सचिन केळकर – डिजिटल द्रष्टा

7
32
carasole

सचिन केळकरने वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आयटी क्षेत्रातील मोठ्या हुद्द्याची आणि पगाराची नोकरी सोडली आणि तो डिजिटल मीडियात उतरला. त्याला त्या व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. त्याने 2001 साली हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा अनोखा मेळ साधत ‘सेंट्राफेस्ट टेक्नॉलॉजी’ ही, आयटी प्रॉडक्ट बनवणारी कंपनी स्थापन केली. ती तशा प्रकारची पहिली भारतीय कंपनी. अल्पावधीतच, सचिन सतरा हजारांहून अधिक लहान कंपन्यांना तांत्रिक मदत (टेक सोल्युशन) पुरवत त्यांनाही सबळ बनवण्याचे काम करू लागला. त्याच्याकडे व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असणारी सर्जनशीलता आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे. फेसबुक जगभरात विकसित होत असतानाच्या काळात त्या सोशल नेटवर्किंग साईटचा आवाका लक्षात येताच, त्यावर उत्पादनांची जाहिरात करणारी सचिनची ‘सोशल कनेक्ट’ ही पहिली भारतीय कंपनी ठरली. ‘सेंट्राफेस्ट टेक्नॉलॉजी’, ‘आयटूआय इंटरअॅक्टिव्ह’ आणि ‘सोशल कनेक्ट’ या तीन कंपन्यांचा मालक असलेल्या सचिनला आता तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोचावे, अशी इच्छा आहे.

सचिनचा जन्म सावंतवाडीत झाला. दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. त्याने बीई (इलेक्ट्रॉनिक्स) सांगली येथे जाऊन केले. तो 1994 मध्ये मुंबईला आला. पुढे त्याने एमबीए (मार्केटिंग) केले. त्यानंतर ‘टाटा’सारख्या मोठ्या कंपनीमध्ये ‘बिझनेस स्टार्टप’चा अनुभव घेतला. त्‍याने टाटामध्ये 2000 पर्यंत नोकरी केली. त्यावेळी तो अंधेरी येथील कंपनीच्या क्वार्टर्समध्ये राहत होता. त्याने 2001 च्या फेब्रुवारीपर्यंत Edit and humming bird यांच्या भारताच्या कार्यालयात टेक्नॉलॉजीवर काम केले. तेथे त्याने ऑटोमेशन, प्रोजेक्ट लीड करणे अशी कामे केली. त्यावेळी एमडींनी सचिनला प्रोत्साहन दिले. ते त्याला म्हणत की, “तुझ्यात बिझनेस डेव्हलप करण्याचे गुण आहेत. तू ते करू शकशील.” त्या‍ दीड वर्षांच्या काळात सचिनच्या मनात, नोकरीत गुंतून न पडता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असा विचार घोळत होता. त्याच्या कुटुंबात कुणीच व्यावसायिक नव्हते. त्याने लोकांचे सल्ले घेतले. मग सचिन आणि त्याचे मित्र वीरेंद्र रावत व प्रशांत पाटील यांनी एकत्र काम करायचे ठरवले. वीरेंद्रला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम करत यूएसला सेटल व्हायचे होते. तोपर्यंतच्या काळात हार्डकोअर गोष्टी करायच्या हेतूने तो दोन वर्षे काम करण्याच्या अटीवर सचिन आणि प्रशांतबरोबर आला. सचिनने २००1 मध्ये ‘सेंट्राफेस्ट टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून तंत्रज्ञानक्षेत्रात स्वतंत्रपणे पहिले पाऊल टाकले.

सचिन आणि त्याच्या टीमने सर्वप्रथम प्रॉडक्ट कम सोल्युशन तयार केले. त्याला नोव्हेंबर 2001 मध्ये ऑर्डर मिळाली आणि त्याने ते सोल्युुशन डिसेंबर महिन्यात रिलीज केले. पुढे, कॉन्टॅक्ट मॅनेजमेन्ट आणि कार्ड स्कॅनर्स तयार करताना सचिनने तैवानमधील कंपनीशी करार (टायअप) केला. ते हार्डवेअर पार्ट त्या कंपनीकडून मागवत असत. अल्पावधीत सचिनने मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या कंपन्यांसह सतरा हजार कंपन्यांना टेक सोल्युशन पुरवण्याची कामगिरी पार पाडली. ती मोठी उपलब्धी होती. त्या सर्व कामांमध्ये सचिनची टीम त्याच्यासोबत होती.

