संगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था

4
36
_Sangamner_Shikshan_Prasarak_1.jpg

‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली गेली. महाराष्ट्र राज्याची स्थापना त्याआधी एकच वर्ष झाली होती. स्वातंत्र्य आणि राष्ट्रभक्ती या संस्कारांनी प्रेरित झालेल्या, ध्येयवेड्या तरुणांचा तो कालखंड! त्या तरुणांच्या डोळ्यांत सामाजिक विकासाची स्वप्ने तरळत होती. सामाजिक बांधिलकीची तशी स्वप्ने उराशी बाळगून प्रवरा नदीच्या कुशीतील काही ध्येयवादी व्यक्तींनी संगमनेरला उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय असावे असे ठरवले. त्या परिसरात विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गैरसोय होती. त्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये शंकरराव गंगाधर जोशी, बी.जे. खताळपाटील, ओंकारनाथ मालपाणी, हिंमतलाल शाह, दत्तात्रय गणपुले, देवकिसन सारडा, दिनकर शेलार, बाबुलाल शाह, द.मा. पिंगळे, मोतीलाल नावंदर हे अग्रणी होते. ती संगमनेरच्या विविध क्षेत्रांतील मंडळी. त्या अपूर्व संगमातून, संगमनेरच्या नवनिर्माणाची आणि सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी घातली गेली.

महाविद्यालयाच्या स्थापनेचे विचार संगमनेरमध्ये सुरू झाले तेव्हा योगायोगाने शहराच्या नगरपालिकेचे शताब्दी वर्ष होते आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मशताब्दी संवत्सरही सुरू होते. त्यामुळे महाविद्यालय स्थापनेच्या विचारास लोकांचाही पाठिंबा लाभला. उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या नवतरुणांच्या आशा-आकांक्षा पल्लवित झाल्या. नगरपालिकेच्या शताब्दी समारंभासाठी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उभारणीचा ठराव झाला.

_Sangamner_Shikshan_Prasarak_2.jpgसंगमनेर परिसरात अनेक विडी कामगार, खाण कामगार, मजूर यांचे प्राबल्य होते. तो काळ सहकाराची मुळे रुजली जाण्याचा होता. महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचाही प्रभाव तालुक्यावर होता. शेजारील अकोले तालुका हा आदिवासीबहुल होता. उच्च शिक्षणाचे केंद्र पुणे, नगर, नाशिक या शहरांत होते. ग्रामीण, आदिवासी आणि कामगार जगतातील मुलांना तेथे जाऊन शिक्षण घेणे परवडणारे नव्हते, ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न तर फारच गंभीर होता. संस्थेची उभारणी काळाची ती गरज ओळखून होत होती! पण प्रश्न होता तो आर्थिक निधीचा. नगरपालिकेने त्यासाठी पुढाकार घेतला. पालिकेने एक लक्षाहून अधिक रुपयांची देणगी संस्थेच्या उभारणीसाठी दिली. संस्थापक सदस्यांनी आणि परिसरातील लोकांनी दातृत्वाचे हात पुढे केले. विडीमजूर, कामगार, हमाल इत्यादी श्रमजीवी वर्गानेही त्यांची एक दिवसाची कमाई – एकूण दहा हजार रुपयांची मिळकत – संस्थेला दान दिली! आणि लोकवर्गणीतून संस्थेचा, संगमनेर महाविद्यालयाचा लोकनिष्ठ, समाजनिष्ठ पाया रोवला गेला. संस्था कष्टाच्या, घामाच्या दामातून उभारत होती. तसे भाग्य जन्मकाळातच प्रसारक संस्थेला लाभले. ते त्या स्वरूपाचे कर्मवीरांच्या ‘रयत’नंतरचे पाऊल असे म्हणता येईल.

संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सर्वस्तरीय समाजाचा अंतर्भाव होता. त्यात डॉक्टर, वकील, शिक्षक, शेतकरी, व्यापारी, कामगार नेते यांचा सहभाग आहे. ते स्वरूप कायम आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी मंडळात निरपेक्षपणे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संस्था राजकारण, अर्थकारण आणि जातीय अभिनिवेश यांपासून मुक्त आणि अलिप्त राहिली आहे. शंकरराव जोशी या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी जी रक्कम लागते त्यासाठी पाचशे रुपये दिले. ते दान मोठे होते. संगमनेर महाविद्यालय जून 1961 मध्ये गावातील एका प्राथमिक शाळेच्या वर्गात सुरू झाले आणि एका ज्ञानयज्ञाचा आरंभ झाला.

