सत्याला सामोरे की शब्दचातुर्य?

    0
    43
    _Rajeev_Joshi_1

    अवधूत परळकरमी मला विशेष प्रभावित करून सोडणारे पुस्तक म्हणून हेन्री डेव्हिड थोरोच्या Walden नंतर ‘हिंद-स्वराज्य’चे नाव घेईन. त्या पुस्तकाचे लेखक मोहनदास करमचंद गांधी यांना ‘सत्य’ ही गोष्ट प्राणाहून प्रिय होती. आपले काय? सत्याला सामोरे जाण्यात आपल्याला स्वारस्य आहे की नाही? येथे आपण सत्य बोलणार आहोत की नाही? इतरांशी नाही तर निदान स्वत:शी तरी? असा विचार मनात आला आणि मी मला जाणवलेले सत्य या परिचर्चेच्या निमित्त तुमच्यासमोर ठेवण्याचे ठरवले. एक कबुली द्यायला हवी, की गांधी पाठीशी नसते तर मला हे धाडस कदाचित झाले नसते.

    तर मला जाणवलेले सत्य असे…

    आपला समाज गांधी मानत नाही, गांधीविचारांना आणि आचारांना आपल्या समाजाच्या विश्वात आणि व्यवहारात काडीचेही स्थान नाही. उलटपक्षी, घराघरात गांधीद्वेष पसरलेला आहे. खास करून, सुशिक्षित उच्चभ्रूंच्या घरांत… त्या घरांतील लहान मुले त्याच संस्कारात वाढत आहेत.

    लगेच, “काय सांगता, आमच्या सोसायटीत आम्ही सारे गांधी जयंतीला एकत्र जमतो; प्रार्थना म्हणतो की…” असे कृपा करून सांगू नका. तसे, महात्मा गांधी यांना प्रात:स्मरणीय नेते मानणारे अनेक माझ्या परिचयाचे आहेत. विद्येच्या या माहेरघरी येथील उच्चविद्याविभूषित गांधींविषयी बोलताना कोणती विशेषणे वापरतात तेही मला ठाऊक आहे. मी त्याच समाजाबद्दल बोलत आहे, जो येथे या सभागृहात जमलेल्या या लहान समुहापेक्षा मोठा आहे आणि निराळा आहे. त्या समुहात आज ‘मी नथूराम गोडसे…’ हे नाटक सर्वाधिक प्रिय आहे. मध्यमवर्गीय मराठी समाज म्हणून ज्याकडे निर्देश करता येईल असा हा समाज. अलिकडे त्या लोकांत दलितांची भर पडली आहे. प्रश्न असा, की आपण त्यांना गांधींच्या विचारांपर्यंत नेणार आहोत की नाही? की गांधीविचार ही आपल्या वर्तुळात चर्चा करण्याची गोष्ट म्हणून आपल्यापुरती मर्यादित ठेवणार आहोत? आणि बाहेरील वास्तवाकडे डोळेझाक करून आपला कार्यक्रम पुढे रेटणार आहोत?

    ‘हिंद-स्वराज्य’ मध्ये गांधी यांनी स्वत:शीच साधलेला संवाद, त्यातील भाषेचा वापर, आशय आणि शैली या दृष्टींनी अपूर्व आहे. गीतेमधील पार्थ आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवादापेक्षा ‘हिंदस्वराज्य’मधील वाचक आणि संपादक संवाद अधिक अर्थपूर्ण आहे. त्यात दूरदर्शी विचार आहेत, अदूरदर्शी विचार आहेत; ज्ञानसंपन्न विचार आहेत आणि अज्ञानसदृश भासावेत असेही विचार आहेत; काही विचार कमालीचे शास्त्रीय आहेत; काही अशास्त्रीय, काही चमत्कारिक; काही त्या काळीदेखील कालबाह्य ठरावेत असे. तर काही रोमँटिक असूनही त्यामागील तत्त्व लक्षात घेता बहुमोलाचे वाटावेत असे…

    या सगळ्यांची चर्चा आपण करतच आहोत. मात्र ती चर्चा गांधीजींच्या महात्मा या गौरवपर किताबाचे ओझे खाली ठेवून पुरेशा चिकित्सक पद्धतीने, पुरेशा निर्भयपणे केली जात नाही असे मला सारखे वाटत आहे.

    गांधींच्या दोषस्थळांबद्दल बोलण्याची वेळ आली की वक्ते शब्दचातुर्याचा आधार घेताना दिसतात. माझे आदरणीय मित्र आणि विख्यात समाजसेवी डॉक्टर अभय बंग म्हणतात, “मी ‘हिंदस्वराज्य’मधील मजकूर अनेकदा वाचत आलो. आत्ता आत्ता कुठे त्यातील काही विधानांचा अर्थ अंधुक अंधुक जाणवत आहे असे मला वाटते.”