‘सेंट्राफेस्ट’ ही भारतामध्ये व्हिजिटिंग कार्ड स्कॅनर्स, मोबाइल स्कॅनर्स, स्कॅनपेन, पर्सनल सेक्रेटरी सॉफ्टवेअर अशा सुविधा उपलब्ध करून देणारी पहिली कंपनी ठरली. सचिनने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘सेंट्राफेस्ट’च्या अंतर्गत लहान-लहान क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या शाखा चौदा वर्षांत सुरू केल्या. त्यामध्ये ‘व्ही फॉर व्हॅल्यू इन्फोटेक’ आणि ‘आयटूआय इंटरअॅक्टिव्ह’ यांचा समावेश आहे. इमेजिंग, वर्कफ्लो, इ-फॉर्मस, आऊटपूट मॅनेजमेंट सोल्युशन्स यांसारख्या नव्याने उदयाला येणाऱ्या क्षेत्रांना सपोर्ट सिस्टिम देण्याचे काम ‘सेंट्राफेस्टा टेक्नॉलॉजी’तर्फे सुरू झाले.

सचिन सांगतो, “‘सेंट्राफेस्ट’ नेहमी काहीतरी नवे आणि इनोव्हेटिव्हर प्रॉडक्टज आणते’ अशी आमच्या कंपनीची व्यावसायिक वर्तुळात प्रतिमा बनत गेली. आम्हाला अनेकांकडून कामाबद्दल विचारणा होऊ लागली. त्यातनंतर आम्ही प्रॉडक्ट आणि सोल्युशनऐवजी प्युअर ब्रॅण्डिंगमध्ये उतरलो. ‘सेंट्राफेस्ट’ची इमेज डेव्हलप होत गेली. लॉजिक एक्‍स्‍टेंड होत गेले. माझ्याकडे प्रॉडक्ट मार्केट रिसर्चरची पार्श्वभूमी असण्याचा कंपनीला फायदा होत गेला.”

सचिनने सुरू केलेली ‘आयटूआय इंटरअॅक्टिव्ह’ ही कंपनी मोठ्या कंपन्यांच्या वेब प्रेझेन्सपासून लहान कंपन्यांच्या डिजिटल श्रीगणेशापर्यंत लागणारी सर्व मदत करते. ती लहान उद्योजकांना वेबजगतामध्ये पाय रोवण्यासाठी मोठी मदत आहे. एखाद्या कंपनीच्या तंत्रज्ञानातील नेमक्या गरजा काय आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत कशी होऊ शकेल, याची यशस्वी उत्तरे शोधण्यास ‘आयटूआय इंटरअॅक्टिव्ह’ने काही कंपन्यांना मदत केली आहे. त्यांच्या ‘एव्हरीथिंग अॅट वन क्लिक’ या संकल्पनेवर आधारित इ-कॅटलॉगचे तर जगभर कौतुक झाले आहे.

सचिनने 2001 मध्ये लग्न  केले. त्याच्या व्यवसायाला त्याच्या पत्नीच्या आणि इतर कुटुंबीयांच्या पाठिंब्याविषयी तो सांगतो, “माझी पत्नी प्राची केळकर ही आर्किटेक्ट आहे. मी व्यवसाय सुरू केला तेव्हा ती डिलाईन आर्किटेक्चर कंपनीत काम करत होती. लग्न झाल्यानंतर हळुहळू तिला माझे विचार कळू लागले. तिने मला पाठिंबा दिला. तिने सुरुवातीची दोन वर्षे घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळली. ती कामाव्यतिरीक्त बाकीच्या असाइनमेन्ट घ्यायची. तिने पार्ट टाइम जॉबही केला. त्यानंतर मी डोंबिवलीला अडीचशे स्क्वेअर फिट आकाराच्या गाळ्यात एक टेबल, एक फोन, सेकंड हॅण्ड पीसी आणि लॅपटॉप अशा सामग्रीच्या आधारावर ऑफिस सुरू केलं. मी आणि प्रशांतने दीड वर्षं पगार घेतला नाही. माझी बहीण इंजिनीअर आहे. ती त्यावेळी जॉब करून आमच्या मदतीला यायची. ती सध्या ओरॅकलच्या पुणे विभागात प्रमुख आहे. माझ्या मामेबहिणीचे पतीही मदतीला यायचे. रात्री उशिरापर्यंत आमचं काम चालायचं. त्या सुरुवातीच्या काळात माझ्या घरून खूप मदत झाली.”

