहे काय? त्यातूनच तर समाजात हे सामाजिक व व्यक्तिगत उद्रेक होत नाहीत ना?
मी मनात सव्वीस नोव्हेंबरनंतर काही महिने वेडाच होतो. काहीही विचार डोक्यात येत, मी ते क्वचित मित्रांशी बोले, इमेलवर लिही, पण ते सारे दैनंदिन जीवनात माझ्या आधी रुळले असावेत. त्यांतला एक मित्र डेप्युटी पोलिस कमिशनरच्या लेव्हलचा. त्याचा एका रात्री फोन आला, की तो कसाबला भेटला. तो कसाबबरोबर अर्धा तास बोलला. मी कमालीचा उत्सुक, म्हटले, “सांगा सांगा, काय झाले तुमचे संभाषण? कसा आहे तो? एवढा कोवळा मुलगा – तयार कसा झाला या हिंसेला?” पोलिस अधिकारी रूढ काही बोलत राहिले. त्यांचे व कसाबचे संभाषण एका प्रशिक्षित माणसाचे दुस-या प्रशिक्षित माणसाशी असावे तसे होते. त्यात माणूसपण कमी आणि प्रशिक्षण जास्त. मी त्यांना म्हटले, की कसाबची आणि येथील सर्वसामान्य विचारी–संवेदनशील माणसाची भेट घालून द्यायची. त्यामधून ‘संवाद’, ‘संभाषण’ घडण्याची शक्यता होती. कसाबच्या मनाचा कदाचित थांग लागला असता! प्रशिक्षणामध्ये माणसाची ‘तयारी’ करून घेतली जाते. तो स्वाभाविक भावना-विचारांनी जगत नाही. प्रशिक्षित माणूस त्याच्या उद्दिष्टापासून सहसा विचलीत होत नाही. डॉक्टर व वकील ही त्याची उत्तम व सहज तपासता येतील अशी उदाहरणे. ‘टूअर ऑन सेफर साइड’ (सुरक्षित राहून चूक केल्यास क्षम्य) हा त्यांचा वर्तनसिद्धांत. ती माणसे धोका पत्करू शकत नाहीत, त्यामुळे ती स्वाभाविकपणे जीवन जगण्याचा सल्ला देऊ शकत नाहीत. त्यामुळे जीवन चालू ठेवता येते, संस्कारित होऊ शकत नाही.
आज सगळे जग तशा व्यावसायिकांनी भरले आहे. नोकरशाही हे त्याचेच रूप. कन्सल्टंट्सचा फैलाव तर सर्वत्र आहे. ती जागतिक बिमारी आहे. ती ‘युनो’च्या विविध संस्थांपासून व श्रीमंत राष्ट्रांमध्ये प्रकर्षाने पाहायला मिळते. आपल्याकडेही त्यांचे एक श्रीमंत जग आहे. त्यांना कसले दु:ख ‘लागत’ नाही. त्यामुळे नैसर्गिक वा मानवी अतिरेकाचा बंदोबस्त त्यांच्याकडून होईल हा भ्रम ठेवू नये हे बरे. अर्थ विषयातील जाणकार दिल्लीत सत्तेवर असताना, ते देशाला मंदीमधून सावरण्याचा मार्ग सुचवू शकले नाहीत. अंमलात आणण्याची गोष्ट दूरच. त्यामुळे ते विकासदर, व्याजदर, इन्फ्लेशनचा दर यांसारखे आकडे फक्त सांगत राहिले. मोदी यांनी आशेचे विश्वासार्ह वाटेल असे नुसते चित्र दाखवले तर लोक त्यांच्या बाजूने धावले. आता ते चिकित्सा करत आहेत!
