‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील व्याख्यानमालेत गोळवलकर गुरुजींचे ‘बंच ऑफ थॉट्स’मधील काही विचार कालबाह्य झाले असल्याचे म्हटले! भागवत यांनी काँग्रेसमुक्त नव्हे युक्त भारत, मुस्लिमांसह हिंदू राष्ट्र आदी मुद्दे आग्रहाने मांडले. विचारवंत, समीक्षक रावसाहेब कसबे यांचे ‘झोत’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले त्या घटनेला या वर्षी चाळीस वर्षें होत आहेत. त्यात ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाची तर्ककठोर चिकित्सा केली आहे. रावसाहेबांच्या मते, संघ तेव्हा कालबाह्य होता आणि आजही कालबाह्य आहे!
गोळवलकर गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ला बावन्न वर्षें पूर्ण झाली आहेत आणि रावसाहेबांच्या ‘झोत’ला चाळीस वर्षें. ‘झोत’ने इतिहासात रमून प्रखर हिंदू राष्ट्रवादाची पेरणी करणाऱ्या संघाची आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या कसोटीवर परखड समीक्षा केली. विसंगती अशी, की संघ एका बाजूला वाढत असला तरीही ‘झोत’ने उपस्थित केलेले प्रश्न चाळीस वर्षांनंतर तेवढेच टोकदार आहेत.
डॉ. केशव बळवंत हेडगेवार यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना 1925 मध्ये केली. ते संघाचे सरसंघचालक 1940 पर्यंत होते. मा.स. गोळवलकर गुरुजी हे संघाचे सरसंघचालक त्यानंतर 1940 ते 1973 अशी तेहतीस वर्षें राहिले. बाळासाहेब देवरस यांच्याकडे संघाची धुरा 1973 ते 1977 ही चार वर्षें होती. देवरस त्यांतील एकवीस महिने आणीबाणीत कारावासात होते. पुढे राजेंद्र सिंह (रज्जुभय्या), कृपाहल्ली सुदर्शन ते मोहन भागवत अशी सरसंघचालकांची कारकीर्द सांगता येते. संघाची लिखित अशी घटना नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या सांस्कृतिक संघटनेची तत्त्वप्रणाली कोणती असा प्रश्न पडणे साहजिक आहे. शिवाय, संघाच्या इतर सरसंघचालकांनी काही लिहून ठेवल्याची उदाहरणे नसल्याने गोळवलकर गुरुजी यांनी वेळोवेळी दिलेली भाषणे, मुलाखती हीच संघाची बौद्धिक संपदा मानली जाते. गुरुजींचे ‘विचारधन’ म्हणजे संघाची तत्त्वे आहेत असेही मोठ्या श्रद्धेने सांगितले आणि जपले जाते. गोळवलकर गुरुजींचे विचार आणि संघाची विचारसरणी एकमेकांपासून वेगळे काढणे हे संघाच्या स्वयंसेवकांना आणि संघाच्या टीकाकारांनाही शक्य झालेले नाही. गोळवलकरांची मते तो संघाचा आचारधर्म आहे.
गोळवलकर गुरुजींचे विचारविश्व हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन, मुस्लिमद्वेष आणि हिंदुराष्ट्रवाद या त्रयीवर उभे आहे. संघानेही त्याच गोष्टींना प्राधान्य दिले आहे. मग मोहन भागवत यांच्या दिल्लीतील अलिकडच्या भाषणांचा अन्वयार्थ संघ बदलतोय असा घेतला तर… तर संघाला खरेच धर्मनिरपेक्ष होता येईल का? आणि महत्त्वाचे म्हणजे संघाच्या जन्मातच रुजलेला मुस्लिमद्वेष नाहीसा होईल का? असे प्रश्न उद्भवतात.