संस्थेची घोडदौड संस्थेचे पहिले अध्यक्ष शंकरराव ठाकूर, उपाध्यक्ष बाळासाहेब भारदे, कार्याध्यक्ष हिंमतलाल शाह, सचिव शंकरराव जोशी, खजिनदार ओंकारनाथ मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. श्रीमती सीताबाई ठाकूर यांनी गावातील त्यांची दोन मजली इमारत त्या महाविद्यालयासाठी दिली. तेथे विद्यार्थी भांडार सुरू झाले. कै. लहानुसा यमासा क्षत्रिय यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने नाशिक-पुणे रोडवरील अठरा एकर जमीन दान दिली आणि महाविद्यालय गावातील महामार्गावर एका विस्तीर्ण माळरानावर आले. विज्ञान विभागाची इमारत 1966 साली बस्तीराम जगन्नाथ सारडा यांच्या स्मरणार्थ उभी राहिली. सोनोपंत दांडेकर यांच्या हस्ते त्या इमारतीची कोनशिला बसवली गेली. वाणिज्य विभागाची इमारत 1970 साली दामोदर जगन्नाथ मालपाणी यांच्या मालपाणी परिवाराच्या आर्थिक सहाय्यातून उभी राहिली. अशा रीतीने कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही ज्ञानशाखांमधील शिक्षण तेथे सुरू झाले. त्यात पुढे अनेक नवीन विषय, नवे उपक्रम, अभिनव प्रयोग राबवले गेले. महाविद्यालयाने राबवलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. संस्थेने 1980 च्या दशकात राबवलेल्या Restructuring सारख्या शैक्षणिक उपक्रमाची दखल पुढे ‘नॅक’ या संस्थेनेही घेतली. आज केंद्र सरकार कौशल्याधिष्ठित व परिसराच्या गरजा लक्षात घेऊन दिल्या जाणाऱ्या शिक्षणासंबंधी जो विचार करत आहे, तो प्रयोग तेथे ‘मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठा’च्या माध्यमातून कल्पकतेने पूर्वीच राबवला गेला आहे. अनेक नामवंत मंडळी तो प्रयोग आणि खुद्द महाविद्यालय पाहण्यासाठी महाविद्यालयात येऊन गेली. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून संगमनेर महाविद्यालयाचा लौकिक वाढला. अल्पावधीतच एक प्रगतीशील संस्था म्हणून महाविद्यालय नावारूपाला आले. मुद्दाम नमूद करावी अशी गोष्ट म्हणजे त्या संस्थेच्या महाविद्यालयातील पहिले प्राचार्य म.वि. कौंडिण्य यांची तेहतीस वर्षांची यशस्वी कारकीर्द तेथे घडली. त्यांनी संस्थेला स्वत:चा चेहरा प्राप्त करून दिला; अनेक उपक्रम आणि प्रयोग राबवून संस्थेला सक्रिय ठेवले. त्यांनी सामाजिक आणि नैतिक भान जपले व ते विशेष नावाजले गेले. नीतिमान संस्थाच गतिमान आणि लोकमानसात टिकून राहू शकतात. महाराष्ट्रात तशा होती शिक्षण संस्था हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच आहेत आणि त्यातही spread knowledge unto the last  या विचाराने प्रेरित झालेली तशी संस्था विरळाच!

