श्रीकांत पेटकर यांचे बेहोष जगणे

7
60
_Shrikant_Petkar_1.jpg

“अहो, आज ना आमच्या घरी नवरात्री ची पूजा आहे. मी कुमारिका मुलींना जेवू घालणार आहे. तुम्ही तुमच्या मुलीला पाठवा आमच्या घरी जेवायला.”

“अहो, मी माझ्या मुलीला दोन वेळचे जेवण व्यवस्थित देऊ शकतो. तुम्हाला जेवूच घालायचे असेल तर रस्त्यावरच्या मुलामुलींना जेवू घाला ना.” ‘तो माणूस’ म्हणाला.

कोणीही माणूस त्याच्याकडे दोन पाहुणे जेवायला म्हणून आले तर तो त्यांना ‘अजून थोडी पोळी घ्या, थोडी भाजी घ्या’ असा आग्रह करतो. पण तीच पद्धत जर ‘त्या माणसा’च्या बायकोने अवलंबली तर ‘त्या माणसा’ला राग येतो. अशा वेळी ‘तो माणूस’ म्हणतो “अगं, तो घेईल ना त्याला पाहिजे तेवढे. तू कशाला त्याला सांगायला पाहिजे?”

एकदा, ‘त्या माणसा’ला त्याच्या मित्राकडे गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जायचे होते. रस्त्यात बायको म्हणाली, “अहो, जरा थांबा ना! आपण एक चांगलंसं गिफ्ट घेऊया त्यांना!”

त्यावर ‘तो माणूस’ म्हणतो, “अगं, मी काय राजा-महाराजा आहे का त्याला त्याच्या घरी गेल्यावर नजराणा पेश करायला?”

हे प्रसंग वाचले तर ‘त्या माणसा’चे वागणे विक्षिप्तपणाचे वाटेल. कोणीही ‘त्या व्यक्ती’शी माझे जुळणार नाही’ असे म्हणेल. मात्र अशी ही दुर्मीळ स्वभाववृत्ती असलेला ‘तो माणूस’ व्यावसायिक पातळीवर आणि सामाजिक उपक्रमांच्या बाबतीत आघाडीवर आहे. एवढेच नव्हे तर, त्याने जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी अशा सर्वत्र स्तुत्य उपक्रमांचे पायंडे पाडले आहेत. त्या माणसाचे नाव आहे श्रीकांत बापुराव पेटकर. पेटकर हे व्यवसायाने इंजिनीयर आहेत. ते ‘महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी’मध्ये (पूर्वीचे ‘म. रा.वि.मं’). कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत.

पेटकरसरांची आणि माझी ओळख १९९९ पासूनची. त्यावेळी पेटकर रोहा येथे तर मी महाड येथे कार्यरत होतो. आम्हाला विजेची मागणी अधिक, मात्र उत्पादन कमी अशा स्थितीमुळे लोड शेडिंग करावे लागे. एका समाजकंटकाने त्याविरूद्ध पेटकरांना मारहाण केली. पेटकरांनी जराही न डगमगता सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली . त्यांनी ती तक्रार मागे घ्यावी म्हणून काही लोकांनी रास्ता रोको केले, पेटकर त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्यामागे वीज कर्मचारी व अधिकारी यांची संघटना उभी होती. अखेर, त्या अपराध्याला शिक्षा झालीच!

ग्राहकाला वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर वीज कार्यालयात वारंवार खेपा घालाव्या लागत. ग्राहकाला वीज कनेक्शन मंजुरी झाली की नाही हे समजण्याचा मार्ग त्याशिवाय नव्हता. पेटकर संबंधित ग्राहकास पोस्टकार्डाद्वारे ‘वीज कनेक्शन मंजूर झाले’ असे कळवत. ते तसे एकमेव अभियंता होते. शेती पंपांनी किती वीज वापर केला हे समजण्यासाठी वीज मीटर हवेत. वीज मंडळ मीटर उपलब्ध नसल्यामुळे शेती पंपांना मीटर लावले जात नव्हते. पेटकर यांनी जुने मीटर दुरुस्त करून शेती पंपांना वीज मीटर लावले. त्याचा परिणाम असा झाला, की शेती पंपधारक वीज जपून वापरू लागले; विजेच्या गैरवापराला आळा बसला.

