“मी कोणत्याही कलेची साधना ही देवपूजाच मानतो” असं म्हणणारे श्रीधर फडके हे नव्या पिढीतील प्रज्ञावंत, प्रतिभावंत, अग्रगण्य संगीतकार व गायक आहेत. प्रख्यात गायक व संगीतकार कै. सुधीर फडके यांचे ते चिरंजीव. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी अतिशय जाणीवपूर्वक आत्मसात केली असली, तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृद्ध वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी त्यांचा गाण्याशी संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं. मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून ‘फिजिक्स’ व ‘इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेत. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व ‘देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी…’ या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे श्रीधर फडके यांनी चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर हा अभंग गायला. ‘हा आपल्या आयुष्यातील जपावासा वाटलेला क्षण’ असं श्रीधर फडके म्हणतात.
“फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश” (चित्रपट – लक्ष्मीची पाऊले) हे गीत त्यांनी लावलेल्या चालीमुळे लोकप्रिय झालं. सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत ’बाबुजी’ (सुधीर फडके) व आशा भोसले यांनी गायलं होतं.
संगीत हा श्रीधर फडके यांचा व्यवसाय नसल्यानं त्यांनी कधीही तडजोड केली नाही. सवंगपणाला बळी पडून त्यांनी कधी रतीब घातला नाही किंवा चालींच्या जिलब्या पाडल्या नाहीत. त्यांना कवितेची सखोल जाण आहे.‘मन मनास उमगत नाही’ ही ग्रेस यांची कविता. पहिल्या चार ओळींना चाल लावली. त्यांना पण पुढील ओळींचा अर्थ उमगेना. तेव्हा त्यांनी आपल्या चालीचं घोडं तसंच पुढे दामटलं नाही, तर त्यांच्या आवडत्या कवींपैकी एक असलेले सुधीर मोघे यांना आपली अडचण सांगून चाल लावलेल्या ओळी ऐकवल्या आणि ‘तुम्हाला या ओळींच्या आधारे काही सुचलं तर पाहा’ असं सुचवलं. मोघे सिद्धहस्त कवी, त्यांनी श्रीधर फडके यांची विनंती मान्य केली व पुढील ओळी लिहून दिल्या –
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा
आधार कसा शोधावा
मन मनास उमगत नाही.
श्रीधर फडके यांच्या तळमळीला मोघे यांनी सृजनात्मक प्रतिसाद दिल्यानं एका सुरेल गीताचा जन्म झाला.
कवितेवर असं कलम करून घेण्याची किमया श्रीधर फडके यांनी आणखी एकदा घडवून आणली. वैद्य यांच्या पुढील ओळी श्रीधर फडकें यांना फार भावल्या. त्या अशा…
कुठे जातात भेटून
कशा होतात ओळखी
आणि आपली माणसे
कशी होतात पारखी
या ओळीदेखील फडके यांनी सुधीर मोघे यांना ऐकवल्या व पुढील ओळी लिहून देण्याची विनंती केली. त्यानुसार, मोघे यांनी पुढील ओळी रचल्या…
कुण्या देशाचे पाखरू
माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेशी
परी ओळखीचे डोळे
श्रीधर फडके यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्या अनेक चाली रागांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, ओंकार स्वरूपा (बैरागी भैरवी), ऋतू हिरवा (चारुकेशी), फिटे अंधाराचे जाळे (मिश्र भैरवी), सांज ये गोकुळी (पूर्वाकल्याण व यमनकल्याण), मी राधिका, मी प्रेमिका (मधुकंस)…
एखादं गाणं आवडलं, की चाल लावण्यासाठी झगडणं काही तासांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असू शकतं असं श्रीधर फडके म्हणतात. ‘मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद’ या एकनाथांच्या अभंगाला बरोबर चाल सुचायला सहा महिने लागले. एकदा तर गंमतच झाली. कविवर्य ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ या कवितेला चाल लावायची होती. त्या दिवशी ते पुण्यात होते, पण दिवसभरात काही सुचलं नाही, पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास चाल मनात दाटून आली. ती हरवू नये, सांडू नये म्हणून श्रीधर फडके ती चाल मुंबईला पोचेपर्यंत गुणगुणत आले. प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते असं सांगून फडके म्हणतात, “अंतरा व मुखडा या प्रमाणे त्यांतील नि:शब्द जागाही एकाच लयीत गुंफणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्रुटी राहिली तर छोट्या तुकड्या तुकड्यात गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबुजींकडून शिकलो.”
श्रीधर फडके यांनी सतरा ध्वनिफितींचे दिग्दर्शन केले आहे. त्यांपैकी मनाचे श्लोक, ओंकार स्वरूपा, अवघा विठ्ठलु, ऋतू हिरवा या ध्वनिफिती/ सीडीज यशस्वी झाल्या, त्याबद्दल त्यांना ‘प्लॅटिनम डिस्क’ प्रदान करण्यात आली. स्वत:चं खास तंत्र व गायनशैली विकसित केलेल्या श्रीधर फडके यांनी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, विराण्या, गजल, नाट्यसंगीताचा बाज असलेली गाणी असे अनेक प्रकार लीलया सादर केले आहेत. ते गीतातील शब्द व भाव प्रासादिक स्वररचनांमधून सादर करतात, तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होतात. ‘नव्या पिढीतील श्रीधर फडके हे एक चांगले संगीतकार आहेत’ या शब्दांत प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी त्यांचा गौरव केला आहे, तर “त्यांनी स्वत: स्वरांचे सिंहासन तयार केले आहे”, अशी प्रशंसा संगीतकार यशवंत देव यांनी केली आहे. ‘मितभाषी, निगर्वी, शालीन असलेले फडके हे सुसंस्कृत, सभ्य, सद्गुुुुणी कलावंत आहेत’ असं अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या प्रतिभेचा ‘ऋतू हिरवा’ असाच बहरत राहो असंच त्यांच्या लाखो चाहत्यांना वाटेल.
– अशोक जैन
श्रीधरफडके
नाव : श्रीधर सुधीर फडके
जन्मदिनांक : 9 सप्टेंबर, 1950
नोकरी : विमान कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी (निवृत्त)
शिक्षण : एम. एस्सी. (मुंबई) , एम. एस. (न्यूयॉर्क)
पत्ता : 1/11, अनिरुद्ध को.ऑप.हौसिंग सोसायटी, अनंत वामन वर्तक मार्ग, विलेपार्ले (पू.), मुंबई – 400 057
फोन : 9821413960
कामगिरी : अठरा मराठी चित्रपटांचे व एका हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन, तीन मराठी व अकरा गुजराथी नाटकांचे व पाच दूरदर्शन मालिकांचे संगीत दिग्दर्शन.
मिळालेले पुरस्कार
1. ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटाच्या संगीत-दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून
फिल्मफेअर पारितोषिक – 1995
2. ‘पुत्रवती’ या चित्रपटाच्या संगीत-दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून
फिल्मफेअर पारितोषिक – 1997
3. ‘लेकरू’ या चित्रपटाच्या संगीत-दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून
फिल्मफेअर पारितोषिक – 1999
4. ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटाच्या संगीत-दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून
5. कालनिर्णय पारितोषिक – 1995
6. मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनी चा ‘स्वररत्न’ पुरस्कार – 2005
yancha program mi atten. kela
yancha program mi atten. kela aahe, ekdam mast….
Hats off to this artist.
Hats off to this artist.
Comments are closed.