_Sangamner_Shikshan_Prasarak_4.jpgकौंडिण्यसरांच्या बरोबरीने जवळपास ऐंशीहून अधिक प्राध्यापकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतः अध्यापनाखेरीज महाविद्यालयाच्या उभारणीसाठी, विकासासाठी विविध स्वरूपाची कामे केली आहेत. श्रमदान तर सर्वांनीच केले. महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण- संगोपनासाठी दत्तक झाड योजना, क्रीडांगण, राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत समाजोपयोगी कामे, मजुरांसाठी घरकुलाचे, वसाहतींचे स्वप्न… अशी कितीतरी कामे! सु.रा. चुनेकर, प्रा. सुधाकर कलावडे, डी.एम.देशमुख, एम.बी.सहस्त्रबुद्धे, डी.डी. काळे, बी.व्ही. जोशी, एच.आर. देवचके, एम.एम. देशमुख, अनिल देवधर, डी.आर. महाजन, एम.एल. अंत्रे, एस.टी. शेवंते, पी.बी.भोलाणे, एस.डी. माळवदकर, भगवान जोशी, मा.रा.लामखडे, पी.एम. कमलापूर, माधव देशमुख, दिलीप धर्म, पी.टी.कुलकर्णी, व्ही.एस. पाटील अशा अनेक प्राध्यापक मंडळींचा त्यात समावेश होता. बुद्धी, प्रतिभा, समाजसेवा आणि कला याला अधिक उत्तेजन आणि मुक्त अवसर मिळत होता. संगमनेर महाविद्यालय हे नाट्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरुषोत्तम करंडक पटकावणारे ग्रामीण भागातील पहिले! महाविद्यालयीन रंगभूमीची यशस्वी कारकीर्द महाविद्यालात घडली. प्राध्यापकांचे दोन गट त्यांची त्यांची नाटके बसवत. त्यासाठी निखळ स्पर्धा असे. नाटके पाहण्यासाठी गाव लोटे. महाविद्यालयीन रंगभूमीवर फिरत्या रंगमंचाचा यशस्वी आणि कल्पक प्रयोग तेथे करण्यात आला. कलेचे, लेखनाचे विविधांगी संस्कार विद्यार्थ्यांवर होत होते आणि लेखक तेथे घडत होते. रंगनाथ पठारे, रावसाहेब कसबे, डॉ. अलीम वकील यांची लेखनाची कारकीर्द तेथेच सुरू झाली. पद्मभूषण देशपांडे यांच्यासारखे यशस्वी संपादक/कार्यकर्ते, प्रा. एस.झेड. देशमुख यांच्यासारखे प्रभावी वक्ते, सदाशिव थोरात यांच्यासारखे जलतरणपटू, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे राजकीय नेतृत्व, भगवंतराव मोरे यांच्यासारखे पोलिस महानिरीक्षक, कथाकथनकार रेखा मुंदडा अशी काही नावे सांगता येतील.

महाविद्यालयात अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली. कल्याणजी आनंदजी, नर्गिस, राज कपूर यांनी महाविद्यालयाच्या कलामंडळाचे उद्घाटन केले. माजी पंतप्रधान चंद्रशेखरही येथे येऊन गेले. कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर यांचा तर या महाविद्यालयावर, विशेषत: कौडिण्यसरांवर विशेष लोभ होता. तेथे तेंडुलकरांनी अनौपचारिकपणे नाट्यवाचन केले तर ना.धों. महानोर यांच्या कवितेची मैफल तेथेच रंगली. विंदा-पाडगावकर आणि बापट यांच्या कवितांचा कार्यक्रम तेथेही झाला. अनेकजण त्या आठवणी जागवतात. पु.ल. देशपांडे यांनी महाविद्यालयास बारा लाख रुपयांची देणगी दिली.

प्राचार्य कौंडिण्य 1991 नंतर निवृत्त झाले, त्यानंतर महाविद्यालयाचे प्रशासकीय नेतृत्व प्राचार्य सुभाषचंद्र माळवदकर यांनी केले. कार्याध्यक्ष ओंकारनाथ मालपाणी यांच्या संकल्पनेतून अनेक योजना, नवीन अभ्यासक्रम सुरू झाले. त्यांनी लॉ कॉलेजला योगा आरंभ करून दिला आणि निसर्गोपचार अभ्यासक्रम सुरू झाला. महाविद्यालयात तो अभ्यासक्रम पूर्ण केलेले पन्नासहून अधिक विद्यार्थी परदेशात योग-निसर्गोपचार ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. प्राचार्य केशवराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाचा शैक्षणिक प्रवास 2002 पासून सुरू झाला. त्या काळात विद्यापीठाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरवण्यात आले.