पेटकरांची बदली पदोन्नतीवर जांभूळ येथे झाली. पेटकरांना जांभूळ येथे तीन शिफ्टमध्ये काम असे. त्यामुळे पेटकरांना वेळ मोकळा मिळू लागला. त्यांनी लिखाणाचा छंद जोपासला. त्यांनी पहिले पुस्तक ‘… आणि मी बौद्ध झालो’ हे लिहिले. ते अनुवादित आहे. त्यांनी भारतातील पहिले मॅजिक लँटर्न निर्माता कल्याणचे पटवर्धन बंधू यांच्यासंबंधी ‘शांबरिका खरोलिका’ हे पुस्तक लिहिले.

_Shrikant_Petkar_2.jpgपेटकर कल्याण येथे राहतात. त्या परिसराचे ऐतिहासिक वैभव मोठे आहे. पेटकरांनी कल्याणचा ऐतिहासिक मागोवा घेणारे ‘कल्याण’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी लिहिलेला ‘बेहोशीतच जगणे असते’ हा कवितासंग्रहही लोकप्रिय आहे.

पेटकर चित्रकार आहेत. ते माहितीचा अधिकार कसा वापरावा या बाबतीत योग्य मार्गदर्शन करतात. त्यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती घेऊन ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या कल्याणमधील ATM चा पारदर्शक दरवाजा सुरक्षिततेच्या मुद्यावरून सुधारून घेतला. पेटकरांनी कल्याणमधील एका मैदानावर अतिक्रमण होण्यास विरोध केला होता. त्यांनी आजुबाजूच्या रहिवाशांना सोबत घेऊन, त्या घटनेचा पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा केला आणि मैदानावरील अनधिकृत बांधकाम बंद पाडून मुलांचे खेळण्याचे मैदान वाचवले.

श्रीकांत पेटकर ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलसोबत काम करतात. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या सोलापूर, नाशिक, कल्याण अशा माहितीसंकलन मोहिमांमध्ये सक्रिय होते. त्यांनी केलेले लेखन ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध आहे.

ठाणे जिल्ह्यातील वाशाला हे वीज मंडळाचे उपकेंद्र दुर्गम भागात आहे. पेटकरांनी स्वत: तेथे नियुक्ती करून घेतली. त्यांनी तेथे घडवलेली सुधारणा अशी, की त्या उपकेंद्रास ‘उत्कृष्ट उपकेंद्रा’चा पुरस्कार मिळाला! MEDA ही संस्था ऊर्जा बचत करणाऱ्यांना स्पर्धेद्वारे सन्मानित करते. पेटकर त्या स्पर्धेत सर्वानी भाग घ्यावा असा आग्रह नेहमी करतात. स्वतः पेटकर यांनी त्या स्पर्धेत भाग घेऊन त्यांच्या उपकेंद्रास मानांकन मिळवून दिले.

पेटकर वेळ आणि त्या वेळेत केले जाणारे काम याबाबत विलक्षण आग्रही आणि काटेकोर आहेत. ते म्हणतात, “आपण ऑफिसमध्ये काम करण्याला येतो. तेव्हा तो वेळ फक्त ऑफिसला द्या.”

पेटकर सांगतात, की शासकीय कार्यालयात सत्यनारायणाची पूजा घालणे असंविधानिक आहे. ते त्या प्रकाराला विरोध करतात. त्यांनी त्यांच्या कल्याण तालुक्यातील कार्यालयात सत्यनारायणाच्या पूजेचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला प्रघात प्रयत्नपूर्वक बंद पाडला. पेटकर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण ऑफिसांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरे करतात.

पेटकर त्यांच्या बौद्ध बांधवानी इतर धर्मीयांप्रमाणे लग्न व सण वार साजरे केल्यास त्यांना ते खडसावून जाब विचारतात. पेटकरांचे विचार इतके धारदार आहेत, की कधी कधी त्यांची धार नातेसंबंधास इजाही करून जाते.

पेटकर यांनी ‘अनुभूती’ नावाचा उपक्रम कार्यालयात सुरू केला. त्या उपक्रमात जाणकार व्यक्ती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक माहिती पुरवत असत. कर्मचाऱ्यांना त्या ज्ञानाचा उपयोग कार्यालयीन कामकाजात होऊ लागला. काहींच्या ज्ञानात भर पडली . तर काहींना ते माहीत होते पण कालांतराने, त्या ज्ञानावर काळाची बुरशी चढली होती ती दूर झाली, ती या अनुभूती या उपक्रमामुळेच.