पुनरुज्जीवनवादी धर्मविचार व त्यातून साकारलेली हिंदुराष्ट्रवादाची कल्पना हे गोळवलकर गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाचे मध्यवर्ती विचारसूत्र आहे. गोळवलकर गुरुजी म्हणतात, की “भारतीय समाज पुन्हा समर्थ समाज म्हणून उभा करायचा असेल तर भारताला हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण केले पाहिजे. हिंदू धर्मातील आदर्श समाजव्यवस्थेत प्रत्येक वर्णाला जी कर्मे निश्चित केली आहेत, ती कर्मे त्याने मरणालासुद्धा न घाबरता केली पाहिजेत.” गुरुजींनी त्यासाठी भगवद्गीतेचा दाखला दिला आहे, “धर्माने नेमून दिलेल्या कर्तव्याव्यतिरिक्त कर्म केल्याचे परिणाम भयानक असतात. म्हणून हिंदू जीवनपद्धतीचे पुनरुज्जीवन करणे हाच आपला राष्ट्रधर्म आहे.” गुरुजींचे हे विचार म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन आहे. गुरुजी एकीकडे जातिव्यवस्थेचे अनिष्ट परिणाम मान्य करतात, पण जाती-अंताला मात्र विरोध करतात. त्यांच्या मते, “हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म असून ऋग्वेदात वर्णन केलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वराचेच चतुर्विध स्वरूप आहे. आजची जातिव्यवस्था नष्ट करणे आणि वर्गविहिन समतेवर आधारलेला समाज निर्माण करणे म्हणजे सारे शरीर वर्गहीन करण्यासाठी कापून टाकणे होय. इतकेच नव्हे तर जातिव्यवस्था ही भारतीय समाजाला गेल्या हजार वर्षांच्या इतिहासात उपकारकच ठरली आहे.”
गोळवलकर गुरुजींच्या दहा ईश्वरी आज्ञा सर्वपरिचित आहेत. त्यात वर्णश्रेष्ठत्व, धर्मरक्षण आणि ईश्वरनिर्मित श्रुती व स्मृती यांना महत्त्व आहे. त्याशिवाय हिटलरचा धडा गिरवा, खाजगी संपत्तीचे रक्षण करा, स्त्री-पुरुष समानतेच्या बडबडीला थारा देऊ नका अशा आज्ञाही गुरुजींनी दिल्या आहेत. त्यांचे ते विचार संस्कृतिसंघर्षाचे कारण बनले आहेत. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी हे आधुनिक विचारधारा कुंठित करण्याचे प्रयत्न करू शकतात आणि त्यातून उद्याच्या लोकशाही समाजवादी समाजरचनेला धोका संभवतो. रावसाहेब कसबे यांनी त्यांच्या ‘झोत’ या पुस्तकात ते सप्रमाण सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाची चिकित्सा करणारे रावसाहेबांचे ‘झोत’ हे पुस्तक 1978 सालच्या मे महिन्यात प्रकाशित झाले. त्यानंतर महिन्याभरातच, 9 जून 1978ला पुण्यात संघाचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. त्यात ‘झोत’वर जोरदार टीका झाली व संघ कार्यकर्त्यांनी ‘झोत’ पुस्तकाची तेथे होळी केली. संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पुस्तकाच्या विक्रेत्याला व पत्रकारांना मारहाण झाली. पुढे, रावसाहेबांच्या ठिकठिकाणच्या भाषणांतही गोंधळ घातले जाऊ लागले. ‘झोत’ने असे अनेक संघर्ष अंगावर घेत, संघाच्या अंतर्गत विचारात मात्र मोठी खळबळ उडवली. ‘झोत’ने संघ व संघस्वयंसेवक यांना आत्मटीकेला सामोरे जाण्याचा मार्ग सुचवला; तसेच, पुरोगामी प्रवाहातील अनेक संघटना व कार्यकर्ते यांना धर्मशक्तींना सामोरे जाण्याची विचारशिदोरीही पुरवली.