सचिन सुरुवातीच्या व्यावसायिक संघर्षाच्या काळाविषयी सांगतो, की “2007 च्या सुमाराला डिजिटल मार्केटिंग फारसं विचारात घेतलं जात नसे. त्यावेळचं डिजिटल मार्केट दोनशे कोटींच्या आसपास होतं. त्यामध्‍ये आमचा बिझनेस पंचवीस लाख रुपयांपर्यंतचा होता. डिजिटल मार्केटिंगला माणसं मिळत नसत. ‘बिग अड्डा डॉट कॉम’ या रिलायन्सच्या सोशल आणि इ-कॉमर्स साईटचं काम आमच्याकडे होतं. रिलायन्सला लोकांचं हवं असलेलं रजिस्ट्रेशनचं काम आम्ही सांभाळत होतो. लोकांना साईटकडे आकर्षित करण्यासाठी रिलायन्सनं अमिताभ बच्‍चनचा ब्लॉग सुरू केला. त्यात वेळी अमिताभ ऑनलाईन उपलब्ध असण्याचं ते एकमेव ठिकाण होतं. लोक साईटला भेट देत, पण अमिताभचा ब्लॉग वाचून निघून जात. त्‍यामुळे ती साईट केवळ अमिताभचा ब्लॉग होऊन राहिली. रिलायन्सची ती कल्पना यशस्वी ठरली नाही. फेसबुक भारतात येण्यापूर्वी आम्ही त्याच संकल्पनेच्या जवळ जाणारं पोर्टल बनवायला घेतलं होतं. त्याचं नाव होतं ‘मेरा गँग डॉट कॉम!’ आम्ही  मोठ्या उत्साहानं ‘मेरा गँग’चे काम सुरू केलं. त्याचवेळी मित्रानं ‘फेसबुक’ नावाची वेबसाईट सुरू होत असल्याची माहिती दिली. मी ‘फेसबुक’चं ऑनलाईन स्वरूप पाहिलं. जे आपल्या डोक्यात आहे तेच फेसबुक, वेगळ्या आणि व्यापक पातळीवर करत आहे, हे आमच्या लक्षात आले. ‘फेसबुक’ पुढे जाऊन मोठं रूप धारण करणार असल्याचं आम्‍ही हेरलं. सोबत रिलायन्‍सच्‍या साइटवरून आम्‍ही धडा घेतला होता. त्यामुळे ‘मेरा गँग…’वर पैसे आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा फेसबुकशी कसं जोडून घेता येईल, याचा विचार आम्ही करू लागलो.”

सचिन पुढे सांगतो, “ जेव्हा 2006-07 साली फेसबुक भारतात आलं, तेव्हा भारतातील पहिल्या शंभर युजर्समध्ये मी होतो. त्यावेळी इतरांकडून आलेल्या इन्व्हिटेशनवरच फेसबुकचं अकाऊंट सुरू करता येत असे. फेसबुक ही उद्याच्या जाहिरातविश्वातली महत्त्वाची गोष्टं होणार, हे आम्ही ओळखलं आणि फेसबुकचा आमच्या ग्राहकांच्या ब्रॅण्डला फायदा कसा करून देता येईल याचा विचार सुरू केला. आम्ही फेसबुकच्या प्रत्येक बदलासाठी नेहमीच तयार असायचो. फेसबुकनं जेव्हा ‘पेज’ ही कल्पना लॉन्च केली, त्याच्या पुढच्या तासाभरातच आम्ही काही पेजेस तयार केली. त्यातील पहिलं पेज ‘लॉर्ड गणेशा’ हे होतं. त्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आम्ही क्रिकीपिडिया, फूडफेटीश, बॉलिवूड, फॅशन, ब्युटी आणि वेलनेस ही फेसबुक पेजेस तयार केली. त्या सा-यांना वीस ते तीस लाख ऑर्गनिक फॉलोअर्स (पैसे देऊन पेज बूस्‍ट न करता पेजला लाभलेले फॉलोअर्स) आहेत. आम्ही फेसबुकवर एकूण एकशे चाळीस लाख लोकांना कनेक्टेड आहोत. तेही कोणतीही पोस्ट  बुस्ट न करता! त्याशिवाय भारतातील सर्वात मोठे बॉलिवूड पेज (तेवीस लाख सदतीस हजार लाइक्स), फॅशनशी संबंधित सात पेजेस (नव्वद लाख लाइक्स), ही सर्व ‘सोशल कनेक्ट’च्या मालकीची पेजेस आहेत. फेसबुकवर जाहिराती येण्यास सुरुवात झाली आणि त्याच्या चौथ्याच दिवशी आमचा फेसबुकच्या आयर्लंड येथील मुख्य कार्यालयाशी करार झाला. त्यावेळी फेसबुकसुद्धा भारतात वेगवेगळ्या कंपन्यांंशी टायअप करण्याच्या प्रयत्नात होतं. त्यावेळी आमचं काम साठ लाखांपर्यंत असेल. पण आमचं पोटेन्शियअल आणि आमचे भविष्यातले प्रॉस्पेक्‍ट्स पाहून त्यांनी आम्‍हाला महिन्याला पाच कोटींचा क्रेडिट फंड (फेसबुकवर जाहिरातींच्या कोट्यासाठीचा फंड) दिला. त्यामुळे आमची क्रेडिबिलिटी वाढली होती.”