_Sangamner_Shikshan_Prasarak_3.jpgसंजय मालपाणी यांच्याकडे 2005 पासून शिक्षण प्रसारक संस्थेची धुरा आली. त्यांच्या नव्या टीमकडून सचिव अनिल राठी, नारायण कलंत्री, बिहारीलाल डंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यामुळे संस्थेने पुन्हा यशाची घोडदौड केली. ‘म.वि. कौंडिण्य स्मृती संशोधन पुरस्कार’; तसेच, स्वाभिमान कोश, विद्याधन कलश, फाइव्ह एस (5 S) ही अभिनव योजना – प्रशासकीय कामाचे सुनियोजित व्यवस्थापन करणारी जपानी संकल्पना – सर्व विभागात व प्रशासनात राबवली. संस्थेने शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी आर्थिक प्रतिकूलतेमुळे वंचित राहू नये ही काळजी नेहमीच घेतली. गरीब होतकरू मुलांना एक रुपयात प्रवेश महाविद्यालयाने आरंभी दिला. तोच वसा आणि वारसा ‘विद्याधन कलश योजने’च्या माध्यमातून जोपासला जात आहे. संस्थेने स्वनिधी उभारून गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली. विद्यार्थ्यांनी मदतनिधीची परतफेड ते अर्थार्जन करू लागल्यानंतर करायची अशी ही अभिनव योजना आहे. मागेल त्याला काम, ही स्वावलंबनाची व श्रमनिष्ठेची प्रेरणा देणारी योजना महाविद्यालयात शासनाच्या मदतीशिवाय राबवली जाते.

संस्थेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोक एकही पैसा न देता केवळ गुणवत्तेच्या निकषावर काम करत आहेत. ते कशामुळे घडले? तर या संस्थेचा आदर्श विचार, आचार आणि लोकाभिमुख वृत्ती यांमुळे! संस्थेच्या महाविद्यालयातून शिकलेले अनेक विद्यार्थी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. ते या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. संस्थेने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला भरीव योगदान दिले आहे. म्हणूनच ती संस्था म्हणजे केवळ शिक्षण देणारे केंद्र नाही, तर संगमनेरवासीयांच्या सांस्कृतिक अस्मितेचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. पन्नास एकराच्या विस्तीर्ण परिसरात, लॉ कॉलेज, बीएड-डीएड महाविद्यालये, मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ आणि कौशल्याधिष्ठित विविध अभ्यासक्रम, योग व निसर्गोपचार केंद्र असे विविध उपक्रम आणि प्रयोगशीलता अग्रेसर आहे. विद्यापीठ आणि ‘नॅक’ या संस्थेने सर्वोत्तम A+ श्रेणी देऊन महाविद्यालयाचा आणि संस्थेचा गौरव केला आहे. भव्य क्रीडांगण, समृद्ध ग्रंथालय, सेवकांची पतसंस्था, तंत्र विद्यानिकेतन, मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह या सुविधांबरोबरच जवळपास तीस स्वतंत्र इमारती शैक्षणिक संकुलात दिमाखाने उभ्या आहेत. पाच हजारांहून अधिक वृक्षांच्या छत्रछायेखाली आणि निसर्गरम्य वातावरणात आठ हजारांहून अधिक ग्रामीण विद्यार्थी संस्थेत त्यांचे भवितव्य घडवत आहेत. संगमनेर महाविद्यालय सुवर्णमहोत्सव साजरा करून हीरक महोत्सवाकडे झेपावत आहे.

– अशोक लिंबेकर ९३२६८९१५६७, ashlimbekar99@gmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. I am the former student of…
    I am the former student of this college from 11 to PG .This collage gives me a lot of knowledge. I will say this college’s progress to go ahead and become better college .

  2. अभिनंदन डॉ लिम्बेकर सर…
    अभिनंदन डॉ लिम्बेकर सर अप्रतिम लेखन । शिक्षण प्रसारक संस्था ही विद्यार्थी केंद्री उच्च गुणवत्ता प्रदान करणारी शैक्षणिक संस्था आहे या संस्थेच्या व कार्याध्यक्ष डॉ संजय मालपाणी यांच्या अभिनव उपक्रमां मुळे शिक्षण प्रसारकसंस्था संपूर्ण महाराष्ट्रात नवनवे शैक्षणिक आदर्श निर्माण करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here