‘झोत’च्या लेखनाला व निर्मितीला पार्श्वभूमी आहे. संघाचा विचार आणि व्यवहार हा अनेकांच्या चिंतनाचा विषय कायम राहिला आहे. ‘समाजवादी युवक दला’ने पुढाकार घेऊन संघाचे खरे रूप जनतेसमोर आणण्याच्या हेतूने संघावर महाराष्ट्रातील विचारवंतांचे लेख असणारे एक पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले होते. त्या पुस्तकासाठी यदुनाथ थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी प्रयत्न करून अनेकांकडून लेखन मागवले, पण अन्य लेखकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने ते पुस्तक प्रकाशित होऊ शकले नाही. रावसाहेब कसबे यांनी त्या पुस्तकासाठी दीर्घ लेख लिहून पाठवला होता. त्या लेखाच्या विस्तारातूनच ‘झोत’ हे पुस्तक आकाराला आले.
‘झोत’चा पहिला दृश्य परिमाण झाला तो म्हणजे, जनता पक्षातील समाजवादी लोक व संघ स्वयंसेवक यांच्यात संघर्ष झडला. तो संघर्ष विकोपाला जाऊन त्याची परिणती म्हणून जनता पक्ष विघटित झाला. गेल्या चाळीस वर्षांत ‘झोत’ पुस्तकाच्या अनेक आवृत्ती निघाल्या, त्याचा विक्रमी खप झाला. त्याची भाषांतरे कानडी, तेलगू, हिंदी आणि इंग्रजी भाषांत झाली.
रावसाहेब कसबे यांनी ‘झोत’मध्ये दाखवून दिले आहे, की संघाचे हिंदुत्व हे वैदिक ब्राह्मण्याचा पुरस्कार करणारे आहे, संघवाले केवळ राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून अस्पृश्य बहुजन हिंदूंना आपलेसे करण्याचा देखावा करतात. त्यामुळे संघाच्या हिंदुत्वाच्या कल्पनेला ऐतिहासिक व सांस्कृतिक अशा दोन्ही अर्थांनी मर्यादा आहेत.
संघाची, विशेषतः गोळवलकरांची श्रद्धा विज्ञानावर नाही, ते भौतिक प्रगतीला गौणत्व देतात आणि तसे करणे गोळवलकरांना क्रमप्राप्त होते असे रावसाहेबांना वाटते. कारण रावसाहेबांच्या मते, “जेव्हा विज्ञानाला आणि समाजवादाला नकार देऊन किंवा गौणत्व देऊन एखादा विचार स्पष्ट करण्याची गरज असते, तेव्हा चैतन्यवादाचा आसरा घेऊन धर्म, परमेश्वर, धर्मग्रंथ इत्यादींना अवास्तव महत्त्व द्यावे लागते.” त्या अर्थाने संघाला सामाजिक अभिसरणही मान्य नाही. पुनर्जन्मावर व त्यावर आधारित कर्मांवर विश्वास ठेवणाऱ्या अनेक गोष्टी संघाकडून पुरस्कृत केल्या जाताना दिसतात. त्यामुळे संघ एकीकडे जसा देशीवादी परंपरांचा अभिमान बाळगतो तसाच दुसरीकडे तरुणांना इतिहासाचे पूजक बनवून त्यांच्या मनात आक्रमक हिंदू राष्ट्रवादाचे बीजारोपण करतो. संघ हे एक सांस्कृतिक संघटन आहे असे सांगत संघाची मंडळी जे राजकारण करतात ते संविधानमूलक नाही असेही रावसाहेबांनी सांगितले आहे.
रावसाहेब कसबे यांना आधुनिक ज्ञान-विज्ञानाला हिंदू जातिवाद्यांचा असणारा विरोध आणि मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांचा विरोध हा एकाच जातकुळीचा वाटतो. रावसाहेबांचे मत अतिरेक्यांना त्यांच्या आत्ममग्नतेने आणि मध्ययुगीन मानसिकतेने निष्क्रिय केले आहे असे आहे. म्हणून रावसाहेबांना या दोन्ही धर्मांमधील परस्परविरोध पाहता संघाने जरी मुस्लिमांसाठी स्वागताची तयारी केली असली तरी मुस्लिम समाज संघात जाईल याची शक्यता दिसत नाही.
