सखा कलाल – एका कथाकाराची अखेर

0
352

सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. त्यांचे ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले…

सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. मित्र-सच्चा मित्र गेल्याचे दु:ख तर आहेच आहे. पण मैत्रीचा अखंड जपलेला धागा त्यांच्या जाण्याने तुटला, त्याचे दु:ख फार व्यथित करणारे आहे.

त्यांची पहिली भेट नेमकी कधी झाली? कोठे झाली? या प्रश्नांची उत्तरे मला जरी देता आली नाहीत तरी त्यांची ओळख प्रथम करून दिली ती आमच्या माधव मोर्डेकरसरांनी. ते बेळगावच्या रायबागला शाळेत शिक्षक होते. कलाल त्यांचे विद्यार्थी होते. सखा कलाल यांच्या घरची परिस्थिती प्रतिकूल होती. कलाल यांना शिक्षणाचा ध्यास होता, तरी त्यांना घरचे वातावरण पूरक नव्हते. पण कलाल मोठ्या जिद्दीचे. त्यांची शिकायचेच ही जिद्द कायम होती आणि त्यात त्यांना प्रोत्साहन देणारे मोर्डेकरसरांसारखे शिक्षक लाभले. ते सखा कलाल यांच्या धडपडीकडे डोळसपणे पाहत होते.

सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. कधी कधी त्यांना सांगावेसे वाटले, तरी ते जाणून बुजून बोलायचे टाळत. त्यामुळे आमचा संवाद ‘ये हृदयीचे ते हृदयी’ असा होता. त्यांनी त्याची कधी, कोठे आणि कोणाजवळही वाच्यता करायची नाही असे वचनच जणू काही माझ्याकडून घेतले होते.

ते कोल्हापूरला आले आणि त्यांना गाव नवीन, माणसे नवीन, कोणाची फारशी ओळख नाही, पण त्यांच्या सुदैवाने त्यांना त्यांचे मुकेपणाचे गुपित जाणणारी माणसे लाभली. दिवसभर कामधंदा करायचा, रात्री कॉलेजचे शिक्षण. हॉटेल ओपलच्या मन्याबापू पडळकर, मोहन लाटकर यांनी त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी सखा कलाल यांच्यातील गुण ओळखले. कलाल कष्टाने शिकले. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयातही त्यावेळी काहीबाही कामे केली असावीत.

ते एम ए झाले. त्यांना बालपणापासून वाचनाची आवड होती. ती पुढे, त्यांचा ध्यास बनली. ते चोखंदळ वाचक तर होतेच, पण पुढे ते ग्रंथपाल – अभ्यासू, मदतीचा सदैव हात पुढे असलेला – म्हणून त्यांनी जसा लौकिक संपादन केला. तसेच, त्यांनी काळजाला भिडणारे कथालेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांनी जे जीवनभर अनुभवले त्याचे दर्शन त्यांच्या ‘ढग’, ‘सांज’ या कथासंग्रहातील कथा वाचताना जाणवते. ‘मौजे’चे श्री.पु. भागवत त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देतच. त्यांनी ‘सत्यकथे’चे लेखक म्हणून लौकिक संपादन केला तरी त्यांचे पाय जमिनीवर होते. त्यांना ते लेखक म्हणून कोणी वेगळे आहेत असे कधी वाटले नाही. लीनता हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य. मी ‘सकाळ’मध्ये होतो, नामवंत कथाकार व्यंकटेश माडगूळकर चर्चासत्रात भाग घेण्यासाठी कोल्हापूरला आले होते. ते चर्चासत्र शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित केले गेले होते. व्यंकटेश यांचा मुक्काम, विद्यापीठाच्या अतिथिगृहात होता. त्यांना ‘सकाळ’च्या संपादकीय विभागातील मंडळींशी गप्पा करण्यासाठी बोलावले गेले. आकाशवाणीतील अनुभव, किस्से, लेखनप्रक्रियेविषयीचे त्यांचे मनोगत असा सुरेख माहोल ‘सकाळ’च्या गांधीनगर कार्यालयात जमला आणि योगायोगाने सखा कलाल तेथे आले. ते आले याचा आनंद साऱ्यांना झाला. आम्ही ती संधी साधून तात्यांच्या हस्ते स्थानिक मोलाचा कथाकार म्हणून सखा कलाल यांचा छोटासा गौरव समारंभ योजला. सखा कलाल त्या दिवशी मोजकेच बोलले. ते संकोचले होते. ते म्हणाले, ‘तात्यांच्या हस्ते गौरव हे मी माझे भाग्य समजतो, पण मी या सत्काराला पात्र खरोखरीच आहे का? जे वाटले ते मी लिहिले. त्याला कथारूप प्राप्त झाले. कथा आवडल्या. एवढंच.’

कलाल यांनी सोलापूरला एका महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून काही काळ काम केले. सहा-सहा महिने वेतन नाही. परके गाव, संसाराची मांडामांड केलेली. कौटुंबिक अडचणी आणि साधा सरळ स्वभाव… त्यांना नोकरीत होणाऱ्या त्रासाची हकिगत वि.स. खांडेकर यांना कळली. खांडेकर यांना कलाल यांच्या कथा आवडायच्या. ते त्याविषयी बऱ्याच वेळा बोलायचे. खांडेकर यांनी कलाल यांच्यासाठी काही तरी करायचे असे ठरवले. कलाल सोलापूर सोडून कोल्हापूरला आले. ते तेथील कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून रुजू झाले. त्या मधल्या काळात कलाल-खांडेकर पत्रसंवाद झकास जमून गेला होता. मीच ती पत्रे खांडेकर यांच्यासाठी लिहिली आहेत. त्यांच्या परस्पर पत्रसंवादाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले.