व्यावसायिक, नोकरदार यांच्याकडून काय घडू शकते व काय घडू शकत नाही त्याचे उदाहरण आठवते. पार्लमेंटला पन्नास वर्षे झाली तेव्हा नारायणन राष्ट्रपती होते. पार्लमेंट ही आधुनिक विचारशास्त्रानुसार, मूल्यांनुसार उभी राहिलेली मोठी संस्था. केवढा अभिमान मनात होता! नारायणन नोकरशाहीतून वर चढलेले. समारंभाचा उपचार कल्पकतेने योजला गेला. पार्लमेंटच्या खास अधिवेशनात भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांचे गायन! तो प्रसंग अजून आठवतो. त्या दोन गाण्यांनंतर एखादा राष्ट्रप्रमुख काय उत्स्फूर्त, झकास, स्फुरणदायी बोलला असता! ‘ऐ मेरे वतन के लोगो’ आणि जवाहरलाल नेहरू आठवा! नारायणन यांनी त्यांचे भाषण निष्प्रभपणे वाचून दाखवले. एका ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगाची वाट लागली. कशाला हवे आहेत असले राष्ट्रपती आणि राज्यपाल? घटनेत आहेत म्हणून? या शोभायमान पदांच्या निरर्थकतेचा विचार व्हायला नको? ते म्हणे, पक्षीय राजकारणाच्या वर मानले जातात! त्यांतील असत्य सगळे जाणतात. मी ‘आऊट ऑफ द बॉक्स’च्याही पलीकडे जाईल असा विचार करण्याची गरज मांडत आहे. गेल्या पन्नास वर्षांत ज्यांचे हितसंबंध सर्वांत जास्त जपले गेले व वाढत गेले आणि पुन्हा, जे उत्तरदायी नाहीत असा वर्ग म्हणजे नोकरशाही व व्यावसायिक. त्यांचे हक्क आणि सवलती प्रथम रद्द करायला हव्यात. तरच त्यांना नवा विचार सुचू शकेल, ते सर्वसामान्य माणसाची उपक्रमशीलता जागी व्हावी त्यासाठी प्रयत्न करतील. ते समाजाला रास्त मार्गावर आणण्यासाठी आखलेले पहिले पाऊल असेल. पेडर रोडवरील फ्लाय ओव्हरला पर्याय म्हणून एका आर्किटेक्टने राजभवनमधून जाणारा मार्ग सुचवला होता, तो विचारातदेखील घेतला गेला नाही, एवढे त्या वास्तूचे घटनात्मक पावित्र्य! मग मंगेशकर भगिनींच्या शांततेच्या प्रेमाची चेष्टा करायची! थोडा सांस्कृतिक, मनभावनेच्या अंगाने विचार केला तर मंगेशकर म्हणतात ती त्यांची गरज असेलच, पण नागरिकांचीही गरज आहे, ती आम्ही बाजूला ठेवली. मला हे जिणे अस्वाभाविक वाटते. आणि गंमत म्हणजे आधी उभारलेल्या सायन हॉस्पिटल समोरच्या फ्लायओव्हर्सला दोन्ही बाजूंना फेन्सिंग सुरू झाले आहे, कारण हॉस्पिटलला आवाज सहन होणार नाही!
मी घटना-प्रसंग-व्यक्तींचा उल्लेख विखुरल्या स्वरूपात करत चाललो आहे, कारण ज्येष्ठ वाचक या सगळ्याचे साक्षी आहेत. माझे भावना-विचार; तसे त्यांचेही त्या त्या प्रसंगी असणार. अशा अनेकविध गोष्टींना सामोरे जाताना वेडेपण स्वाभाविक येणार, मनात विकृत वाटावे असे विचार डोकावणार. विसंगत, विकृत परिस्थितीला प्रतिसाद तसाच असणार ना? त्यातून वेडाचार घडणार! गेल्या पन्नास वर्षांत तत्त्वांची, नीतिमूल्यांची, नातेसंबंधांची जी पडझड झाली व होत आहे, त्याबाबतची ती प्रतिक्रिया आहे. मला कधी कधी भीती वाटते, की माझ्या हातूनदेखील वाकोल्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकासारखे काही घडू शकेल!
मंत्रालयाला आग लागली तेव्हा माझ्या ध्यानी आले, की माझी पत्नी विलक्षण बेचैन आहे. मी तिला सार्वजनिक क्षेत्रातील घटनांनी एवढी विचलीत झालेली कधी पाहिली नव्हती. ती त्यासंबंधी झालेल्या घातपातापासूनच्या विविध आरोपांमुळे घडून आलेली प्रतिक्रिया होती. बेफिकिरीच्या, बेजबाबदारीच्या घटना समाजमन किती पोखरून राहिल्या आहेत याचे ते भेदक प्रत्यंतर होते.
