समाजात विषमतेची दोन टोके
– राजेंद्र शिंदे
उदयदादा लाड हा कला आणि क्रीडा यांमध्ये समरस असलेला अफलातून माणूस आहे! त्यांच्या नावात ‘दादा’ असले तरी त्यांच्या स्वभावात दादागिरी वा भाईगिरी नाही. उलट, ते विनम्र, आदबीच्या आवाजात बोलत असतात; समोरच्या माणसाला मोठा सन्मान देत असतात. त्यांचे ‘दादा’पण आले त्यांच्या कुस्तीप्रेमातून; त्यामधूनच त्यांचा क्रीडाक्षेत्रात दबदबा झाला आणि कलारसिकता तर त्यांच्या स्वभावात आहे. गझलवर त्यांचे उत्कट प्रेम आहे. त्यांनी गीत-गझलांना संगीत दिलेले आहे. त्यांच्या चाली व वाद्यसंयोजन रुढ मराठी भावसंगीताला बाहेर खेचेल अशा वेगळ्या ढंगाचे आहे.
असे उदयदादा त्यांचा दरवर्षीचा वाढदिवस (२९मे) वेगळ्या पद्धतीने, कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करतात आणि समाजकार्यकर्त्यांना, क्रीडापटूंना व साहित्यिकांना पुरस्कार देऊन त्यांचे कार्य लोकांच्या नजरेसमोर आणतात. म्हणून तर अशा समारंभास मंगेश पाडगावकर, डॉ. तात्याराव लहाने वगैरेंसारखी मान्यवर व्यक्तिमत्त्वे व्यासपीठावर आवर्जून उपस्थित राहतात. त्यांच्या अशा नावीन्यपूर्ण उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष. ह्या दशकपूर्तीनिमित्त ‘युआरएल फाऊंडेशन’ने डॉ. अभय व डॉ. राणी बंग, सी.बी. नाईक (कोकणात विज्ञानप्रसार) श्रीमती नसिमा हुरजूक आणि राजू शेट्टी (शेतक-यांची स्वाभिमान संघटना) यांना प्रत्येकी एक लाख रुपये देऊन, त्यांच्या मुलाखती कार्यक्रमात घेण्यात आल्या. संजीव लाटकर व दीपाली केळकर यांनी ठरावीक वेळात ह्या मंडळींना अचूक मुद्यांवर बोलते केले.
क्रीडाक्षेत्रात पुढील पुस्कार देण्यात आले :
कबड्डी – सुरेंद्र वाजपेई, खो-खो – तुकाराम भोईर, मल्लखाब – सौ. शशी दिपक सुर्वे, कॅरम – सुभाष थोरवे
संगमनेरचे विचारवंत लेखक रावसाहेब कसबे ह्यांना साहित्यसेवेबद्दल पंधरा हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. त्यांचीही मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यांनी त्यांचे माणसाच्या वैचारिक उत्क्रांतीबाबतचे सखोल विचारचिंतन नेमकेपणाने मांडले व त्यानुसार ते पुस्तके लिहीत आहेत हे स्पष्ट केले. त्यांतील दोन पुस्तके प्रसिद्धदेखील झाली आहेत.
डॉ. अभय बंग यांनी प्रारंभिक मांडणीत समाजात दोन ध्रुवांसारखी दोन टोके झाली आहेत आणि ती मिटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत असा सूर लावला, त्या अंगाने पाची मुलाखतींदरम्यान तत्त्वचिंतनपर बरेच बोलले गेले. विशेषत: बंग आणि शेट्टी यांची मते परतपरत चाचपून पाहण्यात आली. संजीव लाटकर यांनी शेवट उचित केला. ते म्हणाले, की गरिबी-श्रीमंतीची टोके दोन ध्रुवांसारखी स्थिर नाहीत, तर त्यांमधील अंतर वाढत आहे. परंतु समाजात ह्या सन्मानित व्यक्तींसारखी विधायक कार्यात गुंतलेली अनेक माणसे आहेत व त्यांना दाद देणारी उदयदादांसारखी माणसेही आहेत. ती माणसे म्हणजे विषमता भडकत चाललेल्या या समाजात मोठा दिलासा आहे.
समारंभास मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, डॉ. तात्याराव लाहने, खासदार एकनाथ गायकवाड, राज्यमंत्री वर्षा गायकवाड असे मान्यवर व्यासपीठावर होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व नव-नियुक्त खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. त्यांनी समाजात जाणवणारी अस्वस्थता नेमकेपणाने प्रकट केली. त्यांनी एक साधे उदाहरण दिले, की दादर ते चर्चगेट या परिसरात कोठेही फूटपाथवर निर्वेध दहा पावले चालून दाखवावे. महाराष्ट्र पन्नास वर्षे साजरी करत असताना अशी व्यवस्था आपण निर्माण करु शकलो आहोत! त्यांच्या भाषणातून अन्याय, अव्यवस्था, अनाचार, बेफिकिरी, उदासीनता, उपेक्षा यांबाबतची सतत बोच व्यक्त होत गेली. राष्ट्रीय ख्यातीचा हा माणूस दैनंदिन जीवनातील किती किती साध्या साध्या गोष्टींनी व्यथित झाला आहे. हे ऐकून देशाची सद्यपरिस्थिती व समाजाची उदासीनता कोणत्या भयावह पातळीला पोचली आहे हे जाणवत होते.
कार्यक्रमाला उदयदादा लाड व्हीलचेअरवर बसून उपस्थित राहिले. ते गेली दोन वर्षे संधिवाताच्या विकाराने पीडले आहेत. गेल्या वर्षी, ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते. ते त्यावेळी रुग्णालयात होते. ते यावेळी उपस्थित राहिले व उल्हसितही दिसले याचा आनंद संर्वांनाच झाला.
– राजेंद्र शिंदे