सचिन आणि त्याच्या सहका-यांनी 2009 मध्ये ‘सोशल कनेक्ट’ ही कंपनी सुरू केली. आयर्लंण्डमधील फेसबुकच्या मुख्यालयाशी करार करून कॉर्पोरेट जाहिरातींचे अधिकृत पार्टनर होणारी ‘सोशल कनेक्ट’ ही भारतातील पहिली कंपनी ठरली. ‘सोशल कनेक्ट’ने ‘लिंक्डइन’, ‘गुगल’ यांच्याबरोबरही कॉर्पोरेट जाहिरातींचे अधिकृत पार्टनर म्हणून करार केले आहेत. ‘सोशल कनेक्ट’ने आतापर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांसाठी जाहिरातींच्या विविध संकल्पना राबवल्या आहेत. त्यामध्ये फेसबुक पेजेसशिवाय, पन्नास ब्रॅण्डेड गेम्स आणि सातशे फेसबुक अॅप्सचा समावेश आहे. व्टिटर, फेसबुक यांच्यासोबतच इन्स्टािग्राम, गुगल प्लस, हँगआऊट यांच्या माध्यमातूनही अनेक ब्रॅण्डच्या वेबसाईटना हिट्स मिळवून देण्यात ‘सोशल कनेक्ट’ अग्रस्थानी आहे.

‘सेंट्राफेस्ट’, ‘आयटूआय इंटरअॅक्टिव्ह’ आणि ‘सोशल कनेक्ट’चा आणखी एक संचालक प्रशांत पाटील याचाही कंपनीच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा आहे. त्याचा मार्केटिंग अँड कन्झ्युमर बिहेविअरमध्ये अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे. तो सांगतो, “माझं प्रॉडक्ट‍ चांगलं आहे म्हणून ते विकलं जाईल, हा विचार एके काळी योग्य होता. पण एखादं प्रॉडक्ट  विकत घेतल्यानंतर त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल हे सांगण्याचे आजचे दिवस आहेत. ग्राहकाला समजून घेण्याची, त्याची मानसिकता समजून त्यानुसार कृती करण्याचे हे दिवस आहेत.” प्रशांतने मार्केटिंगमध्ये पुणे विद्यापीठातून एमबीए केल्यानंतर बरीच वर्षे ‘मिट्रिक्स कन्सलट्न्सी’मध्ये काम केले. तेथे त्याला वेगवेगळ्या प्रकारची कामे करायला मिळाली. ती कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्व्हे करत असे. त्याने इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगही केले आहे. त्‍यात मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल आणि केमिकलचाही समावेश असतो. तसेच त्याने एमबीए करत असताना रोबोटिक्सचाही कोर्स केला होता. त्या सगळ्याचा त्याला डिजिटल क्षेत्रात चांगला फायदा झाला. मुख्य म्हणजे प्रशांत ग्राहकांची मानसिकता ओळखायला शिकला. पाम नेटवर्क लिमिटेडमध्ये काम करत असताना त्याची आणि सचिनची ओळख झाली. पुढे त्यांनी एकत्र काम करायचे ठरवले.