    का बरे? गांधीजी म्हणजे काही कवी ग्रेस नव्हेत! समाजातील सर्व थरांतील माणसांना समजेल-उमजेल अशी सरळसोपी भाषा वापरून वाचकांशी थेट संवाद साधणे हे तर महात्मा गांधी यांचे वैशिष्ट्य. इतके संपर्कसुलभ लिहिणारा-बोलणारा दुसरा नेता नाही असे म्हटले जाते. डॉ. बंग तर दैनंदिन व्यवहारात गांधी तत्त्वज्ञान जगत आले आहेत. त्यांच्या पातळीवरील बुद्धिमंताला गांधीजींच्या विधानांचा अर्थ आता आता अंधुक अंधुक जाणवू लागत असेल तर आपल्यासारख्यांचे काय? आणि समाजापुढे तरी आपण हे असे अनाकलनीय पुस्तक घेऊन कसे जाणार?

    दुसरा प्रश्न असा– गांधीजी यांनीच दिलेल्या सत्यदर्शक चष्म्यातून आपण गांधींचे विचार पाहणार आहोत की गांधीभक्ताच्या सश्रद्ध नजरेतून?

    कार्ल मार्क्स आणि गांधी या दोन महापुरुषांनी माणूस या प्राण्याकडे फारच भाबडेपणाने पाहिले असे मला अलिकडे वाटू लागले आहे. त्यांच्या विचारदर्शनात ज्या थोड्याफार गफलती झाल्या आहेत त्या या भाबडेपणामुळे असे मला वाटते. माणूस हा या निसर्गातील अत्यंत बेरका, धूर्त, आणि चमत्कारिक प्राणी!

    ‘साठ्येंचे काय करायचे?’ या नाटकाप्रमाणे आजच्या मार्केटिंगच्या जगतात ‘गांधींच्या विचारांचे काय करायचे?’ या प्रश्नापाशी आपण येथे या सभागृहात घोटाळत आहोत. तिकडे सभागृहाबाहेरील जग महात्मा गांधींचे काय करायचे या प्रश्नांची अत्यंत सवंग उत्तरे शोधून मोकळे झाले आहे. त्यांनी गांधीजींची नाणी पाडली आहेत, पुतळे आणि स्मारके उभारून ठेवली आहेत, टपाल तिकिटे काढली आहेत; अनेक रस्त्यांना-चौकांना गांधीजींची नावे देऊन टाकली आहेत.

    आपण पौर्वात्य आणि पाश्चात्य सभ्यतेतील अंतराबद्दल बोलत आहोत, पण सभागृहाच्या आतील सभ्यता आणि बाहेरील सभ्यता यांतही महदंतर आहे. बाहेर रस्त्यावर कशाला जा, आपल्या घरातील लोकांशी, बायका-मुलांशी या विषयावर आपण कधी मोकळा संवाद साधला आहे का? त्यांना गांधीविचार किती प्रस्तुत वाटतात ते अजमावले आहे का? गांधीवाद आणि सर्वोदयवाद हे अस्तंगत प्राणी (Vanishing species) आहेत असे तरुण उघड बोलू लागले आहेत. आपल्यापैकी कितीजण त्या तरुणांत वावरतात?…  की नवी पिढी आपण आपल्या वैचारिक विश्वातून बाद करून टाकली आहे? आणि नव्या पिढीने आपल्याला?

    पुन्हा, सत्याला सामोरे जाण्याच्या सुरुवातीच्या मुद्याकडे वळतो. येथे गांधीजींविषयी आदर असलेली मंडळी जमली आहेत; गांधीजींचे अंधभक्त जमलेले नाहीत असे मी गृहीत धरतो. चर्चा जसजशी पुढे जाईल तसतसा चिकित्सेचा सूर मोठा होत जाईल आणि बुद्धिप्रामाण्यवादाचे खरेखुरे दर्शन आपणा सर्वांना या सभागृहात घडेल असे मानुया.

    एक निर्बुद्ध निरीक्षण म्हणून तुम्हाला हे निवेदन बाजूला सारता येईल. तरीपण ते इतके सोपे नाही. कारण काहीसे अनुचित आणि बालीश भासले तरी ते प्रामाणिक आहे.

    आणि मुख्य म्हणजे –
    गांधींनी ज्या घटकाचा आवाज आस्थापूर्वक ऐकत चला असे सतत बजावले आहे त्या, समाजातील बौद्धिकदृष्ट्या दुर्बल अशा घटकाचा प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो आहे आणि येथील बुद्धिमंत माझी निराशा करणार नाहीत अशी आशा बाळगून आहे.

    अवधूत परळकर
    awdhooot@gmail.com

    अवधूत परळकर यांच्या लिखाणावर राजीव जोशी यांची प्रतिक्रिया…

    डॉ. राजीव जोशी“गांधींच्या दोषस्थळांबद्दल बोलण्याची वेळ आली की वक्ते शब्दचातुर्याचा आधार घेताना दिसतात” ही परळकर यांनी नमूद केलेली परिस्थिती चिंतेची बाब आहे. त्यांनी ‘इंदु काळे – सरला भोळे’ अशा सारख्या वेगळ्या आकृतिबंधाचा वापर केला आहे, परंतु ‘काय भुललासी वरलिया रंगा’ हे ध्यानात ठेवावे. माझ्या दृष्टीने बाह्यांगाचा विचार वैचारिक चर्चेत करू नये.

