सत्यदेव दुबे आणि राजकारण

sathyadev-dubey

नाटक आणि काही प्रमाणात सिनेमा हे पंडित सत्‍यदेव दुबे यांचं कार्यक्षेत्र असलं तरी अवतीभवती घडणा-या घटनांबाबत ते जागरूक असत आणि अस्‍वस्‍थही असत. प्रत्‍येक गोष्‍टीवर त्‍यांची ठाम व जवळजवळ निकराची प्रतिक्रिया असे. ते स्‍वतःला संघनिष्‍ठ म्‍हणवायचे. त्‍यांनी काही काळ राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचं कामही केलं होतं. याचा अर्थ ते केवळ कट्टर हिंदुत्‍ववादी वगैरे होते असा अजिबात नाही, मात्र आपण हिंदू आणि ब्राम्‍हण असण्‍याचा त्‍यांना सार्थ अभिमान होता. तरीही ज्‍यावेळी 2002मध्‍ये गोध्रा हत्‍याकांड घडले, त्‍यावेळी ते अत्‍यंत अस्‍वस्‍थ झाले होते. संघाशी संबंधित असलेल्‍या लोकांनी अशा त-हेने द्वेषमूलक कृती करावी याचं त्‍यांना वाईट वाटत होतं. त्‍यांनी, ही संघाची शिकवण नव्‍हे अशा अर्थाचा, संघ किंवा नरेंद्र मोदी यांवर टिका करणारा एक लेख ‘मटा’मध्‍ये त्‍यावेळी लिहीला होता. यामुळे ते तशा अर्थाने पूर्ण संघवाले नव्‍हते हे सिद्ध होतं.

2004च्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी राजकीय परिस्थिती फार वाईट होती. एकिकडे बिजेपीचं सरकार होतं आणि ते सरकार काही फार चांगलं चाललंय असं दुबे यांचं मत नव्‍हतं. कॉंग्रेसचा भ्रष्‍टाचार डोळ्यांसमोर येत होता. राजकिय पक्षांचं एकमेकांवर टिकासत्र सुरू होतं. जनतेच्‍या हिताची कुणालाच पर्वा नाही, असं त्‍यांना वाटत होतं. त्‍यामुळे ही अस्‍वस्‍थता वाढत होती. त्‍यातून आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटून ते स्‍वतः निवडणुकीला उभे राहिले. आपल्‍याला मोठा पाठिंबा नाही, लोकांशी जास्‍त ओळखी नाहीत, त्‍यामुळे आपण निवडून येणे शक्‍य नसल्‍याची त्‍यांना कल्‍पना होती. आपण प्रतिकात्‍मक निषेध तरी नोंदवला पाहिजे, असे त्‍यांना वाटत होते.

त्‍यावेळी इतर उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असे आणि दुबे आमच्‍यासोबत कुठेतरी गप्‍पा मारत बसलेले असत. आम्‍ही त्‍यांना विचारले, की तुम्‍हाला निवडणुकीचा प्रचार करायचा नाही का? मते मिळवून निवडून यायचं नाही का? त्‍यावर दुबे म्‍हणाले, की माझं नाव वाचूनच लोक मला मतं देतील. मला प्रचार करण्‍याची गरज नाही. यावर मी त्‍यांना म्‍हटले, की दुबेजी, निवडणुकीत उभे राहण्‍यामागे आपल्‍या मनातली भावना अन् तळमळ आम्‍हाला मान्‍य आहे. मात्र राजकारण अगदी स्‍वस्‍त करून टाकू नका. राजकारणात काहीही करण्‍यासाठी लोकांपर्यंत जाणं, त्‍यांपर्यंत आपले विचार पोहचवणं आवश्‍यक असतं. नुसतं अर्ज भरून निवडणुकीला उभं राहणं यातून काहीच साधलं जात नाही. यावर दुबे म्‍हणाले, की एवढं करण्‍याची माझी तयारी नाही. मी माझा सिम्‍बॉलीक प्रोटेस्‍ट दर्शवला आहे.

दुबे यांनी राजकारणात जरी काही महत्‍त्‍वाचं केलं नसलं तरी आपल्‍या जबाबदा-या जाणून त्‍या पूर्ण करण्‍यासाठी आपल्‍या हातून काहीतरी घडावं अशी तिव्र भावना होती. म्‍हणूनच नाट्यक्षेत्र ही त्‍यांची मर्यादा कधीच बनली नाही. त्‍यांचं जे काही होतं ते उत्‍स्‍फूर्त होतं. पंडित सत्‍यदेव दुबे जसं नाटकाबाबत तिव्रतेने काम करायचे, त्‍याच तिव्रतेने ते सामाजिक आणि राजकिय घटनांकडे ते डोळसपणे पहायचे. शेवटी ती तिव्रता महत्‍त्‍वाची.
– जयंत धर्माधिकारी
चित्रपट दिग्‍दर्शक, पटकथा-लेखक, सामाजिक कार्यकर्ता, ‘दिनांक’ या भूतपूर्व साप्‍ताहिकाचे प्रणेते

9820039694, Suhita.thatte@gmail.com

About Post Author