प्रशांत म्‍हणतो, “कोणत्याही व्यवसायात ग्राहकाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याची एनर्जी किती आहे, तेसुद्धा समजून घ्यावं लागतं. आजची पिढी ही डिजिटल संवाद समजते. पण आधीच्या पिढीला ते सगळं समजावून सांगावं लागतं. अशा वेळी आम्ही त्यांच्याशी कन्सल्ट करतो. त्यांच्या एकेका पैशाचा हिशोब देतो. त्यामुळे पूर्वी ज्या कंपन्यांचे प्रॉडक्ट ऑनलाईन नव्हते ते आमच्या प्रयत्नांमुळे आज ऑनलाईन आले आहेत. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्यांची विक्री होत आहे. आमच्याशी जोडलेली माणसं कायम कशी जोडलेली राहतील, यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न असतात.” प्रशांतच्‍या कामाचा पद्धत अशी, की तो क्लाएंटच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन त्‍यांना स्वतःच्या उत्पादनाचा क्रिएटिव्ह विचार करायला मदत करतो. क्‍लाएंटने सुचवलेल्या कल्पनांमुळे जाहिरातीत जास्तीचे बदल होत जातात आणि जाहिरातीची किंमत वाढत जाते. त्‍यामुळे क्लाएंट कधीकधी थोडा धास्तावतो. जाहिरात घडणीची ती प्रक्रिया कठीण आणि इंटरेस्टिंग असते. त्‍यावर प्रशांतचे नियंत्रण असते. त्याच्याकडे मार्केट रीसर्चचे ज्ञान आहे. जाहिरात क्षेत्रात ऐकण्याची क्षमता महत्त्वाची असते, ती प्रशांतकडे मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच सचिन प्रशांतला कंपन्यांचा ‘बेसिक सक्सेस पॉइंट’ मानतो. प्रशांतने त्याच्‍याठायी असलेल्या क्षमता त्‍याच्‍या ग्रुपमध्येही विकसित केल्या आहेत. त्यामुळे एखाद्या क्लाएंटने त्यांच्याबरोबर काम केले की, तो क्लाएंट त्यांच्या कंपनीचा एक भाग बनून जातो.

‘सोशल कनेक्ट’ ही ‘परफॉर्मन्स बेस अॅड’ची कल्पना समोर आणणारी पहिली कंपनी. मात्र त्या कल्‍पनेला मोठमोठ्या जाहिरात कंपन्यांकडून आणि या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींकडून विरोध झाला. सचिन आणि त्‍याच्‍या टिमला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘परफॉर्मन्स बेस अॅड’मुळे ‘टाइम्स’पासून ‘एचसीएल’सारख्या कंपन्यांनी डोंबिवलीतील ‘सोशल कनेक्ट’सारख्या छोट्या कंपनीकडे धाव घेतली. कारण ‘सोशल कनेक्ट’ परफॉर्मन्समवर पैसे घेते. तेच ‘सोशल कनेक्ट’कडे त्‍या कंपन्यांनी येण्याचे आणि क्लाएंट म्हणून टिकून राहण्याचे कारण आहे. ‘सोशल कनेक्ट’ने ‘टाइम्स जॉब’साठीही काम केले. ‘टाईम्स जॉब’ने रेझ्युमे मिळवण्‍यासाठी अनेक माध्यमांतून जाहिरात करत आठ कोटी खर्च केले. मात्र काही महिन्यांच्या कालावधीनंतर ‘टाईम्स जॉब’ला फक्त दोन लाख रेझ्युमे मिळाले होते. ‘सोशल कनेक्ट’ने ‘टाइम्स जॉब’ला फक्‍त डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अडीच कोटी रुपयांत चाळीस दिवसांत नऊ लाख रेझ्युमे आणून दिले! ‘सोशल कनेक्ट’ने डिजिटल मीडियावर ‘टपर वेअर’साठी ‘रोड ब्‍लॉक कॅम्‍पेन’ (दिवसभर एकाच प्रॉडक्टच्या जाहिराती दिसणे) लावून त्यांचे वेगळेपण दाखवून दिले.