_Shrikant_Petkar_3_0.jpgपेटकरांचे विचार परखड आहेत. ते प्रथम क्षणी कोणालाही न पटणारे असतात. पेटकर वैचारिक पातळीवर आग्रही असले तरी त्यांचा स्वभाव मनमोकळा आहे. पेटकर यांनी व्हॉट्सअॅपचे उपयुक्त ग्रूप्स तयार केले आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या ‘गुड थॉट्स’ नावाच्या ग्रूपवर कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने वेगळे किंवा चांगले काम केले, त्यासाठी वेगळी पद्धत अवलंबली तर ती घटना प्रसारित केली जाते. ते व्यवसायात – नोकरीत यशस्वी आहेत आणि उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचा लिखाणाचा छंद सातत्याने जोपासला आहे. त्यांनी त्यातून कथा, कविता, चारोळ्या, लेख असे साहित्य निर्माण केले. पेटकर खऱ्या अर्थाने बहुगुणी आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे उत्तम अधिकारी, कलाकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, छांदिष्ट असे अनेक पैलू सांगता येतात. अशा बहुआयामी श्रीकांत पेटकर यांना ‘कल्याण रत्न’ हा पुरस्कार देऊन ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ पक्षाकडून सन्मानित करण्यात आले.

पेटकर त्यांचे विचार कायम आग्रहाने, त्यांच्या शैलीत मांडतात. ते स्वत:च्या कामाच्या विचारांच्या आणि कलाकृतींच्या बेहोशीत जगत असतात. त्यांनी लिहिलेली एक काव्यपंक्ती त्यांना स्वत:लाच साजेशी अशी आहे.

म्हणू दे सारे जग तुम्हा वेडे
ध्येयापुढे चला, पाऊल ना पडो वाकडे
जगच येईल घेऊन नगारे, चौघडे
चारचौघांचे भले व्हावे यात बेहोष
या बेहोशीतच जगणे असते !

या बेहोशीतच जगणे असते!

श्रीकांत पेटकर – 9769213913
– मनोहर बागले

About Post Author

7 COMMENTS

  1. खुप सूंदर,प्रेरणा देणारे।सर…
    खुप सूंदर,प्रेरणा देणारे।सर श्यासकीय काम करताना एकदा पाट पानी वाटपा वरुण एकदा एक कार्यर्कर्ता अंगा वर अला होता मी त्याच्या kanakhali वजवाली।पण मला बदली ला सामोरे जावे लागले।वरिस्तानि दखल घेतली नहीं।मात्र संघटना पाठी होती।महाराष्ट्र भर काळ्या फीती लावल्या होत्या।pudharyane इज्ज़ती च्या भेवाने केस न करता वारिस्ता कड़े तकरार केलि।हे ऎसे चालूच असते।

  2. खुपच छान सर कामाव्यतीरिक्त…
    खुपच छान सर कामाव्यतीरिक्त वेळ काढुन लेखणी हातात घेवुन कथा,कविता लिहीता खरंतर सर तुम्ही एक लेखक ,कवी म्हणूनही जी भुमिका पार पाडता आहात तुम्हाला सलाम.

  3. श्रीकांत पेटकर सर हे सामाजिक…
    श्रीकांत पेटकर सर हे सामाजिक तळमळ असणारे असामान्य, अष्टपैलू तसेच माणसातील माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व आहे.

  4. JAIBHIM Dear, your thought …
    JAIBHIM Dear, your thought are inspiring & enerzising the commonners to work in different ways in every walks of life, You have started a small library in office & introduced a different pattern of identifying the file by using the blue color paper for STU. CONGRATS once again, for your deeds are for the betterment of system, society & culture.

  5. खुप छान माहिती मनोहर बागड़े…
    खुप छान माहिती मनोहर बागड़े यांनी तुमचे बद्दल लिहिली आहे .
    प्लास्टिक निर्मूलन तसेच दुष्काळ ग्रस्त गांवांना पाणीपुरवठा करने हे खुप वेगळे ,स्तुत्य ,चांगले उपक्रम तुम्ही राबवलेले
    आहेत,
    अभिनंदन ?? तुमच्या कार्यासाठी अप्रतिम लिखाना
    साठी असेच पुरस्कार मिळावे अशी सदिच्छा ?????????

Comments are closed.