Home वैभव इतिहास संयुक्त महाराष्ट्र समितीत काँग्रेस नेते!

संयुक्त महाराष्ट्र समितीत काँग्रेस नेते!

0

ग.त्र्यं.माडखोलकर नागपूरच्या 'तरुण भारत'चे संपादक होते. ते अग्रलेखांद्वारे संयुक्त महाराष्ट्राची भूमिका व चळवळीस पोषक विचार पेरत होते. मुंबईत आचार्य अत्रे आणि नागपूरला ग.त्र्यं.माडखोलकर असे दोन खंदे प्रवक्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीला लाभले होते.

ब्रिटनच्या मंत्रिमंडळातले तीन मंत्री 1946 साली एप्रिलमध्ये हिंदुस्थानात आले असताना महाविदर्भ सभेने त्यांना महाविदर्भाचा स्वतंत्र प्रांत निर्माण करण्याची विनंती केली. त्या आशयाचे निवेदन विदर्भातले नेते पंजाबराव देशमुख यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्सल ह्यांना सादर केले.

त्याच सुमारास संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव बेळगावच्या साहित्य संमेलनात मांडण्यासाठी मध्यप्रांत व-हाडातील साहित्यिकांनी पाठवले. त्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.

माडखोलकरांना आपले प्रश्न महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्र एकीकरणाबाबत आस्था दाखवल्याशिवाय सुटणार नाहीत याची खात्री होती. त्यांनी काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्र एकीकरणाच्या कार्यात किंवा चळवळीत आणण्याचे प्रयत्न चिकाटीने केले.

माडखोलकरांनी हाच मुद्दा 29 जानेवारी 1946 च्या आपल्या अग्रलेखात मांडला. त्यात त्यांनी, ''देवांचे महाराष्ट्र एकीकरणाबाबतचे उदासीनतेचे आणि उपेक्षेचे धोरण अत्यंत उद्वेगजनक, अत्यंत चीड आणणारे नाही काय?'' असा सवाल विचारला.

पुढे, त्यांनी हाच प्रश्न साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात पुन्हा विचारला. शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ आणि बाळासाहेब खेर या महाराष्ट्राच्या राष्ट्रसभेतील नेत्यांना एकीकरणाची मागणी एकमुखाने करण्याइतके त्या प्रश्नाचे अगत्य कोठे वाटत आहे?''

नुसते प्रश्न उपस्थित करून उपयोग होणार नव्हता. साहित्य संमेलनात मंजूर झालेल्या ठरावानुसार जी संयुक्त महाराष्ट्र समिती नियुक्त करण्यात आली त्यात माडखोलकर, द.वा.पोतदार, श्री.शं.नवरे यांच्याबरोबर केशवराव जेधे आणि शंकरराव देव या महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांचाही समावेश करण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण परिषद शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ब्लॅवटस्की लॉजमध्ये 28 जुलै 1946 रोजी झाली. देवांनी माडखोलकरांनी केलेल्या अनास्था व उदासीनतेच्या आरोपांबाबत खुलासा केला. ते म्हणाले, ''देशाच स्वातंत्र्य मिळवणे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढे होता व आजही आहे. स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र काय किंवा कर्नाटक काय या प्रांतांच्या संयुक्तीकरणाचा प्रश्न गौण मानला पाहिजे व मी तो तसा मानतो.''

महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीत आपण सहभागी का झालो याचे कारण शंकरराव देवांनी याच भाषणात सांगितले, की ''स्वतंत्र हिदुस्थानची घटना तयार करण्याच्या कामाला सुरुवात होत असल्यामुळे, अशा वेळी महाराष्ट्र संयुक्तीकरणाचा प्रश्न हाती घेऊन तो तडीला लावण्याचा काल आता आला आहे म्हणूनच या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे मी मान्य केले.''

परिषदेचे स्वागताध्यक्ष होते मुंबईतले जेष्ठ काँग्रेस नेते स.का.पाटील! मुंबईच्या प्रश्नावर स.का.पाटील यांची भूमिका वादग्रस्त होती, म्हणण्यापेक्षा मुंबई प्रश्नावर स.का.पाटील वादात अडकले होते.पण हा प्रकार 1955-56 नंतर झाला असे नाही.

महाराष्ट्र एकीकरण परिषदेच्या स्वागताध्यक्षपदावर असताना सुध्दा, मुंबईचा प्रश्न परिषदेत उपस्थित केला जाऊ नये असे त्यांना वाटत होते. कारण वल्लभभाई पटेल आणि मंगळदास पक्वासा यांच्याकडून त्यांना तशी 'समज' देण्यात आल्याचे वृत्त पसरले होते.

महाराष्ट्र एकीकरणाची चळवळ सुरू झाल्यावर 'मराठी राज्य की मराठा राज्य' हा प्रश्न उभा राहिला व त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली. याचे कारण महाराष्ट्रात मराठा ही संज्ञा जातिवाचक अर्थाने रुढ असली तरी उत्तर भारतात ती जातिवाचक संज्ञा नसून सर्वसमावेशक अर्थाने वापरली जात होती.