    संपूर्णतः स्वीकारार्ह किंवा संपूर्णतः त्याज्य असे काहीच नसते. कदाचित असेही असेल की गांधीजींचे योगदान ज्ञात आहे, त्यामुळे असेल, परंतु ‘थ्री इडियटस’ सिनेमातील वाक्य उद्धृत करतो ‘किसीने ऐसा सोचा की आज नया सिखनेको मिलेगा, मजा आयेगा’, हे कृपया पाहवे. गांधीजींच्या ज्ञात कर्तृत्वापलीकडील नवीन माहिती, नवीन (वैध) विचार मला तरी जाणवला नाही. ‘काहीतरी नवे शिकण्यास मिळाले, अधिक विचार करण्यास लावणारी नवीन मांडणी मिळाली’ अशा प्रकारचे समाधान मला मिळाले नाही.

    कारणे अनेक असतील.

    एकतर मी चांगला विद्यार्थी नसणार, त्यामुळे काही शिकवण असेल तर मी अंगीकारू शकलो नसेन. दुसरे म्हणजे औपचारिक / अनौपचारिक शिक्षणातील त्रुटी असतील. कावळ्यांच्या राज्यात कोकिळेने गाऊ नये इत्यादी शिकवणूक दिली जाते, पण कोकिळांच्यामधे काव-काव करू नये असे कोठेच सांगितलेले नाही. तिसरे म्हणजे जैव साखळीतील गिधाडे इत्यादी scavengersच्या योगदानाची जाणीव व्यक्त केली जाते. छिद्रान्वेशींच्या, तसेच dead wood of past खाणा-या ‘वाळव्यां’च्या योगदानाबाबत कधीतरी जाणीव होईल अशी आशा बाळगून आहे.

    ‘अप्रियम् न ब्रूयात’ अशी वृत्ती असेल तर सत्य आणि निर्भयता या गांधीजींच्या शिकवणुकीवर बोळा फिरेल. डॉ. सुभाष आठले, अ. पां. देशपांडे, विलास चाफेकर, अवधूत परळकर यांनी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडले.

    ज्यावेळी चर्चा होत होती त्याच दिवशी, रविवारी, २७ ऑक्टोबर रोजी ‘लोकसत्ता’मध्ये विश्वास दांडेकर यांनी केलेले ‘चुकीचा नाही, पण अपुरा प्रयत्न!’ हे शेषराव मोरे यांच्या ‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’  या पुस्तकाचे परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. त्यात विश्वास दांडेकर असे नमूद करतात, की “मात्र जर दुसरे महायुद्ध झाले नसते तर स्वातंत्र्यलढा आणखी काही दशके पुढे चालवणे भाग पडले असते. महायुद्ध संपण्याच्या आधीच ब्रिटिशांनी काढता पाय घेणे व फाळणी यावर आपसात खलबते सुरू केली होती. याला कारण भारतातील मुस्लिमांची मागणी हे नव्हते. मध्यपूर्वेत खनिज तेलाचे साठे – त्यावर नियंत्रण, त्यासाठी भारताच्या पश्चिम सीमावर्ती प्रदेशात ‘तळ’ असण्याची गरज अशी मालिका त्यामागे उभी आहे. पाकिस्तान १९४७ मध्ये अस्तित्वात आले, त्याचा नकाशा व्हाइसरॉय वेव्हेल याने त्या काळीच तयार केला होता.” या आर्थिक हितसंबंधाची पार्श्वभूमी नमूद करतात. परंतु फाळणीबाबतची चर्चा, स्वातंत्र्याच्या आधी किंवा नंतर, धार्मिक हितसंबंधांपुरती राहते.

    दांडेकर असेही नमूद करतात, “तसे पाहिले तर काँग्रेसचा घोषित विरोध असूनही सैन्यभरती, पुरवठा यांत ब्रिटनला भारतात फार मोठा अडथळा उद्भवला नाही. बेचाळीसचा लढा निकालात काढण्याला त्यांना काही आठवडे पुरले”.

    बेचाळीसचा लढा करणा-यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मी शंका घेत नाही. (माझे वडीलही बेचाळीसच्या चळवळीत बाँबकेसमध्ये तुरुंगात होते. आणि अहिंसेचा आग्रह धरणार्याच गांधीजींच्या नावे विविध कार्यक्रम करणारी केंद्र आणि राज्य सरकारे  माझ्या वडिलांना ‘सन्मान’ पेन्शन देतात)

    विश्वास दांडेकर पुढे म्हणतात, “१९३० साली संपलेल्या दशकात ब्रिटनमधून भारतात येणारा पक्का माल एकूण आयातीच्या फक्त ३० टक्के होता. उरलेले क्षेत्र अमेरिकी व जपानी मालाने व्यापले होते.” पण गांधीजी इतर आंतराष्ट्रीय प्रवाहांबद्दल आणि सत्तर टक्के शोषणाबद्दल चर्चाच करत नाहीत.

    चर्चा पुढे चालतच राहील!

    राजीव जोशी
    dr.rajeevjoshi@yahoo.com

    About Post Author