रावसाहेबांनी ‘झोत’मध्ये म्हटले आहे, की देशात पुरोगामी चळवळी सुरू होऊन शंभर-दीडशे वर्षें लोटली, पण अजूनही लोकशाही व समाजवादी मूल्यांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रागतिक प्रवाहाने जडवादाचे विज्ञाननिष्ठ आकलन भारतीय तरुणांच्या मनात नीट रुजवलेले नाही. विशेषत: भारतात समाजवादी व कम्युनिस्ट यांच्याकडून भारतीय इतिहासाची भौतिकवादी मीमांसा नीट न झाल्याने गोळवलकरांनी मांडलेला विकृत इतिहास सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. त्यात दोष केवळ गोळवलकरांचा नाही तर समाजवादी व साम्यवादी यांच्या त्या क्षेत्रातील कर्तव्यशून्यतेचाही आहे. रावसाहेब हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या इतिहासाच्या मांडणीची चिकित्सा नीटपणे झाली नाही तर भारतीय समाजजीवनात अनेक गडबडी होतील असा इशारा देतात.
सध्या भारतात राष्ट्रवादाची चर्चा खूप होत आहे. संघाने वर्गीय वर्चस्व आधारित तथाकथित राष्ट्रवाद टिकवण्याचा प्रयत्न केला आहे, पण भारताला सर्वसामान्य माणसाला सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून देणाऱ्या समाजाची निर्मिती करणारा लोकशाही समाजवादी विचारांचा व्यापक राष्ट्रवाद हवा आहे. म्हणून भारतात मानवतावादी राष्ट्रवाद रुजवण्याचा प्रयत्न पुरोगामी प्रवाहांकडून अधिक जोमाने व्हायला हवा. सांस्कृतिक वर्चस्ववादी विचारसरणींना तोंड द्यायचे असेल तर भारतीय संविधानाच्या प्रामाणिक अमलातून धार्मिक राष्ट्रवादाला तोंड द्यावे लागेल असेही रावसाहेबांना वाटते.
रावसाहेबांनी ‘झोत’मधून दलित चळवळीलाही काही मूलभूत इशारे दिले आहेत. रावसाहेबांची भूमिका ऊठसूट ब्राह्मण व्यक्तिद्वेषात न अडकता ब्राह्मणद्वेष आणि ब्राह्मण्यद्वेष यांत फरक केला पाहिजे अशी आहे. रावसाहेब ब्राह्मण कुळातील सर्व व्यक्ती ब्राह्मणी वर्चस्वासाठी धडपडणाऱ्या आहेत असे मानत नाहीत. जन्माने ब्राह्मण असूनही काही माणसे सर्वसामान्य जनतेच्या बाजूने उभे राहून पुरोगामी चळवळींचे नेतृत्व करतात, वेळप्रसंगी तेही हिंदुत्ववाद्यांच्या टीकेचा विषय बनतात, महाराष्ट्रात आगरकरांपासून ते भाई वैद्य यांच्यापर्यंत अशी उदाहरणे सांगता येतील. म्हणून पुरोगामी प्रवाहांनी ब्राह्मणी वर्चस्व टिकवू पाहणारे ब्राह्मण व त्यांच्या आश्रयाने वर्गीय स्वार्थ टिकवणारे काही ब्राह्मणेतर यांच्यात आणि ब्राह्मणी वर्चस्वासहित कोणत्याही वर्चस्वाला नकार देणारे ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात फरक केला नाही तर पुरोगामी चळवळी म्हणजे केवळ जातींचे संघटन बनून त्यात कमालीचे साचलेपण येईल असा धोकाही रावसाहेबांनी व्यक्त केला आहे. रावसाहेब कसबे यांनी चाळीस वर्षांपूर्वी ‘झोत’मध्ये दिलेले इशारे तेवढेच महत्त्वाचे वाटतात, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न तेव्हा समकालीन होते आणि आजही ते तेवढेच टोकदार आहेत.
– मिलिंद कसबे
contact@milindkasbe.com, m.kasbe1971@gmail.com