कलाल कोल्हापूरात मग कायमचे स्थिरावले. त्यांच्या संसाराचा विस्तार वाढत गेला. जबाबदाऱ्या वाढत गेल्या, पण कलाल यांच्या पाठीशी कितीतरी मोठमोठी माणसे उभी होती आणि तेच त्यांचे बळ होते. त्यांचा स्वभाव प्रत्येकाला मदत करण्याचा. त्याची परतफेड त्यांना मिळे. त्यामुळे त्यांनी निनावी नाती अनेक निर्माण केली आणि ती टिकवली. कलाल यांच्या शब्दकोशात फक्त दोन शब्द होते- कष्ट-कष्ट आणि सतत काळजी-चिंता. त्यामुळे त्यांचे जे काही थोडेसे मोकळेपण होते, तेही हळुहळू हरवत गेले. तरीही ते भेटायचे, कधी महाद्वार रोडवर, कधी अक्षरदालनात तर कधी एखाद्या सभेच्या ठिकाणी. त्यांना समारंभांचा तिटकारा होता. ते चांगली भाषणे ऐकण्यास आवर्जून येत. पण कार्यक्रम संपला, की क्षणभरही न थांबता तेथून निघून जात. त्यांची निराश मनस्थिती जाणवायची. त्या साऱ्या घटनांमुळे कलाल यांच्यामधील लेखक मात्र कोठे तरी हरवत गेला. कधी तरी ते घरी यायचे, वाचनाविषयी बोलणे होई. त्यांनी होमिओपथीचा अभ्यास केला असल्यामुळे ते कधी कधी आम्हाला औषधे सुचवायचे. घरी आणूनही द्यायचे. खांडेकर यांना काही पुस्तके हवी असली, की कलाल यांना पुस्तकांची यादी आणि निरोप गेला, की दुसऱ्या दिवशी ते राजारामपुरीत पुस्तके आणून द्यायचे.

आमच्या गाठीभेटी होत होत्या. वये पुढे सरकत होती आणि ती सरकत असतानाच बरोबर विविध व्याधींनाही सोबतीस घेऊन जात होती, पण ते सारे बाजूला ठेवून आमच्या गप्पा व्हायच्या. कधी त्यांच्या आर. के. नगरातील घरी तर कधी असेच बाहेर कोठेतरी!

त्यांचे कथालेखन वगैरे सारे ऐंशीच्या दशकाआधीचे. त्यानंतर कलाल यांचे कथालेखन जवळपास थांबले; फुटकळ स्फुटलेखन केले तेही मुख्य प्रवाहात आले नाही. त्यांच्या कथा ग्रामीण जीवनसंस्कृतीचा जिवंत प्रत्यय देणाऱ्या आहेत. त्यांच्या कथांतून ग्रामीण समाजजीवनापेक्षा ग्रामीण व्यक्तीच्या जीवनातील हळुवार प्रसंग व नातेसंबंध प्रकट होतात. मुख्य म्हणजे, ग्रामीण महाराष्ट्रीय जीवनाच्या वाटचालीच्या सातत्यातील एक तुकडा कलाल यांनी मराठी वाचकांना दाखवला!

स्वातंत्र्यपूर्व काळात र.वा. दिघे, ग.ल. ठोकळ, श्री.म. माटे, वामन चोरघडे यांनी ग्रामीण विश्व कथेत आणले. मात्र त्या कथा रंजनप्रधान अधिक होत्या. त्या रंजकतेला फाटा देत ग्रामीण जीवनाचा तळ धुंडाळणारी कथा व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, महादेव मोरे आदींनी लिहिण्यास सुरुवात केली, ती स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकभरात. त्याच काळात सखा कलाल हेही कथा लिहू लागले. ‘हिरवी काच’ ही त्यांची कथा ‘सत्यकथा’त 1959 साली प्रसिद्ध झाली; त्यांनी त्या कथेतील अभावग्रस्तेतेतील श्यामचा निरागसपणा कलात्मकतेने टिपला आहे. बेळगावच्या रायबागमध्ये जन्मलेल्या (1938), तेथील माळरानावर बालपण घालवलेल्या सखा कलाल यांचे जगणेच त्यात आले आहे असे एक मत आहे. त्या कथेने ‘सत्यकथा’च्या विशुद्ध वाङ्मयीन वर्तुळात त्यांचा शिरकाव झाला. पुढील वर्षभरात ‘विहीर’, ‘रान, ‘फेड’ या त्यांच्या कथा ‘सत्यकथा’तच प्रसिद्ध झाल्या.

कलाल यांचे हस्ताक्षर सुंदर होते. त्यांनी काही काळ लेखनिक, लिपिक म्हणून उमेदवारी केली. ग्रंथालयशास्त्रातील शिक्षण घेतल्यानंतर ते कोल्हापूरच्या महाविद्यालयात ग्रंथपालपदी रुजू झाले. तेथे त्यांचे आयुष्य गेले. ‘ढग’ (1974) आणि पुढे काही वर्षांनी ‘सांज’ हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्याखेरीज ‘पार्टी’ या शीर्षकाचा त्यांचा स्फुट लेखसंग्रह आहे.

त्यांचे निधन 13 डिसेंबर 2019 मध्ये झाले.

राम देशपांडे 8600145353 / 7385401938

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here