महाराष्ट्र एकीकरण परिषदेच्या त्याच अधिवेशनात 'मराठा' या विषयावर बोलताना केशवराव जेधे म्हणाले, '' मराठा हा शब्द मी जातिवाचक अर्थाने वापरत नाही. मराठी बोलणारा महार व मराठी बोलणारा ब्राम्हण, या दोघांनाही मी मराठा समजतो.''

महाराष्ट्रातले जाती-जातींचे माजलेले जंजाळ पाहिले की वाटते, केशवराव जेधे यांची 'मराठी बोलणारा तो मराठी' ही व्याख्या जर आचरणात आणली असती तर !

मुंबईत भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेचा उद्देश घटना समितीसमोर एकमुखाने महाराष्ट्राच्या एकीकरणाची मागणी करणे हा होता.

'मराठी भाषिकांचा जो मुलुख ब्रिटिश सत्तेखाली आहे तेवढा प्रथम अलग करुन त्या सर्व विभागाचा एक मराठी प्रांत ताबडतोब बनवण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर राहिलेले विभाग, दक्षिण महाराष्ट्रातली संस्थाने, निजामाच्या ताब्यातला मराठवाडा आणि पोर्तुगीजांच्या अंमलाखालचा गोमंतक हे जसजसे साध्य होतील तसतसे मराठी प्रांतात समाविष्ट करण्यात यावेत अशी मागणी मुख्य ठरावात करण्यात आली होती.

'संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही असावी' अशी उपसूचना या ठरावाला 'नवाकाळ'चे संपादक य.कृ.खाडिलकर यांनी सुचवली. त्याति पां.वा.गाडगीळ, प्रभाकर पाध्ये, भा.वि.वरेरकर, अनंत काणेकर या मुंबईकर मंडळींनी पाठिंबा दिला, पण अध्यक्ष शंकरराव देवांनी ही उपसूचना वाचून न दाखवताच नियमबाह्य ठरवली

देवांच्या या कृत्याबद्दल 31 जुलैच्या 'लोकमान्य' पत्राच्या अंकात पां.वा.गाडगीळ यांनी लिहिले, ''मुंबई महाराष्ट्राची राजधानी असावी ही खाडिलकरांनी आणलेली उपसूचना परिषदेपुढे आली असती तर आम्ही उठून गेलो असतो” असे उद्गार व्यासपीठावरील एका बड्या काँग्रेस पुढा-याने काढले.

त्यावेळी व्यासपीठावर बडे काँग्रेस पुढारी म्हणजे स.का.पाटील हे होते! मुंबईचा महाराष्ट्रात समावेश होऊ देण्यास स.का.पाटील यांचा विरोध होता. उपसूचना न वाचताच ती नियमबाह्य ठरवण्याची, अध्यक्ष शंकरराव देव यांची कृती पक्षपाताची होती असेच म्हणावे लागेल. कारण त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा अधिकार वापरताना त्याचा उपयोग निर्भीडपणे करावयास हवा होता, पण स.का.पाटील यांच्या दबावाला शंकरराव देव बळी पडले. अर्थात हे आजचे निष्कर्ष आहेत. मुंबईच्या प्रश्नावर पुढे जे रणकंदन माजले त्याची कल्पना 1946 मध्ये कोठून असणार?

देवांच्या या कृतीबद्दल माडखोलकरांनी लिहिले आहे, ''श्री.देव यांनी ही उपसूचना नियमबाह्य ठरवून परिषद मोडू न देता सुरक्षित पार पाडण्यात थोड्याशा अरेरावीपणाबरोबर जी मुत्सद्देगिरी दाखवली ती योग्यच म्हटली पाहिजे.''

माडखोलकरांना परिषद मोडली नाही याचे समाधान वाटणे स्वाभाविक होते, कारण ही परिषद मोडली असती तर महाराष्ट्राच्या एकीकरणाच्या चळवळीला व्यत्यय निर्माण झाला असता.

महाराष्ट्राच्या एकीकरणाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल माडखोलकर लिहितात,''महाराष्ट्र साहित्य संमेलनाची भूमिका एकीकरणाच्या बाबतीत शुध्द ध्येयवादी तर महाराष्ट्र एकीकरण परिषदेची शु्ध्द व्यवहारवादी होती.''

महाराष्ट्र एकीकरण परिषद ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला एक महत्त्वाचा टप्पा ठरली, कारण त्या परिषदेनंतर एकीकरण चळवळीची सूत्रे लेखकांच्या हातून निसटली आणि राजकीय नेत्यांच्या हाती गेली!

चळवळीची सूत्रे राजकीय मंडळींच्या हातात जाताच, मराठी प्रांत निर्माण करण्यासाठी जरूर ती सर्व खटपट करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषद नावाची सर्वपक्षीय संस्था शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली.

Last Updated On – 1 May 2016

About Post Author

Exit mobile version