त्याबाबत सचिन सांगतो, “‘टपरवेअर ही जर्मन आणि यूएसमधील मोठी कंपनी. आम्हाला त्याच्याकडून बोलावणं आलं. त्यांना आमचं काम आवडलं आणि आम्ही तेव्हापासून त्यांच्यासाठी वेगवेगळी कामं केली. आम्ही त्यांच्या रेव्हेन्यू्मधला चार ते पाच टक्‍क्‍यांचा रेव्हेन्यू डिजीटल ब्रॅण्डिंगमध्ये आणला. आम्ही त्यांच्या डिजिटल ब्रँडिंगसोबत त्यांच्या जाहिरातीचं रुपांतर विक्रीत करून देतो.”

‘विको’ ही भारतातील नावाजलेली कंपनी. त्यांची स्वतःची अॅड एजन्सी आहे. सचिनच्‍या कंपनीने त्यांच्‍यासोबत काम करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. त्यांनी हो-नाही करत त्‍यांना प्रेझेन्‍टेशन देण्‍यासाठी नागपूरला बोलावले. ‘सोशल कनेक्‍टला’ सादरीकरणासाठी अर्धा तास देण्‍यात आला. पण ते सादरीकरण एवढे प्रभावी झाले, की ती मीटिंग दिवसभर चालली. संध्याकाळी निरोपाच्‍या वेळी ‘विको’च्‍या अधिका-यांनी सचिनच्‍या टिमला ‘काम सुरू करा’ असे म्‍हणत ग्रीन सिग्‍नल दिला. सोबत ‘आमच्याकडून काम मिळवणारे तुम्ही पहिलेच आहात’ अशी कौतुकाची थापही दिली. ती घटना ‘सोशल कनेक्‍ट’साठी खूप महत्त्वाची होती. आता ‘सोशल कनेक्‍ट’कडून ‘विको’च्या टीव्हीत अॅड बनवल्‍या जातात. त्‍यांनी विकोची जाहिरात करण्यासाठी मार्केट आणि प्रॉडक्ट यांचा बारकाईने अभ्यास केला. पूर्वी विकोच्या जाहिराती प्रॉडक्ट फोकस असायच्या. ‘सोशल कनेक्‍ट’मुळे ‘विको’ने प्रथमच संकल्पना घेऊन जाहिरात केली. ‘सोशल कनेक्ट’ने ‘गोल्डन आर्कस्’ हे प्रिमिअर कॅटीगरीतले बिस्कीट फक्त डिजिटल मीडियासाठी लॉन्च केले. सचिन म्‍हणतो, ” फक्त जाहिरात लोकांपर्यंत पोचवणं महत्त्वाचं नाही, तर ती जाहिरात पाहून लोकांनी त्या प्रॉडक्‍टचा उपयोग करणं, हे आम्ही आमचं यश मानतो.”

सचिन केळकर वैयक्तिक पुरस्कार स्वीकारत नाही. ‘डोंबिवली भूषण’चा अपवाद वगळता त्याने कोणताही पुरस्कार स्वीकारलेला नाही. त्याच्या मते जे काही पुरस्कार मिळाले आहेत किंवा मिळत आहेत ते कंपनीला आणि कंपनीतील सगळ्यांच्या कष्टाला मिळत आहेत. ‘सोशल कनेक्ट’च्या ‘सी कॅन यू कॅन’ या कॅम्पेनचा ‘कस्टमर एंगेजमेण्ट’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्‍यांना बंगळुरूच्या ‘जेसी पॉल’ या नामांकीत कंपनीचे लागोपाठ दोन वेळा पुरस्कार मिळाले. ‘सोशल कनेक्ट’ला पेअर्स ब्रॅण्ड करता ‘हायेस्ट एन्गेज ब्रॅण्ड ऑन फेसबुक अॅण्ड सोशल मीडिया’ हा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्‍यांनी ‘अॅक्स’ या ब्रॅण्डकरता लॉन्‍च केलेले शॉवर जेलचे कॅम्‍पेन त्या काळात सर्वाधिक हाईप झाले होते. त्या कॅम्‍पेनला गोवा अॅड फेस्टिअव्हलमध्‍ये पुरस्कार लाभला. सोशल कनेक्टरला ‘टपरवेअर’करता २०१२-१३ वर्षातील कामासाठी डिजिटल एजन्‍सीसाठी प्लॅटिनम पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय ‘सोशल कनेक्टस’ला पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. सचिन म्‍हणतो, ”आम्‍हाला अनेक पुरस्‍कार मिळाले असले तरी मी किंवा आमच्या कंपनीने पुरस्कारांसाठी कधीच अर्ज भरला नाही. आतापर्यंत आमच्या क्लाएंटनीच आमच्‍याबद्दल असलेल्‍या आपलेपणाच्‍या भावनेतून आमच्‍यासाठी अर्ज भरून पाठवले आहेत आणि मिळालेले पुरस्कार स्वतः स्वीकारून आम्हाला आणून दिले आहेत.”