समाजाने स्वत:ला वेळीच सावरले नाही तर सध्याच्या सर्व संघटित संस्था आणि आस्थापना त्यास वेडा करतील, कारण संस्था-आस्थापनांकडे एवढा मोठा, संमिश्र समाज चालवण्याची, त्याचे व्यवस्थापन करण्याची रीत नाही. ना त्यांच्याकडे समाज व माणूस घडवण्याचा कोणताही कार्यक्रम आहे. ते त्यांच्या घटनेच्या उद्दिष्टांतच येत नाही. विकासाचे जे कार्यक्रम आहेत त्यांना नैतिक, सांस्कृतिक, मानवी भावनेचा असा कोणताही पदर असल्याचे जाणवत नाही आणि प्रत्यक्ष प्रकल्प घडतात ते राजकारणी, नोकरशहा व कंत्राटदार यांच्या संगनमताने. सध्या जमिनीचे व्यवहार किती बेदरकारपणे, दडपून, घाईघाईने आणि ‘पटवून’ होतात हे सर्वांना ठाऊक आहे. तरीसुध्दा रायगड जिल्ह्यातील एका गावच्या जमिनीच्या दहा गुंठ्यांच्या तुकड्याचा मूळ मालक शोधत त्या गावचा एजंट पुण्याला आमच्या परिचितांकडे पोचला. परिचितांचा पस्तीस वर्षांचा कर्ता मुलगा अचंबित झाला. त्याचे आजोबा गाव सोडून पुण्याला आले त्यास ऐंशी वर्षे झाली. त्या मुलाला त्या जमिनीचे तीन लाख रुपये मिळाले. त्याला ती लॉटरीच होती. मी एका विकासकाला विचारले, की तो एजंट जमिनीच्या मूळ मालकाला शोधत त्याच्याकडे का गेला असावा? मूळ मालक अंधारात असताना व त्याची अपेक्षा नसताना एजंटाने का त्याला शोधून काढून तीन लाख रुपये दिले? तो तहसीलदाराला ‘पटवून’ कागद बदलू शकला असता. विकासकाने आधी सरकारी रेकॉर्ड वगैरे कारणे सांगितली, परंतु शेवटी, तो म्हणाला, की तलाठी-तहसिलदार-एजंट खोटा व्यवहार करू शकले असते, पण त्यांच्या मनात ती भीती कायम राहिली असती. त्यांनी तीन लाख रुपये देऊन ती काढून टाकली. कसली होती ती भीती? धर्माने निर्माण केलेल्या नैतिकतेची! धर्म लोपला पण भीती अवशेषरूपात अजून आहे. खरोखरीच, धर्म विचार आणि आचार दोन्ही दृष्ट्या प्राण गमावून बसला आहे. मनुष्यजीवन संस्कारित, नियंत्रित करण्याची वा घडवण्याची त्याची क्षमता संपली आहे. समाज जीवनात उरले आहे ते त्याचे उच्चारण व कर्मकांड आणि राज्यघटनेने धर्माची जागा घेण्याआधीच ती तिचा प्रभाव गमावून बसली आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक घटनेतील स्वातंत्र्यादी कलमांचे मंत्र म्हणत आहेत, एवढेच! नवनवीन पिढ्या या जगाचा ताबा घेण्यासाठी पुढे येत आहेत.
सद्यकालात भीती एवढीच वाटते, की जन्माला येणारी अर्भके पंचवीस-तीस वर्षांची होतील तेव्हा त्यांची मने सांस्कृतिक दृष्ट्या किती वैराण असतील! त्यांना कोण सावरेल? समाजात तशी व्यवस्था आहे का? समाजातील सर्वांत संघटित संस्था जे सरकार ते कंत्राटदारीने चालते. लोकप्रतिनिधी निवडून येण्याचा लोकशाही उपचार वगळला तर सरकारात कोणतेही लोकशाही मूल्य नाही. अंमलबजावणीचे धिंडवडे आपण पाहतच आहोत.
समाजातील प्रत्येक व्यक्तीचे मुळाशी नाते तुटत चालले आहे- मग ते मातीशी असेल, निसर्गपरिसराशी असेल, कुटुंबव्यवस्थेशी असेल, गावाशी असेल, घराशी असेल… व्यक्तीने जगायचे कशासाठी? ते तिचे तिलाच कळेनासे झाले आहे. मी गाडीत गुटखा खात असलेल्या पस्तीस वर्षांच्या तरुणाला हटकले. त्याला मरणाचे भय दाखवले. तो निर्विकारपणे म्हणाला, “जी के भी क्या करना है?” मला त्याचे उद्गार प्रातिनिधिक वाटले. समाजामध्ये अशी हताशता आहे. त्यातून वेडाचार घडताहेत. विचार-चर्चा खूप झाली आहे. कृतीच्या अंगाने पुढे जायला हवे आहे. त्या कृतीला स्थायी अधिष्ठान जरुरीचे आहे.
– दिनकर गांगल
(माधव शिरवळकर या स्नेह्याशी या विषयाबाबत बरेच बोलणे झाले, ते लेख लिहिताना उपयोगी पडले.)
माहीती चांगली व मनास
माहिती चांगली व मनास वेदनादायी. समाजात परीवतर्न व्हायला हवे.
Very nice article..I am
Very nice article..I am thinking on same line ..will talk or write on this subject.
खुपच मनाला वेदनारि समाजाची
मनाला खूपच वेदना देणारी समाजाची व्यथा व्यक्त केलेली आहे.
Samajman nkkich aajari aahe.
Samajman nkkich aajari aahe. Upchar garjeche aahet. Bhuotik pragatilà Adhyatmachi sangad ghalne,vedokt ooktipramane Daya Dan kartavyanishta Sanvedanshilata japali pahije. Aapan panti lawuya halu-halu andhar osrel,.!
मा.गांगल यांचे नवसमाजचिंतन
मा. गांगल यांचे नवसमाजचिंतन अावर्जून विचारात घेण्यासारखे अाहे.
जणुकाही दिनकरभाऊ मनातलच बोलले
जणु काही दिनकरभाऊ मनातलंच बोलले तुम्ही. समाजातल्या घटनांनी विषन्नता येतेच मनाला. पण हताशेने अस्वस्थ मन फक्त वांझ विचार करु शकते. आचरणाच्या नावाने शुन्यच येते हाती.
Comments are closed.