सचिनला त्याची फेसबुकचा सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग याच्याबरोबर आणि फेसबुकच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेली भेट अविस्मरणीय वाटते. त्या भेटीत डिजिटल मीडिया, सोशल मीडियाचे भविष्य, भारतीय युजर्सची वाढती संख्या, आपत्तीच्या काळात लोकांना फ्री इंटरनेट देण्याची गरज या विषयांवर चर्चा केल्याचे सचिन सांगतो.

सचिनची सध्या दोन कार्यालये आहेत. एक डोंबिवलीला आहे. दुसरे ठाण्याला. तो आता वांद्रे-कुर्ला संकुल येथे तिसरे कार्यालय सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘मॅरिको’ कंपनीचा टर्नओव्हर शंभर कोटींपासून सात ते आठ हजार कोटींपर्यंत नेणारे मिलिंद सरवटे सचिनच्या नव्या कंपनीच्या कामात मदत करत आहेत. सचिन म्हणतो, “आमच्या दोघांचं एकत्रित काही नवे व्यवसाय आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यवसाय कसा वाढेल, याचा विचार आम्ही करत आहोत.”

सचिनचे म्हणणे आहे, की “तंत्रज्ञानाचे फायदे अजूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेले नाहीत. शिवाय भविष्यात अनेक आव्हानं केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीनं पार करावी लागणार आहेत. त्यासाठी तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आजच्या तरुण पिढीसमोर पर्याय भरपूर आहेत. त्यामुळे त्यांनी यशासाठी प्रयत्न करणं सुरू ठेवलं पाहिजे. लोकांना चांगल्या ‘प्रॉडक्ट’ची व चांगल्या सेवेची गरज आहे. त्यामुळे त्याच्या शोधात ते कोठेही जात असतात. प्रत्येक प्रयत्नाची नक्कीच कोणीतरी नोंद घेत असते. डोक्यानं शास्त्रज्ञासारखं वागलं आणि हृदयानं क्रिएटिव्ह राहिलं, तर कोणीही व्यक्ती चमत्कार घडवू शकते!”

सचिन केळकर
98205 01457
sachin@i2eyemail.com

– वैभव शिरवडकर

About Post Author

Previous articleसोलापूरचे पक्षिवैभव
Next articleख आणि सुख-दुःख
वैभव शिरवडकर हे दैनिक 'प्रहार'मध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी त्याआधी 'नवशक्ती', 'सकाळ', 'पुण्यनगरी' या वर्तमानपत्रात आणि 'साप्ताहिक विवेक'मध्ये उपसंपादक म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर त्‍यांना 'प्रेस इन्फाॅमेशन ब्युरो, मुंबई' आणि 'आॅल इंडिया रेडिओ, मुंबई'साठी भाषांतरकार आणि वृत्तनिवेदक म्हणून काम करण्‍याचा अनुभव आहे. शिरवडकर यांनी मराठी विषयातून एम.ए. आणि मराठी विज्ञान परिषदेतून विज्ञान पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9619752642 / 9594755067

7 COMMENTS

  1. Heartiest Congratulations. It
    Heartiest Congratulations. It is with great joy to write this congratulatory message to you on your fine achievement in business success. Ones again congratulation really a great achievement.

  2. Social media advertisement चा
    Social media advertisement चा concept भारतात आणणारी माणसे (Company), तुमच्या creativity ला सलाम..

  3. I am really happy to congrats
    I am really happy to congrats you for your great achievement in business.Keep it up.May God bless you for further progress.

  4. भारताचा झुकरबर्ग म्हणजे सचिन
    भारताचा झुकरबर्ग म्हणजे सचिन केळकर

  5. सर नमस्कार
    सर नमस्कार. आपले कार्य अप्रतिम प्रेरणादाई आहे.

  6. Congratulations to you and
    Congratulations to you and your team.Your journey is inspiring. You think differently and have insight for future developments.

Comments are closed.